श्‍वास आणि नाम : नाम श्‍वासाला जोडणे

भावार्थ : आपण श्‍वासामुळे जिवंत असतो, नामामुळे नाही; म्हणून श्‍वासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असते आणि म्हणूनच नाम श्‍वासाला जोडायचे असते. श्‍वास नामाला जोडायचा नसतो. – सनातनचे श्रद्धास्थान संत भक्‍तराज

फकीरकी लकीर और लकीरका फकीर ।

भावार्थ : ‘फकीरकी लकीर’ म्हणजे फकीराची ललकारी, म्हणजे शिष्य. हाच पुढे ‘लकीरका फकीर’ म्हणजे ‘शिष्याचा गुरु’ होतो. लकीर (ललकारी) आणि फकीर यांच्यात जसे अद्वैत असते, तसेच पुढे गुरु-शिष्यात अद्वैत होते. – सनातनचे श्रद्धास्थान संत भक्‍तराज

सद्‍गुरुनाथा तू अपराधी । तुझेच अपराध घे पदरात ।।

भावार्थ : सद्‍गुरूंना शिष्याने एकदा सर्वस्व अर्पण केले की, शिष्याचे स्वतःचे असे काही उरत नाही; म्हणून अशा शिष्याच्या शरिराने किंवा मनाने काही चुका झाल्या, तर त्या एकप्रकारे गुरूंच्याच ठरतात ! गुरुच अपराधी ठरतात ! – सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्‍तराज महाराज

पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे अध्यात्म आहे म्हणजे काय ?

‘एखाद्याचे अक्षर सुंदर आहे, हे डोळ्यांना दिसते, ते मनाला आवडते. आवडण्याचे कारण ‘अक्षर सुंदर आहे’, हे बुद्धीला कळते. याउलट पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे गेलेल्यांना सूक्ष्मातील स्पंदने कळतात. त्यामुळे त्यांना संतांचे अक्षर चांगले नसले, त्यांनी वेड्यावाकड्या रेखाट्या ओढल्या, तरी त्यांत चैतन्य असल्याचे जाणवते; म्हणून ‘ते चांगले आहे’, असे ते म्हणतात.’ – डॉ. आठवले (२४.६.२००७)