अहेर करणे

अहेर हळद-कुंकू लावून देणे
अहेर हळद-कुंकू लावून देणे

विवाह, मौजीबंधन, गृहप्रवेश इत्यादी प्रसंगी अहेर करण्याची पद्धत आहे. अहेर करणारी व्यक्ती भावनिक स्थितीत आणि लोकेषणेपायी महागड्या वस्तू अहेर म्हणून देतात. अहेर या संकल्पनेविषयी आपण जर शास्त्रीय भाषेत समजून घेतले, तर अनाठायी होणारा व्यय थांबवू शकतो.

‘अहेर’ या शब्दाचा अर्थ

‘अहेर’ म्हणजे हिरावून न घेता येणारी गोष्ट.

अहेर कसा असावा ?

आजकाल मोठमोठ्या महागड्या वस्तू भेट म्हणून देणे, यालाच अहेर समजतात; पण खरे पहाता हे भावनेपोटी केलेले कर्म आहे. अहेर हा दुसर्‍या जिवाच्या आध्यात्मिक उन्नतीस पोषक असणारा, असा असावा. ईश्वरप्राप्तीसाठी साधना शिकवणारे ग्रंथ, देवतांप्रती भक्तीभाव वाढवणारी देवतांची सात्त्विक चित्रे आणि नामपट्ट्या, ही अशा प्रकारच्या अहेरची काही उदाहरणे होत.

 

अहेर करतांना भाव कसा असावा ?

आजकाल अहेर करतांना बडेजावपणा दाखवला जातो. हे अयोग्य आहे. अहेर अहंरहित आणि निरपेक्ष भावनेने द्यायचा असतो. तसे न दिल्यास देवाण-घेवाण निर्माण होतो. अहेर स्वीकारणार्‍या जिवानेही ‘अहेर म्हणजे ईश्वराकडून मिळालेला वस्तूरूपी प्रसाद आहे’, असा भाव ठेवायचा असतो.

अहेर करतांना द्यावयाच्या वस्तूला हळद-कुंकू का लावतात ?

अहेर म्हणून द्यावयाच्या वस्तूला हळद-कुंकू लावल्यामुळे हळद-कुंकवाकडे ब्रह्मांडातील कार्यरत ईश्वरी चैतन्याच्या लहरी आकृष्ट होतात. यामुळे भेटवस्तूबरोबरच जिवाला या चैतन्याचा लाभ होण्यासही साहाय्य होते.

सर्वोच्च अहेर कोणता आणि तो कोण देऊ शकतो ?

संत साधिकेला साधनेत प्रगती केल्यावर भेट देतांना
संत साधिकेला साधनेत प्रगती केल्यावर भेट देतांना

ईश्वर हाच सर्वोच्च दाता आहे; म्हणून ईश्वराचे साक्षात सगुण रूप, म्हणजेच संत किंवा गुरु यांनाच केवळ अहेर करण्याचा अधिकार असतो. गुरु शिष्याची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती करून घेतात. गुरूंनी शिकवलेली साधनाच केवळ कुणालाही हिरावून घेता येत नाही; कारण साधना करणार्‍याच्या मागे गुरुकृपेचे म्हणजेच ईश्वरी कृपेचे छत्र असते. साधना करण्याची संधी मिळणे आणि ईश्वरी कृपा होणे, हाच जिवाला ईश्वराकडून मिळालेला सर्वोच्च अहेर आहे. जिवाने अहेर देणार्‍या ईश्वररूपी संतांपुढे ‘याचक’ व्हायचे असते. ईश्वराच्या चरणी सतत शरणागत असणारा तो याचक. संतांच्या अहेराला पात्र होणे, म्हणजेच ईश्वरप्राप्तीसाठी लायक होणे, हाच खरा ‘शिष्यधर्म’ आहे.

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र’

Leave a Comment