आषाढी एकादशी 2024 आणि पंढरपूरची वारी

Article also available in :

आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी ! वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. या वर्षी आषाढी एकादशी १७ जुलै २०२४ ला आहे. आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची)’ आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात.

कोणत्या तरी विशिष्ट वारीला, तिथीला अथवा कोणत्या तरी मासात विशिष्ट देवतांची स्पंदने पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असतात. तो काळ त्या देवतेचा काळ मानला जातो, उदा. श्रीविष्णूची एकादशी. वर्षभरात २४ वेळा येणार्‍या एकादशींच्या तुलनेत आषाढ आणि कार्तिक मासांतील शुक्लपक्षात येणार्‍या एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या दोन एकादशींचे महत्त्व अधिक आहे. आषाढी एकादशी या व्रतामागील इतिहास आणि तिचे महत्त्व खालील लेखातून जाणून घेऊया.

संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी या ग्रंथाची निर्मिती करून समाजात भागवत धर्माची स्थापना केली आणि समाजात भागवत धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी नामदिंडीची, अर्थात् पंढरीच्या वारीची प्रथा चालू केली.

आषाढी एकादशी इतिहास

पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्तीदेवी, तीच एकादशी देवता आहे.

एकादशीचे व्रत कसे करावे ?

एकादशीच्या दिवशी सर्व प्राणिमात्रांची सात्त्विकता वाढत असल्याने या दिवशी व्रत केल्याने त्याचा अधिक लाभ होतो.

व्रत करण्याची पद्धत

> आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त रहायचे.
> एकादशीला प्रातःस्नान करायचे.
> तुलसी वाहून विष्णुपूजन करायचे.
> हा संपूर्ण दिवस उपवास करायचा
> रात्री हरिभजन करत जागरण करायचे.
> आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे.
> या दोन्ही दिवशी ‘श्रीधर’ या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात.

परात्पर गुरु पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

‘एकावर एक ११ म्हणजे एकादशी. याचा अर्थ एकत्व सोडू नये. या दिवशी लंघन करणे, उपवास करणे, याचा उद्देश आहे, लक्ष तिकडे न जाता भगवंताकडे रहावे. मात्र आता हा अर्थ गौण झाला आहे आणि उपवास प्रधान झाला आहे ! या दिवशीचे तत्त्व साधना करण्याला अनुकूल असते. एकादशी प्रतिदिनच केली पाहिजे; मात्र एक दिवस योग्य तर्‍हेने केल्यास त्याचा प्रभाव १५ दिवस टिकतो; म्हणून एका मासात २ एकादशी असतात.’
– (परात्पर गुरु) परशराम पांडे (महाराज), सनातन आश्रम, देवद, पनवेल

विठ्ठलाची आरती

उपासकाला हृदयातील भक्तीदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे ‘आरती’. संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश निःसंशय सफल होतात, पण तेव्हाच जेव्हा आरती हृदयातून, म्हणजेच आर्ततेने, तळमळीने आणि अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य रीतीने म्हटली जाते.
‘सनातन’च्या भाव असलेल्या, म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे. आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल. ही आरती ऐकण्याने आणि तशा पद्धतीने म्हणण्याने आपल्यातही जलद भावजागृती होण्यास साहाय्य होईल.

तर ऐकूया, “युगे अठ्ठावीस विटेवरी उभा” ही आरती …….

समाजाला शुद्ध आणि योग्य उच्चार, शुद्ध भाषा, शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि भावपूर्ण आवाजात म्हटलेले; तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संतांच्या अन् साधना करणार्‍या साधकांच्या सात्त्विक वाणीतून उच्चारलेले चैतन्यदायी ऑडिओ सर्वांना उपलब्ध व्हावेत, यासाठी सनातन संस्थेने ‘सनातन चैतन्यवाणी’ हे ऑडिओ अ‍ॅप उपलब्ध केले आहे. या अ‍ॅपमध्ये सात्त्विक स्तोत्र, श्‍लोक, आरत्या आणि नामजप यांचा संग्रह आहे.
आजच ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप डाऊनलोड करा ! 

पंढरपूरची वारी

अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा एक भक्कम पुरावा म्हणजे पंढरपूर ! वैकुंठभुवनाच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले. त्यामुळे पृथ्वीवरील सर्वांत पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो. त्यासंदर्भात एक ओवी आहे, आधी रचिली पंढरी, नंतर वैकुंठ नगरी । संत नामदेव महाराजही आपल्या अभंगात सांगतात, जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर ! पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणारी आहेत. एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर, कारण या क्षेत्रांचा अविनाशी तत्त्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णु यांनी आपल्या अखंड वास्तव्याने कथन केला आहे. काशीमध्ये शंकराचे आणि पंढरपूरमध्ये विष्णूचे स्थूल रूपात अस्तित्व आहे; म्हणूनच प्रत्येक हिंदू इहलोकाची यात्रा संपवण्यापूर्वी एकदा तरी काशीस अथवा पंढरपूरला जावे, अशी इच्छा बाळगून असतो. अशी थोरवी प्राप्त झालेले हे पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे.

१. ‘वारी’ या शब्दाच्या व्युत्पत्ती

अ. वार : अमरकोषात ‘वार’ हा शब्द ‘समुदाय’ या अर्थाने वापरला आहे. यावरून ‘भक्तांचा समुदाय’, असा ‘वारी’ शब्दाचा अर्थ काढता येतो.

आ. वारी : संस्कृत भाषेत ‘वारि’ म्हणजे पाणी. पाण्याचा प्रवाह जसा अनेक वळणे घेऊन समुद्राला मिळतो, तसा वारकर्‍यांच्या भक्तीच्या प्रेमाने भारलेला प्रवाह पंढरपूरला येऊन मिळतो.

इ. फेरा किंवा खेप : संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरीत ‘वारी’ हा शब्द ‘फेरा’ किंवा ‘खेप’ या अर्थाने वापरला आहे. 

१ ई. पदोपदी भगवंताचे कीर्तन करणे म्हणजे वारी. श्री शिवलीलामृत ग्रंथात श्रीधरस्वामी म्हणतात,
‘ज्यासी न घडे सत्समागम । त्याने करू जावे तीर्थाटन ॥’ – श्रीधरस्वामी
अर्थ : प्रतिदिनच्या रहाटगाडग्यात ज्याला सत्समागम होत नाही, त्याने तीर्थाटन करावे.

हे करतांना आपोआपच संतदर्शन होते. पंढरपूरच्या वारीत या दोन्ही गोष्टी होतात. सर्व जातीभेद विसरून ‘वासुदेवः सर्वम् ।’ म्हणजे ‘सर्वकाही वासुदेवच आहे’, याचा बोध घेत जनसामान्यही भक्तीचा रस चाखू शकतात. केवळ पायी चालणे म्हणजे वारी नसून पदोपदी भगवंताचे कीर्तन करणे म्हणजे वारी.

२. पंढरपूरच्या वारीचे आध्यात्मिक महत्त्व !

विठुरायाच्या नामगजरात निघणार्‍या वारीला नामदिंडीचे स्वरूप प्राप्त होते. पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेल्या व्यक्तींचे तन, मन आणि धन सर्वकाही देवाच्या चरणी अर्पण होत असते. भगवंताच्या भेटीच्या ओढीने जो प्रवास केला जातो, त्यात मनाची निर्मळता असते आणि स्थूलदेहही चंदनाप्रमाणे झिजतो. त्यामुळे पंढरीला जाणारे वारकरी वारीच्या रूपाने तीर्थयात्रेलाच निघालेले असतात. – कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.७.२०१६)

भगवान श्रीविष्णूचे कलियुगातील सगुण रूपातील अस्तित्व म्हणजे पंढरीनाथाची दगडी काळी मूर्ती होय. ती केवळ साधी मूर्ती नाही, तर श्रीविष्णूचा सगुण देह आहे. पृथ्वीवरील सगुणातील भक्ती करणारे सर्व जीव या मूर्तीकडे आपोआपच आकर्षित होतात. कोणाचेही निमंत्रण नसतांना लक्षावधी भाविक येथे येतात आणि अत्यानंदाने न्हाऊन निघतात. थकून भागून येणारा जीव जेव्हा पंढरीत दाखल होतो, तेव्हा काही काळासाठी त्या जिवाची उन्मनी अवस्था झालेली असते. पंढरीच्या वारीचे हेच आध्यात्मिक रहस्य आहे. – श्री. श्रीकांत भट, अकोला.

२ अ. पाच वेळा काशीला आणि तीन वेळा द्वारकेला जाऊन जेवढे पुण्य मिळते, तेवढेच पुण्य एका पंढरपूरच्या वारीने मिळते !

पृथ्वीवरी तीर्थे असती अपार । परी पंढरीची सर । एकाही नाही ॥ असा दाखला संत नामदेव महाराज देतात, तर न करी आळस । जाय पंढरीशी । अवघी सुखराशी । तेथे आहे ॥, असे संत चोखामेळा यांनी म्हटले आहे. काशीच्या पाच यात्रा, द्वारकेला तीन वेळा जाणे, या दोन्ही यात्रांनी जेवढे पुण्य मिळते, तेवढेच पुण्य एका पंढरपूरच्या वारीने मिळते. सर्व सुखाचे आगर आणि संत मंडळींचे माहेरघर असल्यानेच अवघी दुमदुमली पंढरी । भगव्या पताका खांद्यावरी । तुळशी वृंदावन डोक्यावरी । भाव भुकेल्यांची ही वारी ।, असे म्हटले जाते.

२ आ. वारकर्‍यांच्या तळमळीमुळे विठ्ठलाला पंढरपुरात यावेच लागते !

संत ज्ञानेश्‍वरांनी वारी या व्रताचा प्रारंभ केला. तेव्हापासून चालू असलेल्या वारीमुळे पंढरपुरातील श्री विठ्ठलाची मूर्ती जागृतावस्थेत आली आहे. वारकरी राम कृष्ण हरी । असे नामसंकीर्तन सतत करत पंढरीस जातात. कलियुगात ईश्‍वराची कृपा संपादन करणार्‍या एका व्यक्तीपेक्षा सर्व मिळून जेव्हा कृपा संपादनाचा प्रयत्न करतात, तेव्हा ती समष्टी साधना होते. वारीमध्ये व्यष्टीसह समष्टी साधनाही होते आणि सर्व जिवांच्या उद्धारासाठी विठ्ठलाला पंढरपुरात भूतलावर यावेच लागते. या तीर्थाचा महिमाच असा आहे. येथील भक्तांच्या तळमळीमुळे विठ्ठलाला पंढरपुरात यावेेच लागते. पंढरपूरच्या वारीने आपल्या जीवनात भक्तीचा अखंड झरा पाझरू लागतो. भावभक्तीचे बीज प्रत्येकाच्या अंतर्मनात रुजवणारी ही वारी पृथ्वीच्या अंतापर्यंत अशीच चालू रहाणार आहे.

२ इ. देव भावाचा भुकेला आहे, याची प्रचीती पंढरपूरला येते !

भक्तांच्या संकटसमयी धावून येण्यासाठी, आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी विठ्ठल पंढरपुरात उभा आहे. देव भावाचा भुकेला आहे, याची प्रचीती घ्यायची असल्यास पंढरपूरला जावे.

३. शिस्तबद्धतेचे दर्शन 

शिस्तीचे दर्शन हे पालख्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. प्रत्येक दिंडीची रचना ठरलेली आहे. प्रारंभी भगवे ध्वजधारी वारकरी, मग तुळशी-वृंदावन घेतलेल्या महिला, त्यामागे टाळकरी, नंतर विणेकरी अशीच सर्व दिंड्यांची रचना असते. टाळ वाजवणार्‍या वारकर्‍यांचा पदन्यासही लयबद्ध असतो. भले टाळकरी-वारकरी शेकडोंच्या संख्येने का असेना ! 

४. भावभक्तीची अनुभूती देणारा पालखी सोहळा !

वैयक्तिक जीवनातील अभिनिवेष बाजूला ठेवून ईश्‍वराच्या नामस्मरणात देहभान विसरायला लावणारा आध्यात्मिक सोहळा म्हणजे पंढरपूरची वारी ! श्रीक्षेत्र आळंदी आणि देहू येथून निघणार्‍या संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव ! ऊन-पावसाची तमा न बाळगता भगवी पताका खांद्यावर घेऊन टाळ-मृदुंगाचा गजर करत चालणारे वारकरी म्हणजे भावभक्तीचेच प्रतीक ! कोणाच्याही तोंडवळ्यावर चिंता नाही कि मुक्कामाच्या ठिकाणी सोयीसुविधांची अपेक्षा नाही. वारकर्‍यांना प्रतिदिन १० ते २० किलोमीटरचा टप्पा चालत पार करावा लागतो. सकाळी लवकर मार्गस्थ व्हावे लागते. अल्पाहार आणि महाप्रसादही वाटेतच घ्यावा लागतो. सायंकाळी विलंबाने मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यानंतर भजन-कीर्तन होऊन दिवसाची समाप्ती होते.

श्री विठ्ठल आणि पंढरपूरची वारी यांचे छायाचित्रांच्या माध्यमातून भावपूर्ण दर्शन घेऊया !

विठुमाऊली तू माऊली जगाची । माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ॥ असा वारकऱ्यांचा पंढरीच्या विठुरायाप्रती असलेला भाव जगात सुविख्यात आहे. विठ्ठल विठ्ठल, जय हरि विठ्ठल, असे विठ्ठलाला आळवत वारकरी प्रतिवर्षी वारीला जातात आणि परत आल्यावर स्वतःपुरतीच नव्हे, तर परिसरातही विठ्ठलाची उपासना करतात.

पांडुरंग आणि पंढरपूर विषयी अधिक लेख वाचा !

पांडुरंगाच्या ओढीने वारीत आनंदाने वाटचाल करणारे वारकरी !

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून प्रतिवर्षी लाखो वारकरी आषाढी अन् कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. ते हरिनामाच्या…
Read More

आषाढी एकादशी – पंढरपूरला होणारा भागवतभक्तांचा महासंगम

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि त्यांच्या समवेतच्या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधक गटाने एका पंढरीच्या वारीचे…
Read More

वारीची परंपरा अधिकाधिक वृद्धींगत करणारे संत

१ अ. सर्व जाती आणि पंथ यांच्या लोकांना भक्तीमार्ग कळावा; म्हणून ‘विठ्ठल’नामाचा गजर करत पंढरपूरला पायी जाण्याचा वारीरूपी प्रवाह वृद्धींगत करणारे संत ज्ञानेश्‍वर !
संत ज्ञानेश्‍वरांच्या आधी पंढरपूर हे देवस्थान प्रसिद्ध होते. ज्ञानेश्‍वरांचे आजोबा सिधोपंत हेही पंढरीचे वारकरी होते. पुढे ज्ञानेश्‍वरांनी या वारीला एक विशाल स्वरूप प्राप्त करून दिले. सर्व जाती आणि पंथ यांच्या लोकांना भक्तीमार्ग कळावा; म्हणून ‘विठ्ठल’नामाचा गजर करत पंढरपूरला पायी जाण्याचा वारीरूपी प्रवाह ज्ञानदेवांनी वृद्धींगत केला. ‘ज्ञानेश्‍वर माऊलींनी ‘वारी’ची महती अधिक प्रमाणात वाढवली’, असे म्हणता येईल.

१ आ. समाजात भक्तीचा प्रवाह खळाळत राहावा आणि नामस्मरणाचे सोपे तंत्र जनतेच्या मनी रुजावे; म्हणून वारीची परंपरा पुनरुज्जीवित करणारे संत ज्ञानेश्‍वर ! संत ज्ञानेश्‍वर स्वतः एक सिद्ध पुरुष असून त्यांनी केवळ समाजात भक्तीचा प्रवाह खळाळत राहावा आणि नामस्मरणाचे सोपे तंत्र जनतेच्या मनी रुजावे; म्हणून वारीची परंपरा पुनरुज्जीवित केली. ज्ञानप्राप्ती झाल्यावर सामान्य जनांप्रती असलेली कणव या साधु पुरुषांच्या आचरणाने स्पष्ट होते. त्यांच्या या विश्‍वात्मक जाणिवेमुळे त्यांना ‘माऊली’ हे बिरुद सार्थ वाटते. ते म्हणतात,

‘अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिही लोक ।
जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ॥’ – संत ज्ञानेश्‍वर महाराज

अर्थ : हे जग आनंदाने भरून टाकून माझ्या माहेरी, म्हणजे पंढरपुरी जाईन.

१ इ. वारी म्हणजे आनंदाने ओसंडून वाहणारे स्नेहसंमेलन
संत ज्ञानेश्‍वरांच्या दृष्टीने वारी हे आनंदाने ओसंडून वाहणारे एक स्नेहसंमेलनच होय. केवळ पायी चालत, टाळ कुटत जाणारे लोक वारकरी नसून पदोपदी ज्यांना देवाची प्रचीती येते, ती वारी. वारीमुळे अहंकार विसरून एकमेकांच्या पायी लोटांगण घालणारे वैष्णव दिसतात. अध्यात्ममार्गावरील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि भक्ती. श्रद्धा दृढ होण्यासाठी वारीचे प्रयोजन आहे.

२ अ. ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी’, ही वारकरी परंपरेची नामदेवांनी दिलेली हाक नंतर संत एकनाथांनी खर्‍या अर्थाने जागृत ठेवली.

नित्य हरिकथा नामसंकीर्तन । संतांचे दरूषन सर्वकाळ ।।
पंढरीची वारी आषाढी कार्तिकी । विठ्ठल एकाएकी सुखरूप ।।– संत नामदेव महाराज

२ आ. संत नामदेव यांनी लिहिलेल्या आरतीतील वारीचा उल्लेख

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती ।
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति ।
केशवासी नामदेव भावें ओवाळिती ।।

२ इ. संत नामदेव यांच्या अभंगातील वारीचे महत्त्व !

‘आषाढी कार्तिकी हेचि आम्हां सुगी । शोभा पांडुरंगीं घनवटे ।।’
‘टाळ नृत्य घोष पताकांचे भार । गर्जे भीमातीर सर्वकाळ ।।’
‘कार्तिकी एकादशी । पोहा मिळाला पंढरीसी ।।’
‘पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्याची पायधुळी लागो मज ।।’
‘नामा म्हणे धन्य झाले ते संसारी । न सांडिती वारी पंढरीची ।।’

२ ई. संत नामदेव महाराज यांनी पंढरीची वारी करण्याचे सांगितलेले फळ

‘पंढरीची वारी करील जो कोणी । त्याच्या मागे पुढे चक्रपाणी ।।’
‘पंढरीसी जावे जीवन्मुक्त व्हावे । विठ्ठला भेटावे जीवलगा ।।’

(साभार : संत नामदेव महाराजांच्या अभंगातील निवडक ओळी)

संत एकनाथ महाराजांनी वारीची परंपरा पुढे चालू ठेवली. इस्लामी आक्रमणांच्या धामधुमीत महाराष्ट्रात भक्तीपरंपरा वारीच्या माध्यमातून एकनाथांनी चालू ठेवली. यामुळे कठीण काळातही समाज धर्मप्रवण आणि ईश्‍वरार्पित चित्त राहिले. वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्रावर या अर्थाने मोठे उपकार आहेत. संत एकनाथांनी ग्रंथातील वेदांत भारूडाच्या रूपाने लोकांपर्यंत पोचवला. भागवताच्या एकादश स्कंदावर त्यांनी लिहिलेली प्राकृत टीका ‘एकनाथी भागवत’ नावाने प्रसिद्ध आहे. श्‍लोकांना लोकांपर्यंत पोचवण्याचे हे महत्कार्य संत एकनाथांनी केले; म्हणूनच त्यांना वारकरी पंथाचा ‘खांब’ म्हणतात.

पंढरीची वारी आहे ज्याचे घरी । तोचि अधिकारी धन्य जगीं ।।

– संत एकनाथ गाथा, अभंग १६७९, ओवी १

धर्म अर्थ काम हे त्याचे अंकित । एका जनार्दनी मात धन्य त्याची ।।

– संत एकनाथ गाथा, अभंग १६७९, ओवी ३

‘वारकरी पंढरीचा । धन्य धन्य जन्म त्याचा ।।’

– संत एकनाथ महाराज

नाथांची परंपरा पुढे संत तुकाराम महाराजांनी चालू ठेवली. वारकरी संप्रदायात तुकोबांचा हा अभंग नित्यपाठात आहे.

‘हेचि व्हावी माझी आस । जन्मोजन्मी तुझा दास ।
पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरि ।
संतसंग सर्वकाळ । अखंड प्रेमाचा कल्लोळ ।
चंद्रभागे स्नान । तुका मागे हेचि दान ॥’

जसे ज्ञानदेवांचे ‘पसायदान’ प्रसिद्ध आहे, तसे तुकोबांनी मागितलेले हे एक दान आहे.

‘होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ।।’
‘पंढरीचे वारकरी । हे अधिकारी मोक्षाचे ।।
पुंडलिका दिला वर । करूणाकर विठ्ठले ।।’

(साभार : संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील निवडक ओळी)

कराडहून पंढरपूरला जाणार्‍या वारीत सहभागी व्हावे आणि पांडुरंगाचे दर्शन घ्यावे, असे संत सखुबाई यांना वाटत होते; परंतु त्यांच्या सासूने त्यांना वारीला जाऊ दिले नाही आणि घरातील खांबाला बांधून ठेवले. संत सखुबाई यांच्यामध्ये पंढरीनाथाच्या दर्शनाची इतकी तीव्र ओढ होती, की साक्षात् पांडुरंगाला त्यांना मुक्त करण्यासाठी धावत यावे लागले. पांडुरंगाने खर्‍या सखूला मायामोहाच्या बंधनातून मुक्त करून थेट पंढरपुरात पोहोचवले आणि त्यांचे रूप घेऊन स्वतःला खांबाला बांधून घेतले.

 

संत कान्होपात्रा यांच्यामध्ये भक्तीची ओढ जागृत करण्याचे श्रेय पंढरीच्या वारीलाच द्यावे लागेल.

संत जनाबाई त्यांच्या आई-वडिलांसमवेत गंगाखेडहून वारीने पंढरपूरला आल्या आणि तिथेच संत नामदेवांच्या घरी थांबल्या.

संत जनाबाई म्हणतात,

‘आले वैष्णवांचे भार । झाले हरिनाम जागर ।।’
‘ऐसा आनंद सोहळा । दासी जनी पाहे डोळा ।।’

(साभार : संत जनाबाईंच्या अभंगांतील निवडक ओळी)

हे विठ्ठलाच्या मळ्यातच सेवा करत आहेत, या भावावस्थेत होते. त्यामुळे पांडुरंगाने नेमून दिलेली मळ्याची सेवा सोडून ते पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला कधी गेलेच नाहीत.

यांच्या जीवनचरित्रातही पांडुरंगाच्या भक्तीचे महत्त्व प्रकर्षाने दिसून येते.‘टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ।।’
‘कोणी पंढरीसी जाती वारकरी । तयांचे पायावरी भाळ माझा ।।’
(संदर्भ : संत चोखामेळा यांच्या अभंगातील निवडक ओळी) 

 

संत कूर्मदास यांच्या उत्कट भक्तीमुळे साक्षात् विठ्ठलच त्यांच्या भेटीसाठी पंढरपूरहून लहूल या त्यांच्या गावी जाणे
संत कूर्मदास पैठणचे निवासी होते. त्यांना जन्मतःच हात आणि पाय दोन्ही नव्हते. त्यांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशींचे महत्त्व जाणून पंढरपूरला जाण्याचा निश्‍चय केला. ते पोटाच्या साहाय्याने सरकत सरकत प्रतिदिन एक कोस अंतर पार करत होते. त्यांची स्थिती पाहून करुणेने कुणी त्यांना भाकरीचा तुकडा भरवी, तर कुणी त्यांना उचलून पुढे नेत असे. पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने ते पंढरपूरच्या दिशेने तसेच जाण्याचा प्रयत्न करत होते. असे ४ मास (महिने) झाले.

आषाढी एकादशीला एक दिवस शिल्लक असतांना ते पंढरपूरपासून ७ कोस अंतर दूर असणार्‍या लहुल नावाच्या गावी येऊन पोहोचले. उद्या आषाढी एकादशी आहे आणि आता मला पांडुरंगाचे दर्शन होणार नाही, याची खंत त्यांच्या मनात होती. देवा, मी दीन-हीन, अपंग. मी तुझ्या दर्शनासाठी पोहोचू शकत नाही; पण तू तर मला भेटण्यासाठी येऊ शकतोस ना ? तुला काय अशक्य आहे ?, असा विचार करून संत कूर्मदास यांनी एका यात्रेकरूच्या माध्यमातून एका चिठ्ठीद्वारे विठ्ठलाला भेटण्यासाठी बोलावणे पाठवले. दुसर्‍या दिवशी एकादशीला तो यात्रेकरू पंढरपुरात पोचला.

त्याने श्रीविठ्ठलाचे दर्शन घेऊन संत कूर्मदास यांनी पाठवलेली चिठ्ठी पांडुरंगाच्या चरणांवर अर्पण केली. भक्तवत्सल पांडुरंगाला एक क्षणही रहावेना. तो संत कूर्मदास यांच्या भेटीसाठी संत ज्ञानेश्‍वर, संत नामदेव आणि संत सावतामाळी यांना समवेत घेऊन लहुल या गावी गेला. साक्षात् भगवंताचे दर्शन झाल्याने संत कूर्मदास यांच्या जन्माचे सार्थक झाले आणि ते पांडुरंगाच्या चरणांवर लोटले. संत कूर्मदास लहूल या गावी असेपर्यंत श्रीविठ्ठलही त्यांच्यासमवेत तेथेच राहिला. संत कूर्मदास यांना दर्शन दिलेल्या या ठिकाणी आज श्रीविठ्ठलाचे सुंदर मंदिर आहे.

संत नरहरी सोनार म्हणतात,

पंढरी नगरी दैवत श्रीहरि । जाती वारकरी व्रतनेमें ।। १ ।।

आषाढी कार्तिकी महापर्वे थोर । भजनाचा गजर करिती तेथें ।। २ ।।

– संत नरहरी सोनार

संत सेनामहाराज म्हणतात,

ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार । ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठे ।। १ ।।

वाट धरता पंढरीची । चिंता हरे संसाराची ।। २ ।।

– संत सेनामहाराज

विठ्ठल संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ग्रंथ खरेदी करा !

पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)
> भिमा नदीला चंद्रभागा; म्हणून का संबोधतात ?
> विठ्ठलाच्या मूर्तीचे महात्म्य काय आहे ?
> पांडुरंग विटेवर उभा आहे, याचा भावार्थ काय ?
> विठ्ठलाच्या पायाखाली असलेल्या विटेचे रहस्य काय ?
> आद्यशंकराचार्यांनी पंढरपूरला ‘महायोग पीठ’ का संबोधले आहे ?
पांडुरंगाला संतांनी ‘कानडा’; म्हणून हाक का मारली आहे ?

श्री विठ्ठल (उपासनाशास्त्र आणि पंढरपूर माहात्म्य)
> विठ्ठलपूजेत तुळस आणि गोपीचंदन यांचे महत्त्व काय ?
> विठ्ठलोपासनेत टाळ-मृदुंग वाजवण्याचे कारण काय ?
> विठ्ठलमूर्तीची ‘सूक्ष्मातील वैशिष्ट्ये’ कोणती ?
> आषाढी एकादशी आणि वारकरी यांची ‘सूक्ष्म-चित्रे’
विठ्ठलभक्तांनो, धर्मरक्षण करणे, हे धर्मपालनच आहे !

अध्यात्म हे कृतीचे शास्त्र असल्याने हा विषय आपण बुद्धीने समजून घेण्यासमवेतच श्रद्धेने आणि भाव ठेवून समजून घेण्यासाठी सनातन संस्थेच्या ऑनलाइन साप्ताहिक सत्संगात सहभागी व्हा !

साधना संवाद

1 thought on “आषाढी एकादशी 2024 आणि पंढरपूरची वारी”

  1. खूप सुंदर माहिती.प्रत्यकाने संग्रही ठेवावी.

    Reply

Leave a Comment