दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले, त्या वेळी प्रजेने दीपोत्सव केला. तेव्हापासून दीपावली उत्सव सुरू आहे.
आश्विन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या (लक्ष्मीपूजन) आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलीप्रतिपदा) असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते. काही जण त्रयोदशीला दिवाळीत न धरता, दिवाळी उरलेल्या तीन दिवसांची आहे, असे समजतात. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात, म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः ते सण वेगवेगळे आहेत.