आध्यात्मिक त्रास का होतात ?

सध्याच्या स्पर्धात्मक आणि भोगवादी युगात ईर्षा, द्वेषभाव, लोकेषणा, भिन्नलिंगी व्यक्तींकडे पहाण्याची वाईट दृष्टी यांसारख्या विकृतींनी बहुतांश व्यक्ती ग्रासलेल्या आहेत. या विकृतीजन्य रज-तमात्मक स्पंदनांचा त्रासदायक परिणाम सूक्ष्मातून नकळत दुसर्‍या व्यक्तींवर होतो. यालाच त्या व्यक्तींना ‘दृष्ट लागणे’ असे म्हणतात. तसेच कुटुंबात भांडणे, व्याधी, आर्थिक चणचण, वाईट स्वप्ने पडणे, नैराश्य, सिगारेट किंवा मद्य यांचे व्यसन यांसारख्या समस्या आता नित्याच्या झाल्या आहेत. जीवनातील ८० टक्के समस्यांमागील कारणे सकृद्दर्शनी स्थुलातील दिसत असली, तरी खरे मूळ कारण हे सूक्ष्मातील, म्हणजेच वाईट शक्तींचा त्रास, हे असते. वाईट शक्तींचा त्रास हाही दृष्ट लागण्याचाच होय.

आध्यात्मिक त्रासासंदर्भातील शंकांचे निरसन

अध्यात्मातील सैद्धांतिक भागाचा कितीही अभ्यास केला, तरी मनातील शंकांचे निरसन झाले नाही तर साधना नीट होत नाही. या दृष्टीने गांवोगांवच्या जिज्ञासू आणि साधकांच्या मनात सर्वसाधारणपणे उद्भवणार्‍या अध्यात्मशास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रायोगिक भागाच्या शंकांचे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी निरसन केले आहे. ‘शंकानिरसन’ या सदरातून प्रश्नोत्तराच्या रूपात हे, सर्वच वाचकांसाठी उपलब्ध करत आहोत. याचा अभ्यास करून अधिकाधिक जिज्ञासूंनी योग्य साधनेला आरंभ करावा आणि जीवनाचे खर्‍या अर्थाने सार्थक करून घ्यावे, हीच श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

साधना करत असतांना सूक्ष्मातील विविध शक्ती साधकाला त्रास देतात. त्याला साधनेच्या, परमार्थाच्या पथावरून परावृत्त करण्यास त्या प्रयत्नरत असतात. यावर कोणते उपाय करावेत इत्यादींविषयी प्रश्नोत्तरे प्रस्तुत सदरात अंतर्भूत आहेत.

कलियुगाचे वैशिष्ट्य आणि त्याचा मानवी जीवनावरील परिणाम

अ. ‘कलियुग हे तमोगुणी संस्कारांनी व्यापलेले आहे.

आ. साधना न करता रहाणे, तसेच आध्यात्मिक उपायांविना जीवन व्यतीत करणे, म्हणजे या जन्मात स्वतःचीच अत्यंत हानी करून घेणे आणि जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात अडकणे

इ. मनुष्यात षड्रिपूंचे त्याच्या कर्म अधिक-उणे (कमी-जास्त) असते. कलियुगात मनुष्याचे षड्रिपूंच्या प्रमाणात कार्य करण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्याला दुसर्‍यांविषयी ईर्षा असते, तसेच अनेक गोष्टींविषयी अपेक्षा आणि आसक्ती असते. हे सर्व विचार वासनात्मक संबंधित असतात.

ई. कलियुगातील मनुष्याचे मन ७० टक्के विकल्पाने भरलेले असते. त्याच्या मनात येणारा अन् व्यक्त होणारा विचार तमोगुणी असतो.

उ. सृष्टीचक्रात जीवन जगणार्‍या अशा तामसिक विचारांचे तमोगुणी वादळ जिवावर आपला रज-तमात्मक प्रभाव दर्शवत असते. क्रोध, द्वेष, मत्सर यांसारख्या दोषांचा परिणाम दुसर्‍यावर होऊन ज्याच्याविषयी आपल्याला वासनाजन्यरूपी आसक्तीदर्शक रज-तमात्मक विचार येतात, त्या विचारांच्या तीव्रतेप्रमाणे त्या त्या जिवाला दृष्ट लागण्याचे जास्त असते.

कलियुगात जिवांनी साधना करण्याचे महत्त्व

कलियुगातील वायूमंडलच तमोगुणी विचारांनी ग्रासलेले असल्याने जिवाला कोणाची तरी दृष्ट लागतच असते. त्यासाठी जिवाने साधना करून स्वतःभोवतीचे वायूमंडल सतत शुद्ध ठेवणे अन् त्यातूनच श्‍वास घेऊन ईश्‍वराच्या चैतन्यलहरींचा अपेक्षित लाभ करून घेणे इष्ट ठरते.

 

१. अतृप्त पूर्वज

हल्ली बहुतेकांना अतृप्त पूर्वजांच्या लिंगदेहामुळे त्रास होतो. अतृप्त पूर्वजांच्या त्रासाची लक्षणे कोणती, अतृप्त पूर्वज त्रास का देतात आणि त्यांच्याकडून होणार्‍या त्रासाचे निवारण कसे करावे याविषयी माहिती जाणून घेऊयात.

 

अ. प्रश्न : अतृप्त पूर्वजांमुळे सर्वांना त्रास होतो का ?

उत्तर : सध्याच्या काळात बहुतेकांनाच होऊ शकतो. आपल्या सर्वांनाच नशिबाचा त्रास आहे. प्रारब्धभोग भोगून संपवण्यासाठी आपण जन्माला आलो आहोत. कलियुगात आपण आलो आहोत, तर दुःखेच जास्त भोगून संपवायची आहेत. सत्ययुगात, त्रेतायुगात आपण असतो, तर सुख भोगण्यासाठी आपला जन्म झाला असता. प्रारब्ध हा जसा दुःख भोगण्यातील महत्त्वाचा भाग आहे, तसाच दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आपले अतृप्त पूर्वज !

पूर्वी म्हणजे जवळजवळ ५० ते १०० वर्षांच्या आधी बहुतेक घरांतून श्राद्धपक्ष, नागबली, कावळ्याला काहीतरी ठेवणे अगदी नियमितपणे केले जायचे. नंतरच्या काळात स्वातंत्र्यलढा चालू झाला, त्याकडे सबंध पिढी वळली. घरचे कर्तेपुरुष देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात गेल्यामुळे ज्या परंपरा होत्या, त्या सगळ्या खंडित झाल्या. आताची जी पिढी आहे, ती सगळी इंग्रजी भाषेत, कॉन्व्हेंटमध्ये; शिकत आहे, म्हणजे जे काही संस्कार व्हायची शक्यता होती, तीही गेली. दूरचित्रवाणी (टीव्ही) आहे. त्यावर कितीतरी वाहिन्या (चॅनेल्स) असतात. त्यावर परदेशी संस्कृती दाखवली जाते. त्यामुळे देवाचे काहीतरी करायचे आहे, श्राद्धपक्ष करायचे आहे, हे आपल्याला ठाऊकच नाही. त्यामुळे बहुतेक लोकांना हा त्रास होतो. वैयक्तिकदृष्ट्या चांगली साधना केलेले, म्हणजे सातत्याने सत्चाच विचार ज्यांच्या मनामध्ये चालू आहे, नामस्मरण चालू आहे, सेवा, त्याग आहे, त्यांना त्रास होत नाही; परंतु ज्यांच्याकडून एवढे होत नाही, त्यांना त्रास होऊ शकतो.

अतृप्त पूर्वजांच्या त्रासाची बुद्धीला कळणारी काही उदाहरणे पाहूया. एखाद्याची आर्थिक स्थिती ठीक नाही, प्रयत्न करत आहे तरी सतत त्रास होत आहे. चाकरी-कामधंदा नाही, अशा वेळी अर्ध्या लोकांच्या बाबतीत नशिबामुळे, तर अर्ध्या लोकांच्या बाबतीत अतृप्त पूर्वजांमुळे असे घडत असते. अतृप्त पूर्वजांच्या त्रासामुळे कधी लग्नच जमत नाही, लग्न झालं, तर नवरा-बायकोचे पटत नाही. नवरा-बायकोचे पटतंय तर मूलच होत नाही. बायको गरोदरच रहात नाही. गरोदर राहिली, तर दुसर्‍या-चौथ्या महिन्यातच गर्भपात होतो. गर्भपात झाला नाही, अगदी ९ महिने झाले आणि बाळंतपण झाले, तर मूल जन्माला येते, ते शरिराने किंवा मनाने अपंग असते. मूलही चांगले जन्माला आले, तर त्याचा बालमृत्यू किंवा अपमृत्यू होतो, असे जेथे एखाद्या कुटुंबात दिसून येते, तेथे समजायचे की, अतृप्त पूर्वजांचा त्रास असू शकतो. ‘आम्ही डॉक्टरकडे गेलो’, ‘गायनॉकॉलॉजिस्ट केले’, तरी काही उपयोग होण्याची शक्यता कमी असते. बहुदा डॉक्टर साहाय्य करू शकत नाही; पण हा बुद्धीने समजण्याचा भाग झाला आणि बुद्धीने जे समजत नाही, ते अध्यात्मातले असू शकते.

त्रिपिंडी श्राद्ध प्रत्येकाने करायला नको. ज्यांना काहीतरी त्रास आहे, त्यांनी मात्र अवश्य केले पाहिजे. त्रिपिंडी श्राद्ध, नारायण नागबळी हे सगळंच करायला पाहिजे.

भगीरथाने ६० सहस्र वर्षे तपश्चर्या केली. तेव्हा त्याच्या सगळ्या पूर्वजांना मुक्ती मिळाली. आपले आयुष्य छोटे असते, अध्यात्म कळणार उशिरा आणि सर्व व्यवसाय सांभाळून थोडीशी साधना करणार, तर पूर्वजांना आपण मुक्ती कशी देणार? त्याच्यापेक्षा हे विधी केले की, साधना वाचते. नाहीतर आपण केलेली साधना अतृप्त पूर्वजांची मुक्ती करण्यातच व्यय होत असते.

अतृप्त पूर्वज त्रास तरी का देतात ? पूर्वजांची संपत्ती आपण मजेत घेतो. आमच्या वडिलांनी ठेवले आहे, आमच्या आजोबांनी ठेवले आहे. त्यांचे घ्यायला आपल्याला ठीक वाटते. भूमी-घरात वाटा मिळण्यासाठी आपण धडपडतो. कोकणात तर छोट्या छोट्या तुकड्यासाठीही भांडणे असतात. एका झाडावरूनसुद्धा भांडणे करतात.

आपले सर्व पूर्वज संत-महात्मे लागून गेलेले नाहीत. ही सर्व आपल्यासारखी साधी माणसे आहेत. त्यांनीही साधना केलेली नसते. त्यामुळे ते अडकलेले असतात. सांगण्याचा प्रयत्न करतात, टाहो फोडतात, ‘अरे मी इकडे भुवलोकात अडकलो आहे ! माझ्यासाठी काहीतरी करा !’ पण ते ऐकण्याची आपल्या कर्णेंद्रियांत क्षमता नाही. जसे कुत्रे, मांजर, कावळे यांना काहीतरी निराळे कळते (कारण त्यांची संवेदनक्षमता पुष्कळ जास्त असते), तसे आपल्या बाबतीत होत नाही.

आपल्याला वाटते, ‘माझ्या कर्तृत्वाने मी मिळवले आहे’; म्हणून अतृप्त पूर्वज मला दुःख देतात. आपण कुणाला तरी विचारतो, ‘आमचं घरात पटत नाही. मुलांशी पटत नाही, बायकोशी पटत नाही, काय झाले ?’ मग कोणीतरी सांगते, ‘अहो तुमच्या घरात अतृप्त पूर्वजांचा त्रास आहे. नारायण नागबली करा, त्रिपिंडी श्राद्ध करा !’ ते केले की, बर्‍याच जणांचे जीवन सुखी होऊन जाते. आपण भारतात जन्माला आलो, हे आपण नशीबवान आहोत म्हणून. आपल्याकडे असे सांगणारे तालुक्या-तालुक्याला आहेत. भारताव्यतिरिक्त कुठेही हे शास्त्रच ठाऊक नसते. इंग्लंड, अमेरिका, युरोप, रशिया काय त्यांना काही ठाऊक नाही. ते आयुष्यभर दुःखीच रहातात.

 

आ. प्रश्न : त्रिपिंडी श्राद्ध एकदाच केले तरी चालते का ? त्यामुळे अतृप्त पूर्वजांचे त्रास दूर होतात की, २ – ३ वेळा हा विधी करावा लागतो ?

उत्तर : आपल्याकडे शेकडो पूर्वज आहेत. एकदा त्रिपिंडी श्राद्ध केले की, ज्या अतृप्त पूर्वजाची मुक्तीची वेळ जवळ आलेली असेल, त्या योनीतून तो मुक्त होऊन जाईल. बाकीचे जे शेकडो अतृप्त पूर्वज आहेत, ते तसेच राहून जातात; परंतु हे सर्वच त्रास देणारे नसतात. टप्प्याटप्प्याने आपल्याला त्रास निर्माण होतात. साधारणतः ७० – ८० प्रतिशत जणांना त्रिपिंडी श्राद्ध एकदाच केले, तरी ते पुरते. आणखी ५ – १० प्रतिशतांना आयुष्यात दोनदा करावे लागते. उरलेल्यांपैकी आणखी ५ – १० प्रतिशत जणांना आयुष्यात तीनदाही करावे लागते.

 

इ. प्रश्न : त्रिपिंडी श्राद्ध करतात, त्याला कुटुंबातील सर्वच सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे का ?

उत्तर : सर्वच असणे आवश्यक नाही; पण जे जातात, त्यांच्याविषयी पितरांना वाटते, ‘यांनी माझ्यासाठी काहीतरी केले.’ दोन-चार सहस्र रुपये व्यय झाला. भावांनी वाटून घेतला, तर दोन्ही भावांविषयी पितरांना वाटायला लागते. एकाच भावाने व्यय केला, तर पितर त्याच्यावरच आनंदित होतील. पितर मुक्त होतांना केवळ त्रास देणे बंद करतात असे नाही, तर आपले काहीतरी भलेही करतात. शेवटी आपण त्यांच्या कुटुंबातले आहोत ना ! भूत जाते, म्हणजे साधना करून आपण घालवतो, तेव्हा ते आपल्याला साहाय्य करत नाही; कारण ते आपल्याला त्रास द्यायलाच आलेले असते. ते त्रागा करतच निघून जाते. ‘याच्या साधनेने मला जावे लागले, मला छळता येत नाही’, असे भुताच्या मनात येते; परंतु अतृप्त पितर जातात, तेव्हा त्यांना जाणीव असते की, माझ्यासाठी नातवंडांनी, पतवंडांनी काहीतरी केले; त्यामुळे ते आपल्याला काहीतरी साहाय्य करतात. म्हणून जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनी जावे. तो पूर्वजांना श्रद्धांजली वाहण्याचाच विधी आहे.

 

२. चांगली शक्ती

चांगल्या शक्ती त्रास का देतात याचे कारण पुढील प्रश्नोत्तरातून लक्षात येईल.

 

अ. प्रश्न : वाईट शक्तींचा त्रास होतो, तसा चांगल्या शक्तींचा जसे, कुलदेवता, ग्रामदेवता यांचा होतो का ?

उत्तर : ज्याची साधना करण्याची कुवत आहे, म्हणजे साधना केली, तर याच जन्मात तो पुष्कळ प्रगती करू शकेल, असे असेल आणि तरी तो साधना करत नसला, तर कुलदेवता त्याला निश्चित त्रास देते. एखादा मुलगा हुशार आहे, त्याने अभ्यास केला तर परीक्षेत चांगले गुण मिळवू शकतो, तरीही तो अभ्यास करत नाही, तर शिक्षक त्याच्या पाठीमागे सारखे लागतात. त्याला ओरडतात. जो ‘ढ’ आहे, अनुत्तीर्ण किंवा काठावर उत्तीर्ण होणारा आहे, त्याच्यामागे कोणी लागत नाही. कोणी साधना करणारा असेल, तर कुलदेवतेला वाटते, ‘हा माझा आहे, याने प्रगती करावी’, तेव्हा ती त्रास देते. कोणालातरी विचारल्यावर आपल्याला हे कळते. कुलदेवतेला आपण जायला हवे, लांब असेल, तर वर्षातून एकदा तरी जायला हवे. तिचा जप करायला हवा. कुलाचाराचे पालन करायला पाहिजे. यातूनच साधनेला प्रारंभ होतो आणि त्रास दूर करण्याच्या निमित्ताने एकदा प्रारंभ झाला की, पुढे सवय झाल्याने साधना चालू रहाते.

गावाचे रक्षण करण्याचे दायित्व ग्रामदेवतेवर असते. ती आपल्यासाठी (ग्रामस्थांसाठी) काहीतरी करते, तर ग्रामदेवतेच्या वार्षिक उत्सवात आपण सहभागी झाले पाहिजे. तन, मन, धनाने काहीतरी करायला पाहिजे. जे साधना करत नाहीत, त्यांच्यासाठी हे नियम आहेत. जे साधनेला लागले आहेत, ज्यांना गुरु भेटले आहेत, त्यांच्या संदर्भात असे प्रश्न निर्माण होत नाहीत. ग्रामदेवता इत्यादी या सगळ्या क्षूद्र देवता आहेत. एखाद्या कार्यालयातील मुख्य अधिकारी तुमच्या ओळखीचा असेल, तर तेथील शिपाई आपल्या ओळखीचा आहे का, असा विचार आपण करत नाही. गुरु किंवा कुलदेवता प्रसन्न झाली, तुम्ही तिची साधना करत असलात, तर मग ग्रामदेवतेचे काही नाही केले, तरी चालते.

 

संदर्भ : सनातन-निर्मित ध्वनिचकती ‘अध्यात्मविषयक शंकानिरसन’

Leave a Comment