दीपप्रज्वलन कसे करावे ?

दीपप्रज्वलन करतांना
दीपप्रज्वलन करतांना

चर्चासत्रे, साहित्य संमेलने, संगीत महोत्सव इत्यादींचे उद्‍घाटन करताना दीपप्रज्वलन करतात. हे दीपप्रज्वलन म्हणजे काय, त्याचे महत्त्व आणि परिणाम यांविषयी पाहू.

दीपप्रज्वलनाचा भावार्थ

१. दीपप्रज्वलन करणे, म्हणजे स्वतःमधील आत्मशक्‍ती जागृत करणे होय.

२. दीपाभोवती असणारी शांत प्रभावळ ही आपल्या आत्मप्रकाशाचे प्रतीक आहे, तर दीपाचा रजोगुणी प्रकाश हा आपल्या आत्मतेजाचे प्रतीक आहे.

दीपप्रज्वलनाचे महत्त्व काय ?

१. ईश्‍वराची संकल्पशक्‍ती कार्यरत होणे

ज्या वेळी आपण दीपप्रज्वलन करून कार्याला आरंभ करतो, त्या वेळी आत्मज्योतीच्या बळावर केलेल्या पूजनामुळे आपण ब्रह्मांडातील त्या त्या देवतेच्या तत्त्वाला आवाहन करतो आणि देवतेच्या लहरींना कार्यस्थळी स्थानापन्न होण्याची प्रार्थना करतो. यामुळे आपण करत असलेल्या कार्यामागे ईश्‍वराची संकल्पशक्‍ती कार्यरत होते आणि आपले इच्छित कार्य सिद्धीस जाते.

२. कार्यस्थळाभोवती संरक्षक-कवच निर्माण होणे

ब्रह्मांडातील ईश्‍वराच्या क्रियाशक्‍तीच्या बळावर कार्यस्थळाभोवती संरक्षक-कवच निर्माण होण्यास साहाय्य होते. म्हणजेच दीपप्रज्वलन करून आपण एकप्रकारे कार्यस्थळाची शुद्धीच करत असतो. संरक्षक-कवचातून प्रक्षेपित होणार्‍या किरणांच्या रूपातील गतीमान आणि वलयांकित तेजोलहरींमुळे वरिष्ठ पातळीच्या (जास्त क्षमतेच्या) वाईट शक्‍ती कार्यस्थळी प्रवेश करू शकत नाहीत अन् आपले कार्य देवतेच्या आशीर्वादामुळे निर्विघ्नपणे पार पडते.

दीपप्रज्वलन करण्यामागील शास्त्र काय ?

व्यासपिठालाच ‘ज्ञानपीठ’ असे म्हणतात. व्यासपिठावरून वक्‍त्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्‍वरी तत्त्व ज्ञानदानाचे कार्य करत असते. दीप हा आत्मज्योतीचे प्रतीक आहे. आत्मज्योत ही नेहमीच ज्ञानमयी असते. ही ज्योत सर्व जिवांना आपल्या शुद्ध प्रकाशाच्या माध्यमातून मायेतून तरून जाण्यासाठी ब्रह्मज्ञानदानाचे कार्य अविरत करत असते. दीपप्रज्वलन करणे, म्हणजे एकप्रकारे व्यासपिठावर कार्यरत होणार्‍या ज्ञानलहरींना आवाहन करणे आणि व्यासपिठावर निर्माण होणार्‍या ज्ञानमयी वायूमंडलातील ज्ञानलहरींना दीपज्योतीच्या माध्यमातून अखंड कार्यरत ठेवणे होय.

दीपप्रज्वलनानंतर नारळ वाढवण्याची आवश्यकता असते का ?

नारळातून प्रक्षेपित होणार्‍या दैवी लहरी या जास्त प्रमाणात पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी संबंधित असतात, तर दीपातून प्रक्षेपित होणार्‍या लहरी या तेजतत्त्वाशी संबंधित असतात. त्यामुळे नारळामध्ये कनिष्ठ प्रकारच्या वाईट शक्‍तींना (पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी संबंधित) दूर करण्याचे सामर्थ्य असते, तर दीपामध्ये वरिष्ठ प्रकारच्या वाईट शक्‍तींना (तेजतत्त्वाशी संबंधित) दूर करण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे व्यासपिठावर दीपप्रज्वलन केल्यावर नारळ वाढवण्याची आवश्यकता नसते.

दीपप्रज्वलन करण्यापूर्वी दीपाखाली अक्षता का ठेवाव्यात ?

अक्षतांमध्ये असलेल्या पृथ्वी आणि आप तत्त्वांच्या कणांच्या प्राबल्यामुळे दीपाकडून प्रक्षेपित होणार्‍या लहरी ग्रहण केल्या जातात अन् आवश्यकतेनुसार आपकणांच्या प्राबल्यावर त्या प्रवाही बनवून वातावरणात भूमीच्या दिशेने प्रक्षेपित केल्या जातात. या संचारी लहरी अधोगामी असल्याने त्यांची ओढ भूमीकडे असते, तर दीपातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींची ओढ आकाशाच्या दिशेने असते; कारण त्या ऊर्ध्वगामी दिशेने संचार करत असतात. अशा प्रकारे कार्यस्थळी दीपाच्या माध्यमातून वातावरणाच्या वरील पट्ट्यात सूक्ष्म-छत, तर अक्षतांच्या माध्यमातून भूमीवर सूक्ष्म-आच्छादन निर्माण होण्यास साहाय्य झाल्याने कालांतराने त्याचे रूपांतर घुमटाकार संरक्षक-कवचात होते.

दीपप्रज्वलनासाठी वापरायच्या समईत तुपापेक्षा तेल घालणे अधिक योग्य का ?

तेल हे रजोगुणी लहरी प्रक्षेपणाचे, तर तूप हे सात्त्विक लहरी प्रक्षेपणाचे प्रतीक आहे. कोणत्याही कार्याला गती प्राप्त होण्यासाठी रजोगुणी क्रियालहरींची आवश्यकता असते. तेलाची ज्योत ही ब्रह्मांडातील देवतेच्या क्रियालहरींना जागृत करून कार्यरत ठेवते; म्हणून दीपप्रज्वलनासाठी वापरण्यात येणार्‍या समईत तेल घालणे, हे जास्त इष्ट ठरते.

खालील चित्रांकडे पाहून काय वाटते ते पहा आणि मग पुढील लिखाण वाचा !

दीपप्रज्वलन मेणबत्तीने नव्हे, तर तेलाच्या दिव्याने (कयपंजीने) का करावे ?

१. आध्यात्मिकदृष्ट्या मेणबत्ती ही ‘तमोगुणी’ असणे

मेणबत्ती वापरण्याची किंवा लावण्याची प्रथा पाश्‍चात्त्यांकडून आली आहे. मेणबत्ती प्रज्वलित केल्यानंतर तिच्यातील मेणाचे अल्प प्रमाणातच विघटन होत असल्यामुळे तिच्यामध्ये अधिक प्रमाणात तमोगुणी स्पंदने कार्यरत रहातात. त्यामुळे हिंदु संस्कृतीनुसार, तसेच आध्यात्मिकदृष्ट्या मेणबत्ती ‘तमोगुणी’ समजली जाते.

२. मेणबत्तीची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये दर्शवणारे चित्र

३. इतर सूत्रे

१. मेणबत्तीच्या प्रज्वलनामुळे वातावरणात तमोगुणी काळ्या शक्‍तीची स्पंदने दीर्घकाळापर्यंत कार्यरत रहाणे : ज्या वेळी मेणबत्ती प्रज्वलित करण्यात येते, त्या वेळी त्यामधील तमोगुणी काळ्या शक्‍तीची स्पंदने वातावरणात प्रक्षेपित होतात. मेणबत्तीच्या प्रज्वलनामुळे वातावरणात काळ्या शक्‍तीच्या स्वरूपात वायूचे प्रक्षेपण होत असल्यामुळे त्याची स्पंदने वातावरणात दीर्घकाळापर्यंत कार्यरत असतात.

२. मेणबत्तीच्या प्रज्वलनातून वायूमंडलात मायावी शक्‍तीची स्पंदने प्रक्षेपित होतात. मेणबत्ती प्रज्वलित झाल्यावर ती दिसतांना डोळ्यांना चांगली वाटते; परंतु तिच्या प्रज्वलनाचा कोणत्याच प्रकारे आध्यात्मिक लाभ होत नाही.

३. पाश्‍चात्त्यांच्या प्रथेप्रमाणे शुभ आणि अशुभ या दोन्ही कार्यांसाठी (जन्म आणि मृत्यू यांच्या समयी) मेणबत्तीचा वापर करण्यात येतो. त्यामुळे त्या दोन्ही वेळी वायूमंडलात काळ्या शक्‍तीचे प्रक्षेपण होते.’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था (श्रावण शु. १२, १०.८.२०११)

तेलाच्या दिव्याची (कयपंजीची) सूक्ष्मातील वैशिष्ट्ये दर्शवणारे चित्र

मेणबत्तीच्या तुलनेत तेलाच्या दिव्याने (कयपंजीने) दीपप्रज्वलन करण्यामागील शास्त्र काय ?

मेणबत्तीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरी या तम-रजयुक्‍त (त्रासदायक) असतात. या लहरींमुळे वातावरण तामसिक (वाईट शक्‍तीने भारित) बनते. तसेच या लहरींची गती अनियमित आणि वेगवान असल्याने यांतील तमरजोकणांचे घर्षण होऊन त्यातून उत्पन्न होणार्‍या उष्ण वायूमुळे वातावरणातील सत्त्वकणांचे विघटन होते. त्यामुळे वातावरणातील सात्त्विकता नष्ट होते. मेणबत्तीने दीपप्रज्वलन केल्यामुळे समईभोवती तमोकणांचे मंडल निर्माण होते. त्यामुळे समईच्या ज्योतीकडे आकृष्ट होणार्‍या ब्रह्मांडातील देवतेच्या क्रियालहरींना अडथळा प्राप्त होतो. याउलट तेल हे रजोगुणाचे प्रतीक आहे. तेलाची ज्योत ही ब्रह्मांडातील देवतेच्या क्रियालहरींना जागृत करण्यास साहाय्य करते; म्हणून दीपप्रज्वलनासाठी तेलाचा दिवा (कयपंजी) वापरणे इष्ट ठरते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २०.१.२००५)

व्यासपिठावर दीपप्रज्वलन संतांच्या किंवा सात्त्विक व्यक्‍तीच्या हस्ते करणे का योग्य ?

१. दीप हे ज्ञानज्योतीचे प्रतीक असल्याने दीपप्रज्वलन करण्यास सर्वज्ञानी आणि तेजोमयी अशा संतांविना योग्य अशी कोणतीच व्यक्‍ती नाही.

२. संत उपलब्ध नसल्यास सात्त्विक व्यक्‍तीने दीपप्रज्वलन करणे, हे पुढील कारणासाठी योग्य ठरते. दीपातून प्रक्षेपित होणार्‍या लहरी या जिवाच्या ईश्‍वराप्रती असणार्‍या भावऊर्जेच्या प्रमाणात कार्य करतात. सात्त्विक व्यक्‍तीत ईश्‍वराप्रती भावाचे प्रमाण जास्त आणि अहंचे प्रमाण अल्प असते. अशा व्यक्‍तीने दीप प्रज्वलित केला असता ब्रह्मांडातील उच्च देवतांच्या सूक्ष्मतर लहरी जास्त प्रमाणात कार्यरत होतात. या सूक्ष्मतर लहरींचा परिणाम वातावरणातील जिवांवर होतो आणि त्यामुळे जिवांच्या सूक्ष्म-देहांची शुद्धी होण्यास साहाय्य होते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २०.१.२००५)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘कौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र’

Leave a Comment