कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami 2023)

Article also available in :

पूर्णावतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वीतलावर जन्म घेतला. ती ‍वेळ मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांनाची हाेती. हा दिवस म्हणजे कृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती आदी नावांनी ओळखला जातो. जन्माष्टमी या दिवशी भगवान कृष्णाचे तत्त्व वातावरणात नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. या दि‍वशी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप, तसेच श्रीकृष्णाची अन्य उपासना भावपूर्ण केल्यास श्रीकृष्णाचा आशीर्वाद अधिक ​प्रमाणात ग्रहण करता येऊन त्याचा लाभ होतो.

या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात़ त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.

श्री कृष्णाच्या जन्माची वेळ रात्री १२ वाजता असल्यामुळे त्यापूर्वी पूजनाची सिद्धता करून ठेवावी. रात्री १२ वाजता शक्य असल्यास श्री कृष्ण जन्माचा पाळणा (गीत) लावावा.

  • कृष्ण जन्माचा पाळणा ऐका

कृष्ण जन्माष्टमी या दिवशी करायचे पूजन

मंत्र आणि त्याच्या अर्थासहित
श्री कृष्ण पूजन

श्रीकृष्ण जन्माचा पाळणा झाल्यानंतर श्रीकृष्णाची मूर्ती अथवा चित्र यांची पूजा करावी. ज्यांना श्रीकृष्णाची ‘षोडशोपचार पूजा’ करणे शक्य आहे, त्यांनी तशी पूजा करावी. पूजनाचा संपूर्ण विधी जाणून घेण्यासाठी,

पंचोपचार पूजन : ज्यांना श्रीकृष्णाची ‘षोडशोपचार पूजा’ करणे शक्य नाही, त्यांनी ‘पंचोपचार पूजा’ करावी. पूजन करतांना ‘सपरिवाराय श्रीकृष्णाय नमः ।’ हा नाममंत्र म्हणत एक एक उपचार श्रीकृष्णाला अर्पण करावा. श्रीकृष्णाला दही-पोहे आणि लोणी यांचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर श्रीकृष्णाची आरती करावी.

(पंचोपचार पूजा : गंध, हळद-कुंकू, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या क्रमाने पूजा करणे.)

​श्री कृष्णाची मानसपूजा

जे लोक काही कारणास्तव श्रीकृष्णाची प्रत्यक्ष पूजा करू शकत नाहीत, त्यांनी श्री कृष्णाची ‘मानसपूजा’ करावी. (‘मानसपूजा’ याचा अर्थ प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नसल्यास पूजनाचे सर्व उपचार मानसरित्या (मनाने) श्री कृष्णाला अर्पण करणे.)

​श्री कृष्णाचा नामजप करणे

पूजन झाल्यानंतर काही वेळ श्रीकृष्णाचा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करावा.

​श्री कृष्णाला प्रार्थना करणे

श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेमध्ये दिलेल्या ‘न मे भक्तः प्रणश्यति ।’ म्हणजे ‘माझ्या भक्ताचा नाश होत नाही’, या वचनाचे स्मरण करून आपल्यामध्ये ‘अर्जुनाप्रमाणे निस्सीम भक्ती निर्माण व्हावी’, यासाठी श्रीकृष्णाला मनोभावे प्रार्थना करावी.’

​गाेपाळकाला (दहीकाला)

विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे ‘काला’ होय. श्रीकृष्णाने व्रजमंडळात गायी चारतांना स्वतःची आणि सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला अन् सर्वांसह ग्रहण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.

ईश्वराची अनेक प्रकृतींद्वारे अनंत प्रकटीकरण रूपे आहेत. अनेक तत्त्वांमध्ये एकत्वाच्या अनुभूतींद्वारा जी आनंदप्राप्ती होते, तो म्हणजे गोपाळकाला प्रसाद. त्याची गोडी अवर्णनीय असते.

प्रवृत्ती आणि निवृत्ती दोघांनाही ईश्वरच आनंद देतो. त्याच्या सत्संगामुळे समाजालाही आनंदाची अनुभूती येते. गोड झाला, म्हणजे सर्वांना आनंदाची अनुभूती आली आणि गोविंदाने गोड केला, म्हणजे ही अनुभूती केवळ सद्गुरु किंवा ईश्वरच देऊ शकणे.’ – आधुनिक वैद्य (डॉ.) चारुदत्त पिंगळे (आताचे सनातनचे २२ वे संत पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे) यांच्या माध्यमातून, २९.७.२००५, सकाळी ७.५५ ते ८.०५

​काल्यातील प्रमुख घटक

पोहे, दही, दूध, ताक आणि लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत.

. पोहे :वस्तूनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक (काहीही झाले, तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी)

. दही :वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्‍या मातृभक्तीचे प्रतीक

. दूध :गोपींच्या सहज सगुण मधुराभक्तीचे प्रतीक

. ताक :गोपींच्या विरोधभक्तीचे प्रतीक

उ. लोणी :सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुण भक्तीचे प्रतीक

या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.

दहीकाल्याचे इतर लाभ

या दिवशी वायूमंडल आपतत्त्वाने भारित असल्याने देहातील पंचप्राणांच्या वहनाला पोषक असल्याने मनाला उत्साह देणारे आणि देहाची कार्यक्षमता वाढवणारे असते.

वायूमंडलातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने वृक्षचरही चैतन्ययुक्त लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अत्यंत संवेदनशील बनल्याने सर्व सृष्टीच आनंदी असते.

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ११.८.२००५, दुपारी १२.२४)

दहीहंडी हे जिवाचे प्रतीक आहे. दहीहंडी फोडणे, हे जिवाने देहबुद्धी सोडून आत्मबुद्धीत स्थिर होणे, या अर्थाने आहे आणि दिव्य चव हे आनंदाचे प्रतीक आहे.

गोपाळकाला म्हणजे पांढर्‍या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा अधिकाधिक प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा आणि पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला समूच्चय. ‘काला’ हा शब्द एकसंध आणि वेगात सातत्य असणार्‍या क्रियेशी संबंधित आहे. ‘काला’ म्हणजे त्या काळाला, त्या स्थळाला, त्या त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्टपूर्ण कार्य दर्शवणार्‍या घटनांचे एकत्रिकरण.

पूर्णावतारी कार्य हे स्थळ, काळ आणि स्तर या तीनही घटकांवर आदर्शवत असेच असते. या कार्यप्रक्रियेत विविधांगी जीवनाचे पैलू आध्यात्मिकरीत्या ईश्वरी नियोजनाद्वारे मानवजातीसमोर लीलया उलगडून दाखवले जातात. ‘गोपाळकाला’ हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करतो.

​गोकुळाष्टमी निमित्त होणारे गैरप्रकार रोखा !

  • हल्ली दहीकाल्याच्या निमित्ताने वाटमारी, बीभत्स नाच, महिलांची छेडछाड आदी गैरप्रकार सर्रास होतात.
  • लाखो रुपयांच्या दहीहंडी स्पर्धा आयोजित करून केले जाणारे उत्सवाचे व्यापारीकरण !
  • उत्सवासाठी तंबाखू, गुटखा आदींची विज्ञापने किंवा त्यांच्या उत्पादकांचे प्रायोजकत्व !
  • ४० फुटांहून अधिक उंचीवरील दहीहंडी फाेडण्यासाठी गाेविंदांची धाेकादायक कसरत !

या गैरप्रकारांमुळे उत्सवाचे पावित्र्य नष्ट होऊन उत्सवातून देवतेच्या तत्त्वाचा लाभ तर होतच नाही, उलट धर्महानी होते. वरील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले, तरच उत्सवाचे पावित्र्य टिकून उत्सवाचा खरा लाभ सर्वांना होईल. असे करणे ही समष्टी स्तरावरची भगवान श्रीकृष्णाची उपासनाच आहे.

  • वाटमारी, महिलांची छेडछाड आदी अपप्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांत तक्रार करा !
  • गोकुळाष्टमी उत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांना भेटून अपप्रकारांविषयी त्यांचे प्रबोधन करा !
हिंदूंनाे, धर्महानी राेखून श्रीकृष्णाची कृपा संपादन करा !
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय: ।

हिंदूंनो, देवतांचे विडंबन, मंदिरांतील चोर्‍या, मूर्तीभंजन या माध्यमांतून धर्मावर होणार्‍या आघातांविरुद्ध तुम्हीही स्वक्षमतेनुसार वैध मार्गाने लढा द्या ! श्रीकृष्णाच्या वरील आज्ञेनुसार अर्जुनाने धर्माचे रक्षण केले आणि तो श्रीकृष्णाला प्रिय झाला ! कृष्ण धर्मसंस्थापनेची देवता आहे. त्याने द्वापरयुगात जे केले ते आताही करणे आवश्यक आहे. सध्या काळाची आवश्यकता ओळखून धर्मप्रचाराच्या कार्यात साहाय्य करा !

संदर्भ ग्रंथ

वरील माहिती सनातनच्या ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’ या ग्रंथातून घेतली आहे. रक्षाबंधन प्रमाणे अन्य सणांची माहिती जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ वाचा.

​गोकुळाष्टमी निमित्त कृष्ण उपासनेसंबंधी व्हिडीओ पहा !

Leave a Comment