महाशिवरात्र (Mahashivratri 2023)

महाशिवरात्र कधी साजरी केली जाते ?

महाशिवरात्र हे भगवान शिवाचे व्रत आहे. भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. त्या प्रहराला, म्हणजे शंकराच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्र असे म्हणतात. महाशिवरात्र हे व्रत माघ कृष्ण चतुर्दशी या तिथीला करतात. या वर्षी महाशिवरात्र १८ फेब्रुवारी २०२३ या दिवशी आहे.

महाशिवरात्री व्रताचे महत्त्व काय आहे ?

भगवान शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतात. तो काळ पृथ्वीवर वर्षातून एकदा महाशिवरात्र म्हणून साजरा केला जातो, कारण पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. पृथ्वी आणि उच्चलोकांतील कालमानात अंतर आहे. पृथ्वी जड (स्थूल) आहे. जडाची गती खूप कमी असते. म्हणजेच जडाला ब्रह्मांडात प्रवास करण्यास जास्त वेळ लागतो. देवता सूक्ष्म असल्याने त्यांची गती जास्त असते. त्यामुळे त्यांना ब्रह्मांडात प्रवास करण्यास कमी वेळ लागतो. यामुळेच पृथ्वी अन् देवता यांच्या कालमानात अंतर आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची उपासना करण्यामागील शास्त्र याप्रमाणे आहे. `शिवाच्या विश्रांतीच्या वेळी शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेमध्ये जातात. शिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्यामुळे विश्वातील किंवा ब्रह्मांडातील तमोगुण किंवा हालाहल त्यावेळी शिव-तत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे ब्रह्मांडामध्ये हालाहलाचे प्रमाण प्रचंड वाढते किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून जास्तीतजास्त शिव-तत्त्व आकृष्ट करणारी बिल्वपत्रे, पांढरी फुले, रुद्राक्षांच्या माळा इत्यादी शिवपिंडीवर अर्पण करून वातावरणातील शिव-तत्त्व आकृष्ट केले जाते. त्यामुळे वाईट शक्तींच्या वाढलेल्या दाबाचा परिणाम म्हणावा तितका जाणवत नाही’. – ब्रह्मतत्त्व (सौ. पाटील यांच्या माध्यमातून, १८.२.२००४, दुपारी ३.०५)

शिवाने स्वत: भक्तांना आशीर्वचन दिले आहे, जे महाशिवरात्रीला माझे व्रत करतील, त्यांच्यावर माझी पुढीलप्रमाणे कृपादृष्टी होईल –

१. पुरुषांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

२. कुमारिकांना मनासारखा वर मिळेल.

३. विवाहित स्त्रियांचे सौभाग्य टिकेल.

महाशिवरात्रीच्या दिवशी शिव सर्व जिवांना आवर्जून मार्गदर्शन करतात. त्यामुळे अनेक जीव शिवाकडून मार्गदर्शन घेण्यासाठी त्या दिवशी शिवलोकात उपस्थित असतात.

महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे ?

महाशिवरात्री व्रताचे दोन प्रकार आहेत – काम्य आणि नैमित्तिक. उपवास, पूजा आणि जागरण ही महाशिवरात्र व्रताची तीन अंगे आहेत. माघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्त रहावे. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्र व्रताचा संकल्प करावा. सायंकाळी नदीवर किंवा तळ्यावर जाऊन शास्त्रोक्त स्नान करावे. भस्म आणि रुद्राक्ष धारण करावे. प्रदोषकाळी शिवाच्या देवळात जावे. शिवाचे ध्यान करावे. मग षोडशोपचार पूजा करावी. भवभवानीप्रीत्यर्थ तर्पण करावे. शिवाला एकशे आठ कमळे किंवा बेलाची पाने नाममंत्राने वाहावीत. मग पुष्पांजली अर्पण करून अर्घ्य द्यावे. पूजासमर्पण, स्तोत्रपाठ आणि मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फूल काढून ते स्वतःच्या मस्तकावर ठेवावे आणि क्षमायाचना करावी.

महाशिवरात्रीच्या रात्री करावयाची यामपूजा !

शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्यात, असे विधान आहे. त्यांना ‘यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावे, अनुलेपन करावे, तसेच धोत्रा, आंबा आणि बेल यांची पत्री वाहावी. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी देवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेतील मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. नृत्य, गीत, कथाश्रवण इत्यादी गोष्टींनी जागरण करावे. पहाटे स्नान करून पुनश्च शिवपूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. आशीर्वाद घेऊन व्रतसमाप्ती करावी. बारा, चौदा किंवा चोवीस वर्षे हे व्रत केल्यावर त्याचे उद्यापन करावे.

महाशिवरात्रीच्या दिवशी हे अवश्य करा !

  • दिवसभर भगवान शिवाचे नामस्मरण करा.
  • शिवपिंडीला अभिषेक करा.
  • पांढ-या अक्षता, पांढरी फुले, बेल अर्पण करून भगवान शंकराची पूजा करा.
  • भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या.

महाशिवरात्रीला शिवाचा ‘ॐ नमः शिवाय ।’ या षडक्षर मंत्राचा नामजप करा !

महाशिवरात्र या दिवशी शिव-तत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. भगवान शिवाची भावपूर्णरित्या पूजा करण्यासह ‘ॐ नमः शिवाय ’ हा नामजप जास्तीतजास्त केल्याने त्याची कृपा प्राप्त होते. आपल्याला शिव-तत्त्व अधिकाधिक ग्रहण करता येते.

अक्षर सात्त्विक असल्यास त्यात चैतन्य असते. सात्त्विक अक्षरे आणि त्यांच्या भोवती देवतेच्या तत्त्वाला अनुरूप अशी चौकट यांचा अभ्यास करून सनातनने भगवान शिवाची नामजप पट्टी बनवली आहे. ही नामजप पट्टी बघत भक्त नामजप करू शकतात.

ऐका नमः शिवाय मंत्र जप !

महाशिवरात्रीच्या दिवशी शिव-तत्त्व जास्त प्रमाणात कार्यरत असल्याने साधना करणाऱ्यांना विविध प्रकारच्या अनुभूती येतात. विविध सण कसे साजरे करावे, साधना कशी करावी हे जाणून घेण्यासाठी ‘साधना संवाद’ या सनातनच्या ऑनलाइन सत्संगात सहभागी व्हा !

सनातन संस्थेच्या ऑनलाइन सत्संगात सहभागी व्हा !

शिवपिंडीवर अभिषेक करा !

भगवान शिवाला शक्यतो दुधाचा अभिषेक करावा. याचे कारण म्हणजे दुधामध्ये शिवाचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता अधिक असल्याने दुधाच्या अभिषेकाच्या माध्यमातून शिवाचे तत्त्व लवकर जागृत होते. त्यानंतर ते दूध तीर्थ म्हणून प्राशन केल्याने त्या व्यक्तीला शिवतत्त्वाचा अधिक लाभ होतो. दूध हे शक्तीचे प्रतीक असल्याने त्याचा अभिषेक शिवपिंडीवर केला जातो, हे त्यामागचे अध्यात्मशास्त्र आहे. असे केल्याने त्याचा पूजकाला आध्यात्मिक लाभ होतो.

शिवपिंडीला हळद-कुंकू ऐवजी भस्म लावा !

हळद-कुंकू उत्पत्तीचे प्रतीक आहे; म्हणून लयाची देवता असलेल्या शिवाला हळद-कुंकू वाहू नये. कुठलीही वस्तू जाळल्यावर जी राख उरते, तिला ‘भस्म’ म्हणत नाहीत, तर देवाची पूजा म्हणून यज्ञात आहुती दिलेले तूप, समिधा, इतर वनस्पती इत्यादी सर्व जाळल्यावर जे अवशेष रहातात, त्यालाच ‘भस्म’ म्हणतात. भस्म हे विशेषकरून शिवाशी संबंधित आहे; कारण भगवान शिव सर्वांगाला भस्म लावतो. शिवभक्त आपल्या भालप्रदेशावर भस्माने त्रिपुंड्राकृती काढतात. कधी कधी लाल रंगाचा टिळाही या त्रिपुंड्राच्या मध्यभागी काढतात. तो टिळा शिवभक्तीचे प्रतीक मानला जातो. जीव-शिव यांच्या मीलनाने हे दृश्य आणि अदृश्य जगत निर्माण होते, हे दर्शवणारे चिन्ह होय.

पांढर्‍या अक्षता वहा !

अक्षतांकडे (धुतलेले अखंड तांदूळ) निर्गुण ईश्वरी तत्त्वाशी संबंधित उच्च देवतांच्या लहरी आकर्षिल्या जातात; म्हणून अधिकाधिक निर्गुणाशी संबंधित असलेल्या शिवाला त्याच्या पांढर्‍या रंगाशी साधर्म्य असलेल्या पांढर्‍या रंगाच्या अक्षता वहा.

शिवाला पांढरी फुले वहा !

शाळुंकेला निशिगंधा, जाई, जुई, मोगरा यांसारखी पांढरी फुले १० किंवा १० च्या पटीत त्यांचे देठ शिवपिंडीकडे करून वहावीत.

शिवाला बेल वहा !

शिवाला त्रिदल बेल आवडतो, म्हणजे जो आपले सत्त्व, रज आणि तम हे तीनही गुण शिवाला अर्पण करून समर्पण बुद्धीने भगवत्कार्य करतो, त्याच्यावर  शिव संतुष्ट होतो. बेलाची पाने तारक शिव-तत्त्वाची वाहक आहेत, तर बेलाच्या पानाचे देठ मारक शिवतत्त्वाचे वाहक आहे.

शिवाला बेल कसा वहावा ?

बेलाच्या पानाचे देठ पिंडीकडे आणि अग्र (टोक) आपल्याकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वहातो, तेव्हा बेलपत्राच्या अग्रावाटे शिवाचे तत्त्व वातावरणात पसरण्याचे प्रमाण अधिक असते. या पद्धतीमुळे समष्टी स्तरावर शिव-तत्त्वाचा लाभ होतो. याउलट बेलाच्या पानाचे देठ आपल्याकडे आणि अग्र (टोक) पिंडीकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वाहतो, तेव्हा देठाच्या माध्यमातून शिवतत्त्व केवळ बेलपत्र वाहणार्‍यालाच मिळते. या पद्धतीमुळे व्यष्टी स्तरावर शिव-तत्त्वाचा लाभ होतो. बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे शिवाला बेल वाहातांना तो उपडा वाहावा. शिवाला बेल ताजा न मिळाल्यास शिळा चालतो; परंतु सोमवारचा बेल दुसर्‍या दिवशी चालत नाही.

बेलाच्या पानाची वैशिष्ट्ये दर्शवणारे सूक्ष्म-चित्र

महाशिवरात्रीला कोणत्या गंधाच्या उदबत्तीने ओवाळावे ?

उदबत्ती आणि अत्तर यांतून प्रक्षेपित होणार्‍या गंधलहरींकडे देवतांच्या लहरी लवकर आकृष्ट होतात; म्हणून शिवपूजेत केवडा, चमेली किंवा हीना या शिवाला प्रिय असणार्‍या गंधांच्या उदबत्त्यांनी तीन वेळा ओवाळावे आणि केवड्याचे अत्तर वापरावे.

भगवान शिवाच्या मंदिरात दर्शनासाठी जावे !

असे घ्या शिवपिंडीचे दर्शन !

शिवाच्या पिंडीतून प्रक्षेपित होणारे तेज हे सर्वसामान्य पूजकाला पेलवणारे नसते, त्यामुळे शिवपिंडीचे दर्शन घेतांना ते नंदीच्या दोन्ही शिंगातून घ्यावे असे शास्त्र सांगते. नंदीच्या उजव्या अंगाला बसून किंवा उभे राहून डावा हात नंदीच्या वृषणावर ठेवावा. उजव्या हाताची तर्जनी (अंगठ्याच्या जवळचे बोट) आणि अंगठा नंदीच्या दोन शिंगांवर ठेवावे. दोन्ही शिंगे आणि त्यांवर ठेवलेली दोन बोटे यांच्यामधील पोकळीतून शिवलिंग न्याहाळावे.
उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा नंदीदेवाच्या शिंगांवर टेकवल्याने निर्माण होणार्‍या मुद्रेमुळे भाविकांना आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो. नळीमधून वारा सोडला असता त्याचा वेग आणि तीव्रता अधिक असते, तर याउलट पंख्याचा वारा सर्वत्र पसरतो. वरील मुद्रेमुळे नळीप्रमाणे कार्य होत असल्याचे जाणवते. या मुद्रेमुळे शिवाच्या पिंडीतून येणारा शक्‍त‍ीचा झोत अधिक प्रमाणात कार्य करतो. शृंगदर्शनामुळे होणारे सूक्ष्मातील लाभ दर्शवणारे सूक्ष्म-चित्र समजून घेऊ.

शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणा का घालावी ?

शिवाची प्रदक्षिणा चंद्रकोरीप्रमाणे, म्‍हणजे सोमसूत्री असते. शाळुंकेपासून उत्तर दिशेकडे, म्‍हणजे सोमाच्‍या दिशेकडे मंदिराच्‍या विस्‍ताराच्‍या कडेपर्यंत (आवारापर्यंत) जे सूत्र, म्‍हणजे नाला जातो, त्‍याला सोमसूत्र म्‍हणतात. शिवाच्या पिंडीला प्रदक्षिणा घालतांना शिवपिंडीच्या समोर उभे राहिल्यावर उजवीकडे अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी (शाळुंकेचा पुढे नेलेला स्रोत) असते. प्रदक्षिणेचा मार्ग शिवाच्या समोर उभे राहिल्यास, तेथून चालू होऊन घड्याळाच्या दिशेने प्रदक्षिणा घालत पन्हाळीच्या पलीकडच्या कडेपर्यंत जावे. मग पन्हाळी न ओलांडता परत फिरून येऊन शिवपिंडीच्या समोर उभे रहावे. अशा पद्धतीने एक प्रदक्षिणा पूर्ण करावी. शाळुंकेच्या स्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्रोत वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो; म्हणून शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणाच घालावी. स्वयंभू किंवा घरातील लिंगास हा नियम लागू नाही.


भगवान शिव संबंधित अन्य माहिती

भगवान शिवाशी
संबंधित अन्य व्रते

प्रदोष व्रत, हरितालिका, श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत), असे शिवतत्त्वाची लाभ करून देणारी व्रते आहेत. या व्रतांबद्दल जाणून घेऊया.

भगवान शिवाची
देश-विदेशातील मंदिरे

अमरनाथ, शिवखोरी गुहा (जम्मू), वैद्यनाथेश्वर (कर्नाटक), महाराष्ट्राचे त्र्यंबकेश्वर व कपालेश्वर, कंबोडियाचे बांते सामराई, श्रीलंकेचे मुन्नीश्वरम, नगुलेश्वरम मंदिर या शिव मंदिरांचे महत्त्व जाणून घ्या !

भगवान शिव संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी ग्रंथ खरेदी करा !
Sanatanshop.com

महाशिवरात्री निमित्त सनातनची ठिकठिकाणी ग्रंथ-उत्पादन प्रदर्शनी !
अवश्य भेट द्या


महाशिवरात्री विषयी व्हिडिओ पहा !

आपत्काळात महाशिवरात्र कशी साजरी करावी ?

संकटकाळात अथवा आपत्काळात (जसे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर) काही ठिकाणी हे व्रत नेहमीप्रमाणे करण्यास मर्यादा असू शकतात. अशा वेळी काय करावे ? महाशिवरात्रीला शिव-तत्त्वाचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्या कृती कराव्यात ? याविषयीची काही उपयुक्त सूत्रे आणि दृष्टीकोन येथे देत आहोत.

१. पर्याय

अ. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे ज्यांना महाशिवरात्रीला शिवमंदिरात जाणे शक्य नाही, त्यांनी आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी.

आ. जर शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या चित्राची पूजा करावी.

इ. शिवाचे चित्रसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी.

ई. यांपैकी काहीही शक्य नसेल, तर शिवाचा ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो. (श्रावणी सोमवारी उपवास करून शिवाची विधीवत् पूजा करू इच्छिणार्‍यांनाही ही सूत्रे लागू आहेत.)

उ. मानसपूजा : ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’, हा अध्यात्माचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. स्थूल गोष्टींपेक्षा सूक्ष्म गोष्टींमध्ये अधिक सामर्थ्य असते. या तत्त्वानुसार प्रत्यक्ष शिवपूजा करणे शक्य नसल्यास शिवाची मानसपूजाही करू शकतो. शिवाची मानसपूजा कशी करावी, हे जाणून घेण्यासाठी पहा : https://www.sanatan.org/mr/a/719.html

आपत्काळात तरून जायचे असेल, तर साधनेचेच बळ आवश्यक आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे व्रत करण्यास मर्यादा असल्या, तरी त्याने निराश न होता अधिकाधिक आणि झोकून देऊन साधना करण्याकडे लक्ष द्यावे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण भगवान शिवाला शरण जाऊन प्रार्थना करूया, ‘हे शिवशंभो, साधना करण्यासाठी आम्हाला शक्ती, बुद्धी आणि प्रेरणा द्या. आमच्या साधनेत येणार्‍या अडचणी आणि बाधा यांचा लय होऊ दे’, अशी आम्ही शरणागतभावाने प्रार्थना करतो.

शिव उपासनेतील कृतींची सूक्ष्म-चित्रे

या चित्रांना सूक्ष्म-चित्रे म्हणतात. या चित्रांद्वारे सूक्ष्मातील लाभ किंवा दुष्परीणाम समजायला सोपे होते.

तुम्हाला या चित्रांमुळे सूक्ष्म प्रक्रिया कळण्यास साहाय्य झाले का ?


The form has been submitted successfully!
There has been some error while submitting the form. Please verify all form fields again.

Leave a Comment