नागपंचमी (Nagpanchami 2023)

सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वर आहे’, हे शिकवणारा सण !

नागपंचमी हा सणांचा राजा असलेल्या श्रावण मासातील पहिला सण ! हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो. या वर्षी नागपंचमी २१ ऑगस्ट २०२३ या दिवशी आहे. या दिवशी स्त्रिया उपवास करतात, नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नाग देवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. नाग देवतेचे पूजन केल्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होण्याचे संकट टळते. नागपंचमीला काय करावे आणि काय करू नये, त्याचा इतिहास या सर्व गोष्टींमागील शास्त्र पुढे दिले आहे.

नागपंचमी अशी साजरी करा !

 • उपवास करा.
  उपवास केल्याने शक्‍ती वाढते आणि उपवासाचे फळ मिळते. – श्रीकृष्ण (कु. मेघा नकाते यांच्या माध्यमातून), २.८.२००५, दुपारी ४.०५
 • नाग देवतेची पूजा करा.
  ‘नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे, म्हणजे नाग देवतेला प्रसन्न करून घेणे. या दिवशी नागाची पूजा करणे, म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे. त्यामुळे त्या दिवशी वातावरणात आलेल्या शिव-लहरी आकृष्ट होऊन त्या जिवाला ३६४ दिवस उपयुक्‍त ठरतात. स्त्रियांनी नागाच्या आकृत्यांचे भावपूर्ण पूजन केल्याने तिला शक्‍ती-तत्त्व प्राप्त होते.
 • नागाच्या आकृतीची भाऊ म्हणून पूजा करा.
  या विधीमध्ये स्त्रियांनी नागांचे ‘भाऊ’ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते.
 • नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करा.
  असे केल्याने आनंद आणि चैतन्य यांच्या लहरी आकर्षित होतात.
 • स्त्रियांनी झोका खेळावा.
  यामुळे क्षात्रभाव आणि भक्‍तीभाव वाढून त्यातून सात्त्विकतेच्या लहरी मिळतात.
 • प्रार्थना करावी.
  या दिवशी पुढील प्रार्थना करावी – ‘आपल्या कृपेने या दिवशी शिवलोकातून प्रक्षेपित होणारी तरंगे माझ्याकडून अधिकाधिक ग्रहण होऊ दे. माझ्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये येणार्‍या सर्व अडचणी नष्ट होऊ दे. माझ्या पंचप्राणामध्ये देवतांची शक्‍ती सामावली जाऊन ईश्‍वरप्राप्ती आणि राष्ट्ररक्षण यांसाठी तिचा उपयोग होऊ दे. माझ्या पंचप्राणाची शुद्धी होऊ दे.’
  नागपंचमीच्या दिवशी बहिणीची हाक ईश्‍वराच्या चरणी पोहोचते. त्यामुळे बहीणीने भावाच्या उन्नतीसाठी ईश्‍वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करावी ‘त्याला सद्बुद्धी, शक्‍ती आणि सामर्थ्य दे.’

नागपंचमी : इतिहास

नागपंचमी - महत्व

१. सर्प यज्ञाच्या सांगतेचा दिवस !
सर्पयज्ञ करणार्‍या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने ‘वर मागा’, असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जनमेजयाने सर्पयज्ञ थांबवला, तो दिवस पंचमीचा होता.

२. नागदेवतेला जाणा ज्याच्या शिरी श्रीकृष्ण कान्हा !
कालियामर्दनाची तिथी : श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.

३. नागदेवतेची बहिणीवर माया, सदैव त्याची बहिणीवर कृपेची छाया !
पाच युगांपूर्वी सत्येश्‍वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्‍वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी ‘भाऊ म्हणून पूजा करील’, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नाग देवतेची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.

४. नाग हा परमेश्वराच्या अवतारांशी, म्हणजेच सगुण रूपांशी संबंधित आहे. सागरमंथनासाठी कूर्मावताराला वासुकी या नागाने साहाय्य केले होते. श्रीविष्णूच्या तमोगुणातून शेषनागाची निर्मिती झाली. भगवान शंकराच्या अंगावर नऊ नाग आहेत इत्यादी. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागाचे पूजन करणे, म्हणजे नऊ नागांच्या संघाच्या एका प्रतिकाचे पूजन करणे होय.

५. सागरमंथनाच्या वेळी भगवान शिव जेव्हा हलाहल विष प्यायले तेव्हा शिवाला साहाय्य करण्यासाठी नऊ नाग आले. त्यांनीही हलाहलाचा अंश प्राशन केला. त्यामुळे शिव नागांवर प्रसन्न झाले. नागांनी समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी ‘मनुष्य नेहमी नागांप्रती कृतज्ञ राहून तो नागांची पूजा करेल’, असा आशीर्वाद नागांना दिला. तेव्हापासून नऊ नाग मनुष्याला पूजनीय झाले. नऊ नाग हे नऊ प्रकारची पवित्रके (चैतन्यलहरी) ग्रहण करणारे घटक आहेत.

करून नाग पूजन मिळवा हो अनंत पुण्य जन !

नाग देवतेचे पूजन केल्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होण्याचे संकट टळते. या दिवशी घरामध्ये स्वच्छ लाकडी पाटावर गंध, हळद आणि कुंकू यांच्या मिश्रणाने पाच फण्यांचा नाग काढावा किंवा रक्तचंदनाने नऊ नागांच्या आकृत्या काढाव्यात. काही ठिकाणी मातीचा नागही बनवून त्याचे पूजन करतात. नागाची पूजा करतांना अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या नऊ नागांची नावे घेऊन गंध, अक्षता आणि फुले वाहावीत. घरातील लोकांनी फुले, दूर्वा, लाह्या, हरभरे इत्यादी पदार्थ वाहावेत.

मंत्र आणि त्याच्या अर्थासहित

नाग पूजन

पूजा करताना ती भावपूर्ण व्हावी आणि नागदेवतेची कृपा व्हावी, या हेतूने नागपंचमी या दिवशी करायचा पूजाविधी येथे सविस्तर दिला आहे. संपूर्ण नाग पूजन त्यातील मंत्र आणि त्यांच्या अर्थासहित जाणून घेण्यासाठी…

नाग पूजन

पूजा करताना ती भावपूर्ण व्हावी आणि नागदेवतेची कृपा व्हावी, या हेतूने नागपंचमी या दिवशी करायचा पूजाविधी येथे सविस्तर दिला आहे. संपूर्ण नाग पूजन त्यातील मंत्र आणि त्यांच्या अर्थासहित जाणून घेण्यासाठी…

हिंदु धर्म आपल्याला निर्जीव वस्तुंपासून ते प्राणीमात्रांपर्यंत, सर्वच गोष्टी पूजनीय आहेत अशी शिकवण देतो. त्यांच्यातील देवत्वाचा सन्मान करायला शिकवतो. त्यामुळे देवाची प्रीती सतत अनुभवता येते. हा भाव अनुभवणे म्हणजे देवाच्या अनुसंधानात रहाणे. देवाची कृपा आपल्यावर सतत कशी राहिल, अनुसंधानात कसे रहायचे, हे जाणून घेण्यासाठी…

सनातन संस्थेच्या ऑनलाइन सत्संगात सहभागी व्हा !

नागपंचमीला या कृती टाळा !

नागपंचमी - काय करावे - काय टाळावे

नागपंचमीच्या दिवशी भाजी कापणे, चिरणे, तळणे, तसेच भूमी उकरणे, नांगरणे यांसारख्या कृती करणे निषिद्ध आहे; मात्र वर्षातील इतर दिवशी या कृती करण्यास बंधने नाहीत. नागपंचमीच्या दिवशी निषिद्ध कृती न करण्यामागील शास्त्र आणि त्या कृती केल्याने होणारी हानी जाणून घेऊया.

नागदेवता ही इच्छेशी संबंधित देवता आहे, तो इच्छेचा प्रवर्तक आहे. इच्छेचा प्रवर्तक, म्हणजेच इच्छेला गती देणारा किंवा सकाम इच्छेची पूर्तता करणारा. नागपंचमीच्या दिवशी नागदेवताजन्य तत्त्वाच्या इच्छालहरी भूमीवर अवतरलेल्या असल्याने वायूमंडलात नागदेवताजन्य तत्त्वाचे प्रमाण जास्त असते. कापणे, चिरणे आणि तळणे, या कृतींमधून रज-तमाशी संबंधित इच्छालहरी निर्माण होतात. या स्पंदनांचा व्यक्‍तीवर परिणाम होतो, तसेच देवताजन्य इच्छालहरींच्या कार्याला अवरोध होतो. यामुळे नागदेवताजन्य लहरींना कार्य करण्यात अडथळा प्राप्त होऊ शकतो. म्हणून नागपंचमीच्या दिवशी अशा प्रकारच्या कृती केल्याने पाप लागू शकते; म्हणून नागपंचमीच्या दिवशी कापणे, चिरणे, तळणे, तसेच भूमी उकरणे, नांगरणे, या कृती निषिद्ध मानल्या आहेत.

इतर दिवशी अशा देवताजन्य इच्छालहरींचा वास भूमीलगत नसल्याने अशा कृती केल्यास समष्टी पाप लागण्याचे प्रमाण अल्प असते. यातूनच वायूमंडलात त्या त्या दिवशी असणार्‍या देवतांच्या कार्यरत लहरींचे प्रमाण लक्षात घेऊन त्या त्या दिवशी ते ते सण आणि उत्सव साजरे करण्याची पद्धत हिंदु धर्मात असल्याचे लक्षात येते आणि त्याचे महत्त्व कळते.

पूर्वीच्या काळी कंदमुळे भाजून, तसेच ती उकडून खाण्याची पद्धत होती. या प्रक्रियेत कापणे, चिरणे, तसेच तळणे या कृती होत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्याकडून पातक घडण्याची शक्यता न्यून होती. कलियुगात जुन्या परंपरा पाळणे कठीण असल्याने प्रत्येक कृतीतून निर्माण होणारे पाप नष्ट होण्यासाठी ती कृती साधनेच्या स्तरावर, म्हणजेच नामजप करत करणे आवश्यक आहे, यावरून कलियुगातील नामसाधनेचे महत्त्व लक्षात येते.
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, आषाढ कृष्ण ३, कलियुग वर्ष ५१११ (१०.७.२००९))

नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचे महत्त्व

सत्येश्‍वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्‍वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. ‘भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यांतून तारला जावो’, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला ७५ टक्के लाभ होतो आणि त्याचे रक्षण होते.

एका मतानुसार आदल्या दिवशी केवळ दुपारी जेवून रहावे आणि दुसऱ्या दिवशी रात्री जेवण करावे अशा प्रकारे उपवासाचे स्वरूप आहे. (टीप : पण यात प्रांतानुसार बदल असू शकतात.)

नागपंचमी या दिवशी स्त्रिया मेंदी का काढतात, नवीन वस्त्रे आणि अलंकार का घालतात ?

सत्येश्‍वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले. त्यातून सत्येश्‍वरी समाधानी झाली. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करतात.

नागपंचमी या दिवशी झोका खेळण्याचे महत्त्व

नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे शास्त्रोक्‍त पूजन केल्यानंतर आनंदाचे प्रतीक म्हणून स्त्रियांनी झोका खेळण्याची प्रथा परंपरांगत चालत आली आहे.

झोका खेळण्यामागील इतिहास – नाग राजाने सत्येश्‍वरीला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्‍वराचे रूप प्रकट केले. तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोके घेऊ लागली. त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात.

झोका खेळण्यामागील उद्देश असतो – जसा झोका वर जातो, तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका खाली येतो, तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि दुःखे खाली जाऊ देत. वरील भाव ठेवून जेव्हा बहीण प्रत्येक विचार आणि कृती करते, तेव्हा भावाची ५ टक्के आध्यात्मिक आणि ३० टक्के व्यावहारिक उन्नती होते.

नागपंचमीला करायच्या काही कृतींचे महत्त्व

नाग पूजनाचे महत्त्व

१. ‘नागांतील श्रेष्ठ जो ‘अनंत’ तोच मी’, अशी गीतेत (१०.२९) श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो.

अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम् ।
शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं, कालियं तथा ।।

अर्थ: अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात. त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही.

२. हिंदु धर्म नागपंचमीच्या दिवशीच्या या पूजनातून ‘सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वर आहे’, हे शिकवतो.’ – कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, गोवा.
जगातील सर्व जीवजंतू जगाच्या कार्यासाठी पूरक आहेत. नागपंचमीला नागांच्या पूजेद्वारे ‘भगवंत त्यांच्याद्वारे कार्य करत आहे’, हा विशाल दृष्टीकोन शिकायचा आहे.’ – प.पू. परशराम माधव पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

३. ‘नागामध्ये नागपंचमीच्या दिवसाविना इतर दिवशी तत्त्वे अप्रकट स्वरूपात कार्यरत असतात; मात्र नागपंचमीच्या दिवशी ती प्रकट स्वरूपात कार्यरत असल्यामुळे पूजकाला त्यांचा अधिक लाभ होतो. स्त्रिया पाटावर हळदीने नऊ नागांच्या आकृत्या काढून त्यांचे पूजन करतात.

४. ‘७.८.२००७ या दिवशी दुपारी ४.४५ वाजता प्रदक्षिणा घालतांना मला नागपंचमीविषयी पुढील विचार सुचले. ‘नाग ही ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्याशी एकरूप असलेली देवता आहे. नागदेवता ही पृथ्वीचा मेरूदंड आहे. नागपंचमीला नागाची पूजा करण्याचे पुष्कळ महत्त्व असते. अध्यात्मात नाग देवतेला महत्त्व असते; कारण कुंडलीनीही सूक्ष्म-सर्पच आहे. कुंडलिनी जागृत करण्यासाठी साधना करणे आवश्यक असते. – सौ. क्षिप्रा

कुंडलिनी जागृतीविषयी बऱ्याच जणाांना शंका आणि प्रश्न असतात, त्यांनी शंका निरसनासाठी सनातनच्या सत्संगात सहभागी व्हा !

नागपंचमीच्या दिवशी हळद अथवा रक्‍तचंदन याने पाटावर नऊ नागांच्या आकृत्या काढणे, या कृतीचे केलेले सूक्ष्म-परीक्षण

पाटावर नऊ नागांच्या आकृत्या

​१. ‘पाटावर हळद अथवा रक्‍तचंदन याने नागांच्या काढलेल्या नऊ आकृत्यांचे भावपूर्ण पूजन करावे. पूजन केल्यावर नाग लोकातून नऊ नाग-तत्त्वे ‘प्रत्येक आकृतीमध्ये एक’, याप्रमाणे नागमोडी लहरींच्या स्वरूपात आकृष्ट होणे

१ अ. प्रत्येक नागाच्या नावाच्या उच्चारातून दिसलेला त्याच्याशी संबंधित लहरीचा रंग

नागाचे नावतत्त्वाचा दिसलेला रंग
१. अनंतगडद पिवळा
२. वासुकीधुरकट गुलाबी
३. शेषनिळसर
४. पद्मनाभतांबडा
५. कंबलकाळसर
६. शंखपालफिकट पिवळा
७. धृतराष्ट्रतांबडा
८. तक्षकलाल
९. कालियामातकट काळसर

​२. पाटावर काढण्यात आलेल्या हळदीच्या अथवा रक्‍तचंदनाच्या आकृत्यांमध्ये शक्‍ती कार्यरत होणे

​२ अ. हळदीच्या साहाय्याने नागाच्या आकृत्या काढणे
हळदीमध्ये सत्त्वप्रधान पृथ्वीतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हळदीच्या माध्यमातून अतिसूक्ष्म स्पंदने हळदीमध्ये आकृष्ट होऊन ती पूजन करणार्‍या स्त्रीला मिळतात.

२ आ. रक्‍तचंदनाच्या साहाय्याने नागाच्या आकृत्या काढणे
रक्‍तचंदनामध्ये सापाप्रमाणे अधिक शीतलता असते.

३. नागाच्या आकृत्यांचे भावपूर्ण पूजन केल्यामुळे परमेश्‍वरी तत्त्वाचा प्रवाह आकृत्यांमध्ये आकृष्ट होणे

३ अ. आकृत्यांमध्ये परमेश्‍वरी तत्त्वाचे वलय निर्माण होणे

​४. ईश्‍वराकडून चैतन्याचा प्रवाह आकृत्यांमध्ये आकृष्ट होणे

४ अ. भावपूर्ण पूजनातून आकृत्यांमध्ये चैतन्याचे वलय निर्माण होणे

४ आ. वातावरणात चैतन्य कण पसरणे

​५. ईश्‍वराकडून शक्‍तीचा प्रवाह आकृष्ट होणे

५ अ. शक्‍तीचे वलय निर्माण होऊन या वलयातून वातावरणात शक्‍तीच्या प्रवाहांचे प्रक्षेपण होणे

५ आ. वातावरणात शक्‍तीचे कण पसरणे’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, गोवा, आषाढ कृ. १, कलियुग वर्ष ५१११ (८.७.२००९)

​नागपंचमीच्या दिवशी वारुळाचे पूजन केल्यामुळे होणारा परिणाम

नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी नागाचे वास्तव्य असलेल्या वारुळाचे पूजन करण्याची प्रथा आहे. वारुळाच्या ठिकाणी नागाचे वास्तव्य असल्याने तेथील वातावरणावरही त्याचा सूक्ष्मातून परिणाम होत असतो.

वारुळापेक्षा प्रत्यक्ष नागाचे पूजन करणे अधिक उपयुक्‍त ठरणे : खालील सूक्ष्म-चित्रात दिल्याप्रमाणे सर्व तत्त्वे वारुळात कार्यरत असली, तरीही प्रत्यक्ष नागदेवतेचे पूजन करणे अधिक उपयुक्‍त ठरते; कारण वारुळात नागाचे वास्तव्य आहे का, ते कळत नाही. वारुळात कार्यरत असणार्‍या स्पंदनांचे वातावरणात प्रक्षेपण होत नसल्याचे जाणवले. वारुळात नाग आणि नागीण यांच्या वास्तव्यातून मायिक स्पंदने कार्यरत होऊ शकतात. – कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, गोवा, आषाढ कृ. २, कलियुग वर्ष ५१११ (९.७.२००९)

​नागांचे आध्यात्मिक महत्त्व

कश्यप ऋषी आणि कद्रू यांच्यापासून सर्व नागांची निर्मिती झाली. भगवान शिव हा सर्व नागांचा अधिपति आहे. त्यामुळे बहुतांश नाग शिवाचीच उपासना करतात. काही नाग विष्णूची, तर काही नाग श्री गणेशाची उपासना करतात.

त्रिगुणांप्रमाणे नागांचे प्रमुख तीन प्रकार आहेत.

तामसिक नाग : हे नाग प्रामुख्याने काळ्या रंगाचे असून ते पाताळातील नागलोकात निवास करतात. मोठ्या वाईट शक्ती या नागांचा सूक्ष्म युद्धामध्ये शत्रूवर विष-प्रयोग करण्यासाठी शस्त्राप्रमाणे वापर करतात. पाताळातील नाग हे पृथ्वीवरील नागांपेक्षा लक्ष पटींनी सामर्थ्यवान आणि सहस्र पटींनी विषारी असतात.

राजसिक नाग : हे नाग पृथ्वीवर वास करतात. नाग योनीमध्ये जन्म मिळाल्यामुळे या नागांचे आचरण सर्वसामान्य नागांप्रमाणे असते. ते काळे, निळसर, तपकिरी, चॉकलेटी आदी रंगांचे असतात.

सात्त्विक नाग : हे नाग दैवी असल्यामुळे ते शिव लोकाजवळील दैवी नागलोकात वास करतात. त्यांचा रंग पिवळसर असतो आणि त्यांच्या मस्तकावर लाल किंवा निळ्या रंगाचा नागमणी असतो. सात्त्विक नाग हे पाताळातील नागांच्या तुलनेत लक्ष पटींनी सामर्थ्यवान असतात. सात्त्विक नागांना विविध देवतांनी धारण केले आहे. शिवाच्या गळ्यात वासुकी नाग असतो. गणपतीच्या पोटाला वेटोळे घातलेला जागृत विश्‍वकुंडलीनीचे प्रतीक असणारा पिवळा रंगाचा पद्मनाभ नागआहे. श्रीविष्णू शेषनागाच्या शय्येवर पहुडतो. सात्त्विक नाग सिद्ध आणि ऋषिमुनी यांच्या आधीन असतात. ते त्यांच्या आज्ञेचे पालन करतात. पिवळे नाग उच्च देवतांचे उपासक असल्यामुळे त्यांच्याकडे दैवी बळ आहे. त्यामुळे त्यांना आशीर्वाद देण्याचे, म्हणजे संकल्पानुसार कार्य करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे.

१. नागदेवता या गौण देवतांमध्ये गणल्या जातात.

२. काही ठिकाणच्या स्थानदेवता म्हणूनही त्या कार्य करत असतात.

३. नागदेवतांचे स्थान पिंपळाच्या किंवा वडाच्या वृक्षाखाली किंवा मोठ्या वारुळात असते.

४. सातेरी देवीचा वास वारुळात असतो. देवीची सेवा करण्यासाठी आणि तिचे गण बनून कार्य करण्यासाठी सात्त्विक नाग वारुळात वास करतात.

भुवर्लोक आणि पितृलोक येथे अडकलेले पूर्वज बहुदा काळ्या नागांच्या रूपात वंशजांना दर्शन देतात. सात्त्विक पूर्वज पिवळ्या नागांच्या रूपात दर्शन आणि आशीर्वाद देतात. देवकार्यात सहभागी असणारे आणि सज्जन प्रवृत्तीचे पूर्वज हे पितृलोकात निवास केल्यानंतर काही काळ शिवलोकाजवळील दैवी नागलोकात पिवळ्या नागांच्या रूपाने वास करतात. घर, संपत्ती आणि कुटुंबीय यांच्याविषयी पुष्कळ आसक्ती असणार्‍या पूर्वजांना पृथ्वीवर नागाच्या योनीत जन्म मिळतो असे म्हणतात.

कलियुगाच्या आरंभापर्यंत विविध ठिकाणच्या देवतांना त्यांचे स्वतंत्र स्थान दिले जायचे, उदा. स्थानदेवता, ग्रामदेवता, क्षेत्रपालदेवता इत्यादी. त्याप्रमाणे भारतातील प्रत्येक गावात नागांना रहाण्यासाठी नागबन होते. या ठिकाणी मोठमोठे दाट वृक्ष जवळ-जवळ असायचे आणि त्यांच्या बुंध्याच्या मुळाशी वारुळ असायचे. प्रत्येक गावातील नाग तेथे रहायचे. (अशी नागबने अजूनही कर्नाटक राज्यातील मुल्की, सुरतकल आदी ठिकाणी आपल्याला पहावयास मिळतात.) नागांना स्वतंत्र स्थान दिल्यामुळे ते मनुष्याला त्रास देत नसत आणि मनुष्य अन् त्याची संपत्ती यांचे रक्षण करायचे. विज्ञानयुगातील मानवाने भौतिक प्रगती करण्यासाठी गावोगावी असणारी नागबने नष्ट करून तेथे मोठमोठ्या इमारती बांधल्या. त्यामुळे मनुष्याला नागांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. – कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान)

नागांचे प्रकार

त्रिगुणांप्रमाणे नागांचे प्रमुख तीन प्रकार आहेत.

तामसिक नाग : हे नाग प्रामुख्याने काळ्या रंगाचे असून ते पाताळातील नागलोकात निवास करतात. मोठ्या वाईट शक्ती या नागांचा सूक्ष्म युद्धामध्ये शत्रूवर विष-प्रयोग करण्यासाठी शस्त्राप्रमाणे वापर करतात. पाताळातील नाग हे पृथ्वीवरील नागांपेक्षा लक्ष पटींनी सामर्थ्यवान आणि सहस्र पटींनी विषारी असतात.

राजसिक नाग : हे नाग पृथ्वीवर वास करतात. नाग योनीमध्ये जन्म मिळाल्यामुळे या नागांचे आचरण सर्वसामान्य नागांप्रमाणे असते. ते काळे, निळसर, तपकिरी, चॉकलेटी आदी रंगांचे असतात.

सात्त्विक नाग : हे नाग दैवी असल्यामुळे ते शिव लोकाजवळील दैवी नागलोकात वास करतात. त्यांचा रंग पिवळसर असतो आणि त्यांच्या मस्तकावर लाल किंवा निळ्या रंगाचा नागमणी असतो. सात्त्विक नाग हे पाताळातील नागांच्या तुलनेत लक्ष पटींनी सामर्थ्यवान असतात. सात्त्विक नागांना विविध देवतांनी धारण केले आहे. शिवाच्या गळ्यात वासुकी नाग असतो. गणपतीच्या पोटाला वेटोळे घातलेला जागृत विश्‍वकुंडलीनीचे प्रतीक असणारा पिवळा रंगाचा पद्मनाभ नागआहे. श्रीविष्णू शेषनागाच्या शय्येवर पहुडतो. सात्त्विक नाग सिद्ध आणि ऋषिमुनी यांच्या आधीन असतात. ते त्यांच्या आज्ञेचे पालन करतात. पिवळे नाग उच्च देवतांचे उपासक असल्यामुळे त्यांच्याकडे दैवी बळ आहे. त्यामुळे त्यांना आशीर्वाद देण्याचे, म्हणजे संकल्पानुसार कार्य करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे.

देवतांच्या श्रेणीतील नागांचे स्थान

१. नागदेवता या गौण देवतांमध्ये गणल्या जातात.

२. काही ठिकाणच्या स्थानदेवता म्हणूनही त्या कार्य करत असतात.

३. नागदेवतांचे स्थान पिंपळाच्या किंवा वडाच्या वृक्षाखाली किंवा मोठ्या वारुळात असते.

४. सातेरी देवीचा वास वारुळात असतो. देवीची सेवा करण्यासाठी आणि तिचे गण बनून कार्य करण्यासाठी सात्त्विक नाग वारुळात वास करतात.

पूर्वज आणि नाग यांचा संबंध

भुवर्लोक आणि पितृलोक येथे अडकलेले पूर्वज बहुदा काळ्या नागांच्या रूपात वंशजांना दर्शन देतात. सात्त्विक पूर्वज पिवळ्या नागांच्या रूपात दर्शन आणि आशीर्वाद देतात. देवकार्यात सहभागी असणारे आणि सज्जन प्रवृत्तीचे पूर्वज हे पितृलोकात निवास केल्यानंतर काही काळ शिवलोकाजवळील दैवी नागलोकात पिवळ्या नागांच्या रूपाने वास करतात. घर, संपत्ती आणि कुटुंबीय यांच्याविषयी पुष्कळ आसक्ती असणार्‍या पूर्वजांना पृथ्वीवर नागाच्या योनीत जन्म मिळतो असे म्हणतात.

कलियुगात मनुष्याला नागांचा उपद्रव का होतो ?

कलियुगाच्या आरंभापर्यंत विविध ठिकाणच्या देवतांना त्यांचे स्वतंत्र स्थान दिले जायचे, उदा. स्थानदेवता, ग्रामदेवता, क्षेत्रपालदेवता इत्यादी. त्याप्रमाणे भारतातील प्रत्येक गावात नागांना रहाण्यासाठी नागबन होते. या ठिकाणी मोठमोठे दाट वृक्ष जवळ-जवळ असायचे आणि त्यांच्या बुंध्याच्या मुळाशी वारुळ असायचे. प्रत्येक गावातील नाग तेथे रहायचे. (अशी नागबने अजूनही कर्नाटक राज्यातील मुल्की, सुरतकल आदी ठिकाणी आपल्याला पहावयास मिळतात.) नागांना स्वतंत्र स्थान दिल्यामुळे ते मनुष्याला त्रास देत नसत आणि मनुष्य अन् त्याची संपत्ती यांचे रक्षण करायचे. विज्ञानयुगातील मानवाने भौतिक प्रगती करण्यासाठी गावोगावी असणारी नागबने नष्ट करून तेथे मोठमोठ्या इमारती बांधल्या. त्यामुळे मनुष्याला नागांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. – कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान)

संदर्भ ग्रंथ

वरील माहिती सनातनच्या ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’ या ग्रंथातून घेतली आहे. नागपंचमीप्रमाणे अन्य सणांची माहिती जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ वाचा.

नागपंचमी संबंधी व्हिडीओ पहा !

आपल्या कुटुंबाची नाग भयापासून सदासर्वकाळ मुक्तता व्हावी, तसेच नाग देवतेचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा, यासाठी प्रती वर्षी श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला म्हणजेच नागपंचमीला नागपूजन केले जाते. या दिवशी काही ठिकाणी मातीचा नाग आणून त्याची पूजा करतात, तर काही ठिकाणी वारूळाची पूजा केली जाते. आपत्कालीन स्थितीमुळे (उदाहरणार्थ कोरोना महामारी, पूर) बाहेर जाऊन वारूळाची पूजा करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत पुढील कृती करू शकतो.

१. नागदेवतेचे पूजन

१ अ. नागदेवतेचे चित्र काढणे : हळद-मिश्रित चंदनाने भिंतीवर अथवा पाटावर नागाचे चित्र काढावे (अथवा नऊ नागांची चित्रे काढावीत.) आणि त्या ठिकाणी नाग देवतेचे पूजन करावे. ‘अनंतादिनागदेवताभ्यो नमः ।’ हा नाममंत्र म्हणत गंध, पुष्प इत्यादी सर्व उपचार समर्पित करावे.

१ आ. षोडशोपचार पूजन : ज्यांना नागदेवतेची ‘षोडशोपचार पूजा’ करणे शक्य आहे, त्यांनी षोडशोपचार पूजा करावी.

१ इ. पंचोपचार पूजन : ज्यांना नागदेवतेची ‘षोडशोपचार पूजा’ करणे शक्य नाही, त्यांनी ‘पंचोपचार पूजा’ करावी आणि दूध, साखर, लाह्या यांचा, तसेच कुळाच्या परंपरेनुसार खीर इत्यादी पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. (पंचोपचार पूजा : गंध, हळद-कुंकू, पुष्प (उपलब्ध असल्यास दूर्वा, तुळशी, बेल), धूप, दीप आणि नैवेद्य या क्रमाने पूजा करणे.)

२. पूजनानंतर नाग देवतेला करावयाची प्रार्थना ! ‘हे नाग देवतांनो, श्रावण शुक्ल पक्ष पंचमीला मी जे हे नाग पूजन केले आहे, या पूजनाने आपण प्रसन्न होऊन मला नेहमी सुखी ठेवा. हे नागदेवतांनो, मी हे जे पूजन केले आहे, त्यात अज्ञानाने अथवा अजाणतेपणी काही उणे-अधिक झाले असल्यास मला क्षमा करावी. तुमच्या कृपेमुळे माझी सर्व मनोरथे पूर्ण होवोत. माझ्या कुळामध्ये कधीही नागविषापासून भय उत्पन्न होऊ नये’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.