हिंदु राष्ट्र या शब्दाऐवजी सनातन धर्म राज्य हा शब्द वापरात आणण्याविषयी प.पू. पांडे महाराज यांनी सांगितलेले गुह्य ज्ञान !

PP_pande_maharaj
प.पू. पांडे महाराज

१६.६.२०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये महर्षींनी ८.६.२०१६ जीवनाडीपट्टी क्र. ८२ मध्ये हिंदु राष्ट्र या शब्दाऐवजी सनातन धर्म राज्य हा शब्द वापरावा, अशा आशयाची चौकट प्रसिद्ध झाली होती.

चौकटीत पुढे असेही लिहिले होते, सनातन हा मूळ धर्म आहे. काळाच्या ओघात त्याचे हिंदु असे नाव प्रचलित झाले. सिंधू नदीच्या काठी रहातात, ते हिंदू, अशी हिंदु शब्दाची एक व्युत्पत्ती सांगितली जाते. याविषयी काही वर्षांपूर्वी बोलतांना परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले होते, सध्या हिंदु धर्म असे नाव प्रचलित असले, तरी त्याचे मूळ नाव सनातन धर्म असे आहे. आपण सध्या प्रचलित आहे; म्हणून हिंदु धर्म असा उल्लेख करू; पण पुढे हिंदु राष्ट्रात सनातन धर्म असाच उल्लेख प्रचलित करू. आता महर्षींनी दिलेला संदेशही तशाच अर्थाचा आहे. महर्षींनी नाडीपट्टीत सहस्रो वर्षांपूर्वी भविष्य कथन स्वरूपात केलेले लिखाण आणि प.पू. डॉक्टरांनी व्यक्त केलेले वरील विचार यांतील साम्य पहाता त्यांचे त्रिकालज्ञानीत्व लक्षात येते.

सनातन धर्म म्हणजे काय ? सनातन धर्म राज्य म्हणजे काय ?, याविषयी प.पू. पांडे महाराज यांनी केलेल्या विवेचनाचा पूर्वार्ध काल आपण पाहिला आज उत्तरार्ध पाहू.

 

५. पूजेच्या शेवटी इदं न मम असे म्हणण्यामागील कारण

भगवंताचे भगवंताला अर्पण करायचे असते. त्यावर पूजेतील यजमानाचा कोणताही अधिकार नसतो. या पूर्ण जाणिवेसह जेव्हा साधक वागतो, तेव्हा त्या संकल्पात भगवंताचीच पूर्ण शक्ती येते. त्यात त्याची वैयक्तिक शक्ती रहात नाही. जसे समुद्रात पाण्याचा थेंब टाकला, तर तो समुद्र होतो, त्याप्रमाणे हे होते.

देहाचा मालक तोच आहे. शरीर चालवणाराही तोच आहे. त्यानेच त्याच्याद्वारा कार्य केले आहे. त्यामुळे त्याचे फळ त्यालाच अर्पण करायचे. (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्‍लोक २७) अशामुळे तो कर्मबंधनातून मुक्त होतो आणि या कार्यामुळे साधनेमुळे जी अमोघ शक्ती त्याला प्राप्त झालेली असते, त्यामुळे त्या जिवाची आत्मोन्नती होत जाते. (त्याच्या आत्म्यावर सहस्रो जन्मांचे जे दोषयुक्त आवरण असते, ते नाहीसे होते. त्याचे अंतःकरण शुद्ध होते.) अशा प्रकारे गुरुकृपायोगाद्वारे त्याला ईश्‍वरप्राप्ती होते. तो जीव अशा प्रकारे जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून सुटतो.

५ अ. संकल्पशक्तीचे (धारणाशक्तीचे) सामर्थ्य स्पष्ट करणारे उदाहरण

जसे भूगोलाच्या नकाशावरून आपण पहातो की, एखादे शहर कुठे आहे ? त्याचे स्थान नक्की करण्यासाठी आपण अक्षांश-रेखांश सांगतो. त्यामुळे ते स्थान आपल्याला निश्‍चितपणे सापडते. तेव्हा या अवाढव्य विश्‍वात माझे स्थान निश्‍चितपणे कुठे आहे ?, हे कळण्यासाठी, तसेच मूलस्वरूप शक्तीच्या चैतन्याशी संबंध जोडण्यासाठी असा भावपूर्ण संकल्प केल्यास आपल्याला त्याची अमोघ शक्ती प्राप्त होते.

 

६. यज्ञपुरुष किंवा स्थितप्रज्ञ कुणाला म्हणतात ?

ये ब्राह्मणाः त्रिसुपर्णं पठन्ति । ते सोमं प्राप्नुवन्ति ।
आ सहस्रात् पङ्क्तिं पुनन्ति ॥

विवरण : जे साधक अशा प्रकारे सनातन अशा मूल स्वरूपाशी अनुसंधान साधून साधना करतात, ते स्वतः सदा आनंदमय अवस्थेत रहातात. अशी अवस्था जेव्हा प्राप्त होते, तेव्हा त्याला यज्ञपुरुष किंवा स्थितप्रज्ञ म्हणतात, अशा स्थितप्रज्ञ यज्ञपुरुषामध्ये सहस्त्रो लोक पावन करण्याची क्षमता असते. प.पू. डॉक्टरसुद्धा हेच म्हणतात, मी हिंदु राष्ट्राच्या (सनातन धर्म राज्याच्या) स्थापनेचे प्रयत्न कर्मफलाची अपेक्षा न करता कर्मयोगाप्रमाणे करतो. ज्ञानयोगानुसार कर्मफलाकडे साक्षीभावाने पहातो, तर भक्तीयोगाप्रमाणे सर्व ईश्‍वरेच्छेने (सनातन अशा मूलस्वरूपी ईश्‍वराच्या अनुसंधानात राहून म्हणजेच त्याच्या इच्छेने) होते, हे ज्ञात असल्यामुळे कर्मफलाचे विचार करत नाही; म्हणून मी नेहमी आनंदी असतो.

महर्षींनी सांगितल्याप्रमाणे प.पू. डॉक्टर हे श्रीविष्णूचा अवतार असल्याने त्यांच्यात अशा प्रकारची महान शक्ती आलेली आहे.

 

७. सनातन धर्माचा प्रमुख उद्देश काय आहे ?

वास्तविक प्राणीमात्रांच्या जीवकल्याणासाठी हे विश्‍व वसुधैव कुटुंबकम्प्रमाणेच आहे. त्या दृष्टीनेच भगवंताने या सृष्टीची निर्मिती केली आहे; परंतु रज-तमाच्या प्रभावामुळे मानवाचे मन विकृतीजन्य होते. तेव्हा तो दुराचार करतो. अशा या त्याच्या वाईट कृत्यामुळे तो, त्याचे कुटुंब, समाज, राष्ट्र आणि जग यांची हानी होते. मानवाचा जन्मच ८४ लक्ष योनींतून फिरून आल्यावर होतो. त्यानंतर तो या जन्म-मरणाच्या फेर्‍यांतून सुटावा; म्हणून त्याला मानव देह मिळतो. त्याला बुद्धी दिली आहे. त्याद्वारे त्याने भगवंताचे नियोजन जाणून घ्यावे. तो या भूमीवर कशासाठी आला आहे ? त्याला काय करायचे आहे ? तो आतापर्यंत जन्म-मरणाच्या फेर्‍यांत का अडकला होता ?, याचा त्याने अंतर्मुख होऊन अभ्यास केल्यास त्याच्या लक्षात येईल की, त्याच्यातील वासना, स्वभावदोष, अहंकार आणि सत्य न समजल्यामुळे निर्माण झालेला भ्रम, यांमुळे तो जन्म-मरणाच्या फेर्‍यांत अडकला आहे. यासाठी गुरुकृपायोगाद्वारे सत्य काय आहे ?, ते त्याने जाणून घ्यावे आणि साधना करून आपली आत्मोन्नती करून ईश्‍वरप्राप्ती करवून घ्यावी, हा सनातन धर्माचा प्रमुख उद्देश आहे. – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

७ अ. संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी पसायदानात विराट भगवंताला केलेली प्रार्थना !

संत ज्ञानेश्‍वर महाराजसुद्धा पसायदानात त्या विराट भगवंताला म्हणतात, हे विश्‍वात्मक देवा, हे भगवंता, या जगात जे खल, दुष्ट आहेत, त्यांची दुष्ट वृत्ती जाऊन ते सत्प्रवृत्त होवोत. त्यांचे भ्रम जाऊन त्यांना सत्य काय, ते कळू दे, म्हणजे सर्व मानव एकमेकांशी सत्प्रवृत्तीने वागू लागतील. सर्व धर्माचरणी, ईश्‍वरेच्छेने आणि ईश्‍वराच्या नियोजनाप्रमाणे वागू लागतील, म्हणजे सर्वत्र चैतन्यमय वातावरण दिसू लागेल. सर्वत्र सुखशांती दिसू लागेल.

७ आ. मानवता कशी असावी ?, हे शिकवणारा सनातन धर्म !

अशा प्रकारे सनातन धर्मच मानवता कशी असावी ?, हे शिकवतो. जिवाचे कल्याण कसे होईल ? त्याचे भौतिक आणि पारमार्थिक कल्याण कसे होईल ?, हाच विचार धर्माने केला आहे. त्या दृष्टीने संतांनी सर्व समाजाला उपदेश केला आहे. या धर्मशास्त्राप्रमाणे उपासना केल्यास करणारा नेहमी आनंदावस्थेत रहातो. त्याला सर्व सृष्टी मधुमय दिसते, तसेच त्याच्यात इतके चैतन्य प्रगट होते की, त्यामुळे तो सहस्रो लोकांना पावन करू शकतो. सहस्रोंचे कल्याण करू शकतो.

 

८. सनातन धर्माचे पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता का आहे ?

८ अ. सर्वत्र अत्याचार, दुराचार, हत्या अशा दुष्प्रवृत्तींमुळे सर्वत्र प्रदूषण झाले असल्याने निसर्ग कोपलेला असणे

 आज उपस्थित असलेल्या अन्य पंथांची शिकवण पाहिल्यास दिसून येते की, ते आपलाच धर्म सर्वश्रेष्ठ असून बाकीचे कनिष्ठ आहेत, असे म्हणतात. तेव्हा अशांना सांगावेसे वाटते, अरे, तुमचा पंथ जर श्रेेष्ठ असता, तर त्यांच्या कृतीद्वारे आज जगातील सर्व मानव सुख समाधानाने राहिले असते. परंतु आज काय परिस्थिती दिसते ? आज जिकडे-तिकडे अत्याचार, दुराचार, हत्या अशी भयावह स्थिती दिसते. त्यामुळे मानवी अस्तित्व राहील कि नाही ?, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. एवढेच नव्हे, तर या दुष्प्रवृत्तीमुळे सर्वत्र प्रदूषण झाले आहे. निसर्ग कोपला आहे. यासाठी सनातन धर्माचे पुनरुज्जीवन आवश्यक झाले आहे.

८ आ. दुष्ट प्रवृत्तीच्या आत्म्यांनी दुष्ट प्रवृत्तीच्या आत्म्यांशी संलग्न होऊन त्यांच्याकडून अधिक वाईट कृत्ये करवून घेणे

समाज हा त्रिगुणात्मकाद्वारे कार्य करत असतो. त्यामुळे आपल्याला समाजात चांगल्या आणि वाईट कृती घडत असलेल्या दिसतात आणि त्याचे परिणाम समाज अन् वातावरण यांवर होतो. वातावरणात असलेले सत्प्रवृत्तीचे आत्मे समाजातील सत्प्रवृत्तीच्या लोकांना साहाय्य करतात आणि दुष्ट प्रवृत्तीचे आत्मे दुष्ट प्रवृत्तीच्या आत्म्यांशी संलग्न होऊन त्यांच्याकडून अधिक वाईट कृत्ये करवून घेतात. त्यामुळेच आज वातावरणात रज-तमाचा प्रभाव इतका वाढला आहे की, सर्वत्र दुष्कृत्ये घडत आहेत. यासाठी हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) येणे आवश्यक आहे; कारण सनातन धर्म हा मूलस्वरूप अशा भगवंताशी अनुसंधानित आहे. हे कार्य सध्या प.पू. डॉक्टरांच्या माध्यमातून सनातन संस्थेद्वारे होत आहे.

 

९. सनातन धर्माप्रमाणे चालू असलेले सनातन संस्थेचे कार्य !

९ अ. प.पू. डॉक्टरांनी सर्व साधकांना एका स्थानावर आणल्यामुळे भेदाभेद नाहीसा होणे

सध्या सनातन संस्थेद्वारे जे कार्य चालू आहे, ते सनातन धर्माप्रमाणेच चालू आहे. प.पू. डॉक्टरांनी वसुधैव कुटुंबकम् या न्यायाप्रमाणे सर्व साधकांना, जे निरनिराळ्या जाती-पंथातील (ख्रिस्ती, मुसलमान) मागासवर्गीय, उच्च कुळातील, श्रीमंत-गरीब, शिक्षित-अशिक्षित आहेत, त्यांना एका स्थानावर आणल्यामुळे भेदाभेद नाहीसा झाला आहे. सर्व साधना करणारे आहेत. स्वभावदोष आणि अहं निर्मूलनासाठी प्रतिदिन आढावा ते देतात.

९ आ. प.पू. डॉक्टर समष्टीद्वारे साधक आणि संत यांना घडवत असल्याने त्यांची उन्नती होणे अन् धर्माचरणी लोकांनी साधनेला प्रवृत्त होणे

अष्टांग साधना करत सनातनचे ६८ साधक संत झाले आहेत आणि ९३२ साधकांनी ६१ टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळीचा टप्पा गाठला आहे. समाज हा त्रिगुणात्मकदृष्ट्या कार्य करत असल्यामुळे ती एक प्रयोगशाळा झाली आहे. प.पू. डॉक्टर समष्टीद्वारे साधक आणि संत यांना सामाजिक कार्याद्वारे घडवत आहेत. याचा परिणाम म्हणून साधक आणि संत यांची आध्यात्मिक उन्नती होते, तसेच समाजातील धर्माचरणी लोक साधनेला प्रवृत्त होऊन त्यांचीही प्रगती होतांना दिसते. हे सर्व प.पू. डॉक्टरांच्या संकल्पशक्तीद्वारेच होत आहे. ते विष्णूचा अवतार असल्याचे सप्तर्षींनी जीवनाडीद्वारे सांगितले आहे.

९ इ. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यामुळे सज्जन वृत्तीच्या लोकांना आधार मिळणे

अशा या कार्यामुळेच आज समाजातील नव्हे, तर जगातील दुष्ट प्रवृत्ती उफाळून येत आहेत. त्या आक्रमक होऊन सनातन संस्थेवर प्रहार करत आहेत. त्यांच्या अत्याचारी वृत्तीमुळे बहुसंख्य असलेले सज्जन वृत्तीचे लोक भयावह स्थितीत आहेत; परंतु सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या कार्यामुळे त्यांना आधार मिळत आहे.

९ ई. समाजातील सज्जन धर्माभिमानी लोकांनी पंथ-जाती यांतील भेद विसरून एकत्र व्हावे !

यासाठी समाजातील सज्जन धर्माभिमानी लोकांनी पंथ-जाती यांतील भेद विसरून एकत्र यायला पाहिजे; कारण भगवंताने म्हटले आहे की, परित्राणाय साधूनाम् । विनाशाय च दुष्कृताम् । समाजातील जे साधू-संत, सज्जन, धर्माभिमानी आणि सदाचाराने वागणारे आहेत, जे चैतन्याचे स्रोत आहेत (उदा. वृक्ष, गाय, पर्वत, नदी, तीर्थक्षेत्रे, इत्यादी जे प्रदूषित झाले आहेत.), त्यांचे रक्षण आणि दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन केल्यासच मानवप्राण्याचे अस्तित्व राहील.

९ ए. सनातन धर्माप्रमाणे आचरण केल्याने होणारे लाभ

सनातन धर्माप्रमाणे धर्माचरण करून आपली आध्यात्मिक पातळी वाढल्यास आपण जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटू. वातावरणातील रज-तमाचे वातावरणसुद्धा निवळेल आणि सत्त्वगुणाचे प्राबल्य वाढेल. साहजिकच दुष्ट प्रवृत्ती निर्बल होईल.

 

१०. प्रार्थना

सर्व जीवप्राणीमात्रांना मूलस्वरूपाशी जोडण्यासाठी प.पू. डॉक्टरांनी सनातन या शब्दाचा उपयोग आरंभीपासूनच केला आहे, उदा. सनातन संस्था, दैनिक सनातन प्रभात, सनातन आश्रम, इत्यादी. तो आता रूढ अर्थाने प्रचलित व्हावा, यासाठी केलेला हा पालट कृतीशील आहे. त्या अनुषंगाने सर्व जीवप्राणीमात्र त्या मूळ स्वरूपाशी जोडले जावोत, अशी त्या जगन्नियंत्या श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो.

– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.६.२०१६)