आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – १

अखिल मानवजातीला आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी
सिद्धता करण्याविषयी मार्गदर्शन करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता

१. ‘कोरोना’ विषाणूरूपी आपत्ती म्हणजे, भावी महाभीषण आपत्काळाची लहानशी झलक !

जानेवारी २०२० पासून ‘कोरोना’ विषाणूने जगभरात हाहाकार माजवला आहे. ‘कोरोना’च्या आपत्तीमुळे दळणवळण बंदीचे (‘लॉकडाऊन’चे) पालन करावे लागल्याने अनेक उद्योगधंद्यांवर विपरित परिणाम झाला आहे, तसेच आर्थिक मंदीही आली आहे. ‘कोरोना’मुळे पुष्कळ जीवितहानी आणि वित्तहानी होत आहे. कोरोनाच्या संसर्गाची टांगती तलवार डोक्यावर असल्यामुळे सर्वत्र मुक्तपणे संचार करणे, रुग्णालयात जाऊन उपचार करून घेणे इत्यादी कठीण वाटत आहे. सर्वत्र एकप्रकारे दडपण आणि भीती यांचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑक्टोबर २०२० मधील वरील परिस्थितीवरून ‘कोरोना’ ही महाभीषण आपत्काळाची एक लहानशी झलक असल्याचे दिसत आहे.

 

२. महाभीषण आपत्काळाचे थोडक्यात स्वरूप

महायुद्ध, भूकंप, महापूर इत्यादींच्या स्वरूपातील महाभीषण आपत्काळ तर अजून यायचाच आहे. ‘तो येणार’, हे निश्‍चित असल्याचे अनेक नाडीभविष्य सांगणारे आणि द्रष्टे साधू-संत यांनी पूर्वीच सांगून ठेवले आहे. त्या संकटाचे पडघमही आता वाजू लागले आहेत. ‘कोरोना’ विषाणूची आपत्ती चीनमुळेच उद्भवली आहे’, असे सांगत अमेरिकेसह काही युरोपीय देशांनी चीनविरुद्ध दंड थोपटायला आरंभ केला आहे. थोडक्यात महायुद्ध आता निकट येत आहे. हा भीषण आपत्काळ काही दिवसांचा वा मासांचा नसून तो वर्ष २०२३ पर्यंत, म्हणजे आतापासून ३ वर्षांचा, अर्थात् भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची (आदर्श अशा ईश्‍वरी राज्याची) स्थापना होईपर्यंत असेल. या आपत्काळात वीजपुरवठा बंद पडतो. पेट्रोल, डिझेल आदींचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून पडते. त्यामुळे शासनयंत्रणा सर्वत्र साहाय्यासाठी पोचू शकत नाही. शासन करत असलेल्या साहाय्यकार्यात अडथळेही येतात. त्यामुळे स्वयंपाकाचा ‘गॅस’, खाण्यापिण्याच्या वस्तू आदी अनेक मास (महिने) मिळणार नाहीत वा मिळाल्या, तरी त्यांचे ‘रेशनिंग’ होते. डॉक्टर, वैद्य, औषधे, रुग्णालये आदी सहजपणे उपलब्ध होणे कठीण असते. हे सर्व लक्षात घेऊन या आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी दैनंदिन (शारीरिक), मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक बनले आहे.

 

३. दैनंदिन (शारीरिक) स्तरावरील पूर्वसिद्धता

‘अन्न’ ही जीवित रहाण्यासाठीची एक मूलभूत आवश्यकता आहे. आपत्काळात आपल्यावर उपासमारीची वेळ ओढवू नये, यासाठी आधीच अन्नधान्याची पुरेशी खरेदी करून ठेवणे आवश्यक आहे. सध्याच्या पिढीला विविध प्रकारचे अन्नधान्य साठवण्याच्या आणि ते दीर्घकाळ टिकवण्याच्या पद्धती ठाऊक नसतात. यासाठी आम्ही काही विवेचन या लेखमालिकेत केले आहे.

अन्नधान्याचा साठा कितीही केला, तरी हळूहळू तो संपतो. अशा वेळी अन्नान्नदशा न होण्यासाठी पूर्वसिद्धता म्हणून अन्नधान्याची लागवड करणेही आवश्यक आहे. भात (तांदूळ), कडधान्ये अशासारख्या अन्नधान्यांची लागवड करणे सर्वांनाच शक्य नाही; मात्र कंदमुळे, अल्प पाण्यात अधिक उत्पादन देणार्‍या बारमाही पिकणार्‍या भाज्या आणि बहुउपयोगी फळझाडे यांची लागवड घराच्या परसात आणि सदनिकेच्या (‘फ्लॅट’च्या) आगाशीतही करता येते. या लागवडीविषयीचे उपयुक्त विवेचन या लेखमालिकेत केले आहे.

आपत्काळात अन्नधान्य शिजवण्यासाठी ‘गॅस’ इत्यादी उपलब्ध न झाल्यास चूल, ‘सोलर कुकर’ इत्यादी वापरण्याविषयी सांगितले आहे. आपत्काळात नेहमीप्रमाणे सर्व आहार बनवता येईलच, असे नाही. या दृष्टीने कोणकोणते टिकाऊ खाद्यपदार्थ संग्रही असावेत आणि ते अधिक काळ टिकण्यासाठीच्या उपयुक्त सूचना, यांविषयी सांगितले आहे. कुटुंबासाठी लागणार्‍या नित्योपयोगी, तसेच वेळप्रसंगी लागणार्‍या वस्तूंची सूचीही दिली आहे. यामुळे वाचकांना सर्व प्रकारच्या वस्तूंची खरेदी करणे सोपे जाईल. मनुष्य पाण्यावाचून जगू शकत नाही आणि तो विजेवाचून जीवन जगण्याची कल्पना करू शकत नाही. यासाठी पाण्याची सोय करणे, पाण्याची साठवणूक आणि शुद्धीकरण यांच्या पद्धती, तसेच विजेला असणारे पर्यायही या लेखमालिकेत सांगितले आहेत. लेखमालिकेत एकाच विषयासंबंधाने विविध प्रकारच्या सिद्धता सांगितल्या आहेत. प्रत्येकाने स्वतःची आवश्यकता, जागेची उपलब्धता, आर्थिक परिस्थिती, आपण रहात असलेल्या ठिकाणचे हवामान आणि भौगोलिक स्थिती इत्यादींचा विचार करून स्वतःला सोयीस्कर अशा सिद्धता कराव्यात. जेथे सिद्धतांच्या संदर्भात कृतीच्या स्तरावर सांगण्याला मर्यादा येते, तेथे केवळ निर्देश केला आहे, उदा. ‘आपत्काळात पाण्याची चणचण भासू नये यासाठी विहीर खोदावी’, असे सांगितले आहे; पण त्यासाठी ‘नेमके काय काय करावे लागते’, हे सांगितले नाही. अशा कृतींविषयी वाचकांनी जाणकारांना विचारावे किंवा त्यासंबंधीचे संदर्भग्रंथ पहावेत.

 

४. मानसिक स्तरावरील पूर्वसिद्धता

आपत्काळात अनेकांना मन अस्थिर होणे, चिंता वाटणे, निराशा येणे, भीती वाटणे इत्यादी त्रास होतात. हे त्रास होऊ नयेत, म्हणजेच प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जाता यावे, यासाठी आधीच ‘मनाला कोणत्या स्वयंसूचना द्याव्यात’, याचे मार्गदर्शन केले आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाचा… प्रतिकूल परिस्थितीत घाबरून न जाता पुढील स्वयंसूचना देऊन आत्मबळ वाढवा !

 

५. आध्यात्मिक स्तरावरील पूर्वसिद्धता

आपत्काळात रक्षण होण्यासाठी व्यक्तीने स्वतःच्या बळावर सिद्धता कितीही केल्या, तरी महाभीषण आपत्तींतून वाचण्यासाठी शेवटी सारा भरवसा देवावरच ठेवावा लागतो. व्यक्तीने साधना करून देवाची कृपा प्राप्त केली, तर देव व्यक्तीचे कोणत्याही संकटात रक्षण करतोच. साधना करण्याविषयीचे गांभीर्यही ही लेखमाला वाचल्यावर निर्माण होईल.

 

६. वाचकांनो, सिद्धतांना शीघ्र आरंभ करा !

वाचकांनी लेखमालिकेनुसार आतापासूनच कार्यवाहीला आरंभ केल्यास त्यांना आपत्काळ सुसह्य वाटू शकेल. वाचकांनी या विषयाच्या संदर्भात समाजबांधवांमध्येही जागृती करावी.  या विषयावरील ग्रंथमालिकाही प्रसिद्ध झाली आहे.

 

७. प्रार्थना

‘आपत्काळात केवळ तग धरून रहाण्यासाठीच नव्हे, तर जीवनात साधने चा दृष्टीकोन अंगिकारून आनंदी रहाण्यासाठीही या लेखमालिकेचा उपयोग व्हावा’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !

पू. संदीप आळशी
पू. संदीप आळशी

 

आपत्काळात सर्व मानव जिवंत
राहण्यासाठी आणि सृष्टीच्या कल्याणासाठी कृतीशील
असणारे जगाच्या पाठीवरील एकमेव द्रष्टे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

‘हिरण्याक्ष नामक असुराने पृथ्वीला पळवून महासागरात लपवून ठेवले असता श्रीविष्णूने वराह अवतार घेऊन पृथ्वीचे रक्षण केले. सृष्टीचे संतुलन सदैव टिकून राहण्यासाठी भगवान शिव अखंड ध्यानावस्थेत रहातो. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हेही अनेक दैवी गुणांनी युक्त असून ते देवतासमान असल्याच्या अनेक अनुभूती साधकांना आल्या आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांनाही देवतांप्रमाणे अखिल मानवजातीच्या रक्षणाची आणि कल्याणाची, तसेच सृष्टीचीही काळजी आहे.

आपत्काळात पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्ती आणि महायुद्धासारख्या मानव-निर्मित आपत्ती येणार आहेत. अखिल मानवाला या आपत्तींना समर्थपणे तोंड देता येण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष २०१३ पासून ‘आपत्काळातील संजीवनी’ या ग्रंथमालिकेच्या निर्मितीला आरंभ केला. यामध्ये डॉक्टर, औषधे आदी नसतांना स्वतःच स्वतःवर उपचार करता येतील अशा विविध उपचारपद्धतींवरील ग्रंथ आहेत. या अंतर्गत ‘प्राणशक्तीवहन उपाय’ आणि ‘रिकाम्या खोक्यांचे उपाय’ या सोप्या आणि प्रभावी उपचारपद्धतींचा शोध परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः लावला आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, परात्पर गुरु डॉक्टरांनी वर्ष १९८० पासूनच मुंबई येथील त्यांच्या घरी राहत असतांनाच्या काळात आयुर्वेद, बिंदूदाबन, रेकी यांसारख्या उपचारपद्धतींविषयीची शेकडो कात्रणे संग्रहित करून ठेवली होती. या कात्रणांचा उपयोगही आता ग्रंथ बनवण्यासाठी होत आहे. यातूनही परात्पर गुरु डॉक्टरांचे द्रष्टेपण विदित होते.

आपत्काळात घरगुती औषधे सहजतेने उपलब्ध व्हावीत, यासाठी देश-विदेशांतील मानवांना त्यांच्या घराच्या आगाशीत, अंगणात अथवा घराजवळच्या परिसरात सहजतेने लागवड करता येतील अशा औषधी वनस्पतींचा अभ्यास ते साधकांकडून करवून घेत असून या वनस्पती सर्वत्र लावल्या जाव्यात याकडे लक्षही देत आहेत. त्यांनी औषधी वनस्पतींच्या लागवडीविषयीचे ग्रंथही सिद्ध करवून घेतले आहेत.

आपत्काळात मानवाला जीवित राहण्यासाठी केवळ उपचारपद्धतींची माहिती असणे पुरेसे नसते, तर अन्न-धान्य, पाणी, इंधन, वीज यांसारख्या अनेक जीवनावश्यक गोष्टींची मानवाला नितांत आवश्यकता असते. हे सर्व लक्षात घेऊन आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक स्तरावर; इतकेच नव्हे, तर मानसिक, कौटुंबिक, आर्थिक आणि आध्यात्मिक स्तरांवरही पूर्वसिद्धता करणे आवश्यक असते. या दृष्टीने ‘प्रत्येकाने व्यक्तीगतरित्या, तसेच समाजबांधवांनी एकत्रितपणे मिळून काय करायला हवे’, हे सांगणारे परात्पर गुरु डॉक्टर हे एकमेवच होत. त्यांनी ‘आपत्काळात जिवंत राहण्यासाठी करायची सिद्धता’ या विषयावरील लेख नियतकालिके अन् संकेतस्थळे यांवर प्रसिद्ध केले असून याविषयीची सनातनची ग्रंथमालिकाही झाली आहे.

आपत्काळात रक्षण होण्यासाठी व्यक्तीने स्वतःच्या बळावर सिद्धता कितीही केली, तरी भूकंप, त्सुनामी यांसारख्या महाभीषण आपत्तींतून वाचण्यासाठी शेवटी सारा भरवसा देवावरच ठेवावा लागतो. व्यक्तीने साधना करून देवाची कृपा प्राप्त केली, तर देव व्यक्तीचे कोणत्याही संकटात रक्षण करतोच. भक्त प्रल्हाद, पांडव यांसारख्या अनेक उदाहरणांवरून हे सिद्ध झाले आहे. यासाठीच परात्पर गुरु डॉक्टर काही वर्षांपासून ग्रंथ, नियतकालिके, संकेतस्थळे आदींच्या माध्यमातून अखिल मानवाला कळकळीने सांगत आहेत, ‘आता जिवंत राहण्यासाठी तरी साधना करा !’

‘धर्माचरणाचा र्‍हास होऊन अधर्म बळावला की, पृथ्वीवर संकटे येतात’, असे हिंदु धर्मशास्त्र सांगते. समाज धर्माचरणी आणि साधक बनला, तसेच सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात धर्माचे अधिष्ठान असले की, पृथ्वीवर संकटे येत नाहीत आणि सृष्टीचे संतुलन स्थिर राहण्यासही साहाय्य होते. यासाठीच परात्पर गुरु डॉक्टर केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीवर धर्माचे अधिष्ठान असलेले ‘ईश्‍वरी राज्य’ स्थापन करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करत असून त्यासाठी संत, संप्रदाय, साधक, हिंदुत्ववादी, धर्मप्रेमी आणि राष्ट्रभक्त यांचे संघटनही करत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून परात्पर गुरु डॉक्टरांची प्राणशक्ती अत्यंत न्यून असून, म्हणजे जेमतेम जिवंत रहाण्याइतपतच असून ते अनेक व्याधींनी ग्रसित आहेत. ते स्वतः ब्रह्मलीन अवस्थेत असून मनात आणले, तर कधीही सानंद देहत्याग करू शकतात. असे असतांनाही ते केवळ अखिल मानवाचे आपत्काळापासून रक्षण व्हावे आणि अखिल मानवजात सात्त्विक बनून सर्वत्र ईश्‍वरी राज्य यावे अन् सकल सृष्टीचे कल्याण व्हावे, यांसाठी प्रतिदिन अक्षरशः देहातील प्राण एकवटून १५ – १६ घंटे कार्यरत असतात !
अशा धर्मसंस्थापक, जगतोद्धारक, सृष्टीचे पालनहार आणि युगप्रवर्तक परम कृपाळू गुरुमाउलीच्या चरणी शिरसाष्टांग नमन !’

– (पू.) श्री. संदीप आळशी, (११.११.२०१९)

घोर आपत्काळाविषयी द्रष्टे, संत, सप्तर्षि आणि देवता यांनी वर्तवलेली भाकिते !

 

२०२३ पर्यंत, म्हणजे भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची
(आदर्श अशा ईश्‍वरी राज्याची) स्थापना होईपर्यंत आपत्काळ असणार !

‘सध्या भूकंप, महापूर, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आदींच्या माध्यमातून आपत्काळाला आरंभ झालेलाच आहे. वर्ष २०२१ पासून आपत्काळाची तीव्रता पुष्कळ वाढेल. वर्ष २०२३ पर्यंत, म्हणजे भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची (आदर्श अशा ईश्‍वरी राज्याची) स्थापना होईपर्यंत आपत्काळ असेल.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

१. आपत्काळाला काही प्रमाणात आरंभ झाला असल्याचे
दर्शवणार्‍या काही नैसर्गिक आपत्ती आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी

१ अ. काही नैसर्गिक आपत्ती

गेल्या काही वर्षांपासून जगभर नैसर्गिक आपत्ती येत आहेत. अलीकडच्या काळातील काही उदाहरणे पाहूया. वर्ष २०१३ मध्ये केदारनाथ येथे जलप्रलय होऊन ६० गावांची हानी झाली, तर १ सहस्राहून अधिक व्यक्ती मृत्यू पावल्या. वर्ष २०१८ मध्ये केरळमध्ये आलेल्या महापुरामुळे ३ लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले, तर ३७५ हून अधिक व्यक्तींना प्राण गमवावे लागले. डिसेंबर २०१८ मध्ये इंडोनेशियातील समुद्रात ज्वालामुखीचा स्फोट होऊन आलेल्या त्सुनामीमध्ये सुमारे ३०० जणांचे प्राण गेले. कॅलिफोर्निया (अमेरिका) येथील जंगलात गेल्या काही वर्षांत २ वेळा मोठे वणवे लागून शेकडो एकर भूमीवरील नैसर्गिक संपत्तीची हानी झाली.

१ आ. तिसर्‍या महायुद्धाला कारणीभूत ठरू शकणार्‍या काही आंतरराष्ट्रीय घडामोडी

पाकिस्तान सातत्याने भारतावर करत असलेल्या कुरघोडी आणि आतंकवाद्यांच्या माध्यमातून भारताशी करत असलेले छुपे युद्ध, चीन वारंवार भारतात करत असलेली घुसखोरी, उत्तर कोरियाकडे असणारी अण्वस्त्रे नष्ट करण्यावरून झालेला उत्तर कोरिया-अमेरिका संघर्ष, महासत्ता होण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षेमुळे चालू असणारा चीन-अमेरिका संघर्ष, अमेरिका आणि रशिया यांच्यात पुन्हा चालू झालेले शीतयुद्ध, ‘कोरोना’ विषाणूची आपत्ती चीनमुळेच उद्भवली आहे’, असे सांगत अमेरिकेसह काही युरोपीय देशांनी चीनविरुद्ध दंड थोपटायला केलेला आरंभ आदी घटनांचा विचार करता भारतासह जगातील अनेक देश तिसर्‍या महायुद्धाच्या खाईत कधीही लोटले जाऊ शकतात.

 

२. ‘आपत्काळात परिस्थिती कशी भयावह असते’, हे दर्शवणारी काही उदाहरणे

२ अ. दुसर्‍या महायुद्धाच्या काळातील स्थिती

दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी जर्मनीने ब्रिटनविरुद्ध युद्ध पुकारले. त्यामुळे ब्रिटनमध्ये पहिल्या ४ दिवसांतच १३ लाख लोकांचे स्थलांतर करावे लागले. युद्धकाळात प्रकाशबंदीही चालू झाली. रात्री बाहेर रस्त्यावर अगदी मिट्ट काळोख असायचा. खिडकीतून वा दारातून अंधुकसा प्रकाशसुद्धा बाहेर आला, तरी दंड व्हायचा ! इतकी कडक प्रकाशबंदी १-२ दिवस किंवा मास (महिने) नाही, तर ५ वर्षे होती ! दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जर्मनीने रशियालाही कोंडीत पकडले होते. त्या काळात रशियन जनतेवर झाडपाला, लाकडाचा भुसा मिसळलेले ‘केक’ असे पदार्थ खाऊन पोट भरण्याची पाळी आली होती !

२ आ. वर्ष २०१५ मध्ये नेपाळ येथे झालेल्या भूकंपानंतर
तेथे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यामुळे जनतेवर ओढवलेले काही प्रसंग

२ आ १. स्वयंपाकाच्या ‘गॅस’च्या तुटवड्यामुळे जनतेवर ओढवलेले कठीण प्रसंग

२ आ १ अ. ‘गॅस सिलिंडर’चा काळाबाजार होणे

‘१ सहस्र ५०० रुपये किमतीच्या गॅसच्या एका सिलिंडरसाठी काळ्या बाजारात ८ सहस्र रुपये मोजावे लागत होतेे.

२ आ १ आ. भूकंपात कोसळलेल्या घरांच्या लाकडांचा ‘जळण’ म्हणून वापर करावा लागणे

लोकांना पुढे ७ मास ‘गॅस सिलिंडर’च मिळत नव्हते. त्यामुळे लोकांनी भूकंपात कोसळलेल्या घरांच्या लाकडांचा ‘जळण’ म्हणून वापर केला. काही मासांनंतर शासनाने लाकूड उपलब्ध करून दिले; परंतु त्या लाकडाचा दर ‘२० रुपये प्रती किलो’ एवढा महाग होता.

२ आ १ इ. ‘जळणा’साठी लाकडांचा वापर करतांना उद्भवलेल्या समस्या

१. लाकूडविक्रेते ओली लाकडेही विकत. ओली लाकडे लवकर पेट घेत नसल्यामुळे महिलांना चूल पेटवण्यास त्रास होई.

२. अनेकांकडे लाकडे फोडण्यासाठी कुर्‍हाड नसल्याने आणि काहींना ‘कुर्‍हाडीने लाकडे कशी फोडतात ?’, हे ठाऊक नसल्याने त्यांना ती लाकडे इतरांकडून फोडून घ्यावी लागत.

३. भाड्याच्या घरांत रहाणार्‍या लोकांना घरमालक घरात चुलीवर स्वयंपाक करू देत नसत. ‘चुलीच्या धुरामुळे घराच्या भिंती काळ्या होतील’, असे घरमालकांचे म्हणणे असायचे.

२ आ १ ई. अनेक आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेला ‘गॅस सिलिंडर’ वाहनाच्या अभावी घरापर्यंत नेणे कठीण होणे

अनेक आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर गॅसच्या काही सिलिंडरचे वितरण होत असे; पण इंधनाच्या तुटवड्यामुळे वाहने उपलब्ध नसल्याने तो सिलिंडर स्वतःच्या घरापर्यंत घेऊन जाणे कठीण होई.

२ आ २. किराणा सामानाची वानवा होणे

त्या काळात किराणा दुकानांमध्ये बरेचसे सामान उपलब्ध नव्हते. उपलब्ध असलेले सामानही नेहमीपेक्षा चारपट मूल्याने विकत घ्यावे लागे, उदा. नेहमी ‘१०० ते १८० रुपये प्रती लिटर’ असलेले गोडे तेल ‘५०० रुपये प्रती लिटर’ झाले होते.

२ आ ३. औषधांच्या अभावी अल्पशा विकारानेही रुग्णांचा मृत्यू होणे

रुग्णालयांमध्ये औषधेच उपलब्ध नसल्याने काही लोक अल्पशा विकारानेही मृत्यूमुखी पडले.

२ आ ४. विजेच्या अपुर्‍या पुरवठ्यामुळे उद्भवलेल्या समस्या

काठमांडू शहरात अधिकृतरित्या दिवसाचेे १४ घंटे वीज-पुरवठा बंद होता. असे असले तरी काही वेळा वीज-पुरवठा दिवसभरात केवळ २ – ३ घंटेच व्हायचा. वीज-पुरवठा चालू झाल्यावर घरोघरी लोक पाण्याचा ‘पंप’ चालू करणे, विजेच्या उपकरणांवर स्वयंपाक करणे इत्यादी कृती करत. त्या ‘लोड’मुळे रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) जळून जायची. अशी रोहित्रे दुरुस्त करायला शासकीय कर्मचारी ४ – ५ दिवस लावत.

२ आ ५. पेट्रोल आणि डिझेल यांच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्या

अ. पेट्रोल आणि डिझेल यांच्या तुटवड्यामुळे वाहने उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे शाळा आणि उद्योग बंद होते.

आ. काही वेळा शासनाकडून या इंधनांचे वितरण केले जायचेे; परंतु ते मिळण्यासाठी ४ – ५ घंटे रांगेत थांबावे लागे. अनेकांचा क्रमांक येईपर्यंत इंधन संपून जात असल्यामुळे त्यांना अनेक आठवडे पुन्हा प्रतीक्षा करावी लागे. शासनाकडून ‘इंधनाचे पुढचे वितरण कधी होणार ?’, याविषयी काहीच माहिती मिळत नसे. त्यामुळे लोक अनेक दिवस आपली वाहने रस्त्यावरच रांगेत ठेवून जात.

इ. एरव्ही १०० ते १३० रुपये प्रती लिटर असणारे पेट्रोल काळ्या बाजारात ५०० रुपये प्रती लिटरने विकले जायचे आणि ८० ते १०० रुपये प्रती लिटर असलेले डिझेल २५० ते ३०० रुपये प्रती लिटरने विकले जायचे.

ई. इंधनाच्या टंचाईमुळे सायकल चालवणार्‍यांची संख्या वाढली. त्यामुळे त्या काळात अगदी स्वस्त अशा सायकलचे मूल्यही १० सहस्र रुपये झाले होते.

२ आ ६. वीज, तसेच पेट्रोल अन् डिझेल यांच्या अभावी ‘इंटरनेट’ बंद असणे

विविध कार्यालयांचा वीज-पुरवठा बंद असतांना जनित्रांच्या (जनरेटरच्या) साहाय्याने वीज-पुरवठा चालू ठेवला जात असे; मात्र भूकंपानंतर विजेपाठोपाठ पेट्रोल अन् डिझेल यांचाही तुटवडा होऊन ही जनित्रे तशी निरुपयोगी झाली. परिणामी ‘इंटरनेट’द्वारे चालणारे कामकाज थांबले.

२ आ ७. उद्योगधंदे बंद पडल्याने अनेकांना नोकर्‍या गमवाव्या लागणे

त्या काळात सुमारे २ सहस्र उद्योगधंदे बंद पडले आणि साधारणपणे १ लाख लोकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या.’

– ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधिका कु. सानू थापा, नेपाळ (२४.४.२०१६)

वरील सर्व उदाहरणे ही आपत्काळाच्या भीषणतेची एक झलक आहे. आपत्काळात समस्यांचा केवढा मोठा डोंगर असेल, याची कल्पनाही आपल्याला करता येत नाही. ‘आपल्याला अशा सर्व समस्यांचा सक्षमपणे सामना करायचा असेल, तर आपत्काळाची सिद्धताही तेवढ्याच सक्षमपणे करण्याविना पर्याय नाही’, हे लक्षात घ्या !

 

३. आपत्काळाच्या दृष्टीने दैनंदिन (शारीरिक) स्तरावर करायच्या विविध सिद्धता !

३ अ. अन्नावाचून उपासमार न होण्यासाठी हे करावे !

३ अ १. स्वयंपाकाचा ‘गॅस’, ‘स्टोव्ह’साठी लागणारे रॉकेल इत्यादींची होऊ शकणारी टंचाई वा अनुपलब्धता लक्षात घेऊन पुढीलपैकी आवश्यक ते करणे
३ अ १ अ. घरात चुलीची व्यवस्था करणे

१. घरी चूल नसली, तर पेठेतून मातीची, सिमेंटची किंवा बिडाची (‘बीड’ म्हणजे कच्चे लोखंड. याला इंग्रजीत ‘पिग आयर्न’ असे म्हणतात.) चूल खरेदी करून ठेवावी. काही उत्पादक पारंपरिक चुलींच्या तुलनेत इंधन अल्प लागणे, धूर अल्प होणे, चूल आवश्यकतेनुसार दुसरीकडे नेता येणे इत्यादी लाभ देणारी लोखंडी चूल बनवतात, उदा. भोपाळ, मध्यप्रदेश येथील ‘दत्तू चूल्हा’ (भ्र.क्र. ९४२५० ०९११३). काही उत्पादकांनी बनवलेल्या चुलीला धूर वर जाण्यासाठी ‘चिमणी’ची (उंच धुराड्याची) सोय असते. अशा आधुनिक चुलींचाही अभ्यास करून आपल्या आवश्यकतेनुसार चूल खरेदी करू शकतो. (वेळप्रसंगी तीन दगड विशिष्ट पद्धतीने मांडूनही चूल सिद्ध करता यायला हवी.)

२. चूल पेटवणे, प्रतिदिन तिची स्वच्छता करणे इत्यादी कृतीही शिकून घ्याव्यात.

३. चुलीसाठी जळण म्हणून लाकडे, कोळसे, शेणी, ‘बायोमास ब्रिकेट’ (ऊसाची चिपाडे, लाकडाचा भुसा, भुईमुगाची टरफले, सूर्यफुलाचा फूल काढल्यानंतरचा भाग आदींवर विशिष्ट दाबाने प्रक्रिया करून त्यांचे एकजीव बनवलेले लहान लहान तुकडे) इत्यादींचा पुरेसा साठा करून ठेवावा. ‘बायोमास ब्रिकेट’ मोठ्या शहरांतील दुकानांत, तसेच ‘ऑनलाईन’ विकत मिळतात. लाकडे फोडण्यासाठी कुर्‍हाड, साधी काड्यापेटी, जलरोधक (वॉटरप्रूफ) काड्यापेटी, अग्नी पेटवण्यासाठी चकमक (फायर स्ट्रायकर) इत्यादी वस्तूही घेऊन ठेवाव्यात.

दोन दगडांची चूल

४. चुलीवर वापरण्यासाठी तवा, कढई इत्यादी विशिष्ट भांडी; तसेच ज्यांच्याकडे सौरऊर्जेद्वारे पुरेशी वीजनिर्मिती करणारी यंत्रणा आहे, अशांनी विजेच्या साहाय्याने चालणारी घरघंटी (पिठाची घरगुती चक्की) घेऊन ठेवावी.

५. चुलीवर स्वयंपाक करायला शिकावे. यात ‘प्रेशर कुकर’चा वापर न करता पातेल्यात वा अन्य भांड्यात भात करणे, आमटीसाठी डाळ शिजवणे, भाकरी तव्यावर भाजून ती निखार्‍यांवर शेकणे इत्यादी कृती समाविष्ट असाव्यात. चुलीवर जेवण करायला शिकतांना ‘ओट्यावर स्वयंपाक करण्याची सवय’सुद्धा अल्प करण्याचा प्रयत्न करावा. बीडाची चूल

बीडाची चूल

३ अ १ आ. स्वयंपाकाला साहाय्यभूत होणारी सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे खरेदी करणे

१. ज्यांच्याकडे सौरऊर्जेद्वारे (‘सोलर’द्वारे) पुरेशी वीजनिर्मिती करणारी यंत्रणा नाही, अशांनी ‘सोलर कुकर’ सारखी उपकरणे घेऊन ठेवावीत.

सौर कुकर

२. ज्यांच्याकडे सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करणारी यंत्रणा आहे, अशांनी विजेच्या साहाय्याने अन्न शिजवणारी ‘इंडक्शन शेगडी’ आणि त्या शेगडीच्या संदर्भात उपयुक्त असणारी स्वयंपाकाची भांडी घेऊन ठेवावीत. (ढगाळ वातावरणात सौरऊर्जा मिळण्याला मर्यादा येते.)

३ अ १ इ. पुरेशा प्रमाणात ओला कचरा (भाजीपाल्याची देठे, खरकटे, कुजणारे अन्य पदार्थ इत्यादी) उपलब्ध होणार्‍यांनी ‘बायो-गॅस संयंत्र’ बांधणे या संयंत्रात शेणाचाही वापर करता येतो, तसेच या संयंत्राला शौचालय जोडू शकतोे. काही राज्यांत शासन ‘बायो-गॅस संयंत्र’ उभारणीचा संपूर्ण व्यय (खर्च) देते, तर काही राज्यांत शासन अशा संयंत्राच्या उभारणीसाठी काही प्रमाणात अनुदान देते.

बायो-गॅस संयंत्र

३ अ १ ई. गाय, बैल इत्यादी प्राणी पाळणार्‍यांनी ‘गोबर-गॅस संयंत्र’ बांधणे या संयंत्राला शौचालय जोडू शकतो. हे संयंत्र बांधण्यासाठी शेतकर्‍याला राज्य शासनाकडून विशिष्ट नियमांनुसार अनुदान मिळू शकते.

गोबर-गॅस संयंत्र

३ अ २. स्वयंपाक करतांना यंत्रांचा (उदा. ‘मिक्सर’चा) वापर टाळून पारंपरिक वस्तूंचा वापर करण्याची सवय आतापासूनच लावणे

पाटा-वरवंटा

अ. यांत्रिक रवीने ताक करणे यांसारख्या कृती अल्प करून साध्या रवीने ताक घुसळावे.

आ. ‘मिक्सर’ऐवजी चटणी वाटण्यासाठी पाटा-वरवंटा, तर शेंगदाण्याचे कूट करण्यासाठी खलबत्ता यांचा वापर करावा.

खलबत्ता

इ. अन्य पारंपरिक वस्तू (उदा. दळण्यासाठी जाते, कांडण्यासाठी उखळ आणि मुसळ) वापरण्याचीही सवय करावी.

 

आपत्काळात शासनावर विसंबून राहण्याची
चूक न करता प्रत्येकाने विविध स्तरांवर सिद्ध राहणे आवश्यक !

आपत्काळात दळणवळण ठप्प होते. त्यामुळे शासनयंत्रणा सर्वत्र साहाय्यासाठी पोचू शकत नाहीत. शासन करत असलेल्या साहाय्यकार्यात अडथळेही येऊ शकतात. स्वयंपाकाचा गॅस, खाण्यापिण्याच्या वस्तू आदींचा तुटवडा भासू लागतो. त्याचा अपलाभ घेत वितरण व्यवस्थेत भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता असते. शासन काही वस्तूंचे शिधाकरण (रेशनिंग) चालू करून वा ‘औषध-वाटप केंद्रे’ उघडून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करते; परंतु शासनाच्या साहाय्यकार्यालाही मर्यादा येतात. हे सर्व लक्षात घेऊन आपत्काळात जिवंत राहण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे अत्यावश्यक ठरते.

आपत्काळात ‘जसे व्हायचे असेल, तसे होईल’, अशी मानसिकता नको !

आपत्काळाविषयी गांभीर्य निर्माण होण्याच्या दृष्टीने काही जणांना सांगितले की, ते म्हणतात, ‘आपत्काळात सर्वांचे जे होईल तेच आमचेही होईल. आपत्काळात जसे व्हायचे असेल, तसे होईल. पुढचे पुढे बघू.’ यासंदर्भात पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावा.
आपत्काळात जे व्हायचे आहे ते, म्हणजे विनाश हा होणारच आहे. घरामध्ये वयोवृद्ध मंडळी आणि लहान मुलेही असतात. वयोवृद्ध मंडळी परावलंबी अन् असाहाय्य असतात, तर मुले अजाण असतात. त्यांना सांभाळण्याचे आणि त्यांच्या रक्षणाचे दायित्व कुटुंबातील कर्त्या मंडळींचे असते. कुटुंबातील कर्त्या मंडळींनी जर आपत्काळाच्या सिद्धतेकडे दुर्लक्ष केले, तर पुढे जो आपत्काळाचा वणवा पेटेल, त्याच्यात वयोवृद्ध आणि लहान मुलेही होरपळली जातील. याचे पातक कुटुंबातील कर्त्या मंडळींना निश्‍चितच लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवावे.

प्रस्तुत लेखमालिकेचे सर्वाधिकार (कॉपीराईट) ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’कडे संरक्षित आहेत.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा !’

भाग २ वाचण्यासाठी भेट द्या. आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – २

Leave a Comment