आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता : भाग – ९

आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधना शिकवणारी सनातन संस्था !

भाग ८ वाचण्यासाठी भेट द्या – आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ८

अखिल मानवजातीला आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी
सिद्धता करण्याविषयी मार्गदर्शन करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

आपत्कालीन लेखमालिकेतील मागील भागात आपण कौटुंबिक स्तरावर लागणार्‍या नित्योपयोगी वस्तूंना असणार्‍या पर्यायांविषयी माहिती घेतली. या पूर्वीच्या लेखांकात अन्नधान्यादींच्या साठवणुकीविषयी माहिती पाहिली. या लेखात आरोग्याच्या दृष्टीने करायच्या पूर्वसिद्धतेविषयी जाणून घेणार आहोत.

 

३. आपत्काळाच्या दृष्टीने दैनंदिन (शारीरिक) स्तरावर करायच्या सिद्धता

३ ऐ. डॉक्टर, वैद्य, रुग्णालये आदींची होणारी अनुपलब्धता लक्षात घेऊन आरोग्याच्या दृष्टीने करायच्या पूर्वसिद्धता

३ ऐ. १. कुटुंबाला लागू शकणार्‍या औषधांची आपत्काळापूर्वीच पुरेशी खरेदी करून ठेवणे

पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये दळणवळण ठप्प झाल्याने अन्य सामुग्रींसह औषधेही मिळणे कठीण होते. युद्धाच्या काळात औषधांचा साठा प्राधान्याने सैन्यासाठी वापरला जातो. यामुळे औषधांचा तुटवडा निर्माण होतो. या दृष्टीने कुटुंबाला लागू शकणार्‍या औषधांची आपत्काळापूर्वीच पुरेशी खरेदी करून ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबातील व्यक्तींना असलेल्या विकारांनुसार कोणती औषधे किती प्रमाणात विकत घ्यावीत, तसेच भविष्यात लागू शकतील, अशी नेहमीच्या विकारांवरील कोणती औषधे घेऊन ठेवावीत, यांविषयी जवळचे डॉक्टर किंवा वैद्य यांना विचारावे.

पेठेत (बाजारात) मिळणारी काही तयार आयुर्वेदीय आणि ‘होमिओपॅथी’ औषधे यांचा दैनंदिन जीवनातील विकारांमध्ये कसा वापर करावा, याविषयीची माहिती सनातन संस्थेच्या ‘आपत्काळातील संजीवनी’ या मालिकेतील आगामी ग्रंथांत देण्यात येईल. काही आयुर्वेदीय औषधांची निर्मिती सनातन संस्थेने चालू केली असून लवकरच ही औषधे सर्वांसाठी उपलब्ध होतील.

३ ऐ. २. औषधी वनस्पतींची लागवड करणे

आपत्काळात तयार औषधांची भासू शकणारी चणचण लक्षात घेऊन आपत्काळाच्या आधीच अनेक विकारांवर उपयुक्त ठरणार्‍या आयुर्वेदीय औषधी वनस्पतींची लागवड आपण आपल्या घराची आगाशी, अंगण इत्यादी ठिकाणी करू शकतो. यामुळे आपत्काळात औषधांविना आपले हाल होणार नाहीत. (लागवडीविषयीचे सविस्तर विवेचन सनातन संस्थेचे ग्रंथ ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’ आणि ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’ यांत केले आहे.)

३ ऐ. ३. आपल्या सभोवतालच्या परिसरात आधीपासून उपलब्ध असलेल्या औषधी वनस्पतींची जाणकारांकडून माहिती करून घेणे आणि त्यांचा वापर करून पहाणे

अडूळसा, तुळस, बेल, औदुंबर, पिंपळ, वड, कडूनिंब यांसारख्या औषधी वनस्पती सर्वत्र आढळतात. पुनर्नवा, दूर्वा, आघाडा, माका यांसारख्या वनस्पती बहुतेक ठिकाणी आपोआप उगवतात. अशांसारख्या वनस्पतींची जाणकारांकडून ओळख करून घ्यावी आणि ‘वनस्पतींचे औषधी गुणधर्म’ या विषयावरील सनातन संस्थेच्या ग्रंथांतील त्यांचे उपयोग वाचून त्या वनस्पतींचा वापर करून पहावा.

सनातन संस्थेच्या आगामी ग्रंथांत घरगुती औषधांविषयीही माहिती देण्यात येईल.

३ ऐ. ४. लहानसहान विकारांच्या उपचारांसाठी औषधांवर अवलंबून न रहाता उपवास करणे, अंगावर ऊन घेणे आदी विना-औषध उपचारांचा वापर करण्यास आतापासूनच आरंभ करणे

असे उपचार सनातन संस्थेच्या ‘आपत्काळातील संजीवनी’ या मालिकेतील आगामी ग्रंथात देण्यात येतील.

३ ऐ. ५. ‘बिंदूदाबन (अ‍ॅक्युप्रेशर)’, ‘रिकाम्या खोक्यांचे उपाय’, ‘नामजप-उपाय’ आणि ‘प्राणशक्तीवहन उपाय’ या विना-औषध उपचारपद्धती शिकून घेणे

या उपचारपद्धतींवर सनातन संस्थेने ग्रंथ प्रकाशित केले आहेत. ‘www.sanatan.org’ आणि ‘www.ssrf.org’ या संकेतस्थळांवरही या उपचारपद्धतींविषयी माहिती दिली आहे.

[योगासने, सोपे व्यायामप्रकार, प्राणायाम, मर्मचिकित्सा, नस चिकित्सा (न्यूरोथेरपी), रंग चिकित्सा यांसारख्या अन्यही प्रचलित विना-औषध उपचारपद्धती शिकून त्यांचाही वापर करता येऊ शकतो.]

३ ऐ. ६. विकार झाल्यावर औषध घेण्यापेक्षा तो होऊच नये, यासाठी आतापासूनच प्रयत्न करणे

याविषयीचे विवेचन सनातन संस्थेचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !’ यात केले आहे.

कुटुंबातील एकाने तरी ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ घेणे

मार लागणे, रक्तस्राव होणे, भाजणे, बेशुद्ध पडणे, हृदयविकाराचा झटका येणे आदी प्रसंग जीवनात कधीही ओढवू शकतात. आपत्काळात उपचारांसाठी लगेचच डॉक्टर उपलब्ध होऊ शकतील, असे नाही. अशा वेळी रुग्णावर तात्पुरते उपचार करून त्याचे प्राण वाचवता यावेत, यासाठी ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ घेणे आवश्यक ठरते.

‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने ठिकठिकाणी विनामूल्य ‘प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग’ घेतले जातात. या प्रशिक्षणवर्गांचा लाभ घ्यावा. सनातन संस्थेची ग्रंथमालिका ‘प्रथमोपचार प्रशिक्षण (३ खंड)’ हीसुद्धा उपलब्ध आहे.

कुटुंबातील एकाने तरी ‘अग्नीशमन प्रशिक्षण’ घेणे

आपत्काळात बॉम्बस्फोटामुळे वा अन्य कारणामुळे आग लागणे, आगीने वेढले जाणे यांसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. आपत्काळात शासनाची ‘अग्नीशमन यंत्रणा’ साहाय्यासाठी लगेचच उपलब्ध होईल, असे नाही. यासाठी अशा आपत्तींमध्ये उपाययोजना काढता येण्यासाठी ‘अग्नीशमन प्रशिक्षण’ घेणे आवश्यक ठरते.

सनातन संस्थेचा ‘अग्नीशमन प्रशिक्षण’ हा ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्यावा. ‘अग्नीशमन प्रशिक्षणवर्ग’ कुठे घेतले जात असतील, तर त्या वर्गांनाही जाता येईल.

दंगलखोर, गुंड इत्यादींपासून स्वतःचे आणि कुटुंबियांचे रक्षण करता यावे, यासाठी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ घेणे

दंगलखोर, गुंड, बलात्कारी इत्यादी समाजकंटकांमुळे देशातील सर्वसामान्य जनता आजही पीडित आहे. आपत्काळात तर बर्‍याचदा अराजकासारखी परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी समाजकंटकांचा धोका वाढतो. यावर उपाय म्हणून आताच ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ घेणे आवश्यक ठरते.

‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने विनामूल्य ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग’ घेतले जातात. या प्रशिक्षणवर्गांचा, तसेच सनातन संस्थेचा ग्रंथ ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ याचा लाभ घ्यावा.

आपत्काळाच्या दृष्टीने करायच्या अन्य सिद्धता

१. आधुनिक वैद्यकीय यंत्रे वा उपकरणे यांद्वारे करायचे आवश्यक ते उपचार, उदा. डोळ्यांची शस्त्रक्रिया, दंतोपचार आपत्काळापूर्वीच करून घ्यावेत.

२. अन्न, पाणी, वीज, स्वयंपाकाचा ‘गॅस’, तसेच इतर वस्तू (उदा. गोडेतेल) काटकसरीने वापरायची सवय आतापासूनच लावावी.

३. ‘आपल्या शरीरस्वास्थानुसार कोणते अन्न आपल्यासाठी आवश्यक आहे’, हे जाणून घेऊन त्याप्रमाणे आवश्यक तेवढाच आहार करण्याची सवय आतापासूनच लावून घ्यावी. आपत्काळात आवडीचे पदार्थ खायला मिळतीलच, असे नाही; म्हणून आपल्या आवडी-निवडी आतापासूनच अल्प करण्यास आरंभ करावा. आपत्काळात एखाद्या वेळी कंदमुळे खाऊन रहाण्याची किंवा उपासमारीची पाळीही ओढवू शकते. या दृष्टीनेही मनाची आतापासूनच सिद्धता करावी.

४. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा यांमध्ये उपयुक्त ठरतील, अशी न्यूनतम वस्त्रे वापरण्याची सवय आतापासूनच करावी.

५. एकूणच गरजा [उदा. अंघोळीला गरम पाणीच लागणे, सतत पंख्याचा वारा पाहिजे असणे, वातानुकूलन यंत्र (एसी) असल्याविना झोप न येणे] अल्प करण्याची हळूहळू सवय करावी.

६. आपत्काळात उपयुक्त ठरतील, अशा विविध शारीरिक कृती शक्य होतील तेवढ्या आतापासूनच करण्याचा सराव करावा, उदा. रहाटाने विहिरीचे पाणी काढणे, कपडे हाताने धुणे, उद्वाहनाचा (‘लिफ्ट’चा) वापर न करता जिन्याने ये-जा करणे, जवळच्या अंतरावरील कामे करायला जाण्यासाठी गाडीऐवजी सायकलचा उपयोग करणे. थोडक्यात ‘यंत्रावलंबी अल्प आणि स्वावलंबी जास्त’ बनावे !

७. प्रतिकूल परिस्थितीतही शरीर कार्यक्षम रहाण्यासाठी प्रतिदिन व्यायाम (उदा. सूर्यनमस्कार घालणे, न्यूनतम १ – २ कि.मी. चालणेे), प्राणायाम, योगासने आदी करावे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा !’

भाग १० वाचण्यासाठी भेट द्या – आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – १०

(प्रस्तुत लेखमालिकेचे सर्वाधिकार (कॉपीराईट) ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’कडे संरक्षित आहेत.) 

Leave a Comment