आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ३

आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधना शिकवणारी सनातन संस्था !

अखिल मानवजातीला आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी सिद्धता
करण्याविषयी मार्गदर्शन करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

भाग २ वाचण्यासाठी भेट द्या. आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – २

पूर, भूकंप, तिसरे महायुद्ध, कोरोना महामारीसारखी संकटे आदी आपत्काळात टिकून रहाण्यासाठी करायच्या सिद्धतेविषयीच्या या लेखमालिकेतील पहिल्या लेखात चूल, गोबर-गॅस आदींविषयी माहिती पाहिली. दुसर्‍या लेखात भाज्या, फळे आदींची लागवड करण्याविषयी माहिती जाणून घेतली. आता या लेखात टिकाऊ पदार्थांचे विवेचन केले आहे. आपत्काळात नेहमीप्रमाणे अल्पाहार किंवा भोजन बनवता न आल्यास आपल्यावर उपासमारीची वेळ ओढवू नये, यासाठी घरात आधीच पुढील टिकाऊ पदार्थ करून ठेवलेले उपयोगी पडतील.

 

३. आपत्काळाच्या दृष्टीने दैनंदिन (शारीरिक) स्तरावर करायच्या विविध सिद्धता !

३ अ ५. विविध टिकाऊ खाद्यपदार्थ खरेदी करून ठेवणे वा घरी करून ठेवणे

आपत्काळात स्वयंपाकासाठी इंधनाचा तुटवडा असणे, घरात सर्व जण रुग्णाईत असणे, अचानक अन्य ठिकाणी स्थलांतर करावे लागणे, पेठेत (बाजारात) भाजीपाला न मिळणे इत्यादी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा वेळी नेहमीप्रमाणे अल्पाहार आणि भोजन बनवता येईलच, असे नाही. या परिस्थितीत विविध टिकाऊ खाद्यपदार्थ संग्रही असलेले उपयुक्त ठरेल.

अ. पुढे दिलेल्या पदार्थांपैकी काही पदार्थ (उदा. खाकरे, लोणची, पेये) पेठेत विकत मिळतात. ते खरेदी करून ठेवू शकतो. घरीही असे पदार्थ बनवण्याची सवय आतापासूनच ठेवावी; कारण पुढे आपत्काळ जसजसा तीव्र होत जाईल, तसतसे हे पदार्थ पेठेत उपलब्ध होणेही कठीण होईल.

आ. पुढे दिलेले पदार्थ उदाहरणस्वरूप आहेत, तसेच ते देतांना अधिकतर महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला आहे. वाचकांना त्या त्या राज्यानुसार वा देशानुसार ठाऊक असलेले टिकाऊ पदार्थही खरेदी करता येतील किंवा घरी बनवता येतील.

इ. आम्ही टिकाऊ पदार्थ बनवण्याच्या कृती फार दिल्या नाहीत. या कृती बहुतेकांना ठाऊकही असतात. मात्र आपत्काळाचा विचार करून बर्‍याच ठिकाणी ‘टिकाऊ पदार्थ अधिक काळ कसे टिकवावेत’, यासंदर्भात उपयुक्त सूचना केल्या आहेत.

‘टिकाऊ पदार्थ कसे बनवावेत’, याविषयीची माहिती वाचकाला नसल्यास त्याने ती माहिती कुटुंबातील वडीलधार्‍यांकडून समजून घ्यावी किंवा त्यासाठी पाकशास्त्रावरील पुस्तक वाचावे अथवा या पदार्थांच्या ‘यू ट्यूब’वर दिलेल्या कृती पहाव्यात. या विषयावर ‘मराठी किचन एक्स्पर्ट (Marathi kitchen expert)’ सारख्या भ्रमणभाष प्रणाल्याही (अ‍ॅप्सही) उपलब्ध आहेत.

ई. ग्रंथात शक्य तेथे टिकाऊ पदार्थ टिकण्याचा सरासरी कालावधीही दिला आहे. हा कालावधी त्या त्या प्रदेशातील वायूमान (हवामान), टिकाऊ पदार्थ बनवतांना घेतलेली काळजी इत्यादी घटकांवरही अवलंबून आहे.

३ अ ५ अ. तांदुळाचे आणि नाचणीचे पीठ, दुधाची भुकटी (पावडर) इत्यादी पदार्थ
३ अ ५ अ १. तांदुळाचे आणि नाचणीचे पीठ
नाचणीचे पीठ

‘या पिठांपैकी नाचणीचे पीठ अधिक पौष्टिक आहे.

तांदूळ ३ – ४ घंटे पाण्यात भिजवून नंतर चाळणीत निथळत ठेवावेत. साधारणपणे १ घंट्याने तांदुळातील पाणी निथळल्यावर आणि त्यांचा ओलसरपणा न्यून झाल्यावर थोडे थोडे तांदूळ मध्यम आचेवर (उष्णतेवर) भाजून घ्यावेत. एका वेळी थोडेसे तांदूळ घेतल्याने ते लाह्यांसारखे फुलतात. शेवटी सर्व तांदुळांचे पीठ करून कोरड्या बरणीत भरून ठेवावे. हे पीठ साधारणपणे ३ मास टिकते. ते दूध, दही, ताक किंवा आमटी यांत घालून खाता येते. पीठ दुधातून घेतल्यास त्यात चवीसाठी साखर किंवा गूळ घालू शकतो.

तांदुळाचे पीठ बनवण्याच्या पद्धतीप्रमाणेच नाचणीचेही पीठ करून ठेवू शकतो. हे पीठही साधारणपणे ३ मास टिकते.

३ अ ५ अ २. सातूचे पीठ
सातूचे पीठ

गहू धुऊन निथळत ठेवावेत. साधारणपणे १ घंट्याने गव्हातील पाणी निथळल्यावर आणि त्यांचा ओलसरपणा न्यून झाल्यावर ते मध्यम आचेवर खमंग भाजावेेत. त्यांत डाळे (सोललेले चणे) आणि जिरे भाजून घालावेत. सर्व एकत्र करून त्याचे पीठ करावे. हे पीठ हवाबंद डब्यात किंवा कोरड्या बरणीत भरून ठेवावे. हे पीठ पाणी किंवा दूध यांत घालून चवीप्रमाणे साखर किंवा गूळ घालून खाऊ शकतो. हे पीठ साधारणपणे ६ मास टिकते.

प्रांतानुसार सातूचे पीठ करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही ठिकाणी गहू न वापरता जव वापरतात, तर काही ठिकाणी केवळ अख्खे हरभरे भाजून त्याचे पीठ करतात. ५ ते ७ धान्ये एकत्र करून वरीलप्रमाणे भाजून त्याचेही पीठ करता येते.’

– श्रीमती क्षमा राणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (फेब्रुवारी २०२०)

३ अ ५ अ ३. गहू किंवा नाचणी यांचे ‘सत्त्व’
नाचणीचे ‘सत्त्व’

‘गहू किंवा नाचणी यांचा चीक काढून तो चांगला वाळवल्यास त्याची पूड (पावडर) सिद्ध होते. त्याला ‘सत्त्व’ म्हणतात. ही पूड पौष्टिक असून दुधात किंवा पाण्यात शिजवून त्यात साखर किंवा गूळ घालून खाऊ शकतो. ही पूड साधारणपणे ३ मास टिकते.’ – सौ. अर्पिता देशपांडे, सनातन आश्रम, मिरज. (फेब्रुवारी २०१९)

३ अ ५ अ ४. यंत्राद्वारे प्रक्रिया केलेले पौष्टिक पदार्थ

दुधाची भुकटी (पावडर), लहान मुलांसाठी विविध पोषक घटक असलेल्या भुकट्या इत्यादी साठवून ठेवता येऊ शकतात. उदा. लॅक्टोजेन (Lactogen), सेरेलॅक (Cerelac). ‘सेरेलॅक’ पूरक आहार म्हणून रुग्ण व्यक्ती किंवा मोठी माणसेही खाऊ शकतात. जर्सीसारख्या विदेशी वंशाच्या गायींचे दूध शरिराला हानीकारक असते, असे संशोधनाने सिद्ध झाले आहे. त्यामुळे देशी गायीच्या दुधाची भुकटी मिळत असेल, तर तिला प्राधान्य द्यावे.

३ अ ५ आ. उन्हात खडखडीत वाळवलेल्या भाकर्‍या, तसेच गुळाच्या पोळ्या इत्यादी पदार्थ
३ अ ५ आ १. ज्वारी (जोंधळा) आणि बाजरी यांच्या भाकर्‍या
ज्वारी (जोंधळा)च्या भाकर्‍या

‘या भाकर्‍या करण्याआधी त्या पिठात चवीसाठी तिखट, मीठ आणि हिंग घालू शकतो.

अ. ज्वारीच्या पिठाच्या अगदी पातळ भाकर्‍या करून त्या उन्हात खडखडीत वाळवाव्यात. या भाकर्‍या साधारणपणे १ मास टिकतात.

आ. बाजरीच्या पिठाच्याही अगदी पातळ भाकर्‍या करून त्या उन्हात खडखडीत वाळवाव्यात. या भाकर्‍या ज्वारीच्या भाकर्‍यांपेक्षा चवीला चांगल्या लागतात. या भाकर्‍या साधारणपणे २ मास टिकतात.

उन्हात खडखडीत वाळवलेल्या भाकर्‍या घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवाव्यात. या भाकर्‍यांचे तुकडे करून त्यांवर उष्ण (गरम) आमटी घालून ते खाता येते.

३ अ ५ आ २. गुळाच्या पोळ्या
गुळाची पोळी

गुळाची पोळी चांगली भाजावी. पोळी भाजून झाल्यावर ती पूर्ण गार होऊ द्यावी. पोळ्या उष्ण (गरम) असतांना एकावर एक ठेवू नयेत. पोळ्या गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवाव्यात. अशा पोळ्या साधारणपणे १ मास किंवा त्याहूनही अधिक काळ टिकतात.

३ अ ५ आ ३. खाकरे
खाकरे

मेथी, जिरे, मसाला (उदा. चाट मसाला, गरम मसाला) आदी स्वादांत खाकरे बनवता येतात. यासाठी गव्हाच्या पिठात आपल्याला ज्या चवीचे खाकरे करायचे आहेत, ते पदार्थ घालून पीठ घट्ट मळावे. त्याची अतिशय पातळ पोळी लाटावी. ती तव्यावर भाजतांना स्वच्छ फडक्याने पूर्ण पोळीवर दाब देऊन मंद आचेवर भाजावी. ती कुठेही फुगू देऊ नये. नंतर पोळी पूर्ण गार होऊ द्यावी. खाकरे गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरावेत. ते साधारणपणे ३ मास टिकतात.

३ अ ५ इ. कणकेचे (गव्हाच्या पिठाचे) आणि अन्य धान्यांच्या पिठांचे लाडू
गव्हाच्या पिठाचे लाडू

पिठीसाखर किंवा गूळ घातलेले कणकेचे लाडू १ – २ मास टिकतात. नाचणीचे पीठ, हरभर्‍याच्या डाळीचे पीठ (बेसन), मुगाचे पीठ इत्यादींचेही लाडू १ – २ मास टिकतात.

३ अ ५ ई. आंबापोळी आणि फणसपोळी
फणसपोळी

या कडक उन्हात वाळवाव्यात. आंबापोळीवर आवश्यक तेवढे उष्ण (गरम) पाणी घालून ती सैलसर केल्यास साखरांब्याप्रमाणे साध्या पोळीला लावूनही खाऊ शकतो.

आंबापोळी आणि फणसपोळी साधारणपणे १ वर्ष टिकतात.’

– (पू.) वैद्य विनय भावे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जानेवारी २०२०)

३ अ ५ उ. आंब्याचा रस

१. आंब्याच्या रसात सम प्रमाणात साखर घालून तेे मिश्रण पूर्ण वाळेपर्यंत उन्हात ठेवावे. असा वाळलेला रस शीतकपाटात (‘फ्रीझ’मध्ये) ठेवल्यास साधारणपणे दीड – दोन वर्षे टिकतो आणि शीतकपाटाबाहेर ठेवल्यास साधारणपणे १ वर्ष टिकतो.

२. आंब्याच्या रसात सम प्रमाणात साखर घालून ते मिश्रण ‘गॅस’वर वा चुलीवर आटवावे. हा आटलेला रस शीतकपाटात ठेवल्यास साधारणपणे १ वर्ष टिकतो. (शीतकपाटात न ठेवल्यास त्याला बुरशी येऊ शकते.)

३ अ ५ ऊ. साखरांबा, कैरीचा छुंदा इत्यादी पदार्थ

‘हे साखरेच्या किंवा गुळाच्या पाकातील पदार्थ आहेत. हे पदार्थ चांगले टिकण्यासाठी पाक गोळीबंद (पक्का) करावा. त्यामुळे पाकात पाण्याचा थोडाही अंश रहात नाही आणि केलेला पदार्थ चांगला टिकतो. गोळीबंद पाक केल्यामुळे पदार्थात ‘प्रिझरव्हेटिव्ह (पदार्थ नासू नये; म्हणून घालायचा रासायनिक पदार्थ)’ घालावे लागत नाही.

३ अ ५ ऊ १. साखरांबा
साखरांबा

हा कैर्‍यांचा (कच्च्या आंब्यांचा) किंवा पिकलेल्या आंब्यांचा केला जातो. साखरांबा वर्षभर सहज टिकतो.

३ अ ५ ऊ २. कैरीचा छुंदा (कच्ची कैरी किसून त्यामध्ये आवश्यकतेनुसार पदार्थ घालून बनवलेले मिश्रण)

कैरीचा छुंदा १५ ते २० दिवस कडक उन्हात ठेवावा. कैरीचा छुंदा पुष्कळ वर्षे टिकतो.

३ अ ५ ऊ ३. आवळा, कैरी, स्ट्रॉबेरी, संत्री आदींची ‘जेली’ आणि ‘जॅम’
जेली आणि जॅम

हे साधारणपणे १ वर्ष टिकतात.’

– सौ. अर्पिता देशपांडे, सनातन आश्रम, मिरज. (फेब्रुवारी २०१९)

३ अ ५ ए. लोणची आणि ‘टॉमॅटो सॉस’
३ अ ५ ए १. लोणची

अ. घरी घातलेले लोणचे चांगले टिकावे, यासाठी घ्यायची काळजी : ‘पुढे नमूद केलेली काळजी घेऊन लोणचे घरी घातले, तर कैरी, आवळा, मिरची, ओली हळद इत्यादींची लोणची १ – २ वर्षे टिकतात. लिंबे शिजवून केलेले लिंबाचे लोणचे साधारणपणे ४ – ५ वर्षे टिकू शकते. लिंबाच्या लोणच्यामुळे रुग्ण व्यक्तीच्या तोंडालाही चव येते, तसेच ते जेवढे जुने होईल (मुरेल), तेवढे ते अधिक चांगले लागते.

अ १. लोणचे घालण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत आणि कोरडे करावेत. लोणच्यासाठी वापरणार असलेल्या कैर्‍या, लिंबे, आवळे, ओली हळद, मिरच्या इत्यादी धुऊन, स्वच्छ पुसून आणि कोरड्या करून घ्याव्यात. लोणचे करण्यासाठी वापरायचे पदार्थ, उदा. तिखट, खडे मीठ भाजून घ्यावेत, म्हणजे त्यांमध्ये पाण्याचा अंश रहात नाही. (लोणचे टिकण्यासाठी आयोडिनयुक्त मीठ वापरण्यापेक्षा खडे मीठ वापरावे; कारण आयोडिनयुक्त मिठामुळे लोणचे लवकर खराब होऊ शकते.) लोणच्यासाठी साखर वापरायची असेल, तर साखरही कोरडी असावी. लोणचे घालतांना आवश्यकता वाटल्यास त्यात ‘प्रिझरव्हेटिव्ह’ वापरू शकतो.

अ २. लोणचे चिनी मातीच्या बरणीत किंवा जाड काचेच्या बरणीत ठेवावे.

अ ३. लोणचे बरणीत भरल्यावर लोणच्याच्या वरच्या भागावर खडे मीठ पसरून घालावे.

अ ४. लोणच्याला ‘बुरशी येऊ नये’ यासाठी हाताच्या बोटाच्या २ पेरांएवढी थंड केलेली तेलाची फोडणी लोणच्यावर घालावी.

अ ५. लोणच्याच्या बरणीचा उघडा भाग स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घेऊन बरणीचे झाकण घट्ट लावावे. बरणीच्या झाकणावर स्वच्छ सुती कापड ठेवून ते बरणीच्या गळ्याशी नाडीने बांधावे.

अ ६. लोणच्याची बरणी कोरड्या स्थानी ठेवावी. (पूर्वी लोणच्याच्या बरण्या उंचावर अथवा देवघरात ठेवत असत.)

अ ७. जेवणावर घ्यायचे लोणचे सारखे सारखे मुख्य साठ्यातून काढायचे नसते, तर आठवठ्यातून एकदा आठवठाभर पुरेल इतके लोणचे वेगळ्या भांड्यात काढावे. शक्यतो अंघोळ करून मुख्य साठ्यातून लोणचे काढावे. लोणचे काढण्यासाठी वापरायचा मोठा चमचा, लोणचे काढून ठेवायचे भांडे आणि लोणचे काढणार्‍याचे हात कोरडे असावेत. लोणचे बरणीतून काढल्यावर ती बाहेरून स्वच्छ कोरड्या कापडाने पुसावी आणि पूर्वीप्रमाणे बंद करावी.

अ ८. मासिक पाळी चालू असलेल्या स्त्रीने मुख्य साठ्यातील लोणच्याला स्पर्श करू नये. ग्रहणकाळातही मुख्य साठ्यातील लोणच्याला स्पर्श करू नये.

कोकणात किंवा समुद्रकिनार्‍यांवरील प्रदेशांत दमट वातावरणामुळे लोणच्याला बुरशी येण्याचे प्रमाण अन्य प्रदेशांपेक्षा थोडे अधिक असते. त्यामुळे अशा ठिकाणी लोणचे उष्ण आणि कोरड्या वातावरणाच्या तुलनेत थोडे अल्प काळ टिकते.’

– सौ. अर्पिता देशपांडे, सनातन आश्रम, मिरज (फेब्रुवारी २०१९) आणि श्री. प्रसाद म्हैसकर, रत्नागिरी (८.८.२०१९)

३ अ ५ ए २. ‘टॉमॅटो सॉस’
टॉमॅटो सॉस

‘व्हिनेगर (पदार्थ टिकण्यासाठी घालायचे अतिशय आंबट द्रावण) न घातलेला ‘टॉमॅटो सॉस’ शीतकपाटात ठेवल्यास तो १ वर्ष टिकतो. व्हिनेगर घातलेला ‘टॉमॅटो सॉस’ शीतकपाटाच्या बाहेर ठेवला, तर तो ६ मास टिकतो आणि शीतकपाटात ठेवल्यास साधारणपणे दीड – दोन वर्षे टिकू शकतो.

३ अ ५ ऐ. चटण्या, मेतकूट इत्यादी पदार्थ
३ अ ५ ऐ १. कैरी, आवळा आणि चिंच यांच्या ओल्या चटण्या
कैरीची चटणी

अ. कैरीची चटणी : साखरेचा गोळीबंद पाक करावा. त्यात आवश्यक ते मसाल्याचे पदार्थ आणि उकडलेल्या कैर्‍या घालून चटणी करावी. अशी चटणी मध्यम पिकलेल्या आंब्यांचीही करता येते आणि साखरेऐवजी गुळाचा पाक करूनही करता येते.

आ. आवळ्याची चटणी : कैर्‍यांप्रमाणेच आवळ्यांचीही चटणी करता येते.

इ. चिंचेची चटणी : चिंच अर्धा घंटा पाण्यात भिजत घालून नंतर त्यातील रस (कोळ) पिळून घ्यावा. गुळाचा किंवा साखरेचा गोळीबंद पाक करून त्यामध्ये चिंचेचा रस, तिखट, मीठ, थोडीशी मिरपूड आणि धने-जिरे पूड घालून ते मिश्रण चांगले उकळू द्यावे. सर्व एकजीव झाल्यावर ‘गॅस’ बंद करावा.

या चटण्या गार झाल्यावर काचेच्या बरणीत ठेवाव्यात. या चटण्या शीतकपाटात ठेवल्यास दीड वर्ष टिकतात, तर शीतकपाटाविना १ वर्ष टिकतात.’

– सौ. अर्पिता देशपांडे, सनातन आश्रम, मिरज. (फेब्रुवारी २०१९)

३ अ ५ ऐ २. विविध प्रकारच्या कोरड्या चटण्या आणि मेतकूट

‘शेंगदाणे, तीळ, कारळे (तिळासारखे; पण त्याहून मोठे असणारे एक बीज), जवस, सोललेले चणे (याला ‘डाळे’ असेही म्हणतात.), खोबरे इत्यादींच्या चटण्या करू शकतो. मेतकूट भातावर घालून खाऊ शकतो. हे पदार्थ कोरडे असल्यामुळे साधारणपणे ३ मास टिकतात.’ – श्रीमती क्षमा राणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जानेवारी २०२०)

३ अ ५ ओ. सांडगे, पापड इत्यादी पदार्थ
सांडगे

हे पदार्थ साधारणपणे वर्षभर टिकतात.

१. सांडगे : ‘सांडग्यांना काही प्रदेशांत ‘वड्या’ असेही म्हणतात.

अ. कलिंगडाचा पांढरा आणि हिरवा भाग, दुधी भोपळा, लाल भोपळा, पपई, कोबी अशा विविध प्रकारच्या भाज्या, तसेच सोयाबिन यांचे सांडगे

आ. रताळ्याचे सांडगे आणि ज्वारीच्या खारवड्या (ज्वारीच्या लाह्यांचे सांडगे)

इ. मूगडाळ, उडीदडाळ, चणाडाळ, मटकीची डाळ आदी डाळींचे सांडगे घालता येतात. या डाळी एकत्रित करूनही सांडगे घालता येतात.

सांडग्यांची भाजीही करतात. दुधी भोपळा, लाल भोपळा यांसारख्या भाज्यांचे सांडगे बनवतांना त्यांत मीठ घालू नये; कारण मिठामुळे पुढे भाजी शिजण्यास अडचण येते. जेवणात तोंडी लावण्यासाठी म्हणून सांडगे घालायचे असल्यास त्यांत मीठ घालावे.’

– सौ. छाया विवेक नाफडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (मे २०२०)

२. किस : ‘रताळ्यांचा किस आणि बटाट्यांचा किस

३. पापड : उडीद, मूग, तांदूळ, नाचणी आणि पोहे यांचे पापड किंवा मिरगुंडे, तसेच फणसाचे (गर्‍यांचे) पापड

पापड

४. ज्वारी, तांदूळ, साबूदाणा आणि बटाटा यांच्या पापड्या, तसेच गव्हाच्या कुरडया

५. सांडगी मिरची किंवा दह्यातली मिरची’

– सौ. अर्पिता देशपांडे, सनातन आश्रम, मिरज. (फेब्रुवारी २०१९)
३ अ ५ औ. तहान आणि काही प्रमाणात भूक शमवतील, अशी पेये

३ अ ५ औ १. लिंबू, संत्री आणि मोसंबी यांची पेये

‘लिंबाच्या रसात सम प्रमाणात साखर घालून ते काचेच्या बरणीत भरावे आणि त्यातील साखर पूर्ण विरघळेपर्यंत ते उन्हात ठेवावे. उन्हाच्या तीव्रतेनुसार साखर विरघळायला साधारणपणे १५ ते ३० दिवस लागतात.
लिंबाचे पेय करण्याच्या पद्धतीप्रमाणेच संत्री आणि मोसंबी यांचीही पेये करता येतात. ही पेये शीतकपाटात न ठेवताही २ – ३ वर्षे टिकतात. ही पेये शीतकपाटात ठेवल्यास त्यांची चव पालटते; म्हणून ती शीतकपाटात ठेवत नाहीत.

३ अ ५ औ २. कैरीचे पन्हे

कैर्‍या शिजवून, त्यांचा गर काढून त्यात साखर किंवा गूळ घालून त्याचे पन्हे करू शकतो. हे काचेच्या बरणीत भरून शीतकपाटात ठेवावे. हे एक ते दीड वर्ष टिकते.

अशी प्रांतानुसार (उदा. कोकणात ‘कोकम सरबत’) आणि फळांच्या हंगामानुसार वेगवेगळ्या फळांची टिकाऊ पेये करून ठेवू शकतो.’

– सौ. अर्पिता देशपांडे, सनातन आश्रम, मिरज. (फेब्रुवारी २०१९)

३ अ ५ अं. अधिक पोषक तत्त्वे असणारी बिस्किटे, साधारण वर्षभर टिकणारी चॉकलेट्स’, सुका मेवा इत्यादी पदार्थ
शेल्फ लाईफ चॉकलेट्स

आपत्काळात एखाद्या वेळी अचानक स्थलांतर करावे लागते आणि तेथे काही कारणांमुळे अडकून पडावे लागते. अशा वेळी कधी कधी खाण्यासाठी अन्नही उपलब्ध होत नाही. या स्थितीमध्ये वरील पदार्थांचा अधिक चांगला उपयोग होऊ शकतो.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा !’

भाग ४ वाचण्यासाठी भेट द्या. आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ४

(प्रस्तुत लेखमालिकेचे सर्वाधिकार (कॉपीराईट) ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’कडे संरक्षित आहेत.)

संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

Leave a Comment