आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता : भाग – ७

आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधना शिकवणारी सनातन संस्था !

भाग ६ वाचण्यासाठी भेट द्या. आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ६

अखिल मानवजातीला आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी सिद्धता
करण्याविषयी मार्गदर्शन करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

आपत्कालीन लेखमालिकेतील मागील भागात आपण कौटुंबिक स्तरावर लागणार्‍या नित्योपयोगी वस्तूंविषयी माहिती जाणून घेतली. आता काही नित्योपयोगी वस्तूंना असणार्‍या पर्यायांविषयी या लेखात माहिती देण्यात आली आहे.

 

३. आपत्काळाच्या दृष्टीने दैनंदिन (शारीरिक) स्तरावर करायच्या सिद्धता

३ ऊ. विविध नित्योपयोगी वस्तूंना असणार्‍या पर्यायांचा विचार करून ठेवणे

आपत्काळात बाजारपेठेत अनेक नित्योपयोगी वस्तूंचा तुटवडा असेल, त्या महाग होतील किंवा मिळणारही नाहीत. अशा वेळी पुढील पर्याय उपयोगी ठरतील. यांतील शक्य होतील तेवढे पर्याय आतापासूनच कृतीत आणण्याचा सराव करावा.

३ ऊ १. बाजारपेठेत मिळणारी दंतमंजने (पूड स्वरूपातील) आणि ‘टूथपेस्ट’ (दंतलेपी) यांना पर्याय
कडुलिंबाची फांदी

अ. ‘कडूनिंबाच्या कोवळ्या फांदीचे साधारणपणे १५ सें.मी. लांबीचे तुकडे करून त्या तुकड्यांचा (काड्यांचा) वापर दात घासण्यासाठी करावा.

आ. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणार्‍या बारीक मिठाने दात घासावेत.’

– श्री. अविनाश जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.५.२०२०)

इ. ‘१० भाग गेरू (सोनकाव) आणि १ भाग मीठ (सैंधव मीठ असल्यास उत्तम; अन्यथा खडे मीठ बारीक करून वापरू शकतो.) यांचे मिश्रण दंतमंजन म्हणून वापरावे.

ई. आंबा, पेरू, कडूनिंब, रुई, पिंपळ, खैर, करंज आणि अर्जुन यांपैकी उपलब्ध होतील तेवढ्या झाडांची वाळलेली पाने किंवा वाळलेल्या लहान फांद्या जाळून त्यांची राख करावी. ही राख वस्त्रगाळ करून (कापडातून गाळून घेऊन) दंतमंजन म्हणून वापरावी.’

– पू. वैद्य विनय भावे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१२.२०१९)

उ. ‘बाभळीच्या वाळलेल्या शेंगा जाळून ती राख वस्त्रगाळ करून दंतमंजन म्हणून वापरावी.

ऊ. गोवर्‍यांपासून (शेण्यांपासून) बनवलेले दंतमंजन

गोवर्‍यांपासून बनवलेले दंतमंजन

दंतमंजन बनवण्यासाठी वापरण्याच्या गोवर्‍या बनवतांना त्यांच्यावर माश्या बसून किडे होऊ नयेत; म्हणून कडूनिंबाची ताजी पाने आणि भाताचे तूस (तांदुळाची टरफले) शेणात मिसळून पातळ गोवर्‍या थापाव्यात. कडूनिंबाच्या पानांमुळे माश्या जवळ येत नाहीत. भाताच्या तुसामुळे गोवर्‍या लवकर जळण्यास साहाय्य होते. गोवर्‍या पातळ थापल्याने त्या लवकर वाळतात. अशा रितीने सिद्ध केलेल्या गोवर्‍यांचा लहानसा ढीग करावा. ढीग करतांनाच ढीगाच्या आत दिवा लावता येण्याएवढी जागा ठेवावी. ढीगाच्या आत तुपाचा दिवा लावल्यावर गोवर्‍या पेटू लागतात. काही गोवर्‍या पेटल्यावर तुपाचा दिवा बाहेर काढावा. गोवर्‍यांचा ढीग पूर्ण जळल्यावर तांबडा दिसू लागतो. तो ढीग पूर्ण जळल्याची निश्‍चिती झाल्यावर तो पेटलेला असतांनाच पूर्णपणे झाकला जाईल, एवढे मोठे पातेले (किंवा लोखंडी घमेले) त्यावर पालथे घालावे. झाकलेल्या पातेल्याची भूमीला टेकलेली कडा मातीने झाकावी. (काही ठिकाणी एक लहान खड्डा खणून त्यात गोवर्‍या जाळण्यासाठी ठेवतात. त्या जळून तांबड्या झाल्यावर त्यावर पत्रा झाकतात. पत्र्याच्या कडा मातीने झाकतात.) त्यामुळे पातेल्याच्या आत जळत असलेल्या गोवर्‍यांना हवेतील प्राणवायू न मिळाल्याने त्या विझतात. दुसर्‍या दिवशी ते पातेले बाजूला करून आतील गोवर्‍यांचा कोळसा चुरडून बारीक करून वस्त्रगाळ करावा.

गोवर्‍यांच्या कोळशाची वस्त्रगाळ पूड १० वाट्या असेल, तर त्यात ५ चहाचे चमचे (टीस्पून) सैंधव आणि अर्धा चमचा तुरटीची पूड घालून ते मिश्रण एकजीव करावे. या मिश्रणाचा दंतमंजन म्हणून उपयोग करावा.’

– श्री. अविनाश जाधव (२१.५.२०२०)

ए. ‘भाताच्या तुसांचा (तांदुळाच्या टरफलांचा) ढीग करून त्यावर निखारे (पेटलेले कोळसे) ठेवावेत. त्यामुळे तूस जळू लागते. हा ढीग पूर्ण जळल्यावर त्याची राख बनते. थंड झालेली राख वस्त्रगाळ करून घ्यावी. (या ढीगाचा बाहेरील काही भाग जळल्याने केवळ काळा होतो; पण त्याची राख होत नाही. तो काळा भाग हाताने अलगद बाजूला करून आतील राख घ्यायची असते.) ती राख दंतमंजन म्हणून वापरावी.’ – पू. वैद्य विनय भावे (१०.१२.२०१९)

ऐ. ‘नारळाची करवंटी किंवा बदामाची टरफले जाळून झालेल्या कोळशाची वस्त्रगाळ केलेली पूड दंतमंजन म्हणून वापरावी.’ – श्री. अविनाश जाधव (२१.५.२०२०)

वरील उपसूत्र ‘इ’पासूनची सर्व दंतमंजने प्लास्टिकच्या पिशवीत किंवा लहान डब्यांमध्ये हवाबंद करून ठेवल्यास साधारणपणे वर्षभर टिकतात.

३ ऊ २. दाढी करण्यासाठीचा साबण आणि लेपी (शेव्हिंग क्रीम) यांना पर्याय

अ. ‘गालांना कोमट पाणी चोळून दाढी करू शकतो किंवा उष्ण (गरम) पाण्याने अंघोळ केल्यावर लगेच दाढी करू शकतो.

आ. दाढीला खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल लावून दाढी करता येते.

वरील पर्यायांनी साधारण (गुळगुळीत नव्हे !) दाढी होते. या पर्यायांमुळे दाढी करतांना त्रास झाल्यास हे पर्याय वापरू नयेत.’

– पू. वैद्य विनय भावे (१०.१२.२०१९)

३ ऊ ३. अंगाच्या साबणाला पर्याय
मुलतानी माती

‘अंघोळीसाठी साबण नसल्यास हरभर्‍याची डाळ किंवा मसूर डाळ यांचे पीठ, मुलतानी माती, वारुळावरची माती किंवा चांगल्या जागेवरील चाळलेली कोणतीही स्वच्छ माती (उदा. काळी माती, लाल माती) वापरावी. या वस्तू प्रथम किंचित पाण्यात भिजवून नंतर उटणे वापरतो तशा वापराव्यात. [काही वेळा वारुळाच्या ठिकाणी स्थानदेवतेचे वास्तव्य असते. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना विचारून ‘वारूळ देवतेचे नाही ना’, याची निश्‍चिती करून एका लांब दांड्याने वारूळ फोडावे आणि त्याची ढेकळे (मातीचे घट्ट झालेले तुकडे) एकत्र करावीत. ही ढेकळे कुटून बारीक करून ती माती बारीक चाळणीने चाळून घ्यावी.]

वरीलपैकी कोणतीही वस्तू उपलब्ध नसल्यास अंघोळ करतांना नुसतेच हाताने अंग चोळले तरी चालते.’ – वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.३.२०१९)

३ ऊ ४. केस धुण्यासाठीचा साबण आणि बाजारपेठेत मिळणारा द्रवस्वरूपातील साबण (शँपू) यांना पर्याय

३ ऊ ४ अ. शिकेकाईची पूड घरी बनवणे

‘आवळा चूर्ण २ भाग आणि शिकेकाई अन् रिठे यांची चूर्णे प्रत्येकी १ भाग घेऊन सर्व एकत्र करावे. यातील २ ते ४ चमचे चूर्ण रात्रभर लोखंडी कढईत भिजत ठेवावे. (लोखंडी कढई नसल्यास हे मिश्रण ‘स्टील’च्या भांड्यात घालून त्यात लोखंडाचे तुकडे, उदा. ४ – ५ लोखंडी खिळे घालावेत. दुसर्‍या दिवशी हे मिश्रण वापरण्यापूर्वी खिळे काढून ठेवावेत. – संकलक) आवळ्याचा लोखंडाशी संयोग झाल्याने काळा रंग येतो. यामुळे केस काळे होण्यास साहाय्य होते. सकाळी अंघोळीपूर्वी एक घंटा या भिजवलेल्या चूर्णाची बनलेली पातळ चटणी (पेस्ट) केसांना लावावी आणि अंघोळीच्या वेळी कोमट पाण्याने केस धुवावेत. आठवड्यातून १ – २ वेळा असे केल्यास केसांचे आरोग्य चांगले रहाते आणि केस काळे अन् मऊ होतात.’ – वैद्या (सौ.) गायत्री संदेश चव्हाण, कुर्ला, मुंबई. (२०.६.२०२०)

‘वरील चूर्णात २ भाग मेथी, १ भाग नागरमोथा, १ भाग जटामांसी, तसेच उपलब्धतेनुसार जास्वंदीची फुले, ब्राह्मीची पाने आणि माक्याची पाने वाळवून चूर्ण करून घालता येतात. आवळा, शिकेकाई, नागरमोथा इत्यादी वस्तू बाजारपेठेत उपलब्ध असतात. त्यांचे चूर्ण हवाबंद डब्यात भरून ठेवल्यास साधारण १ वर्ष टिकते. या वस्तू चूर्ण न बनवता अख्ख्या स्वरूपात कडक उन्हात नीट वाळवून हवाबंद डब्यात ठेवल्यास साधारण ३ वर्षे टिकतात. हवेतील आर्द्रतेमुळे या वस्तू मऊ झाल्यास त्या पुन्हा उन्हात वाळवून वापरता येतात.’

– वैद्य मेघराज पराडकर (२०.६.२०२०)

३ ऊ ४ आ. रिठा : रिठ्याची फळे वाळवून ठेवावीत. ५ – ६ रिठे उष्ण (गरम) पाण्यात रात्रभर भिजत ठेवावेत. सकाळी अंघोळीच्या वेळी ते पाणी केसांना चोळून त्याने केस धुवावेत.

३ ऊ ५. कपडे धुण्याचा साबण किंवा साबणाचा चुरा (पावडर) यांना पर्याय
रिठा पावडर

३ ऊ ५ अ. रिठा : ‘रिठे कडक उन्हात वाळवावेत. काही वेळा ते वाळल्यावर फुटतात आणि त्यांतील बिया आपोआप बाहेर येतात. बिया आपोआप बाहेर न आल्यास वाळलेले रिठे खलबत्त्यात हळूवारपणे कुटून त्यांतील बिया बाजूला काढाव्यात. टरफले खलबत्त्यात बारीक करून त्यांची मिश्रक (मिक्सर) किंवा जाते यांच्या साहाय्याने पूड करावी. ही पूड साबण म्हणून वापरतांना ती केवळ ओलसर होईल, एवढेच पाणी त्यावर घालावे. ओलसर झालेली पूड २० ते २५ मिनिटे तशीच भांड्यात ठेवावी. त्यानंतर ती साबणाप्रमाणे ओल्या कपड्यांवर चोळून तिचा वापर कपडे धुण्यासाठी करावा.

३ ऊ ५ आ. काळी माती : या मातीने कपडे धुतांना ती साबणाप्रमाणे ओल्या कपड्यांवर चोळावी आणि ते कपडे वहात्या पाण्यात धुवावेत. (कपडे धुण्यासाठी तांबडी माती वापरू नये; कारण कपड्यांवर तिचे डाग पडतात.)’

– श्री. अविनाश जाधव (मे २०२०)

३ ऊ ५ इ. केळीच्या पानांच्या दांड्यांची राख : ‘केळीच्या पानांचे दांडे (ताटोळे) वाळवावेत. नंतर ते जाळून त्याची राख करावी. या राखेत क्षार असल्यामुळे ती राख साबणाप्रमाणे ओल्या कपड्यांवर चोळून कपडे धुता येतात.’ [संदर्भग्रंथ : ‘व्यापारोपयोगी वनस्पतीवर्णन (भाग १)’, लेखक – गणेश रंगनाथ दिघे, वर्ष १९१३]

३ ए ६. भांडी घासण्याचा साबण, साबणाचा चुरा इत्यादींना पर्याय

३ ऊ ६ अ. चुलीतील राख : ‘चुलीतील राख बाहेर काढून ती थंड झाल्यावर तिचा वापर भांडी घासण्यासाठी करावा.

३ ऊ ६ आ. माती : राख उपलब्ध नसल्यास कोणत्याही मातीने (उदा. काळ्या मातीने, तांबड्या मातीने) भांडी घासावीत. मातीत दगड असल्यास भांड्यांना चरे पडू शकतात. त्यामुळे भांडी घासण्यासाठीची माती चाळून घ्यावी.

३ ऊ ७. हात धुण्यासाठी लागणारी साबणवडी किंवा द्रवसाबण यांना पर्याय

३ ऊ ७ अ. चुलीतील राख : चुलीतील थंड झालेली राख हातांना लावून हात धुवावेत.

३ ऊ ७ आ. माती : कोणत्याही प्रकारची माती हातांना लावून हात धुवावेत.’

– श्री. अविनाश जाधव (मे २०२०)

३ ऊ ८. काड्यापेटी किंवा ‘प्रज्वलक’ (लायटर) यांना पर्याय
बहिर्गोल भिंग

३ ऊ ८ अ. सूर्यप्रकाश असतांना अग्नी पेटवण्यासाठी बहिर्गोल भिंगाचा वापर करणे : सूर्यप्रकाश असतांना अग्नी पेटवण्यासाठी बहिर्गोल भिंग (Convex lens किंवा Magnifying lens) वापरता येते. हे भिंग प्रयोगशाळेच्या वस्तू मिळतात, त्या दुकानांमध्ये मिळू शकतेे. बहिर्गोल भिंगातून केंद्रीभूत होणारे सूर्यकिरण कापूस, नारळाचा काथ्या, वाळलेले गवत, वाळलेली पाने किंवा कागदाचे कपटे यांवर साधारणपणे १ ते ५ मिनिटे (हा कालावधी सूर्यकिरणांच्या तीव्रतेवर अवलंबून असतो.) स्थिर केल्यास आरंभी धूर येतो आणि मग अग्नी प्रज्वलित होतो.

३ ऊ ८ आ. चुलीतील निखारे धुमसत ठेवणे

१. ‘चुलीवरील स्वयंपाक इत्यादी झाल्यावर चुलीतील निखार्‍यांवर थोडीशी राख टाकावी. त्यामुळे चुलीतील निखारे पूर्णपणे न विझता धुमसत रहातात. त्याच निखार्‍यांवर ३ – ४ घंट्यांनी कागद किंवा वाळलेली पाने घालून फुंकणीने फुंकर मारून अग्नी पुन्हा प्रज्वलित करावा.’ – श्री. अविनाश जाधव (मे २०२०)

२. प्रतिदिन ताजे शेण उपलब्ध असल्यास २ चुली करून निखारे धुमसत ठेवण्याची पद्धत : ‘२ चुली बाजूबाजूला मांडाव्यात. चुलींखालील भूमीत एकेक लहान खड्डा करावा. (चूल पेटवण्याची पद्धत समजण्यास सोपी जावी; म्हणून पहिल्या चुलीला चूल ‘१’, तर दुसर्‍या चुलीला चूल ‘२’ म्हणू.)

दिवस १ : चूल ‘१’ पेटवावी. चूल ‘२’च्या खड्ड्यात एक शेणाचा गोळा ठेवून त्यावर थोडी राख घालावी.
(खड्ड्यातील माती, शेणावर घातलेली राख आणि बाजूच्या चुलीतील अग्नीची उष्णता यांमुळे शेणाच्या गोळ्यातील पाणी शोषले जाते.)

दिवस २ : चूल ‘२’ पेटवावी. चूल ‘१’मधील राख बाहेर काढून त्या चुलीतील खड्ड्यात शेणाचा गोळा ठेवून त्यावर राख घालावी.
(चूल ‘२’मध्ये आदल्या दिवशी ठेवलेला शेणाचा गोळा आता बर्‍यापैकी वाळत आलेला असतो. या चुलीत दिवसभर विस्तव झाल्यामुळे त्या वाळलेल्या शेणाच्या गोळ्याचा निखारा बनतो.)

दिवस ३ : चूल ‘२’च्या खड्ड्यातील शेणाच्या निखार्‍याच्या साहाय्याने चूल ‘१’ पेटवावी आणि चूल ‘२’च्या खड्ड्यात शेणाचा गोळा ठेवावा.

दिवस ४ : चूल ‘१’ च्या खड्ड्यातील शेणाच्या निखार्‍याच्या साहाय्यानेे चूल ‘२’ पेटवावी आणि चूल ‘१’च्या खड्ड्यात शेणाचा गोळा ठेवावा.
अशा प्रकारे आलटून पालटून चुली वापराव्यात आणि जी चूल वापरणार नाही, त्या चुलीच्या खड्ड्यात शेणाचा गोळा ठेवावा.’

– श्री. विवेक नाफडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (मे २०२०)

गारगोटी

३ ऊ ८ इ. गारगोट्यांच्या साहाय्याने अग्नी प्रज्वलित करणे : ‘लिंबाएवढ्या आकाराच्या २ गारगोट्या एकमेकांवर घासून कापसावर ठिणग्या पाडाव्यात. यामुळे कापूस पेटतो.’ – श्री. कोंडिबा जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१.२०१९)

३ ऊ ९. मिठाला पर्याय

‘केळीची वाळलेली सोपटे जाळून बनलेल्या राखेत क्षार असतात. बंगालमध्ये कित्येक निर्धन (गरीब) लोक मिठाला पर्याय म्हणून या राखेचा उपयोग करतात.’ [संदर्भग्रंथ : ‘व्यापारोपयोगी वनस्पतीवर्णन (भाग १)’, लेखक – गणेश रंगनाथ दिघे, वर्ष १९१३]

३ ऊ १०. जेवणाची ताटे आणि वाट्या यांना पर्याय

जेवणासाठी केळीची / चवईची (रानकेळीची) पाने वापरावीत, तसेच वडाच्या पानांपासून बनवलेल्या पत्रावळी आणि द्रोण यांचाही उपयोग करावा.

३ ऊ ११. डासांना पळवून लावणार्‍या बाजारपेठेतील उदबत्त्या, द्रावण (लिक्विड) इत्यादींना पर्याय३ ऊ ११ अ. ‘डास प्रतिबंधक कांडी’ घरी बनवणे

‘गायीचे अनुमाने एक किलो ताजे शेण घ्यावे. अनुमाने १ मूठ तमालपत्रे, २ मुठी कडूनिंबाची पाने, अर्धी मूठ पुदिना, अर्धी मूठ तुळशीची पाने एकत्र करून बारीक वाटून घ्यावीत. या वाटलेल्या मिश्रणात २ चहाचे चमचे (टीस्पून) कडूनिंबाचे तेल आणि अर्धा चमचा कापराची पूड घालून हे मिश्रण शेणात नीट मिसळून एकजीव करावे. या मिश्रणाला हाताने धुपाच्या कांडीसारखा आकार देऊन त्या कांड्या सुकवून ठेवाव्यात. आवश्यकतेप्रमाणे या कांड्या धुपाच्या कांडीप्रमाणे पेटवून खोलीत लावाव्यात. कांडीतून येणार्‍या धुरामुळे डास निघून जातात.

३ ऊ ११ आ. अन्य पर्याय

१. खोलीतील डास पळवून लावण्यासाठी –

अ. ‘मॅट’ (डासप्रतिबंधक कागदी वडी) गरम करण्याच्या यंत्रामध्ये ‘मॅट’ऐवजी लसणाची पाकळी ठेवून यंत्र चालू करावे. एक पाकळी १ – २ दिवस वापरता येते.

आ. कडूनिंब तेल आणि खोबरेल तेल सम प्रमाणात घेऊन त्यांचे मिश्रण करून खोलीत त्याचा दिवा लावावा.

इ. कडूनिंबाची पाने निखार्‍यांवर टाकून धूर करावा. पाने वाळलेली असल्यास ती थोडीशी ओलसर करून निखार्‍यांवर टाकावीत; म्हणजे ती लगेच पेट घेणार नाहीत.

ई. संत्र्याची सुकवलेली मूठभर साले निखार्‍यांवर टाकून धूर करावा.

२. कडूनिंबाच्या पानांचा रस आणि पुदिना तेल सम प्रमाणात घेऊन त्यांचे केलेले मिश्रण शरिराच्या उघड्या भागाला लावावे. असे केल्यास डास जवळ येणार नाहीत.

३. डासांचे प्रमाण अल्प होण्यासाठी घराच्या आवारात झेंडूची रोपे लावावीत.’

– श्री. अविनाश जाधव (१६.६.२०२०)

– संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा !’

भाग ८ वाचण्यासाठी भेट द्या – आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ८

(प्रस्तुत लेखमालिकेचे सर्वाधिकार (कॉपीराईट) ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’कडे संरक्षित आहेत.)

Leave a Comment