आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ४

आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधना शिकवणारी सनातन संस्था !

अखिल मानवजातीला आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी सिद्धता
करण्याविषयी मार्गदर्शन करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

भाग ३ वाचण्यासाठी भेट द्या. आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ३

आपत्काळाविषयीच्या या लेखमालिकेतून आतापर्यंत अन्नावाचून उपासमार न होण्यासाठी काय करायला हवे, तसेच अन्नधान्याची लागवड, गोपालन इत्यादी विषय पाहिले. मनुष्य पाण्यावाचून जगू शकत नाही आणि तो विजेवाचून जीवन जगण्याची कल्पना करू शकत नाही. यासाठी पाण्याची सोय करणे, पाण्याची साठवणूक आणि शुद्धीकरण यांच्या पद्धती, तसेच विजेला असणारे पर्याय यांविषयीची माहिती खालील लेखात दिली आहे.

 

३. आपत्काळाच्या दृष्टीने दैनंदिन (शारीरिक) स्तरावर करायच्या विविध सिद्धता !

३ आ. पाण्यावाचून हाल होऊ नयेत, यासाठी हे करावे !

३ आ १. आपत्काळात पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी विहीर किंवा आड (लहान विहीर) आताच खोदून घेणे आणि हे शक्य नसल्यास कूपनलिका (बोअर वेल) खोदून घेणे
विहीर

काही गावे, नगरे आणि महानगरे यांना पंचायत, नगरपालिका आदींकडून धरणातील वा तलावातील पाणी नळाद्वारे पुरवले जाते. आपत्काळात अनेक दिवस वीज नसणे, अतीवृष्टीमुळे धरण फुटणे, तलावाच्या क्षेत्रात पुरेसा पाऊस न पडणे आदी कारणांमुळे नळाद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा बंद होऊ शकतो. अशा परिस्थितीत शासनाकडून काही वेळा ‘टँकर’द्वारे पाणीपुरवठा केला जातो; पण आपत्काळात इंधनाच्या अभावी ‘टँकर’ची वाहतूकही ठप्प होऊ शकते. दुष्काळात गावाजवळून वहाणारी नदीही आटण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या विविध समस्या लक्षात घेऊन जेथे पाणी लागू शकते, अशा ठिकाणी घराजवळ विहीर किंवा आड (लहान विहीर) आणि हे शक्य नसेल, तर कूपनलिका आताच खोदून घ्यावी. कूपनलिकेपेक्षा विहीर खोदणे अधिक योग्य आहे; कारण आपत्काळात कूपनलिकेच्या दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग, यंत्रसुधारक (मेकॅनिक) इत्यादी मिळणे कठीण होते. विहीर किंवा कूपनलिका यांचे खोदकाम चालू करण्यापूर्वी ‘भूमीत पाणी लागण्या’विषयी जाणकाराला विचारावे. भूमीत पाणी लागणार असेल, तरच खोदकामाचा व्यय (खर्च) करावा.

विहीर किंवा कूपनलिका यांना भरपूर पाणी लागल्यास त्या पाण्याचा शेती, बागायत आदींसाठीही वापर करता येतो.

३ आ १ अ. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी विविध उपाययोजना करणे

पाऊस पुरेसा न पडणे, पाण्याचा उपसा अधिक होणे इत्यादी कारणांमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावते. पुढे दिलेले प्रयत्न करून ही पातळी वाढवण्याचा प्रयत्न केला, तर परिसरातील विहिरी, कूपनलिका इत्यादींच्या पाण्यात वाढ होऊ शकते. पुढे सांगितलेल्यापैकी ओढ्यांवर बंधारे बांधणे आणि नदीपात्र नांगरणे या कृती गावपातळीवर संघटितपणे कराव्यात, तसेच त्या करण्यापूर्वी शासनाची रीतसर अनुमती घ्यावी.

३ आ १ अ १. शासकीय योजनांचा लाभ घेणे

गावातील नागरिकांनी वैयक्तिकरित्या वा एकत्र येऊन अशा योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा, उदा. महाराष्ट्र शासन राज्यात राबवत असलेली ‘पाणी अडवा आणि पाणी जिरवा’ ही योजना.

३ आ १ अ २. ओढ्यांवर ठिकठिकाणी लहान लहान बंधारे बांधावेत !
लहान बंधारे
३ आ १ अ ३. गावाजवळून वहाणार्‍या नदीचे पात्र नांगरणे

‘प्रतिवर्षी पावसाळ्यात नदीत येणार्‍या गढूळ पाण्यातील सूक्ष्म कण (फाईन पार्टीकल्स) नदीपात्रातील वाळूत साचतात. असे वर्षानुवर्षे होत असल्याने त्यांचे थरावर थर बनतात आणि त्यामुळे नदीतून वहाणारे पाणी वाळूतून नदीपात्रात (भूमीत) फारसे जिरत नाही. नदीचे पाणी पात्रामध्ये न जिरल्याने नदीच्या परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी प्रतिवर्षी घटत जाते. यावर उपाययोजना म्हणून नदीचे पात्र नांगरण्याचा एक यशस्वी प्रयोग काही गावांमध्ये करण्यात आला. यासंबंधीची माहिती पुढे दिली आहे.

३ आ १ अ ३ अ. नदीपात्र नांगरून पाणी भूमीत जिरवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणारे गोमई नदीच्या काठावरील गावकरी !

वरीलप्रमाणे परिस्थिती डांबरखेडा, ता. शहादा, जिल्हा नंदुरबार, महाराष्ट्र या गावात होती. हे गाव गोमई नदीच्या काठावर आहे. या नदीला ४ ते ६ मास (महिने) पाणी असते. असे असूनही डांबरखेड्याच्या विहिरी आणि कूपनलिका यांच्या पाण्याची पातळी ५०० ते ७०० फूट खोल गेली होती. यावर मात करण्यासाठी तेथील गावकर्‍यांनी उन्हाळ्यात कोरडी पडलेली गोमई नदी ट्रॅक्टर, लाकडी नांगर, लोखंडी नांगर आदी साधनांनी साधारण एक किलोमीटर उभी-आडवी नांगरून काढली. त्यामुळे पावसाळ्यात नदीला पाणी आल्यावर ते मोठ्या प्रमाणात वाहून न जाता नदीपात्रात बर्‍यापैकी मुरले आणि अवघ्या २४ घंट्यांत परिसरातील विहिरी अन् कूपनलिका यांचा जलस्तर ५०० ते ७०० फूट खोलीवरून अवघ्या ९० फुटांवर आला !

खेतीया या मध्यप्रदेशातील शहरापर्यंतच्या अनेक गावांतील लोकांनीही नंतर आपापल्या गावांजवळून वहाणारी गोमई नदी नांगरली आणि पावसाळ्यात वाहून जाणारे नदीचे पाणी पात्रात जिरवले.’ (संदर्भ : ‘व्हॉटस्अ‍ॅप’वरील लिखाण)

३ आ १ आ. काही सूचना

१. विहीर किंवा कूपनलिका खोदण्याची एखाद्या कुटुंबाची आर्थिक क्षमता नसल्यास काही कुटुंबे एकत्र येऊनही हे करता येईल.

२. विहिरीवर हातरहाटही बसवून घ्यावा. हातरहाटाने पाणी काढण्याची सवय ठेवावी. ‘रहाटाची दोरी झिजल्यास ती पालटावी लागते’, हे लक्षात घेऊन रहाटासाठी अजून एखादी दोरी विकत घेऊन ठेवावी. शक्य असल्यास विहिरीवर सौरऊर्जेवर चालणारा पंपही बसवून घ्यावा. सौरपंप बसवला असला, तरी हातरहाटाची सोय करून घेणे टाळू नये; कारण दिवसभर ढगाळ वातावरण असल्यास त्या दिवशी सौरपंप निरुपयोगी ठरेल.

३. पूर्वी खोदून घेतलेल्या विहिरीचे पाणी पावसाळा चालू होईपर्यंत पुरत नसल्यास जाणकाराला विचारून विहिरीची खोली वाढवून घ्यावी, जेणेकरून पावसाळा चालू होईपर्यंत पाणी पुरू शकेल.

४. एखाद्याकडे पूर्वीपासूनच कूपनलिका असेल, तर त्याने कूपनलिकेवर विजेवर चालणार्‍या पंपाच्या जोडीला सौरपंप आणि हातपंपही बसवावा. नव्याने खोदलेल्या कूपनलिकेवरही ही सोय करून घ्यावी.

५. विहीर आणि कूपनलिका यांतील पाणीसाठा मानवी चुकांमुळे दूषित होणार नाही, याकडे लक्ष द्यावे.

३ आ २. आपत्काळात कुटुंबाला न्यूनतम (कमीतकमी) १० ते १५ दिवस पुरेल, एवढे पाणी साठवता येईल, अशी सोय करणे

आपत्काळात शासनाकडून होणारा पाणीपुरवठा अनियमित असणे, विहीर किंवा कूपनलिका यांवर बसवलेला विजेचा पंप बिघडणे इत्यादी शक्यतांचा विचार करून कुटुंबाला न्यूनतम १० ते १५ दिवस पुरेल, अशा स्वरूपाची पाणी-साठवणुकीची सोय करावी, उदा. पाण्याच्या टाक्या बसवाव्यात.

३ आ ३. विजेअभावी घरातील जलशुद्धीकरण-यंत्र (वॉटर प्युरिफायर) बंद पडण्याची शक्यता लक्षात घेऊन पुढील पर्यायांचा विचार करणे
३ आ ३ अ. ‘कँडल फिल्टर’ खरेदी करून ठेवणे
३ आ ३ आ. पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर करणे
तुरटी

हंड्यामधील किंवा मध्यम आकाराच्या पिंपामधील मातीमिश्रित (थोडेसे गढूळ) पाणी पिण्यासाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी वापरायची वेळ आली, तर पुढीलप्रमाणे तुरटीचा उपयोग करावा.

तुरटीचा साधारण ३ – ४ सें.मी. लांब-रुंद असलेला खडा (लिंबाएवढा खडा) स्वच्छ धुतलेल्या हाताने हंड्यातील किंवा पिंपातील पाण्याच्या वरच्या भागात घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने २ – ३ वेळा आणि त्यानंतर विरुद्ध दिशेने २ – ३ वेळा फिरवावा. असे केल्याने पाण्यातील माती साधारणपणे ३ – ४ घंट्यांत (तासांत) तळाशी बसू लागते. पाणी पूर्णपणे स्वच्छ होण्यास एक दिवस लागतो. पाणी स्वच्छ होईपर्यंत ते हलवू नये. पाणी मध्ये मध्ये हलवल्यास पाण्यात तळाशी बसू लागलेली माती पुन्हा वर येते.

हंडा किंवा पिंप यांतील पाणी वापरायला घेण्याची वेळ आल्यावर वरचे स्वच्छ पाणी अलगद दुसर्‍या भांड्यामध्ये काढून घ्यावे. हंड्यातील किंवा पिंपातील खालचे गाळयुक्त पाणी झाडांना घालावे.

३ आ ३ इ. पाणी गाळून आणि उकळून घेणे

पिण्याचे पाणी पिंपात भरण्यापूर्वी पिंपावर एक जाड आणि स्वच्छ धुतलेले कापड पिंपाच्या वरच्या उघड्या भागावर बांधावे आणि त्यातून पाणी गाळून घ्यावे. हे पाणी स्वयंपाकासाठी वापरता येते. पाणी गाळण्यासाठी वापरलेले कापड नंतर स्वच्छ धुऊन वाळवून ठेवावे. ते कापड केवळ पाणी गाळण्यासाठीच वापरावे.

गाळून घेतलेल्या पाण्यापैकी पिण्यासाठी लागणारे पाणी उकळून घ्यावे.

३ आ ३ ई. पाणी शुद्ध करणारी यंत्रणा असलेली बाटली (इन्स्टंट प्युरिफायर बॉटल) वापरणे

या बाटलीत अशुद्ध पाणी भरल्यास काही वेळात ते शुद्ध होऊन पिण्यायोग्य होते. या बाटलीचा अधिक उपयोग आपत्काळात अचानक प्रवास करावा लागल्यास वा परगावी रहावे लागल्यास होईल. याचे कारण म्हणजे, तेव्हा प्रत्येक वेळी पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध होईलच असे नाही. पाणी शुद्ध करणार्‍या अशा प्रकारच्या बाटलीचे मूल्य साधारण रु. ५०० किंवा त्यापुढे आहे. या बाटल्या ‘ऑनलाईन’ विकत मिळतात.

३ आ ४. विजेअभावी पाणी थंड करणारी यंत्रे बंद पडण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणी थंड करण्याच्या काही सोप्या पर्यायांचा विचार करणे
३ आ ४ अ. मातीचा रांजण (मोठा माठ) किंवा माठ वापरणे
रांजण (मोठा माठ)

‘खेडेगावांतील काही घरांमध्ये पाणी थंड रहाण्यासाठी मातीचा रांजण वापरतात. रांजणाची सोय करण्यासाठी घरात एखादा खड्डा खणून त्यात रांजण थोडा तिरका पुरावा. रांजण भूमीच्या वर साधारण ‘फूट’भर राहील, असे पहावे. रांजण तिरका पुरल्याने आतील पाणी काढणे आणि रांजणाची स्वच्छता करणे सोपे जाते.

पाणी थंड रहाण्यासाठी माठही वापरू शकतो.

३ आ ४ आ. काचेची बाटली, कळशी किंवा पिंप यांच्याभोवती ओले कापड घट्ट गुंडाळणे

काचेची बाटली, कळशी किंवा पिंप यांत पाणी भरून त्यांच्याभोवती कापड ओले करून ते घट्ट गुंडाळावे. यामुळे साधारणपणे ३ – ४ घंट्यांत आतील पाणी थंड होते. कापड वाळल्यावर ते पुन्हा ओले करावे. आपल्याला जेवढा काळ पाणी थंड रहायला हवे आहे, तेवढा काळ कापड मध्ये मध्ये ओले करत रहावे.’

– (पू.) वैद्य विनय भावे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१२.२०१९)
३ आ ५. पाण्याच्या वापराविषयीच्या काही सूचना
३ आ ५ अ. पाण्याचा वापर काटकसरीने करणे

१. तोंड धुणे, स्नान करणे, लादी पुसणे, कपडे धुणे, वाहन धुणे यांसारखी कामे करतांना आवश्यक तेवढेच पाणी वापरण्याची सवय मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनी लावून घ्यावी.

२. घराभोवतालच्या बागेसाठी वा शेतीसाठी ठिबक सिंचन अन् तुषार सिंचन या पद्धतींचा वापर करावा.

३. उन्हाळ्याच्या दिवसांत बागेतील झाडांच्या बुंध्यांभोवती पालापाचोळा किंवा गवत यांचे आच्छादन (मल्चिंग) करावे. यामुळे झाडांना घातलेल्या पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होणे टळते आणि पाण्याची बचत होते, तसेच कालांतराने पालापाचोळा किंवा ते गवत कुजून झाडांना लाभदायी ठरते.

३ आ ५ आ. पावसाचे पाणी पिंपात साठवणे

पावसाळ्यात घराच्या छतावरून गळणार्‍या पाण्याखाली पिंप ठेवून त्यात पाणी गोळा करावे. या पाण्याचा वापर घरातील अनेक कामांसाठी करता येतो.

पाणी वाया घालवणे, हा अक्षम्य अपराध !

‘एका दर्शनार्थ्याने पेल्यातील १ घोट पाणी पिऊन उरलेले पाणी फेकून दिले. पाणी फेकण्याची शिक्षा म्हणून शेगावचे प.पू. गजानन महाराज त्याला म्हणाले, ‘‘तुझा पुढचा जन्म ज्या गावात पाणी नाही, अशा गावात होईल !’’ – (प.पू.) सुशीला आपटेआजी, गोवा (१८.११.२०१८)

३ इ. वीजपुरवठा खंडित झाल्यास या पर्यायांचा विचार करावा !

आपत्काळात विद्युत् मंडळाकडून होणारा वीजपुरवठा खंडित होण्याची दाट शक्यता असते. वादळासारख्या प्रसंगी तर वीजपुरवठा अनेक दिवस खंडित होतो. अशा स्थितीत विजेअभावी दिवे, पंखे इत्यादी विद्युत् उपकरणे बंद पडून अडचण होऊ नये, तसेच आपली कामेही ठप्प होऊ नयेत, यांसाठी पुढे दिलेल्या पर्यायांचा आताच विचार करावा. पर्याय निवडतांना ‘ज्याच्यामुळे आपल्याला अधिक कालावधीसाठी वीज उपलब्ध होऊ शकते’, असा पर्याय निवडणे हितावह आहे. या पर्यायांचा लाभ आपल्याला आपत्काळाच्या नंतरही, म्हणजे सदासाठीच होईल.

३ इ १ अ. घराच्या छतावर बसवण्यात येणार्‍या सौरऊर्जा यंत्रणेद्वारे (‘रूफ टॉप सोलर पॅनल’द्वारे) वीजनिर्मिती करणे
सौरऊर्जा यंत्र

स्थानिक विक्रेता सौरऊर्जेद्वारे (‘सोलर’द्वारे) वीजनिर्मिती करणारी यंत्रणा बसवून देतो. यासाठी विनाअडथळा सूर्यप्रकाश येणारी न्यूनतम १०० वर्गफुटांची जागा घराच्या छतावर असणे आवश्यक असते. या जागेमध्ये ‘सोलर पॅनल्स’ बसवली, तर दिवसभरात वीजनिर्मिती होत रहाते आणि त्याद्वारे विद्युत् घट भारित होतात. वीज मंडळाचा विद्युत् पुरवठा बंद असल्यास किंवा वीज मंडळाचा विद्युत् पुरवठा बंद करून या सौरऊर्जेवर घरातील दिवे, पंखे, शीतकपाट (फ्रीझ) आदी उपकरणे वापरता येतात. योग्य क्षमतेची सौरऊर्जा यंत्रणा असेल, तर ‘एल्ईडी बल्ब’, विजेर्‍या, विद्युत् घटाच्या साहाय्याने (‘बॅटरी’वर) चालणारी सायकल, विजेवर चालणारी दुचाकी आणि चारचाकी वाहन इत्यादीही भारित करता येतात.

कौलारू किंवा ‘स्लॅब’चे घर असणार्‍यांना सौरऊर्जा यंत्रणा बसवून घेता येते. सदनिकाधारकांनाही (‘फ्लॅट’ असलेल्यांनाही) एकत्रितपणे इमारतीच्या वरच्या छतावर (‘टेरेस’वर) अशी यंत्रणा बसवून घेता येऊ शकते. सौरऊर्जेद्वारे आपल्या आवश्यकतेपेक्षा अधिक वीज निर्माण होत असेल, तर ती वीज ‘विद्युत् वितरण कंपनी’ खरेदी करते. सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करण्याला प्रोत्साहन म्हणून शासनाकडून अनुदान (सबसिडी) मिळते. सौरऊर्जा यंत्रणेसाठी अनुदान आणि सवलती मिळणारी योजना घरे, दुकाने इत्यादींसाठीच उपलब्ध आहे. याविषयीची अधिक माहिती संबंधित विक्रेत्याकडून घ्यावी.

३ इ. १ आ . जनित्र (जनरेटर) वापरणे
जनरेटर
३ इ १ इ. हाताच्या साहाय्याने चालणारे जनित्र (हँड जनरेटर) वापरणे

भ्रमणभाषमधील विद्युत् घट भारित करण्याएवढी याची क्षमता असते.

३ इ १ ई. इंधनावर चालणारे जनित्र वापरणे

ही जनित्रे पेट्रोल, डिझेल किंवा गॅस यांवर चालतात. त्यांची क्षमता काही किलोवॅट (१ किलोवॅट = १,००० वॅट) वीजनिर्मिती करण्याएवढी असते.

३ इ १ उ. वीजपुरवठा विनाखंडित चालू ठेवणारी यंत्रणा [यु.पी.एस्. (अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय)] बसवून घेणे
यु.पी.एस्

विद्युत् मंडळाकडून होणारा वीजपुरवठा खंडित झाला, तर ही यंत्रणा लगेचच कार्यरत होते आणि या यंत्रणेतील विद्युत् घटांद्वारे वीजपुरवठा विनाखंडित चालू रहातो. विद्युत् मंडळाकडून होणारा वीजपुरवठा पूर्ववत झाल्यावर ही यंत्रणा विद्युत् घटांद्वारे विजेचा पुरवठा करण्याचे कार्य थांबवून मधल्या काळात अभारित (डिस्चार्ज) झालेले विद्युत् घट पुन्हा भारित (चार्ज) करण्याचे काम करते.

विद्युत् मंडळाकडून होणारा वीजपुरवठा काही घंट्यांसाठी खंडित झाला, तर ही यंत्रणा उपयुक्त ठरते.

घरगुती वापरासाठी उंच इमारतींवर भरपूर वारा येणार्‍या ठिकाणी पवनचक्की बसवून तिच्यापासून निर्माण होणारी वीज विद्युत् घटांमध्ये साठवता येते. ती वीज आवश्यकतेनुसार वापरता येते. मोठ्या प्रमाणावरील वीजनिर्मितीसाठी डोंगरावर किंवा मोकळ्या पठारावर पवनचक्क्या बसवाव्या लागतात.

सौरऊर्जेच्या तुलनेत पवनचक्कीद्वारे वीजनिर्मिती करण्याला पुष्कळ मर्यादा आहेत. त्यामुळे पवनचक्कीद्वारे वीजनिर्मिती करण्याविषयी तज्ञाचा समादेश (सल्ला) घ्यावा.

३ इ १ ऊ. विजेवर भारित होणारे ‘एल्ईडी बल्ब’, विजेरी (बॅटरी) इत्यादी उपकरणे वापरणे

पूर्ण भारित केलेला एक ‘एल्ईडी’ दिवा (बल्ब), विजेरी, दंडनलिका (ट्यूबलाईट) इत्यादी वस्तू काही घंटे प्रकाश देऊ शकतात.

३ इ १ ए. अन्य काही पारंपरिक पर्याय

वर उल्लेखलेल्या पर्यायांना मर्यादा आहेत, उदा. ढगाळ वातावरण असेल, तर सौरऊर्जा निर्माण होण्यात अडथळा येईल; आपत्काळात जनित्राला लागणार्‍या इंधनाचा तुटवडा निर्माण झाला, तर जनित्र काम करू शकणार नाही. अशा वेळी चिमणी (लहान आकाराचा कंदिलासारखा दिवा), कंदील, दिवटी (लहान मशाल) इत्यादी पारंपरिक पर्याय (वस्तू) आपल्याजवळ उपलब्ध असावेत. यांमुळे रात्रीच्या वेळी थोडा तरी प्रकाश मिळेल.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी दैनंदिन स्तरावर सिद्धता करा !’

भाग ६ वाचण्यासाठी भेट द्या. आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ५

(प्रस्तुत लेखमालिकेचे सर्वाधिकार (कॉपीराईट) ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’कडे संरक्षित आहेत.)

संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले

Leave a Comment