आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ५

आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधना शिकवणारी सनातन संस्था !

अखिल मानवजातीला आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी सिद्धता
करण्याविषयी मार्गदर्शन करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

भाग ४ वाचण्यासाठी भेट द्या. आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ४

आपत्काळाविषयीच्या या लेखमालिकेतून आतापर्यंत अन्नावाचून उपासमार न होण्यासाठी काय करायला हवे, तसेच अन्नधान्याची लागवड, गोपालन, पाण्याची सोय करणे, पाण्याची साठवणूक आणि शुद्धीकरण, तसेच विजेला असणारे पर्याय पाहिले. या लेखात प्रवास किंवा वाहतूक यांसाठी उपयुक्त साधने याविषयीची माहिती दिली आहे.

 

३. आपत्काळाच्या दृष्टीने शारीरिक स्तरावर करायच्या विविध सिद्धता !

३ उ. पेट्रोलसारखी इंधने किंवा वीज नसतांना प्रवासाची सोय होण्यासाठी करायच्या पूर्वसिद्धता

३ उ १. प्रवास किंवा वाहतूक यांसाठी उपयुक्त ठरणारी साधने खरेदी करणे

आपत्काळात पेट्रोल, डिझेल इत्यादी इंधनांचा तुटवडा भासेल. पुढे पुढे तर ती इंधने मिळणारही नाहीत. तेव्हा अशा इंधनांवर चालणारी दुचाकी आणि चारचाकी वाहने निरुपयोगी ठरतील. अशा वेळी प्रवास करणे, रुग्णाला वैद्याकडे नेणे, धान्य वा अवजड सामान आणणे इत्यादी कारणांसाठी उपयुक्त ठरणार्‍या साधनांचे विवेचन पुढे केले आहे.

३ उ १ अ. सायकल
सायकल

पुढे सायकलीचे विविध प्रकार दिले आहेत. आपली आवश्यकता आणि आर्थिक क्षमता, तसेच सायकलींचे लाभ लक्षात घेऊन आपल्याला सोयीस्कर असा पर्याय निवडावा.

३ उ १ अ १. साधी सायकल

यात ‘टायर-ट्यूब’ असलेली सायकल किंवा ‘ट्यूबलेस (ट्यूब नसलेला) टायर’ असलेली सायकल, असे २ प्रकार आहेत.

३ उ १ अ २. विद्युत् घटाच्या साहाय्याने (‘बॅटरी’वर) चालणारी सायकल
३ उ १ अ ३. सायकल-रिक्शा

आपत्काळात रुग्णाला वैद्याकडे नेणे, सामानाची वाहतूक करणे इत्यादींसाठी सायकल-रिक्शा उपयुक्त आहे.

३ उ १ आ. विद्युत् घटाच्या साहाय्याने (‘बॅटरी’वर) चालणारे दुचाकी आणि चारचाकी वाहन

आपत्काळात पेट्रोल, डिझेल इत्यादींचा तुटवडा असतांना अशा प्रकारचे वाहन उपयुक्त ठरत असले, तरी पेट्रोल, डिझेल इत्यादींवर चालणार्‍या वाहनाच्या तुलनेत या वाहनांच्या काही उणिवाही आहेत. याविषयी वाचक अधिक माहिती संबंधित विक्रेत्याकडून घेऊ शकतात.

३ उ १ इ. हातगाडी

रस्त्यावर भाजी, वडापाव इत्यादी विकणारे वापरत असलेल्या हातगाडीचा उपयोग आपत्काळात सामानाची वाहतूक करण्यासाठी होईल.

३ उ १ ई. बैलगाडी किंवा घोडागाडी

बैलगाडीसाठी बैल पाळावेत. गाय आणि बैल दोन्ही पाळले, तर गायीचे दूध मिळेल, तसेच गाय अन् बैल यांची उत्पत्तीही (पैदासही) होत राहील. बैल साधारणपणे ३ वर्षांचा झाल्यावर गाडीला जुंपता येतो. बैलगाडीप्रमाणेच घोडागाडीही खरेदी करू शकतो. केवळ घोडा खरेदी केला, तर तो प्रवासासाठी उपयुक्त ठरतो.

गाय, बैल आणि घोडा यांना चारा-पाणी देणे, त्यांच्या गोठ्या-तबेल्याची व्यवस्था करणे, त्यांची निगा राखणे, त्यांची आजारपणे अन् त्यांवरील औषधोपचार इत्यादी जाणकाराकडून समजून घ्यावे. घोड्यावरून प्रवास करणे आणि घोडागाडी वा बैलगाडी चालवणेही शिकून घ्यावे.

३ उ २. रात्रीच्या प्रवासाच्या वेळी विजेअभावी मार्गातील दिवे बंद असल्यास प्रकाश देणार्‍या साधनांचा उपयोग करणे
३ उ २ अ. वीज किंवा सौरऊर्जा यांवर भारित (चार्ज) करू शकतो, अशी विजेरी (बॅटरी)

आपत्काळाच्या दृष्टीने एक किंवा त्यापेक्षा अधिक विजेर्‍या खरेदी करून ठेवाव्यात. अशा विजेर्‍या वापरातही ठेवाव्यात.

३ उ २ आ. कंदील

कंदील पेटवण्यासाठी ‘रॉकेल’ वापरले जाते. रॉकेल उपलब्ध नसल्यास कंदीलात अन्य तेल (उदा. गोडे तेल, तीळ तेल) वापरू शकतो. कंदीलाव्यतिरिक्त ‘रॉकेल’वर पेटणारे विविध प्रकारचे दिवेही बाजारात मिळतात.

कंदील
३ उ २ इ. मशाल

‘मशाल सर्वत्र विकत मिळत नाही; पण ती सुतार किंवा जोडकाम करणारे (फॅब्रिकेटर) यांच्याकडून बनवून घेता येते. मशालीच्या वरच्या भागात मोठ्या वाटीप्रमाणे एक धातूचे (उदा. स्टीलचे, पितळेचे) भांडे असते. हे भांडे साधारण अर्धा मीटर लांबीच्या लाकडी दांड्याला जोडलेले असते. निरांजनात ज्याप्रमाणे कापसाची वात असते, त्याप्रमाणे मशालीमध्ये कापडी चिंध्यांची गुंडाळी वात म्हणून वापरली जाते.

मशाल

मशाल उभी धरून तिच्या वरच्या भागातील भांड्यात घट्ट बसेल एवढ्या आकाराची गुंडाळी ठेवावी आणि तिचे एक टोक प्रज्वलित करण्यासाठी बाहेर काढावे. गुंडाळी तेलाने पूर्ण भिजेपर्यंत भांड्यात तेल (उदा. करंज तेल, सरकीचे तेल) ओतावे. गुंडाळीचे बाहेर काढलेले टोक पेटवल्यावर तिच्यातील तेल संपेपर्यंत मशाल प्रज्वलित रहाते. मशालीतील तेल पूर्ण संपल्यास गुंडाळी जळून जाते. यासाठी तेल पूर्ण संपू न देता मशालीत आवश्यकतेनुसार मध्ये मध्ये तेल घालावे. मशाल सिद्ध करण्याच्या कृतीविषयी जाणकाराकडूनही शिकून घ्यावे.’ – श्री. अविनाश जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

मशालीच्या वाटीतील खिळ्याभोवती गुंडाळलेले कापड आणि ते पेटवण्यासाठी बाहेर काढलेले कापडाचे टोक
३ उ २ ई. चूड

‘नारळाच्या झावळीच्या पात्यांपासून ‘चूड’ बनवतात. चूड बनवण्यासाठी एका मुठीत मावतील एवढ्या झावळीच्या पात्या एकत्र करून त्या अन्य पात्यांच्या किंवा सुतळीच्या साहाय्याने मध्ये मध्ये घट्ट बांधाव्यात. चूड भरभर न जळता संथपणे जळावी, यासाठी ती पेटवण्यापूर्वी तिच्यावर पाण्याचा हलकासा शिडकावा करावा. झावळीच्या पात्यांमध्ये नैसर्गिकरित्या तेलाचा अंश असल्याने चूड पेटत रहाण्यासाठी निराळे इंधन लागत नाही. आपण आगपेटीची काडी जळतांना जशी तिरपी धरतो, त्याप्रमाणे ‘चूड नीट जळावी’, यासाठी ती जळतांना तिरपी धरावी. साधारण ३ फूट लांबीची चूड २० मिनिटे प्रकाश देते.’ – श्री. विवेक प्रभाकर नाफडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

चूड
३ उ ३. अनोळखी प्रदेशात प्रवास करतांना दिशा कळण्यासाठी होकायंत्र (दिशादर्शक, इंग्रजीमध्ये ‘कंपास’) वापरणे

आपत्काळात एका प्रदेशातून दुसर्‍या अनोळखी प्रदेशात स्थलांतर करावे लागू शकते. अशा वेळी वाटेत मार्गदर्शक फलक असतीलच, असे नाही आणि तेथे वाट सांगणारेही भेटतील, असे नाही. मार्गदर्शक फलक असले, तरी रात्रीच्या वेळी अंधार असल्यास ते दिसणार नाहीत. अशा वेळी प्रवास दिशाहीन होऊन आपण भरकटू नये; म्हणून होकायंत्र उपयुक्त ठरतेे. यासाठी भ्रमणभाषमध्ये होकायंत्राचे ‘अ‍ॅप’ ‘डाऊनलोड’ करून घ्यावे. ते पाहून दिशा कळते.

होकायंत्र

‘भ्रमणभाषमध्ये होकायंत्राचे ‘अ‍ॅप’ ‘डाऊनलोड’ केले असले, तरी भ्रमणभाष अभारित (डिस्चार्ज) होऊ शकतो’, हे लक्षात घेऊन होकायंत्रही जवळ ठेवावे. होकायंत्राला ‘सेल’ किंवा वीज यांची आवश्यकता नसते. त्यातील काटे नेहमी ‘उत्तर-दक्षिण दिशा’ दर्शवतात. त्यावरून इतर दिशा ठरवता येतात.’ – श्री. विजय पाटील, जळगाव

(संदर्भ : सनातनची आगामी ग्रंथमालिका ‘आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या  पूर्वसिद्धता’)

(प्रस्तुत लेखमालिकेचे सर्वाधिकार (कॉपीराईट) ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’कडे संरक्षित आहेत.)

भाग ६ वाचण्यासाठी भेट द्या. आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता भाग – ६