आधुनिक वैज्ञानिक युगात प्रार्थनेचे महत्त्व

१. परमेश्‍वरी शक्ती असल्याचे वैज्ञानिक निकषांवर पटवून द्यावे लागणे 

साधारण ३० वर्षांपूर्वी परमेश्‍वराचे अस्तित्व नाही, असे म्हणण्यासाठी धाडस लागत होते; परंतु आताच्या तंत्रयुगात परमेश्‍वराचे अस्तित्व आहे, असे म्हणण्यासाठी धाडस करावे लागते. वेगवेगळ्या वैज्ञानिक निकषांवर घासून, सिद्धान्त निर्माण करून, परमेश्‍वरी शक्ती आहे, हे पटवून द्यावे लागते.

२. अनाकलनीय गोष्टीसुद्धा विज्ञानाचाच अविभाज्य भाग होऊ लागणे

निवळ दृढ श्रद्धेने प्रार्थना करून मृत्यूच्या दारातून परत आलेले रुग्ण आणि त्यांच्या कथा ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. त्यांना वेगळे एवढेच आहे की, अशा अनाकलनीय गोष्टी विज्ञानाचाच भाग नव्हे, अविभाज्य भाग बनू पहात आहेत.

३. वैज्ञानिक प्रयोग

३ अ. रोगनिवारण होणे

वैद्यकीय प्रोफेसर डॉ. डेल मॅथ्यू म्हणतात, परमेश्‍वरच रोग ठीक करतो, असे आम्ही शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करून दाखवू शकत नाही; पण परमेश्‍वरावरील दृढ श्रद्धा त्याचा रोग ठीक होण्यासाठी निश्‍चितच उपयोगी पडते.

३ आ. रोगनिवारण होण्यामध्ये दृढ श्रद्धेचे महत्त्व

आजार निवारण होण्यासाठी दृढ श्रद्धा कशी उपयोगी पडते आणि त्यांचा एकमेकांशी संबंध कसा असतो, यावर सुमारे ३० प्रयोग करण्यात आले, त्यातील काही प्रयोगांचा सारांश येथे दिला आहे.
३ आ १. कॅलिफोर्नियातील ५ सहस्र २८६ रहिवाशांपैकी चर्चचे सभासद आणि चर्चचे नसलेले सभासद यांच्यात चर्चच्या सभासदांमध्ये, जरी ते धूम्रपान आणि मद्यपान करत होते, लठ्ठपणा होता, तरीसुद्धा मृत्यूचे प्रमाण अल्प आढळले.
३ आ २. श्रद्धा आणि प्रार्थना यांमुळे रुग्णांची प्रकृती सुधारणे : ८ पैकी ७ कॅन्सर (कर्करोग) रुग्णांच्या अभ्यासामध्ये श्रद्धा आणि प्रार्थना यांमुळे त्यांची प्रकृती सुधारत होती, तसेच ५ पैकी ४ उच्च रक्तदाबाचे रुग्ण, ६ पैकी ४ हृदयविकाराचे रुग्ण आणि ५ पैकी ४ सर्वसाधारण रुग्ण हे सर्वच श्रद्धा आणि प्रार्थना यांमुळे सुधारत होते.
३ आ ३. धर्मावर दृढ श्रद्धा असलेल्या लोकांमध्ये व्यसनाधीनता आणि आत्महत्या यांचे प्रमाण अत्यल्प असणेे : नुकत्याच एका संशोधनामुळे सिद्ध झाले आहे की, ज्या लोकांची आपापल्या धर्मावर दृढ श्रद्धा आहे, असे लोक नैराश्य, आत्महत्या, अतिरिक्त मद्यपान या गोष्टींकडे फारच अल्प प्रमाणात वळतात.
३ आ ४. धर्मावरील श्रद्धेमुळे जुनाट रोगांतून ठीक झालेले रुग्णांचे आरोग्य सुस्थितीत रहाणे : वैद्यकीय प्रोफेसर जेफ्रे एस्. लेविन यांनी केलेल्या संशोधनात्मक २०० प्रकरणांमध्ये प्रौढ कॅथॉलिक्स, जपानी बुद्धिस्ट आणि इस्राईल ज्यू हे सर्व वर्ष १९३० आणि १९८० मध्ये जुनाट रोगांना धैर्याने टक्कर देऊन ठीक झाले. त्यांचे आरोग्य सुस्थितीत राखण्यात धर्मावरील त्यांची दृढ श्रद्धाच कारणीभूत होती.

४. प्रार्थनेने होणारे लाभ

४ अ. मन प्रसन्न राहून नैराश्य दूर होणे

सत्संगात राहिल्याने आणि सात्त्विक अन् सत्प्रवृत्त लोकांशी संबंध आल्यामुळे मानसिक आधार मिळून मन प्रसन्न रहाते. त्याचा परिणाम प्रकृतीवर होऊन आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते. श्रद्धेमुळे माणूस आशावादी होतो. ताणतणावांचा निचरा होऊन नैराश्य दूर होते.

४ आ. मानसिक बळ मिळणे

डॉ. हॅरॉल्ड कोईनीग यांच्या म्हणण्याप्रमाणे श्रद्धा आणि प्रार्थना माणसाला दुःख, रुग्णस्थिती आणि कुठल्याही संकटाला सामोरे जाण्यास धैर्य अन् मानसिक बळ देतात.

४ इ. प्रकृती निरोगी राहून मनावरील ताण नाहीसा होणे

हॉर्वर्ड मेडिकल संस्थेचे डॉ. हर्बर्ट बेन्सन यांच्या म्हणण्याप्रमाणे रक्तदाब, चयापचय, हृदयाचे ठोके आणि श्‍वासोच्छ्वासाचे प्रमाण हे सर्व प्रार्थनेमुळे व्यवस्थित रहाते आणि प्रकृती निरोगी रहाण्यास साहाय्य होते. सामुदायिकरित्या प्रार्थना, जप आणि ध्यान केल्याने मनावरील ताण नाहीसा होतो. एकमेकांचा आधार आहे ही भावना असल्यामुळे मन सदैव प्रसन्न रहाते. अर्थात् देवावर किंवा परमेश्‍वरावर दृढ श्रद्धा असेल, तर जप किंवा प्रार्थना यांचा अधिकच उपयोग होतो.
आता रुग्णांसाठी दुसर्‍यांनी केलेल्या प्रार्थनेचा किती आणि कसा उपयोग होतो, ते पाहू.

५. प्रत्यक्ष प्रयोग 

५ अ. रुग्णासाठी अन्य व्यक्तींनी प्रार्थना केल्याने रुग्णाच्या त्रासाचे प्रमाण अल्प होऊन अँटीबायोटिक्स औषधाचे प्रमाणही अल्प होणे

डॉ. बेन्सन आणि त्यांचे सहकारी यांनी कॉरोनरी बायपास केलेल्या रुग्णांचा आणि डॉ. मॅथ्यूज यांनी हृमॅटॉईट ऑथ्रराईटस्च्या रुग्णांचा अभ्यास केला. डॉ. बायर्ड यांनी ३९३ हृदयविकारांच्या रुग्णांचा अभ्यास केला. एका गटातील रुग्णांसाठी त्या गावातील काही धार्मिक लोकांनी प्रार्थना केली आणि दुसर्‍या गटातील कुणीही प्रार्थना केली नाही. अर्थात दोन्ही गटांतील लोकांना या प्रयोगाविषयी काहीही कल्पना नव्हती. ज्या गटासाठी प्रार्थना केली होती, त्यांच्यात रोगाच्या त्रासाचे प्रमाण अल्प होऊन अँटीबायोटिक्स औषधाचे प्रमाणही अल्प झाले.

५ आ. व्रण लवकर सुकणे

प्रार्थनेमुळे दुसरी महत्त्वाची गोष्ट आढळली, ती म्हणजे प्रयोगशाळेत बॅक्टेरियांची वाढ लवकर झाली, तसेच उंदरांना झालेल्या जखमा लवकर ठीक झाल्या.
प्रेअर इज गुड मेडिसिन या पुस्तकाचे लेखक डॉ. लरी डोसे यांना प्रार्थनेच्या चांगल्या परिणामांची इतकी निश्‍चिती पटलेली आहे की, ते आपल्या वैद्यकीय व्यवसायाव्यतिरिक्त वैयक्तिकपणे आपल्या रुग्णांसाठी प्रार्थना करत असत.

६. अमेरिकनांचा अनुभव

६ अ. परमेश्‍वरावरील दृढ श्रद्धाच रोगनिवारणासाठी अधिकाधिक साहाय्य करणे

हॉर्वर्ड मेडिकल स्कूल आणि मेयो क्लिनिक या दोन्हीही संस्था अध्यात्म आणि आरोग्य यांवर परिषद, चर्चा, सभा, परिसंवाद आयोजित करत असतात. अमेरिकेतील निम्म्याहून अधिक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या विषयावर वेगवेगळे अभ्यासक्रम ठेवले आहेत. वर्ष १९९६ च्या अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ फिजिशिअनच्या सभेत २६९ डॉक्टरांपैकी ९९ टक्के डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे परमेश्‍वरावरील दृढ श्रद्धाच रोगनिवारणासाठी अधिकाधिक साहाय्य करते.
टाईम, सीएन्एन् आणि यूस्एवीकएन्ड यांनी केलेल्या पाहणीप्रमाणे ८० टक्के अमेरिकन जनता श्रद्धावादी आणि प्रार्थनेवर विश्‍वास ठेवणारी आहे.

६ आ. वैद्यकीय व्यवसाय दिवसेंदिवस मनुष्याच्या मनापासून दूर आणि केवळ शरिरापुरता यांत्रिक झाला असल्याने मनावरील व्रण न दिसणे अन् त्यासाठी परमेश्‍वरावर दृढ श्रद्धा आणि त्याची प्रार्थना हाच सर्वोत्तम उपाय असणे

डॉ. कोइनीग यांच्या म्हणण्याप्रमाणे श्रद्धा ही माणसाच्या शरिरापेक्षा त्याच्या मनावर नियंत्रण ठेवते. त्यामुळे माणसाचा स्वभाव सकारात्मक बनतो. वैद्यकीय व्यवसाय दिवसेंदिवस मनुष्याच्या मनापासून दूर आणि नुसताच शरिरापुरता यांत्रिक झाला आहे. वेगवेगळ्या यंत्रांमुळे शरिरातील त्रुटी आणि उणीवा दिसत असल्या, तरी मनाचे व्रण दिसत नाहीत. त्यासाठी परमेश्‍वरावर दृढ श्रद्धा ठेवणे अन् त्याची प्रार्थना करणे. हाच सर्वोत्तम उपाय होय.
(रीडर्स डायजेस्ट, नोव्हेंबर १९९९ मधील Faith is Power Medicine या लेखाच्या आधारे)
– सौ. अपर्णा भाटवडेकर (संदर्भ : मासिक संतकृपा, मार्च २००१)