जलप्रलयाच्या दृष्टीने भौतिक स्तरावर कोणती पूर्वसिद्धता करावी ? – भाग १

Article also available in :

पूरग्रस्त क्षेत्रातील नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती

पावसामुळे निर्माण झालेल्या एका ठिकाणच्या पूरस्थितीचे एक संग्रहित छायाचित्र

पावसाळ्यात अतीवृष्टी झाल्यास जलप्रलय (महापूर) होतो. अन्य ऋतूंमध्येही ढगफुटी झाल्यास जलप्रलय येऊ शकतो. वर्ष २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतील अनेक शहरे अतीवृष्टीमुळे जलमय झाली. बर्‍याच गावांना जोडणारे रस्ते खचल्याने वाहतूक ठप्प झाली. सहस्रो नागरिकांची घरे पाण्याखाली गेली. काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, त्यात माणसे आणि गुरे-ढोरे, गाड्याही वाहून गेल्या. पेट्रोल, डिझेल, दूध आदी जीवनावश्यक वस्तू मिळणे दुर्लभ झाले. अकस्मात उद्भवलेल्या या नैसर्गिक आपत्तीने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले.

‘भविष्यात अशी स्थिती पुन्हा कधी उद्भवू शकेल ?’, हे सांगता येत नाही. त्यामुळे ‘पूरग्रस्त क्षेत्रांतील नागरिकांनी कशा प्रकारे पूर्वसिद्धता करावी ?’, या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे पुढे दिली आहेत.

 

१. पूरग्रस्त क्षेत्रात नवीन घराचे बांधकाम करत असल्यास काय करावे ?

१ अ. नवीन घर पूरग्रस्त क्षेत्रात बांधू नये

नवीन घर बांधणार असल्यास ते पूरग्रस्त क्षेत्रात बांधण्याचा विचार करू नये.

१ आ. ‘पूरग्रस्त क्षेत्रात घर बांधण्यापूर्वी ‘किती उंचीवर घर बांधावे ?’, याविषयी बांधकाम तज्ञांचे मार्गदर्शन घेणे

काही कारणांमुळे पूरग्रस्त क्षेत्रात नवीन घर बांधावे लागत असल्यास ‘तेथे किती मीटर उंचीवर पाणी येते ?’, हे स्थानिक बांधकाम विभागाला विचारावे, तसेच ‘किती मीटर उंचीवर घर बांधायला हवे ?’, या संदर्भात अनुभवी बांधकाम तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

१ इ. मातीची किंवा कच्च्या विटांची नव्हे, तर ‘स्लॅब’ आणि सिमेंटचे ‘कॉलम, बीम’ असलेली घरे सुरक्षित !

पूरग्रस्त क्षेत्रात मातीची, तसेच कच्च्या विटांची घरे अधिक काळ तग धरू शकत नाहीत. मातीची घरे पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे सहज पडतात, तर कच्च्या विटा पाण्यात विरघळून जाण्याची शक्यता असते. मुसळधार पावसामुळे घरावरील पत्रे, कौले आदी उडून जातात. त्यामुळे पूरग्रस्त क्षेत्रात दगडी, तसेच ‘स्लॅब’ आणि सिमेंटचे ‘कॉलम’ (सिमेंटचे खांब) – ‘बीम’ असलेली मजबूत घरे बांधावीत. या घराच्या भिंती मातीऐवजी सिमेंट आणि वाळू यांच्या असाव्यात.

१ ई. घर बांधतांना पुराचे पाणी घरात आल्यास ‘ते बाहेर जाऊ शकेल’, अशा
पद्धतीने उताराची (‘स्लोप’ची) रचना करून ते बांधावे. यासाठी बांधकाम तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.

 

२. वास्तूच्या संदर्भातील सूत्रे

२ अ. विमा उतरवणे

वास्तू (घर) पूररेषा क्षेत्रात असेल, तर ‘भविष्यात महापुराचे प्रसंग येऊ शकतात’, हे लक्षात घेऊन ‘वास्तू, वाहने, पिके, तसेच अन्य साहित्य यांचा विमा उतरवायचा का ?’, याचा निर्णय घ्यावा.

२ आ. भिंतींना ओल आल्यास ‘वॉटरप्रूफिंग’ करणे

घरातील भिंतींना ओल येत असल्यास पावसाळ्यापूर्वी ‘वॉटरप्रूफिंग’ करावे. भिंतींना मोठ्या भेगा पडल्या असल्यास ते धोकादायक ठरू शकते. त्यामुळे त्वरित बांधकाम तज्ञांना दाखवून घ्यावे.

२ इ. लाकडी ‘फर्निचर’ला ‘वॉटरप्रूफ कोटिंग’ करणे

‘प्लायवूड’ किंवा ‘भूसा प्लाय’ यांपासून बनवलेले ‘फर्निचर’ पाणी लागून खराब होते. त्यामुळे त्याऐवजी लाकडी किंवा लोखंडी फर्निचर (टेबल, सोफा, पलंग आदी) यांचा विचार करावा. लाकडी फर्निचरला ‘वॉटरप्रूफ कोटिंग’ केल्यास ते अधिक काळ पाण्यात राहिले, तरी खराब होणार नाही.

२ ई. घरातील विद्युत् जोडण्या (‘इलेक्ट्रिक पॅनेल’) शक्य तितक्या उंचीवर ठेवाव्यात.

२ उ. ‘विजेचा तुटवडा भासू नये’, यासाठी काय करावे ?

पावसाळ्यात अनिश्‍चित कालावधीसाठी विद्युत् पुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे घरात काड्यापेट्या, पणत्या, मेणबत्त्या, विजेर्‍या (टॉर्च), कंदील, चिमणी, रॉकेल, तेल आदींची व्यवस्था करावी. ‘टॉर्च’मध्ये घालण्यासाठी अतिरिक्त ‘सेल’चीही उपलब्धता करून ठेवावी. हे सर्व ‘वॉटरप्रूफ’ पाऊच किंवा बॅग यांमध्ये ठेवल्यास पाण्याने भिजणार नाहीत.

२ ऊ. खिडक्या आणि दारे यांची दुरुस्ती करून घ्यावी

पूरस्थितीत चोरीच्या घटना घडत असल्याने ‘घराच्या खिडक्या आणि दारे व्यवस्थित बंद होतात ना ?’, तसेच ‘त्यांना सुरक्षित जाळ्या आहेत ना ?’, याची निश्‍चिती करावी. खिडक्या आणि दारे व्यवस्थित बंद होत नसल्यास त्यांची दुरुस्ती करून घ्यावी.

 

३. महत्त्वाची कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित रहाण्यासाठी काय करावे ?

३ अ. ‘डिजिलॉकर’ अ‍ॅपचा वापर करणे

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आय.टी. मंत्रालयाने चालू केलेल्या ‘डिजिलॉकर’ या ‘अ‍ॅप्लिकेशन’चा वापर करावा. (https://digilocker.gov.in/ या संकेतस्थळावर याविषयी माहिती उपलब्ध आहे.) इंटरनेटची सुविधा असलेल्या भ्रमणभाषमध्ये हे ‘अ‍ॅप्लिकेशन’ स्थापित (‘इन्स्टॉल’) करून त्यामध्ये आपल्या आधारकार्डाचा क्रमांक लिहावा. ‘अ‍ॅप’वर आपला आधार कार्डाचा क्रमांक घातल्यानंतर आधारकार्डशी संलग्न (लिंक) असलेली सर्व शासकीय कागदपत्रे (उदा. वाहन-परवाना, ‘इन्शुरन्स पॉलिसी’, ‘टी.डी.एस्. सर्टिफिकेट’, भाडे करारपत्र, घर खरेदी व्यवहार) ‘डाऊनलोड’ करता येतात. ‘डाऊनलोड’ केलेली ही कागदपत्रे ‘अ‍ॅप’वर नेहमीसाठी सुरक्षित रहातात. ‘अ‍ॅप’ आपल्या भ्रमणभाषवर अगोदरच स्थापित करून त्यावरील कागदपत्रे ‘डाऊनलोड’ केली असल्यास आपत्कालीन स्थितीत कागदपत्रे सहज उपलब्ध होऊ शकतात.

३ आ. रोख रक्कम, मौल्यवान वस्तू, दागिने, महत्त्वाची
कागदपत्रे आदी ठेवण्यासाठी शक्यतो पूरग्रस्त क्षेत्रातील अधिकोष निवडू नये.

३ इ. महत्त्वाच्या कागदपत्रांच्या साक्षांकित (अ‍ॅटेस्टेड) आणि छायांकित प्रती सुरक्षित ठेवणे

१. महत्त्वाची मूळ (ओरिजिनल) कागदपत्रे (उदा. शिधापत्रिका, आधारकार्ड, बँकेचे पासबूक, घराशी संबंधित कागदपत्रे) आणि त्यांच्या ५ साक्षांकित (अ‍ॅटेस्टेड) प्रती अधिकोषाचा ‘लॉकर’ असल्यास त्यामध्ये ठेवाव्यात.

२. महत्त्वाच्या कागदपत्रांच्या ५ साक्षांकित (अ‍ॅटेस्टेड) प्रती अन्य नातेवाईक किंवा परिचित यांच्या घरी ठेवता येतील.

३. यासह महत्त्वाच्या कागदपत्रांच्या ५ छायांकित (झेरॉक्स) प्रती प्लास्टिकच्या पिशवीत घालून एखाद्या लहान बॅगेत किंवा ‘ब्रीफकेस’मध्ये स्वतःसह ठेवाव्यात. घरातून अकस्मात् बाहेर पडावे लागल्यास ही बॅग समवेत ठेवता येईल.

अशा प्रकारे कागदपत्रांच्या प्रती ३ विविध ठिकाणी ठेवल्याने एका ठिकाणी ठेवलेली कागदपत्रे आपत्काळात जरी उपलब्ध झाली नाहीत, तरी अन्य ठिकाणी ठेवलेली कागदपत्रे आपल्याला मिळू शकतात.

३ ई. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवा !

आपत्काळात चोर्‍यांचे प्रमाण वाढते. त्यामुळे मौल्यवान वस्तू, दागिने अधिकोषात अथवा सुरक्षित ठिकाणी ठेवावेत. मौल्यवान वस्तू अगोदरच सुरक्षित ठिकाणी ठेवल्याने घराला कोणताही धोका पोचला, तरी वस्तू गहाळ होणार नाहीत.

३ उ. ‘अधिकोष अथवा ‘एटीएम्.’ या सुविधेच्या अभावी
गैरसोय होऊ नये’, यासाठी स्वतःजवळ रोख रक्कम बाळगावी !

आपद्स्थितीत दैनंदिन आवश्यकता पूर्ण करण्यासाठी रोख रक्कम तात्काळ उपलब्ध होऊ शकत नाही, तसेच जीवनावश्यक आणि अन्य वस्तूही चढ्या दराने विकल्या जातात. त्यामुळे न्यूनतम १५ दिवस ते १ मास पुरी पडेल, एवढी रोख रक्कम जवळ ठेवावी. ही रक्कम पाण्याने भिजू नये; म्हणून ती प्लास्टिकच्या लहान पिशवीत सुरक्षित ठिकाणी ठेवावी.’

(प्रस्तुत लेखमालिकेचे सर्वाधिकार (कॉपीराईट) ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’कडे संरक्षित आहेत.)

भाग २ वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://www.sanatan.org/mr/a/73874.html

 

वाचकांना आवाहन !

महापुराच्या दृष्टीने काही मार्गदर्शक सूत्रे येथे दिली आहे. या विषयाच्या अनुषंगाने वाचकांना काही सूत्रे सुचवायची असल्यास त्यांनी ती खालील संगणकीय किंवा टपाल पत्त्यावर पाठवावीत, ही विनंती ! यामुळे हा विषय समाजापुढे सखोलपणे मांडण्यास साहाय्य होईल.

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

Leave a Comment