जलप्रलयाच्या दृष्टीने भौतिक स्तरावर कोणती पूर्वसिद्धता करावी ? – भाग ३

Article also available in :

पूरग्रस्त क्षेत्रातील नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती

पावसाळ्यात अतीवृष्टी झाल्यास जलप्रलय (महापूर) येतो. अन्य ऋतूंमध्येही ढगफुटी झाल्यास जलप्रलय येऊ शकतो. वर्ष २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतील अनेक शहरे अतीवृष्टीमुळे जलमय झाली. बर्‍याच गावांना जोडणारे रस्ते खचल्याने वाहतूक ठप्प झाली. सहस्रो नागरिकांची घरे पाण्याखाली गेली. काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, त्यात माणसे आणि गुरे-ढोरे, गाड्याही वाहून गेल्या. पेट्रोल, डिझेल, दूध आदी जीवनावश्यक वस्तू मिळणे दुर्लभ झाले. अकस्मात् उद्भवलेल्या या नैसर्गिक आपत्तीने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले.

‘भविष्यात अशी स्थिती पुन्हा कधी उद्भवू शकेल ?’, हे सांगता येत नाही. त्यामुळे ‘पूरग्रस्त क्षेत्रांतील नागरिकांनी कशा प्रकारे पूर्वसिद्धता करावी ?’, या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे पुढे दिली आहेत.

या लेखाचा आधीचा भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

६. पुराच्या पाण्यातून बाहेर पडण्यासाठी करावयाची पूर्वसिद्धता

अ. काही वेळा पुराच्या पाण्याची पातळी ७ – ८ फूट किंवा त्यापेक्षाही अधिक असते. अशा वेळी व्यक्तीला पोहता येत नसल्यास तिचा जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे अधिकाधिक जणांनी पोहणे शिकून घ्यावे.

आ. पुराच्या पाण्यातून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी ‘लाईफ जॅकेट्स’चा (‘जीवरक्षक जाकिटा’चा) वापर करता येतो. यामुळे पाणी कितीही खोल असले, तरी व्यक्ती त्यात बुडत नाही. ‘लाईफ जॅकेट’ विकत घेऊन ठेवल्यास आपत्कालीन स्थितीत त्यांचा वापर करता येईल.

इ. वाहनाच्या ‘टायरच्या ट्यूब’मध्ये हवा भरून ती वापरल्यास बुडण्यापासून रक्षण होते. यामुळे घरात जितक्या व्यक्ती आहेत, तितक्या संख्येने ‘टायरच्या ट्यूब’ ठेवाव्यात.

 

७. अन्य महत्त्वाची सूत्रे

७ अ. जीवनावश्यक साहित्य एकत्रित ठेवणे

महापूर, भूकंप किंवा अन्य आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास तात्काळ घर सोडून अन्य ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागते. अशा वेळी घरातील महत्त्वाच्या वस्तू गोळा करण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे एखाद्या पिशवीत सर्व जीवनावश्यक वस्तू (कपडे, औषधे आदी) एकत्रित ठेवाव्या. पाण्यामुळे ओली होणार नाही, अशी पिशवी असावी.

७ आ. वस्तू सहज सापडतील अशा ठिकाणी ठेवाव्यात

चांगल्या गुणवत्तेचे ‘प्लास्टिक शीट’, तसेच मजबूत दोर्‍या घरी असाव्यात आणि ‘त्या सहज सापडतील’, अशा ठिकाणी ठेवाव्यात. जेणेकरून पूरस्थितीत वस्तू बांधण्यासाठी त्यांचा वापर होईल.

७ इ. महत्त्वाचे संपर्क क्रमांक आणि पत्ते वहीत नोंदवून ठेवणे

वीज गेल्याने भ्रमणभाष भारित (चार्ज) करण्यात अडचण येते. त्यामुळे एकमेकांना संपर्क करायला अडचणी येऊ नयेत, यासाठी आपले नातेवाईक, पोलीस ठाणे, अग्नीशमन दल, आपल्या जवळची रुग्णालये इत्यादी ठिकाणांचे दूरभाष क्रमांक आणि पत्ते एका नोंदवहीत नोंद करून स्वतःकडे ठेवावेत. यामुळे अन्य मार्गाने, उदा. दुसर्‍याच्या भ्रमणभाषवरून / दूरभाषवरून त्यांच्याशी संपर्क करता येईल.

 

८. पावसाळ्यापूर्वी करावयाची पूर्वसिद्धता

अ. मानवापेक्षा प्राण्यांमध्ये धोक्याची संवेदना जाणण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे घरातील पाळीव प्राण्यांच्या वागण्यात पालट जाणवत असेल, तर सावध व्हावे.

आ. प्राण्यांना (कुत्रे, गाय आदींना) सुरक्षित ठिकाणी हालवावे. ‘तेथे त्यांना चारा आणि पाणी उपलब्ध होईल’, असे पहावे. आपत्तींच्या प्रसंगी प्रशासन, तसेच स्वयंसेवी संघटना यांच्याकडून प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था केली असल्यास त्याचाही लाभ घेऊ शकतो. (वर्ष २०१९ मध्ये पश्‍चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरात मृत झालेल्या जनावरांचा ज्ञात आकडा ८ सहस्र होता; पण त्यापेक्षाही तो अधिक असू शकतो.)

इ. ‘पूरस्थिती आल्यास आपल्याला नातेवाईक, परिचित, स्नेही यांच्यापैकी कुणाकडे जाऊन रहाता येईल का ?’, असा विचार करून ठेवावा. जेणेकरून आयत्या वेळी शोधाशोध करण्यात वेळ जाणार नाही.

ई. आपत्कालीन स्थितीत घरातील वृद्ध व्यक्ती आणि लहान मुले यांना ‘काय काय लागू शकते ?’, याचा विचार करून त्यांची व्यवस्था करून ठेवावी.

उ. घराला तळघर असल्यास तेथील साहित्य वरच्या मजल्यांवर आणून ठेवावे. घरात पाणी आल्यावर खराब होतील, अशा वस्तू (उदा. गादी, जादाच्या उशा, मोठ्या रजया) असल्यास त्याही सुरक्षित ठिकाणी हालवाव्यात.

ऊ. घरातील लाकडी फर्निचर सुरक्षित ठिकाणी हालवावे. तसे शक्य नसल्यास ते घरातील कॉलम (सिमेंटचे खांब), खिडकी आदींना साखळीने बांधून ठेवावे. त्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहामुळे इतरत्र जाणार नाहीत.

ए. पुराच्या वेळी आपण अन्यत्र स्थलांतरित होणार असू, त्या वेळी आपल्या देवघरातील लहान आकाराच्या मूर्ती, तसेच देवतांची चित्रे समवेत न्यावीत. सर्व मूर्ती समवेत नेता येणे शक्य नसल्यास देवघरातील लहान आकाराच्या मूर्ती, देवतांचे टाक, शाळीग्राम आदी ‘स्टील’ किंवा ‘अ‍ॅल्युमिनियम’ यांच्या डब्यात कापड घालून त्यात ठेवता येतील. एकाच डब्यात एकापेक्षा अधिक मूर्ती ठेवल्या, तरी चालतील; परंतु दोन मूर्तींमध्ये मऊ कापड अथवा कापसाचे बोळे ठेवावेत. जेणेकरून मूर्ती एकमेकांवर आदळून मूर्तीला दुखापत होणार नाही. हे डबे शक्यतो आपल्या घरी (पूरग्रस्त क्षेत्रात) न ठेवता नातेवाईक किंवा स्नेही यांच्या घरी सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.

ऐ. घरातील जड मूर्ती अन्यत्र नेणे शक्य असल्यास त्या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. तसे शक्य नसल्यास मूर्ती घरातील उंच आणि सुरक्षित ठिकाणी किंवा वरचा माळा असल्यास तेथे ठेवाव्यात. मूर्ती ठेवण्यासाठी पुढीलप्रमाणे पेटी बनवता येईल.

पाण्याने खराब न होणार्‍या चांगल्या प्रतीच्या लाकडी फळ्यांची चौकोनी पेटी करावी. काही काळ तरी त्यात मूर्ती व्यवस्थित राहू शकतील. लाकडाची पेटी रंगवल्यास अथवा तिला ‘वॉटरप्रूफ कोटिंग’ केल्यास पेटीचे आयुष्य वाढू शकते. चांगल्या प्रतीचे लाकूड उपलब्ध नसल्यास फायबर किंवा अन्य तत्सम साहित्य वापरून पेटी बनवावी.

ओ. विजेवर चालणार्‍या उपकरणांमध्ये (शीतकपाट, धुलाई यंत्र, दूरचित्रवाणी संच, ‘ओव्हन’ आदींमध्ये) पाणी गेल्यास ती नादुरुस्त होऊ शकतात. त्यामुळे ती ‘प्लास्टिक’ने व्यवस्थित बांधून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. जड वस्तू आणि उपकरणे हालवणे शक्य नसल्यास तीही वरीलप्रमाणे पॅक करून साखळीने भिंतीला बांधून ठेवावी. जेणेकरून पाण्याची पातळी वाढली, तरी ती वाहून जाणार नाहीत.

औ. पूरस्थितीत विद्युत् पुरवठा अनेक घंट्यांसाठी, तर काही ठिकाणी अनेक दिवसांसाठीही खंडित होतो. अशा वेळी भ्रमणभाष ‘डिस्चार्ज’ झाल्यास संपर्क करण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे ‘पॉवर बँक’चा पर्याय वापरता येईल. घरात जुने भ्रमणभाष संच असल्यास ‘ते चालू स्थितीत आहेत का ?’, हे पहावे. आयत्या वेळी त्यांचा वापर करता येईल.

अं. छत्री, रेनकोट, तसेच पावसाळ्यात वापरायचे बूट असल्यास ते अगोदरच स्वच्छ करून ठेवावेत.

क. घराच्या आसपास पाण्याची डबकी निर्माण झाल्यास त्यात पाणी साठून डासांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्य असल्यास सभोवतालच्या परिसरात पाणी साठू देऊ नये, तसेच डासांपासून रक्षण होण्यासाठी उपाययोजना करून ठेवावी.

ख. प्रशासन आणि हवामान खाते यांच्याकडून वेळोवेळी प्रसारित होणार्‍या सूचनांचे पालन करावे. त्यांकडे दुर्लक्ष करू नये.

(प्रस्तुत लेखमालिकेचे सर्वाधिकार (कॉपीराईट) ‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’कडे संरक्षित आहेत.)

 

जनहो, आपत्काळाच्या दृष्टीने भौतिक स्तरावरील सिद्धता
करण्यासह साधनेला आरंभ करून आध्यात्मिक स्तरावरील सिद्धताही करा !


महापुराच्या दृष्टीने भौतिक स्तरावर कितीही पूर्वसिद्धता केली, तरी आपले रक्षण होण्यासाठी भगवंताची नित्य आराधना (साधना) करायला हवी. सर्वसामान्य व्यक्ती आपत्कालीन स्थितीत घाबरून जाते. साधना करणार्‍याच्या (साधकाच्या) मनात मात्र ‘या प्रसंगी देव माझे रक्षण करील’, अशी दृढ श्रद्धा असल्याने तो कठीण परिस्थितीतही स्थिर राहू शकतो. जीवनात घडणार्‍या दुःखद प्रसंगांना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती केवळ साधनेमुळेच प्राप्त होते.

जनहो, संभाव्य आपत्काळातील आपले जीवन सुसह्य होण्यासाठी साधनेला त्वरित आरंभ करा आणि आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सर्व स्तरांवर सिद्ध व्हा !

 

वाचकांना आवाहन !

महापुराच्या दृष्टीने काही मार्गदर्शक सूत्रे येथे दिली आहे. या विषयाच्या अनुषंगाने वाचकांना काही सूत्रे सुचवायची असल्यास त्यांनी ती खालील संगणकीय किंवा टपाल पत्त्यावर पाठवावीत, ही विनंती ! यामुळे हा विषय समाजापुढे सखोलपणे मांडण्यास साहाय्य होईल.

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment