नामजप करतांना मन एकाग्र होण्यासाठी वापरावयाच्या पद्धती

" जप करतांना मन एकाग्र झाल्यासच त्याचा लाभ होतो. नामजप करतांना आरंभी मन एकाग्र होणे कठीण जाते; कारण पंचज्ञानेंद्रियांकडून मनाकडे येणार्‍या विविध संवेदना आणि चित्ताकडून मनामध्ये येणारे विविध विचार आणि भावना यांमुळे मन एकाग्र होत नाही. यावर मात करण्यासाठी पुढील उपाय करता येतात.

टप्पा १

१ अ. पंचज्ञानेंद्रिये

१. नाक : नामजपाच्या ठिकाणी दुर्गंध नसावा. सुगंध असल्यास एकाग्रता व्हायला साहाय्य होते.

२. तोंड : नामजप करतांना काहीही खाऊ नये.

३. डोळे : डोळे बंद केल्यास बाह्य दृष्यांकडे लक्ष जाऊन मन विचलित होत नाही. डोळे उघडे ठेवल्यास लिहिलेला जप मोठ्याने वाचून करावा.

४. त्वचा : मला स्पर्श करू नका, असे इतरांना सांगता येते.

५. कान : बाहेरच्या आवाजांचा त्रास होणार नाही, असे स्थळ किंवा काळ निवडावा.

१ आ. पंचकर्मेंद्रिये

वाणी (वाक्), हात, पाय, गुद, जननेंद्रिय यांतील फक्त जीभ आणि हात-पाय यांचा एकाग्रता होण्यासाठी लाभ करून घेता येतो. गुद आणि जननेंद्रिय यांचा प्रत्यक्ष संबंध येत नाही.

१. जीभ : लिहिलेला नामजप वाचत वैखरीतून मोठ्याने नामजप करावा. यामुळे कानालाही नामजप ऐकू येत असल्यामुळे मन एकाग्र व्हायला साहाय्य होते.

१ अ. गती : जप जलद गतीने केल्यास मन जपावर केंद्रित होण्यास साहाय्य होते. पुढे मन जपावर केंद्रित होऊ लागले की, टप्प्याटप्प्याने गती कमी करावी. शेवटी श्‍वासोच्छ्वासाच्या गतीशी जपाची गती जोडावी. त्याहूनही गती कमी झाली, तर चांगलेच आहे.

१ अ. चाल : जपाला चाल हवी, चढ-उतार हवा, उदा. ॐ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ ॐ हा जप करतांना एकदा चढ्या पट्टीत, म्हणजे वरच्या स्वरात आणि दुसर्‍यांदा उतरत्या पट्टीत, म्हणजे खालच्या स्वरात करावा. नंतर असाच चढ्या आणि उतरत्या पट्टीत एक आड एक म्हणावा. त्यामुळे मन एकाग्र व्हायला साहाय्य होते.

२. हात आणि पाय : हालचाल न करता स्थिर बसावे.

टप्पा २

मन

या टप्प्याला जप मनात म्हणायचा असतो. हा जप भावपूर्ण आणि अनाहतचक्रावर पाच बोटांनी न्यास करून केल्यास मन एकाग्र होण्यास साहाय्य होते. "

– (प.पू.) डॉ. आठवले (३.५.२०१४)

Leave a Comment