सजीव आणि निर्जीव वस्तूंत स्वतःला पहाणारे, पूर्ण ब्रह्माशी एकरूप झालेले संत

हे मृत्यू, हे नश्वर शरीर हवे तर खुशाल घेऊन जा ! मला त्याची खंत नाही. मी कुठल्याही मूर्त-अमूर्त शरिराने कार्यरत राहू शकतो. या शीतल चंद्रकिरणांना धारण करून मी पृथ्वीवर संचार करीन, पर्वतावरून खळखळणाऱ्या झऱ्याचे, ओढ्या-नाल्याचे वस्त्र पांघरून दिव्य संचार करीन, समुद्राच्या लाटेच्या रूपाने मी नृत्य करीन. मंद वाऱ्याची झुळूक हीच माझी प्रसन्न धुंद पाऊले असतील…..

अशी ही माझी नित्य नूतन असंख्य रूपे जरा पहा ! त्या क्षितिजापलीकडच्या शिखरावरून मी उतरलो आणि मृतांना संजीवन दिले. झोपी गेलेल्यांना जागे करून अनेकांचे निराशेचे मुखवटे दूर सारले. अगणित दुःखितांचे अश्रू पुसले. सुंदर फुलांना, मधुर गायन करणाऱ्या पक्षांना मी न्याहाळले आणि त्यांचे सांत्वन केले. माझ्या स्पर्शाने सर्व विश्वाला पावन केले. मृत्यू, तूसुद्धा मला शोधू शकणार नाहीस; कारण मी इतस्तः सर्वत्र दिशा-दिशांतून संचार करतो आणि तरीसुद्धा मी कुठेच नाही.

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १६.१२.२०१०)

Leave a Comment