मनापासून विषयांचा त्याग केल्यासच प्रगती होणे

एकदा संत तुकारामांनी आपल्या पत्नीस बराच वैराग्यपर उपदेश केला आणि विषय कसे वाईट आहेत, हे पटवून दिले अन् विठोबाचे नामस्मरण करण्यास सांगितले. उपदेश ऐकून तिच्या मनात वैराग्य आले. दुसऱ्या दिवशी तिने स्नान करून देवपूजा केली आणि ब्राह्मणांस बोलावून सर्व घर लुटवले. घरात काही एक ठेवले नाही. दुपारच्या वेळी घरात अन्न नाही, असे पाहून ती विचारात पडली. आदल्या दिवशीचा एकादशीचा उपवास, त्यामुळे ती आणि मुले भुकेने व्याकुळ झाली. त्या संकटात जगत्जननी एका महारणीचे रूप घेऊन तुकारामांचे सत्त्व पहाण्यासाठी आली आणि म्हणाली, ‘मी तुमच्या गावची महारीण आहे. तुम्ही ब्राह्मणाकरवी घर लुटवल्याचे ऐकले. काही उरले असेल, तर मला द्या.’ ते ऐकून घरात जे एक लुगडे वाळत घातले होते, तेही तुकारामांनी महारणीला देऊन टाकले.

ही गोष्ट बायकोला समजली, त्या वेळी तिला फारच राग आला. संतापाच्या भरात ती विठ्ठलाच्या ज्या पायांच्या चिंतनाने इतका अनर्थ झाला, ते पाय फोडून टाकण्याकरता दगड घेऊन देवळाकडे निघाली. तुकारामही तिच्या पाठोपाठ धावले; परंतु ती दगड घेऊन देवळात येताच रुक्मिणीने गाभाऱ्याचे दार बंद केले. इकडे तुकारामांच्या मनात नानातर्हेचे तर्क येऊ लागले. ती पांडुरंगाच्या पायावर दगड मारणार, इतक्यात रुक्मिणीने तिला अडवले आणि सांगितले, “तुला संसारात जे जे उणे पडेल, ते ते मी तुला पुरवत जाईन.” मग तिने तिला लुगडे, चोळी घेऊन परतवले. ती आनंदाने घरी परतली. इकडे तुकाराम मनात म्हणाले, आपण एवढा बोध करूनही आपली बायको उतावीळ होऊन रुक्मिणीकडून साडीचोळी घेऊन आली. ते बायकोला म्हणाले, ‘तू परमार्थ दवडलास. दुधावरची साय खाल्ली, तर लोणी येणार कुठून ?’ ऋद्धीसिद्धी, संपत्ती यांचा मनापासून त्याग केल्यानेच भगवद्प्राप्ती होते. आणि पुन्हा तिच्याकडून सर्व घेऊन गोरगरिबांना वाटून टाकले.

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९१)

Leave a Comment