व्यष्टी आणि समष्टी साधनेतील भेद आणि समष्टी साधनेचे महत्त्व

१. ईश्‍वर सूक्ष्मातीसूक्ष्म आहे, तसाच सर्वव्यापीही आहे. त्यामुळे ईश्‍वरप्राप्तीचे, म्हणजे ईश्‍वराशी एकरूप होण्याचे सूक्ष्मातीसूक्ष्म होणे, म्हणजेच शून्यात जाणे किंवा सर्वव्यापी होणे, हे दोन मार्ग आहेत.
सूक्ष्मातीसूक्ष्म होणे हा मार्ग व्यष्टी साधना करणार्‍यांचा असतो, तर समष्टीशी एकरूप होण्यासाठी आपली व्यापकता वाढवणे, हा मार्ग समष्टी साधना करणार्‍यांचा असतो. व्यष्टी साधना करता करता पुढे शून्यात जाऊन ईश्‍वराशी एकरूप होता येते. समष्टी साधना करता करता व्यापकत्व येत जाते आणि शेवटी सर्वव्यापी ईश्‍वराशी एकरूप होता येते.

२. ईश्‍वर स्वतः एकाच वेळी सूक्ष्मातीसूक्ष्म आणि सर्वव्यापीही असल्याने साधकाच्या व्यष्टी किंवा समष्टी साधनामार्गानुसार तो त्याला तशा अनुभूती देतो. ईश्‍वराशी एकरूप होऊ इच्छिणार्‍या साधकानेही या दोन्ही अनुभूती घेतल्यास तो ईश्‍वराशी लवकर एकरूप होतो. यासाठी व्यष्टी साधना आणि समष्टी साधना या दोन्ही साधना करणे उपयुक्त ठरते.

३. व्यष्टी साधनेत ज्ञानमार्गातील साक्षीभाव आणि भक्तीयोगातील ईश्‍वरेच्छा हे शब्द उपयुक्त आहेत. समष्टी साधनेत मात्र व्यापकत्व येण्यासाठी कर्तव्यकर्म महत्त्वाचे ठरते.

४. व्यष्टी साधनेत जीव शरिराने किंवा मनाने सर्वांपासून दूर राहून एकटाच साधना करतो. त्यामुळे त्याला इतरांचे साहाय्य मिळत नाही; म्हणूनच साधकाने काही वर्षे ते शेकडो वर्षे तपश्‍चर्या केली, असे आपण वाचतो. याउलट समष्टी साधनेतील साधक इतरांसह साधना करत असल्याने साधना करतांना त्याच्या काही त्रुटी झाल्या, तर इतर त्याला साहाय्य करतात. त्यामुळे त्याची प्रगती जलद होते.

५. ईश्‍वर अनंत कोटी ब्रह्मांडांचे कार्य करतो, म्हणजे त्याच्यात किती समष्टी भाव आहे, हे लक्षात येते.

६. ऋषीमुनी हजारो वर्षे तपश्‍चर्या करायचे; पण समष्टीच्या हितासाठी यज्ञयाग करणे, अध्यात्म शिकवणे, इत्यादी करत. हेही व्यष्टी साधना करणार्‍यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

७. व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग, असा सिद्धांत असल्यामुळे काही जण व्यष्टी, तर काही जण समष्टी साधना करतात. असे असले, तरी व्यष्टी साधना करणार्‍यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, जलद आध्यात्मिक प्रगतीसाठी पुढे समष्टी साधना करायची आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नांची सुरूवात करणे आवश्यक असते.

वरील कारणांमुळे सनातन संस्थेमध्ये व्यष्टीसह समष्टी साधना शिकवण्यात येते. याची फलनिष्पत्ती म्हणून गेल्या २५ वर्षांत एकूण ६२१ साधकांनी ६० टक्के पातळीहून अधिक स्तर गाठला आहे, म्हणजे ते संत होण्याच्या मार्गावर आहेत, तर ४८ साधकांनी ७० टक्के पातळीहून अधिक स्तर गाठला आहे, म्हणजे ते संत झाले आहेत.
– (प.पू) डॉ. आठवले (३.१२.२०१४)

Leave a Comment