दया

१. व्याख्या

परे वा बन्धुवर्गे वा मित्रे द्वेष्टरि वा तथा ।

आपन्ने रक्षितव्यं तु दयैषा परिकीर्तिता ॥

– अत्रिसंहिता

अर्थ : आपले भाऊबंध किंवा ओळख नसलेले, मित्र किंवा शत्रू किंवा आपला मत्सर किंवा द्वेष करणाऱ्यांवर आपत्ती आल्यास त्यांचे रक्षण करून त्यांना संकट आणि दुःख यांपासून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या मनोवृत्तीला ‘दया’ म्हणतात.

भेद न करणे : दया चंद्राच्या शीतलतेप्रमाणे लहान-थोर, श्रेष्ठ-कनिष्ठ, असा भेद करत नाही.

२. महत्त्व

अ. तस्मात् सर्वेषु भूतेषु दयां कुरुत सौहृदम् ।

भावम् आसुरम् उन्मुच्य यया तुष्यत्यधोक्षजः ॥ – श्रीमद्भागवत, स्कन्ध ७, अध्याय ६, श्लोषक २४
अर्थ : (प्रल्हाद राक्षसांच्या मुलांना सांगतो), सर्व प्राणीमात्रांवर दया करा. त्यामुळे परमेश्वर प्रसन्न होतो.

आ. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतो, ‘जळत्या घरात अडकलेल्यांना सोडवण्यासाठी दयेमुळे जो आगीतही उडी घेतो, त्याचे चरण मी वंदितो. जगात दयाळू माणसे धन्य असतात’. – एकनाथी भागवत, अध्याय १७, ओवी १२७
३. उदाहरणे

३ अ. राजा रन्तिदेव : राजाला भगवंत प्रसन्न झाला आणि त्याने राजाला वर मागण्यास सांगितले. त्या वेळी रन्तिदेव म्हणाला, सर्व प्राण्यांच्या हृदयात मी रहावे आणि त्यांचे सर्व दुःख मी सहन करावे, म्हणजे कोणत्याही प्राण्याला दुःख होणार नाही. (क्रमश:)

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९८०)

Leave a Comment