दुसऱ्या कुणामुळे आपल्याला सुख-दुःख वाटणे, ही कुबुद्धी (चुकीचे) असून ‘मी करतो, मला येते’, असे वाटणे हा वृथा अभिमान असणे

१. ‘आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक बऱ्या-वाईट घटना आणि प्रसंग यांसाठी आपण इतरांना उत्तरदायी समजत असतो; परंतु ‘जे घडत असते, ते केवळ आपल्या प्राब्धानुसार घडत असते. आपल्याच कर्माचे ते फळ असते’, हे समजून घेतल्यास इतरांविषयी येणाऱ्या प्रतिक्रिया अल्प होऊ शकतात.

२. मनुष्य पराधीन (ईश्वराधीन) आहे. कर्मयोगातील प्रसिद्ध श्लोक, तरी दुसरे काय सांगतो ? पुढील श्लोकातून हे आपल्याला स्पष्ट होईल.

सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता, परो ददातीति कुबुद्धिरेषा ।
अहं करोमीति वृथाभिमानः स्वकर्मसूत्रग्रथितो हि लोकः ॥

– अध्यात्म रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ६, श्लोक ६

अर्थ : आपल्याला होणारे सुख किंवा दुःख यांचा कोणीही दाता नसून ते आपल्याच कर्माच फळ असते. ‘दुसऱ्यामुळे मला सुख किंवा दुःख मिळते’, असा विचार ही दुर्बुद्धी, अज्ञान आहे. ‘मी सर्व (चांगले) करतो’, असा अभिमान ठेवणेही व्यर्थ आहे; कारण सर्वजण स्वतःच्या कर्माची फळे भोगत असतात.

आपल्या जीवनात सुख-दुःख देणारा कुणीही नाही. दुसऱ्या कुणामुळे मला सुख-दुःख होते’, असे वाटत असेल, तर ती कुबुद्धी (चुकीचे) आहे. ‘मी करतो, मला येते’, असे वाटत असल्यास तोही वृथा अभिमान आहे.

सत्य हे आहे की, पूर्वजन्मी मीच केलेल्या पाप-पुण्याचे फळ या जन्मी एकामागून एक (ज्याप्रमाणे माळ तुटली की, सर्व मणी एकामागून एक बाहेर पडतात त्याप्रमाणे) भोगतो. मण्यांना मागे-पुढे करता येत नाही. त्यांना एकामागून एक यावे लागते. पाप-पुण्य या मण्यांची रचना ईश्वर करतो.’

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

Leave a Comment