परिस्थिती स्वीकारणे

‘परिस्थिती साधकाला घडवत असते. परिस्थिती स्वीकारली की, तो घडतो, म्हणजेच त्यातून त्याची साधना होते. स्वीकारले नाही, तर तो बिघडतो. म्हणजेच त्याच्या मनामध्ये विकल्प येऊन तो देवापासून दूर जातो.

१. निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारल्यास देवाची कृपा निश्‍चितच होते !

निर्माण झालेली परिस्थिती म्हणजे देवाने आपल्यासाठी दिलेला प्रसाद आहे. तो प्रसाद या भावाने ग्रहण केल्यास (म्हणजे निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारल्यास) देवाची कृपा निश्‍चितच होणार आहे.

२. परिस्थिती स्वीकारून ती हाताळणे महत्त्वाचे

नदीमध्ये पडल्यामुळे जीव कधीच जात नाही. जीव तेव्हाच जातो, जेव्हा व्यक्तीला पोहता येत नाही. त्याचप्रमाणे परिस्थिती कधीच समस्या बनत नाही. ती समस्या तेव्हाच बनते, जेव्हा आपल्याला परिस्थिती हाताळता येत नाही.

३. प्रसंग स्वीकारून त्यातून शिकणे

‘एखादी घटना किंवा प्रसंग माझ्याच संदर्भात का घडला ?’, असा विचार करणे अयोग्य आहे; कारण ‘असे घडण्यामागे काय कार्यकारणभाव आहे ?’ हे केवळ सर्वज्ञानी गुरुच जाणू शकतात. त्यापेक्षा ‘त्या प्रसंगातून मला देव काय शिकवत आहे ?’ याकडे लक्ष दिल्यास मन शांत होऊन साधनाही होईल.

४. ‘परिस्थिती पालटायला हवी’, अशी अपेक्षा नको !

‘परिस्थिती कधी पालटेल ?’ हे केवळ भगवंतच सांगू शकतो.

५. परिस्थितीला संधी समजून धैर्याने समोर गेल्यास साधना होते !

प्रसंग कितीही कठीण वाटला, तरी भगवंताचे साहाय्य घेतल्यास त्याला सहज सामोरे जाता येते.

६. घरी राहून होणारी साधना

घरी राहून सेवा करणारे बरेच साधक सांगतात की, घरातील अडचणींमुळे आम्हाला सेवेसाठी अधिक वेळ देता येत नाही. त्यामुळे साधना करण्यावर मर्यादा येतात. अशा वेळी घरी राहूनही साधक नामजप, भावजागृतीचे प्रयत्न, कृतीला भाव जोडणे, सूचनासत्र, सारणी लिखाण इत्यादी करून व्यष्टी साधना चांगली करू शकतात. असे झाल्यास देव त्यांच्या पुढील साधनेची काळजी घेणारच आहे.’

– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०१९)

Leave a Comment