सेवेत चुका झाल्यावर लक्षात ठेवायचे काही दृष्टीकोन !

अ. परात्पर गुरु डॉक्टर काही वेळा त्यांनी स्वतः केलेले लिखाण मला पडताळण्यासाठी देतात. मी त्यामध्ये काही लहानसहान सुचवले असले, तरी ते साधकांना सांगतात, ‘‘बरे झाले. आता लिखाण अजून परिपूर्ण झाले.’’ ‘सनातनचे कोणतेही कार्य परिपूर्ण व्हायला हवे’, ही त्यांच्यासारखी तळमळ आपणही ठेवली, तर दुसर्‍यांनी आपल्या सेवेत चुका दाखवल्यास आपल्याला वाईट वाटणार नाही.

आ. ‘चुकांतून देव आपल्याला शिकवून साधनेत पुढे नेत आहे आणि शिकण्याच्या प्रक्रियेत आनंदही आहे’, असा भाव ठेवला, तर चुका झाल्यावर निराशा येत नाही.

इ. सेवेत चुका झाल्या, तरी ‘देवाने या सेवेसाठी आपल्याला पात्र समजले’, यासाठी देवाप्रती कृतज्ञता वाटली पाहिजे.

ई. ‘संघर्ष करणे’, हे साधनेचे एक महत्त्वाचे अंगच आहे. जे जमते, ते कोणीही करू शकेल. यात मनाचा संघर्ष होत नाही. ‘जे जमत नाही, ते करायचा प्रयत्न करणे’, ही खरी साधना आहे; कारण यात मनाचा संघर्ष होतो आणि या संघर्षातूनच साधकाचे मन घडते आणि पुढे त्याचा मनोलय होतो.

उ. ‘देव आपल्याकडून परिपूर्ण सेवा करवून घेईलच’, अशी दृढ श्रद्धा ठेवली, तर तसे होईलच !’