भीक आणि भिक्षा यांमधील भेद

१. भिक्षा मागण्याचे लाभ : सनातन धर्मात ब्रह्मचारी आणि संन्यासी यांनी काही ठराविक घरांतून भिक्षा मागून अन्न खावे, असे सांगितले आहे.

२. ब्रह्मचर्याश्रम : गुरुकुलात रहाणारी काही मुले श्रीमंत घरांतील असतात आणि त्यांचे पालक त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करू शकतात; पण राजा असो वा रंक प्रत्येकाने भिक्षा, म्हणजेच माधुकरी मागून पोट भरावे, असा गुरुकुलाचा नियम असल्यामुळेे खालील लाभ होतात.

अ. अन्न शिजवण्यात वेळ वाया जात नसल्यामुळेे विद्यार्जन आणि गुरुसेवा यांसाठी पूर्ण वेळ मिळतो.

आ. प्रत्येकाने माधुकरी मागायची असल्यामुळेे समानता हा ईश्वराचा गुण अंगी बाणतो.

इ. विद्यार्थ्याला मागून आणलेल्या अन्नावरच जगावे लागते. त्यामुळे खाण्याच्या पदार्थार्विषयीची आवड-नावड हा चित्तातील संस्कार न्यून होतो.

ई. माधुकरीतून मिळालेले अन्न प्रतिदिनी उणे-अधिक असू शकते; म्हणून मिळालेल्या अन्नावरच ब्रह्मचाऱ्याला भूक भागवावी लागते. यामुळे ईश्वर ठेवेल त्या स्थितीत रहाण्याची सवय लागते.

३. संन्यासाश्रम : वरीलप्रमाणे ब्रह्मचाऱ्याला जे लाभ होतात, ते सर्व लाभ संन्याशाला भिक्षेमुळे मिळतात. ते पूर्वायुष्यात स्वतःचे कुटुंब आणि इतर काहीजण यांचा चरितार्थ चालवत असतात, दुसऱ्यांना दान आणि भिक्षा देत असतात. संन्यासाश्रमात त्यांना स्वतःला भिक्षा मागावी लागते. भिक्षा मागतात; म्हणून काहीजण त्यांचा अपमानही करतात. एखाद्या दिवशी भिक्षा न मिळाल्याने उपवासही घडतो. हे होत असतांना त्यांचे षड्रिपूंवर नियंत्रण येऊन आध्यात्मिक उन्नती होते. सनातन धर्माप्रमाणे राजा आणि गृहस्थाश्रमी यांचे ब्रह्मचारी, वानप्रस्थाश्रमी अन् संन्याशी यांना साहाय्य करण्याचे दायित्व असते.

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९१)

Leave a Comment