व्याकरण सोपे केले ! – व्याकरणाचे महत्त्व ज्ञात नसलेले समाजातील तथाकथित विद्वज्जन आणि सर्वपक्षीय राजकारणी !

मराठी भाषेचे लेखन सुलभ होण्याच्या दृष्टीने तिच्यात एकसूत्रीपणा आणण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मराठी भाषा कशी लिहावी, याविषयी १४ नियम सिद्ध केले. सुलभीकरणाच्या या प्रयत्नात महामंडळाने संस्कृतोद्भव मराठी भाषेच्या व्याकरणात संस्कृत व्याकरणाच्या विरुद्ध जातील, असे पालट केले, उदा. मूळ इकारान्त शब्द ईकारान्त केले, म्हणजे गणपतिचे गणपती केले. असे करणे म्हणजे वैद्यकीय शिक्षण कठीण वाटणार्‍यांसाठी थोड्याच व्याधी अन् थोडीच औषधे शिकवणे, असे करण्यासारखे आहे. अ.भा. मराठी साहित्य महामंडळ हे महाराष्ट्रातील साहित्य संस्थांचे प्रातिनिधिक मंडळ असल्यामुळे त्याने केलेल्या या नियमावलीला १९६२ साली यशवंतराव चव्हाण यांच्या काँग्रेस शासनाने मान्यता दिली आणि राज्यकारभारात अन् शिक्षणक्षेत्रात तिचे पालन करण्याचे ठरवले; परंतु काही व्यक्तींना वाटते आणि समाजाला लिहायला सोपे जाते, म्हणून भाषेच्या व्याकरणात पालट करण्याएवढे व्याकरण निरर्थक असते, तर महर्षि पाणिनींनी अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ लिहिला असता का ?
शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांची शक्ती एकत्र असतात, असा सिद्धांत आहे. त्यामुळे शब्द उच्चारला की, त्याला एक रूप असते. ते रूप म्हणजेच शब्द लिहिण्याची पद्धत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या शासनाला हे ज्ञात नाही का ? या सिद्धांताकडे दुर्लक्ष करून नवीन व्याकरण सिद्ध केल्याने शब्दांतील चैतन्य नष्ट झाले आहे. ते टाळण्यासाठी व्याकरण सोपे करण्याऐवजी सर्वांना योग्य व्याकरण शिकवले असते, तर शब्दांतील चैतन्य टिकून राहिले असते. धर्माचरण आणि साधना कठीण असल्यामुळे ती सोपी केली, असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे, तितकेच व्याकरण सोपे करणे हास्यास्पद आहे !
हिंदु राष्ट्रात महर्षि पाणिनींनी अष्टाध्यायी या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे व्याकरण असेल. त्यामुळे शब्दांत चैतन्यही असेल.

– डॉ. आठवले (१२.२.२०१४)

Leave a Comment