भारत भूमीची महानता !

‘भारत भूमीत जन्माला येणार्‍या प्राणीमात्रांनाही जे भाग्य लाभले आहे, ते पाश्‍चात्त्य देशांतील अधिनायकांनाही लाभलेले नाही.’ – प.पू. डॉ. गुणप्रकाश चैतन्यजी महाराज, अध्यक्ष, अखिल भारतीय वर्षीय धर्मसंघ

स्वामी विवेकानंद यांचे विचारधन

१. पशूला द्रव्याचा लोभ नसतो; परंतु हाच द्रव्यलोभ माणसाला पशू बनवतो. २. ‘मी देह नाही’ हे म्हणण्यापेक्षा ‘मी आत्मा आहे’ हे म्हणण्यामुळे ‘नाहमकर्ताची’ जाणीव होऊन नरदेहाचे सार्थक होते. ३. आज आपल्या देशाची उन्नती करण्याकरता सुसंस्कृत माणसांची आवश्यकता आहे. केवळ सुशिक्षित असणे व्यर्थ आहे. (संदर्भ : मासिक ‘कल्याणी’, वर्ष २०१६)

महिलांना मान देण्याविषयी मनुस्मृतीतील श्लोक

सुवासिनी: कुमारीश्‍च रोगिणो गर्भिणीः स्त्रियः । अतिथिभ्योऽग्र एवैतान् भोजयेदविचारयन् ॥ – मनुस्मृति, अध्याय ३, श्‍लोक ११४ अर्थ : सुवासिनी, कुमारिका, रोगी आणि गर्भवती स्त्रिया यांना अतिथीच्याही आधी भोजन द्यावे.

आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण

‘राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे विषय मायेतील असल्यामुळे त्यांचे लिखाण अधिक काळ टिकत नाही. याउलट आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण बराच काळ किंवा युगानुयुगेही टिकते, उदा. वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी.’ – (परात्पर गुरु) डॉ. जयंत बाळाजी आठवले

आजची बिघडलेली तरुण पिढी !

‘चेन्नई येथील उच्च न्यायालयाने आजच्या तरुण पिढीविषयी खेद व्यक्त करतांना म्हटले आहे, ‘चित्रपटातील अश्‍लील शब्द आणि गाणी यांमुळे तरुण पिढीच्या मनामध्ये दुष्ट विचार येतात आणि त्यात हिंसाचाराच्या घटना दाखवल्यामुळे तरुण पिढीची मने बिघडली आहेत. यासाठी चित्रपट क्षेत्रातील लोकांनी स्वतःचे सामाजिक दायित्व लक्षात घेऊन चांगले संस्कार, आपली संस्कृती आणि नैतिकता जोपासावी.’

अशा आई-वडिलांची मुले कशी असणार ?

‘आपला मुलगा सात्त्विक व्हावा, ईश्‍वरप्राप्तीला लायक व्हावा’, असे पूर्वीच्या आई-वडिलांना वाटायचे. आता ‘आपला मुलगा शिक्षण घेऊन नोकरीला लायक व्हावा, विदेशात जावा’, असे आई-वडिलांना वाटते !’

रज-तमप्रधान लोकांचे स्वराज्य कधी सुराज्य नसते

‘स्वराज्य हे सुराज्य नसते. याचे कारण हे की, रज-तमप्रधान लोकांचे स्वराज्य कधी सुराज्य नसते. भारताने हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची ७१ वर्षे अनुभवले आहे.’

ईश्वरप्राप्तीसाठी गुरूंनी सांगितलेला जप करत असतांना काही आध्यात्मिक अडचणी आल्यास त्या दूर करण्यासाठी इतर संतांनी सांगितलेले आध्यात्मिक उपायही करावेत

‘एखादा रुग्ण मोठ्या आजारासाठी आधुनिक वैद्यांनी सांगितलेली औषधे घेत असला, तरी इतर आजार झाल्यावर तो इतर औषधेही घेतोच. तसेच गुरूंनी सांगितलेला जप त्यांचा शिष्य ईश्‍वरप्राप्तीसाठी करत असला, तरी जीवनात मोठ्या आध्यात्मिक अडचणी आल्यास त्या दूर करण्यासाठी गुरूंना संपर्क होऊ शकत नसल्यास इतर संतांनी सांगितलेले आध्यात्मिक उपायही करावेत.’