साधनेत अधिक प्रगती केलेल्यांना ईश्वरावर पूर्ण श्रद्धा असते.

‘आपत्काळात सर्वसाधारण व्यक्तीला कुटुंबियांची काळजी वाटते; पण तेव्हा साधनेत प्रगती केलेल्या साधकांना साधकांची, म्हणजे ईश्‍वराच्या कुटुंबाची, म्हणजे त्याच्या भक्तांची काळजी वाटते. साधनेत अधिक प्रगती केलेल्यांना ती काळजीही वाटत नाही; कारण ‘ईश्‍वर करतो, ते भल्यासाठी’ यावर त्यांची पूर्ण श्रद्धा असते.’

साधनेची ओढ अंतर्मनातून यायला हवी

‘कोणावरही साधनेची सक्ती करता येत नाही. साधनेची ओढ अंतर्मनातून यायला हवी. त्यासाठी अध्यात्माचा आणि साधनेचा अभ्यास केल्यास साहाय्य होते.’

‘‘आश्रमात कोण राहू शकतो ?’’

‘सनातनचा आश्रम पहायला येणारे काही जण विचारतात, ‘‘आश्रमात कोण राहू शकतो ?’’ या प्रश्‍नाचे उत्तर आहे, ‘ईश्‍वरप्राप्तीसाठी अखंड साधना करू इच्छिणारे आश्रमात राहू शकतात.’

अध्यात्मशास्त्र अनंताचे शास्त्र आहे

‘अध्यात्मशास्त्र अनंताचे शास्त्र आहे; म्हणून देवाशिवाय ते कोणी सांगू शकत नाही. हिंदु धर्मातील अध्यात्मशास्त्र देवांनीच सांगितलेले असल्यामुळे ते अनंत आहे.’

अशा आई-वडिलांची मुले कशी असणार ?

‘आपला मुलगा सात्त्विक व्हावा, ईश्‍वरप्राप्तीला लायक व्हावा’, असे पूर्वीच्या आई-वडिलांना वाटायचे. आता ‘आपला मुलगा शिक्षण घेऊन नोकरीला लायक व्हावा, विदेशात जावा’, असे आई-वडिलांना वाटते !’

रज-तमप्रधान लोकांचे स्वराज्य कधी सुराज्य नसते

‘स्वराज्य हे सुराज्य नसते. याचे कारण हे की, रज-तमप्रधान लोकांचे स्वराज्य कधी सुराज्य नसते. भारताने हे स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची ७१ वर्षे अनुभवले आहे.’

अध्यात्मात ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’, हा सिद्धांत आहे

अध्यात्मात ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’, हा सिद्धांत असल्यामुळे सनातन संस्थेमध्ये प्रत्येकाला त्याच्या आवश्यकतेनुसार साधना सांगितली जाते. वैद्य ज्याप्रमाणे प्रत्येक रुग्णाला त्याच्या आवश्यकतेनुसार उपचार सांगतात, त्याप्रमाणे हे आहे.’

ईश्वरप्राप्तीसाठी गुरूंनी सांगितलेला जप करत असतांना काही आध्यात्मिक अडचणी आल्यास त्या दूर करण्यासाठी इतर संतांनी सांगितलेले आध्यात्मिक उपायही करावेत

‘एखादा रुग्ण मोठ्या आजारासाठी आधुनिक वैद्यांनी सांगितलेली औषधे घेत असला, तरी इतर आजार झाल्यावर तो इतर औषधेही घेतोच. तसेच गुरूंनी सांगितलेला जप त्यांचा शिष्य ईश्‍वरप्राप्तीसाठी करत असला, तरी जीवनात मोठ्या आध्यात्मिक अडचणी आल्यास त्या दूर करण्यासाठी गुरूंना संपर्क होऊ शकत नसल्यास इतर संतांनी सांगितलेले आध्यात्मिक उपायही करावेत.’