चित्तशुद्धीसाठी एक वेगळा विचार !

इंद्रिये, पञ्चतन्मात्रा इत्यादींमध्ये व्यक्त होणार्‍या चैतन्याच्या अंशालासुद्धा ‘देवता’ म्हणण्याची पद्धत आहे. उदा. वाणीची देवता अग्नी, कानांमध्ये दिक् देवता, डोळ्यांची सूर्य, त्वचेची वायू, पायांची उपेन्द्र, हातांची इन्द्र इत्यादी.

आता, अपरिहार्य नसताना आपण कोणाशी कठोरपणे बोललो, दुसर्‍याला टोचून बोललो, वाणीने कर्कश स्वर काढले तर आपल्या मुखातील वाणीची देवता अप्रसन्न होते, कारण हा वाणीचा दुरुपयोग आहे. त्याचबरोबर ज्याच्या कानांवर आपले कटु वचन पडले, तेथील दिक् देवतासुद्धा अपमानित होते. म्हणजे आपल्या एका अप्रिय बोलण्याने आपण दोन देवतांना दुखावतो, अप्रसन्न करतो; म्हणून असे वागणे टाळायला हवे. असेच इतर इंद्रियांविषयीही असते.

असा विचार करून प्रत्येक इंद्रियाकडून अयोग्य कृती न होण्याची दक्षता बाळगली तर ‘दम’ म्हणजे इंद्रियनिग्रह साधेल. पुढे हे अंगवळणी पडले की अयोग्य कृतीचा विचार मनात येताच तो चुकीचा असल्याचे भान होईल. ह्याने पुढची पायरी ‘शम’ अर्थात् मनोनिग्रह साधेल. अशा प्रकारे देवतांचा आदर राखण्याच्या भक्तीमार्गाच्या आचरणाने हा आणखी एक लाभ होतो की ज्ञानमार्गातील ‘दम’ आणि ‘शम’ सुद्धा साधतात. त्यापुढे तो सहजस्वभाव बनेल. अशा विचारप्रक्रियेने सुद्धा चित्तशुद्धी करता येऊ शकते.

चित्तशुद्धी होणे, हे साधनेत खूप महत्त्वाचे, अत्यावश्यक आणि अपरिहार्य असते. ते ह्या पद्धतीने साध्य होईल.

– पू. अनंत आठवले (२१.६.२०२१)

Leave a Comment