भावजागृतीचे प्रयत्न नीट जमत नाहीत; म्हणून निराश होऊ नका, तर कर्म आणि ज्ञान या साधनामार्गांनुसार प्रयत्न करा !

‘काही साधकांना सतत भावाच्या अनुसंधानात रहाणे, देवाशी बोलणे इत्यादी भावजागृतीचे प्रयत्न नीट जमत नाहीत; म्हणून निराशा येते. भक्तीमार्गी साधकाला हे प्रयत्न चांगले जमतात; पण कर्ममार्गी आणि ज्ञानमार्गी साधकाला ते भक्तीमार्गी साधकाप्रमाणे जमू शकणार नाहीत. परात्पर गुरु डॉक्टरांनी निर्मिलेला ‘गुरुकृपायोग’ हा सर्व साधनामार्गांना सामावून घेणारा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गुरुकृपायोगात भक्ती, कर्म आणि ज्ञान या साधनामार्गांचे प्रमाण अनुक्रमे ४०, २० आणि ३० टक्के आहे, तर उर्वरित साधनामार्गांचे प्रमाण १० टक्के आहे. त्यामुळे भावजागृतीचे प्रयत्न नीट जमत नाहीत; म्हणून निराश होऊ नये. कर्मयोगाप्रमाणे ‘प्रत्येक कर्म मनापासून आणि परिपूर्ण करणे’ आणि ज्ञानयोगाप्रमाणे ‘मी काहीच करत नसून देवच सर्व माझ्या माध्यमातून करतो’, या भावाने कर्म करणे यांमुळे ५० टक्के लाभ होणारच आहे.

असे असले, तरी आपल्याला परिपूर्ण अशा ईश्‍वराशी एकरूप व्हायचे असल्याने आपली साधनाही परिपूर्ण असली पाहिजे. यासाठी कर्मयोग आणि ज्ञानयोग यांनुसार प्रयत्न करण्याच्या जोडीलाच भक्तीयोगाप्रमाणेही जेवढे जमतील तेवढे प्रयत्न अवश्य करावेत.’

– (पू.) श्री. संदीप आळशी (५.५.२०१७)

Leave a Comment