साधनेतील आत्मपरीक्षणचे महत्त्व

आपल्या हातून घडणार्‍या पाप आणि पुण्य याची नोंद प्रतिदिन ठेवणे, म्हणजे साधना. असे केले, तर आपलेच आपल्या कर्माकडे लक्ष रहाते. आपणच आपले परीक्षण केले, तर आपली साधनेत प्रगती लवकर होते. शिवाय यातून स्वतःकडे साक्षीभावानेही पहाता आल्याने आपल्याला अध्यात्मात थेट पुढच्या टप्प्यालाच जाणे शक्य होते. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

संत दुसर्‍यांच्या जीवनाला आनंदयात्रा बनवतात

इतरांच्या आनंदात एकरूप होऊन आपल्या समवेत इतरांच्याही जीवनाला आनंदयात्रा बनवता आले पाहिजे. संत असे असतात. ते दुसर्‍यांच्या जीवनाला आनंदयात्रा बनवतात. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

कर्मातून ब्रह्म पहाता येणे

आपले प्रत्येक कर्म पूजेप्रमाणे हवे, तरच आपल्याला सर्वत्र ब्रह्म पहाता येईल. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

भगवंतमय दृष्टि असावी

आपल्या दृष्टीतच भगवंत असला पाहिजे, म्हणजे आपण जिथे पाहू, तिथे आपल्याला मंदिर दिसेल. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

अधिकारी व्यक्तींच्या मार्गदर्शनानुसार साधना कऱण्याचे महत्त्व

कोणत्याही एका मार्गाने साधना केली, तरी प्रगती निश्चित आहे. अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींच्या मार्गदर्शनानुसार साधना मार्ग निवडावा. स्वतःच्या मनाने साधनामार्ग निवडू नये, नाहीतर अध्यात्मातील अनेक वर्षे वाया जाऊ शकतात. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

एकावेळी एकच साधना करावी

भोजन करतांना पूर्ण ताट भरून अन्नपदार्थ आपल्यासमोर ठेवले, तर ते सर्वच आपण खाऊ शकत नाही. आपल्याला जेवढे पचेल, तेवढेच आपण खाऊ शकतो. व्यावहारिक शिक्षण घेत असतांनाही एकाच वेळी सर्वच परीक्षेत उत्तीर्ण होऊन अनेक पदव्या प्राप्त करू शकत नाही, तसेच हे आहे. अध्यात्मातही एका वेळी एकच करू शकतो. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

जन्मांतरीचा साधनामार्ग

‘प्रत्येक जीव त्याच्या पूर्वजन्मात काय शिकला ? त्या जिवाने कोणती साधना केली ?’, यांवरही त्या जिवाची साधनेची सद्यस्थिती अवलंबून असते. पूर्वजन्मात ध्यानयोगाने साधना केली, तर पुढील जन्मातही तोच साधनामार्ग असू शकतो. ‘परमेश्वर प्राप्तीसाठी काहीतरी करणे’, हे पुष्कळ महत्त्वाचे आहे. अध्यात्मात मार्ग जरी भिन्न असले, तरी ध्येय एकच आहे. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

अचल संतमन

संतांचे मन नेहमी ईश्वरी अनुसंधानात स्थिर असते. ते एखाद्या जलाशयातील संथ पाण्यासारखे अचल असते. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

परलोकमार्गातील गुरुबळ

गुरूंनी साधकाला घडवलेले असते. गुरूंनी शिकवलेल्या गोष्टींचा संस्कार साधकावर मृत्यूनंतरही रहातो. तो संस्कार आपल्या परलोकातील प्रवासात एक ऊर्जा बनून साहाय्य करतो. – श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ