गुरुपौर्णिमा संदेश : भारताला पुनश्च ‘विश्वगुरु’ बनवण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापा !

‘गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुतत्त्वाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! सनातन धर्मातील ज्ञानपरंपरा गुरु-शिष्यपरंपरेच्या माध्यमातून प्रवाही आहे. या परंपरेने भारताला ‘विश्‍वगुरु’ बनवले आहे. भारताच्या अध्यात्मविश्‍वात आजही थोर गुरु-शिष्य परंपरा कार्यरत आहेत. आज सनातन धर्माला भीषण ग्लानी येऊनही विविध धर्मसंप्रदाय, धार्मिक संस्था आदी माध्यमातून कार्यरत गुरु-शिष्य परंपरा भारताची गौरवशाली ज्ञानपरंपरा प्रवाही रहाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे सर्व प्रयत्न ज्ञानशक्तीच्या स्तरावरील असले, तरी आजच्या काळात धर्मग्लानी दूर करण्यासाठी गुरु-शिष्य परंपरेने क्रियाशक्तीद्वारे कार्य करणे काळानुसार आवश्यक आहे.

भ्रष्टाचार, अनैतिक आचरण, तसेच सर्वच क्षेत्रांत माजलेले पाखंड ही धर्माला आलेल्या ग्लानीची प्रत्यक्ष लक्षणे आहेत. विद्यमान लोकशाही राज्यव्यवस्था धर्मशून्य असल्यामुळे ही धर्मग्लानी आलेली आहे. यावर उपाय एकच म्हणजे धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था पुनर्स्थापित करणे. थोडक्यात भारतात आज धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची (सनातन धर्मराज्याची) स्थापना करण्याची आवश्यकता आहे. अनेक संतांनी दिलेल्या आध्यात्मिक स्तरावरील योगदानामुळे सूक्ष्मातून हिंदु राष्ट्राची स्थापना जवळ आली आहे. वर्ष २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्राची स्थुलातून स्थापना होणार आहे. यासाठी सद्यस्थितीत विविध संप्रदाय, धार्मिक संस्था आदींद्वारे कार्यरत गुरु-शिष्य परंपरांनी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी प्रत्यक्ष कार्य करण्याची आवश्यकता आहे. या कालानुरूप क्रियाशक्तीच्या प्रयत्नांद्वारेच स्थुलातून हिंदु राष्ट्र-स्थापना करणे शक्य होणार आहे. भारतात सनातन धर्म पुनर्स्थापित झाल्यानंतरच भारतातील ज्ञानशक्ती पुनश्‍च विश्‍वभर प्रवाही होईल आणि भारत खर्‍या अर्थाने पुन्हा ‘विश्‍वगुरु’ होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, सनातन संस्था. (गुरुपौर्णिमा २०१८)