कुलदेवतेची उपासना !

आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात जलद प्रगती होते.

कुलदेवतेचा नामजप करणे
कुलदेवतेचा नामजप करणे

 

कुलदेवता या शब्दाचा अर्थ !

‘कुलदेवता’ हा शब्द ‘कुल’ आणि ‘देवता’ या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनीशक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्या वेळी पुरुषदेवता असते, त्या वेळी तिला ‘कुलदेव’ आणि जेव्हा ती स्त्रीदेवता असते, तेव्हा तिला ‘कुलदेवी’ म्हणून संबोधले जाते.

 

छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली उपासना !

शिवाजी माहाराजांना आशीर्वाद देतांना त्यांची कुलदेवता
शिवाजी माहाराजांना आशीर्वाद देतांना त्यांची कुलदेवता

कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी राज्य स्थापन करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवी होती. तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हे साध्य केले.

 

कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व !

शीघ्र ईश्वराप्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करणे अावश्यक असते, त्याच देवतेच्या कुळात ईश्वर आपल्याला जन्माला घालतो; म्हणून आपल्या कुलदेवतेचा जप प्रतिदिन न्यूनतम १ ते २ घंटे अन् जास्तीत-जास्त म्हणजे सतत करावा. समजा कुलदेवी महालक्ष्मीदेवी असेल, तर श्री महालक्ष्मीदेव्यै नम: । असा नामजप करावा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा.

ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आली की, साधना पूर्ण होते. श्रीविष्णु, शिव आणि श्री गणपति यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा.

 

कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे ?

कुलदेवता ठाऊक नसेल, तर ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ असा नामजप करावा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटते. सनातन संस्थेच्या अनेक साधकांनी आणि सत्संगातील अनेकांनी ही अनुभूतीघेतली आहे. ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ हा जप देवतेच्या तारक तत्त्वाशी संबंधित असल्याने ‘कुलदेवता’ या शब्दातील ‘दे’ हे अक्षर उच्चारतांना थोडेसे लांबवावे. यामुळे देवतेचे तारक तत्त्व जागृत होऊन त्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो.

आता आपण ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ हा नामजप ऐकूया.

सनातन-निर्मित नामपट्टी
सनातन-निर्मित नामपट्टी

देवतेच्या तारक किंवा मारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजे तारक किंवा मारक नामजप. याविषयीची सविस्तर माहिती https://www.sanatan.org/mr/a/491.html या लिंकवर उपलब्ध आहे.

 

कुलदेवतेच्या संदर्भातील काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

१. मला साधना कारण्याची इच्छा झाल्यानंतर कुलदेवतेचे नाव माहीत नसल्याने आवडत्या श्रीगणेशाचे नामस्मरण चालू केले. केवळ पंधरा दिवसांनी माझ्या वडिलांचे आगमन झाले आणि त्यांनी मला आमची कुलदेवता ‘श्री भवानी’ असल्याचे सांगितले. – श्री. ज्ञानेश्वर हिरवे, बिरवाडी, महाड, रायगड, महाराष्ट्र.

२. एकदा कुलदेवतेच्या दर्शनाहून परतत असता माझे डोके दुखू लागले. मी सहज विनोदाने म्हटले, ‘‘आई मल्लय्या (आमची कुलदेवी), मी एवढ्या लांबून आलो आणि ही डोकेदुखी चालू झाली. तुला माझी काळजी असेल तर कृपा करून हे थांबव.’’ मला लगेचच एक जांभई आली. जांभई देतांना तोंड उघडले तेव्हा डोके दुखत होते, पण तोंड मिटले तेव्हा डोके दुखायचे थांबले होते. मी चाट झालो; पण लगेचच माझ्या लक्षात आले की, परमेश्वर सदोदित आपल्याबरोबर असतो आणि साधकांच्या अशा लहानसहान इच्छाही पूर्ण करतो. – डॉ. प्रकाश घळी, फोंडा, गोवा.

३. मी सत्संगात जाऊ लागल्यावर माझे कुलदैवत भैरी भवानीचे नामस्मरण करू लागलो. यापूर्वी मी कधी कुलदेवतेच्या दर्शनाला गेलो नव्हतो. मी कुलदेवतेची प्रतिमाही पाहिली नव्हती; पण नामस्मरण चालू झाल्यानंतर एका रात्री झोपेत स्वप्नाद्वारे मला एका देवतेने दर्शन दिले. नंतर कुलदेवीचे छायाचित्र पाहिल्यावर कळले की, मला कुलदेवतेने दर्शन दिले आहे. – श्री. अनंत कोकबणकर, घाटकोपर, मुंबई.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’

 

आपल्या आध्यात्मिक प्रवासाला आत्तापासूनच आरंभ करा !

सनातन संस्थेच्या ‘साधना संवाद’साठी आताच नोंदणी करा !

Leave a Comment