सनातनचे अध्यात्मप्रसाराचे कार्य

सनातनचे कार्य : समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठीची अथक वाटचाल !

‘सनातन संस्था’ ही ऋषीमुनी आणि संत-महंत यांनी धर्मशास्त्र हा आधारस्तंभ मानून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उन्नतीचा जो मार्ग दाखवला, त्यानुसार कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. ‘सनातन संस्थे’चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.

समाजाची सात्त्विकता वाढवण्यासाठी अध्यात्मप्रसार

अ. प्रवचने

अध्यात्माचे महत्त्व, गुरुकृपायोगानुसार साधना, नैतिक मूल्यांचे संवर्धन, तसेच समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयी प्रवचनांच्या माध्यमांतून मार्गदर्शन करण्यात येते.

आ. साप्ताहिक सत्संग


साधना योग्य प्रकारे होत रहाण्यासाठी नियमित सत्संग आवश्यक आहे. यासाठी संस्थेतर्फे देशभरात विनामूल्य सत्संग घेतले जातात. या सत्संगांमध्ये साधनेचे महत्त्व, सण-धार्मिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र, अध्यात्मविषयक लिखाणाचा भावार्थ, आध्यात्मिक शंकांचे निरसन आदींविषयी विवेचन करण्यात येते.

इ. बालसंस्कारवर्ग


मुलांवर योग्य संस्कार झाले, तर त्यातून पुढे चांगले व्यक्तीमत्त्व घडते. साप्ताहिक बालसंस्कारवर्गांतून मुलांना त्यांच्या वयोमानानुसार सुलभ अशी साधना सांगून ती करवूनही घेतली जाते. मुलांसमोर योग्य ते संस्कार व्हावेत, यासाठी त्यांना देवता, संत, हिंदु राजे, क्रांतीकारक आदींच्या बोधप्रद गोष्टीही सांगितल्या जातात.

ई. व्यक्तीमत्व विकासवर्ग

साधनेद्वारे तणावमुक्त आणि नेतृत्वसंपन्न व्यक्तीमत्त्व घडवणार्‍या कार्यशाळांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात येते.

उ. गुरुपौर्णिमा महोत्सव


गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा आणि साधना यांचे जीवनातील महत्त्व कळण्यासाठी संस्थेतर्फे प्रतिवर्षी देशभरात शेकडो ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरा करण्यात येतो.

ऊ. सनातन साधक-पुरोहित पाठशाळा


भारतात, तसेच जगभर चांगल्या पुरोहितांची न्यूनता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. पुरोहित सात्त्विक नसून केवळ व्यावसायिक असले, तर विधीचे फळ अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचा विधी आणि धर्म यांच्यावरील विश्वास उडतो. त्यांना वाटते, ‘हे सर्व विधी म्हणजे ब्राह्मणांनी पैसे मिळविण्यासाठी योजलेली युक्ती आहे.’ तसे होऊ नये, म्हणून साधक-पुरोहित विधीसाठी उपलब्ध असले पाहिजेत. या दृष्टीने खिस्ताब्द २००७ मध्ये सनातनने साधक-पुरोहित पाठशाळा चालू केली. पाठशाळेतील पौरोहित्य शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे साधक-पुरोहित, शिष्य-पुरोहित आणि संत-पुरोहित असे टप्पे असणार आहेत.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !

ए. धर्मसत्संग मालिकांना दूरचित्रवाहिन्यांद्वारे प्रसिद्धी

‘ईश्वरप्राप्तिके लिए अध्यात्मशास्त्र’ ही धर्मसत्संगांची २२५ हून अधिक भागांची मालिका सनातनने निर्मिली आहे. ही मालिका ‘श्री शंकरा’ वाहिनी आणि ‘सुदर्शन’ वाहिनी यांवरून वर्षभर आशिया खंडात प्रसारित झाली आहे.


ऐ. धर्मसत्संग मालिकांना स्थानिक केबलचालकांद्वारे आंतरराज्य प्रसिद्धी

१. हिंदी भाषेतील धर्मसत्संगांचा मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, बिहार, झारखंड, बंगाल आणि ओडिशा या राज्यांतील ७५ लाखांहून अधिक जिज्ञासू हिंदूंनी नियमित लाभ घेतला आहे.

२. मराठी भाषेतील धर्मसत्संगांचा महाराष्ट्रातील ८ लाख ७४ सहस्रांहून अधिक दर्शकांनी नियमित लाभ घेतला आहे.

ओ. यज्ञयाग


यज्ञयाग केल्यामुळे समाजाची सात्त्विकता वाढण्यासह वातावरणही चैतन्यमय बनते. यासाठी सनातनच्या वतीने आतापर्यंत ३७ हनुमत्कवच यज्ञ, १ राक्षोघ्न यज्ञ आणि ३ नवचंडी यज्ञ करण्यात आले आहेत. तसेच ‘अग्निहोत्र’ याविषयी विवेचन करणारा ग्रंथही सनातनने प्रसिद्ध केला आहे.