श्री दश महाविद्यां’च्या यंत्रांची वैशिष्ट्ये आणि त्यांचा अष्टांगसाधनेशी संबंध

‘नवरात्रीच्या काळामध्ये देवीची उपासना प्रामुख्याने करतात. आदिशक्ती माता दुर्गेची दहा रूपे ‘श्री दश महाविद्या’ या नावाने सर्वांनाच परिचित आहेत. ही सर्व पार्वती देवीची १० रूपे आहेत. ती तिच्या १० पैलूंचा, म्हणजे वैशिष्ट्यांचा (कार्यांचा) समूह आहे. या दहा महाविद्यांची जशी अलग अलग १० रूपे आहेत, तशीच त्यांच्याशी संबंधित अलग अलग १० यंत्रेही आहेत. त्यांची छायाचित्रे येथे दिली आहेत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

सप्तर्षींनी नाडीपट्टीवाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून नवरात्रीचे ९ दिवस आणि दसर्‍याचा १० वा दिवस अशा १० दिवसांत दश महाविद्यांच्या एकेका रूपाशी संबंधित यज्ञ करण्यास सांगितले होते. त्या यज्ञांच्या वेळी मला दश महाविद्यांची यंत्रे बघून त्यांचा साधनेतील अष्टांगांशी संबंध असल्याचे जाणवले. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना ‘अष्टांग साधना’ करण्यास सांगितले आहे. ही अष्टांग साधना म्हणजे स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, नामजप, भावजागृती, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती या ८ अंगांनी साधनेमध्ये प्रतिदिन प्रयत्न करणे. असे केले, तर जलद आध्यात्मिक उन्नती होते. दश महाविद्येचे एकेक यंत्र अष्टांग साधनेतील एकेका अंगाशी संबंधित कसे आहे, हे पुढे दिले आहे.

‘श्री दश महाविद्यां’चे एकेक यंत्र आणि त्याच्याशी संबंधित अष्टांग साधनेचे अंग

वरील माहितीवरून लक्षात येते की, दश महाविद्येतील यंत्र ज्या अष्टांगसाधनेशी संबंधित आहे, त्या प्रमाणेच यंत्राकडे पाहून अनुभूती येते, उदा. यंत्र स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाशी संबंधित असेल, तर आपल्यात अंतर्मुखता येते, यंत्र नामजपाशी संबंधित असेल, तर आपल्यात गांभीर्य येऊन शक्ती जाणवते इत्यादी. यंत्रातून प्रक्षेपित होणारी शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदनेही यंत्रानुसार पालटतात, उदा. स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन आणि नामजप यांच्याशी संबंधित यंत्रांतून शक्तीची स्पंदने प्रक्षेपित होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. भावजागृतीशी संबंधित यंत्रातून भावाची स्पंदने सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात इत्यादी. यंत्रातून प्रक्षेपित होणारे तारक आणि मारक शक्तीचे प्रमाणही साधनेतील अंगानुसार पालटते.

ही सर्व माहिती मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्री दुर्गादेवी यांच्या कृपेनेच प्राप्त झाली. यासाठी मी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१९.१०.२०२३)

Leave a Comment