अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, हा सूक्ष्मातून रामराज्याचा, म्हणजेच हिंदु राष्ट्राचा प्रारंभ !

श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने  संत यांचे संदेश

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘अयोध्येत उभारलेल्या भव्यदिव्य श्रीराममंदिरात २२.१.२०२४ या दिवशी श्री रामललांच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठेमुळे अयोध्येतून साक्षात् श्रीरामाची स्पंदने भारतातच नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीवर नियमित रूपात प्रक्षेपित होणार आहेत. हे एकप्रकारचे प्रभु श्रीरामाचे सूक्ष्मातील अवतरण आहे. प्रभु श्रीराम अयोध्यापती झाल्यानंतर पृथ्वीवर रामराज्य अवतरले होते. ‘स्थुलातून एखादी घटना घडण्यापूर्वी सूक्ष्मातून ती घडत असते’, असे शास्त्र आहे. अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीच्या होणार्‍या प्राणप्रतिष्ठेमुळे सूक्ष्मातून रामराज्याचा, अर्थात् भावी हिंदु राष्ट्राचा प्रारंभ होणार आहे.

साधारण वर्ष २००५ मध्ये मी सर्वत्रच्या साधकांना भेटण्यासाठी शेवटचा महाराष्ट्राचा दौरा केला होता. या दौर्‍यात मी सर्वांना सांगितले होते, ‘यापुढे मी तुमच्या जिल्ह्यात प्रत्यक्षात भेटीन किंवा मार्गदर्शन करीन, असे होणार नाही. त्यामुळे ‘भावी काळात कोणता नामजप करायचा ?’, याविषयी साधकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ नये; म्हणून आताच सांगतो. सध्या (वर्ष २००५ मध्ये) धर्मसंस्थापनेचे कार्य करायचे ध्येय असल्याने भगवान श्रीकृष्णाचा (‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’) हा जप करा आणि हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यानंतर ते रामराज्यासम होण्यासाठी श्रीरामाचा (‘श्रीराम जय राम जय जय राम ।’) हा जप करा !’

साधकांनी नामजपाच्या संदर्भात हीच शिकवण पुढे आचरणात आणावी !

सध्याच्या अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उभारणीत स्वातंत्र्यानंतरच्या ३ पिढ्यांचे प्रत्यक्ष योगदान आहे. कोट्यवधी कुटुंबियांनी यासाठी मनापासून धनार्पण केले.

मीही आठवले कुटुंबियांच्या वतीने वर्ष १९९१ मध्ये बांधकामासाठी आवश्यक असणार्‍या शिळांसाठी देणगी दिली होती. त्याची पावतीसुद्धा अनेक वर्षे माझ्या कागदपत्रांमध्ये जतन केली होती. त्याचा हेतू हाच होता की, भविष्यात जेव्हा श्रीराममंदिर उभे राहील, तेव्हा त्यात ‘आपल्या कुटुंबियांचा खारीचा वाटा होता’, हे पुढील पिढीला सांगता येईल.

श्रीराममंदिराप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचेही कार्य ३ पिढ्यांचे आहे. वर्ष २०२३ ते २०२५ या कालावधीत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला प्रारंभ होईल, अशा विषयांच्या संदर्भात मी नियमित ग्रंथ आणि ‘सनातन प्रभात’ नियतकालिके यांमध्ये लेखन केले होते. आता प्रभु श्रीरामाचे अधिष्ठान भारताला प्राप्त झाल्याने हिंदु राष्ट्र स्थापनेच्या स्थुलातील कार्याला बळ मिळेल आणि प्रत्यक्ष स्थुलातील कार्य ५-७ वर्षांत पूर्ण होईल. अर्थात् असे हिंदु राष्ट्र स्थुलातून रामराज्यासम आदर्श घडण्यासाठी प्रत्यक्ष आणखी २ पिढ्यांना, म्हणजे पुढील ५० वर्षे कार्य करावे लागणार आहे.’

– (सच्चिदानंद परब्रह्म) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था.

हिंदूंनो, अयोध्येत प्रभु श्रीरामाचे भव्य मंदिर बनले आहे. आता श्रीरामाची (आराध्य देवतांची) भक्ती करून त्याची कृपा संपादन करूया ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

 

अयोध्येप्रमाणे संपूर्ण भारताला गतवैभव मिळवून द्यायचे आहे !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘श्री रामललाच्या भव्य मंदिरामुळे अयोध्येला गतवैभव प्राप्त झाले आहे. आता आपल्याला भारताचे हरवलेले वैभव परत मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आजही आदर्श राज्य म्हणून रामराज्याकडे पाहिले जाते. प्रभु श्रीरामाच्या काळात संपूर्ण प्रजा धर्मपालक आणि रामभक्त होती; म्हणून तिला श्रीरामासारखा धर्मपालक राजा अन् रामराज्य मिळाले. भारतालाही पुनश्च रामराज्यासम गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी हिंदु समाजाला धर्मपालन आणि रामभक्ती करून आध्यात्मिक बळ वाढवावे लागेल.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक उत्तराधिकारी)

 

श्रीराममंदिरानंतर सर्वत्र रामराज्याची स्थापना करणे, हेच आपले ध्येय असेल !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

गेली ५०० वर्षे रामभक्तांना त्यांच्या प्रभूपासून विलग करणार्‍या इस्लामी आक्रमकांचा अंतत: पराजय झाला. भक्ती, ज्ञान आणि कर्म अशा तीनही स्तरांवर म्हणजेच सर्वार्थाने हिंदू विजयी झाले. या प्रदीर्घ संघर्षमय काळातून तावून सुलाखून निघालेल्या हिंदु जनसमुदायाने श्रीराममंदिराच्या प्रतिष्ठेच्या या दिव्य क्षणी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी सातत्याने कार्य करण्याचे वचन आपल्या आराध्य श्रीरामाला दिले पाहिजे. श्रीराममंदिरानंतर आता सर्वत्र रामराज्याची स्थापना करणे, हेच आपले ध्येय असेल !’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या एक उत्तराधिकारी)

1 thought on “अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, हा सूक्ष्मातून रामराज्याचा, म्हणजेच हिंदु राष्ट्राचा प्रारंभ !”

Leave a Comment