नामजप : कलियुगातील श्रेष्ठ उपासना !

श्रीकृष्णाचा नामजप करतांना
श्रीकृष्णाचा नामजप करतांना

देवतांच्या विविध उपासना पद्धतींपैकी कलियुगातील सर्वांत श्रेष्ठ, तसेच सुलभ अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेचा नामजप करणे. नामाचा संस्कार मनावर रूजेपर्यंत तो मोठ्याने (वैखरीतून) करणे लाभकारी आहे. भगवंताच्या नामाबरोबरच त्याचे रूप, रस, गंध आणि त्याची शक्‍तीही नामासोबत असतेच. भगवंताच्या नामाचे उच्चारण करतांना किंवा ते नाम ऐकतांना हे लक्षात घ्यावे. हेच तत्त्व लक्षात घेऊन सनातनने नामजपाच्या ध्वनीचकतींची निर्मिती केली आहे. त्या चकतीतील नामजप आपण दिवसभर घरात लावून ठेवू शकतो. त्यामुळे वास्तुशुद्धी होऊन घरातील वातावरणही प्रसन्न होण्यास साहाय्य होते. या सुलभ अशा नामजपाविषयी माहिती या लेखात पाहू.

 

नामजपाचे प्रकार !

देवतेविषयी भक्‍तीभाव निर्माण झाल्यानंतर देवतेचे नाम कसेही घेतले तरी चालते; परंतु भक्‍तीभाव लवकर निर्माण होण्यासाठी अन् देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामाचा उच्चार योग्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी नामजपाचे प्रकार कोणकोणते आहेत, ते सर्वप्रथम समजून घेऊया.

देवतेची तारक आणि मारक अशी दोन रूपे असतात. भक्‍ताला आशीर्वाद देणारे देवतेचे रूप म्हणजे तारक रूप, उदाहरणार्थ आशीर्वाद देतांनाच्या मुद्रेतील श्रीराम, श्रीकृष्ण अथवा अन्य देवता. देवतेचे असुरांचा संहार करणारे रूप म्हणजे मारक रूप, उदाहरणार्थ कंस, जरासंधादी असुरांचा नाश करणारा किंवा शिशुपालावर सुदर्शनचक्र सोडणारा श्रीकृष्ण.

देवतेच्या तारक किंवा मारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजे तारक किंवा मारक नामजप. देवतेप्रती सात्त्विक भाव निर्माण होण्यासाठी, तसेच चैतन्य, आनंद आणि शांती यांची अनुभूती लवकर येण्यासाठी अन् आसुरी शक्‍तींपासून रक्षण होण्यासाठी तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो. तर देवतेकडून शक्‍ती अन् चैतन्य ग्रहण होण्यासाठी आणि आसुरी शक्‍तींचा नाश करण्यासाठी मारक रूपाचा नामजप आवश्यक असतो.

आता आपत्काल चालू झाला आहे. आपत्कालामध्ये जिवाच्या रक्षणासाठी देवतेच्या तारक तत्त्वाचा नामजप करणे इष्ट ठरते.


विविध देवतांच्या तारक तत्त्वाचा नामजप ऐकण्यासाठी येथे क्लिक करा !

 

नामजप कोठे करावा ?

‘सर्वकाही ईश्‍वरानेच निर्माण केलेले असल्याने कोठेही, कधीही त्याचे नाव घ्यावे. एकाच ठिकाणी बसून नामजप करण्यापेक्षा व्यवहारातील सर्व कामे करत असतांना नामजप करणे, ही श्रेष्ठ प्रतीची साधना आहे; कारण त्यात एकतर साधना अखंड चालू रहाते आणि दुसरे म्हणजे व्यक्ती व्यवहारातील कामे करत असतांना, नामजपामुळे मायेत असूनही नसल्यासारखी असते. अशा सर्व स्थितींत भगवंताशी अनुसंधान साधणे, यालाच ‘सहजस्थिती’ किंवा ‘सहजावस्था’ असे म्हणतात.

 

तारक नामजपाचे वैशिष्ट्य !

तारक नामजप करतांना नामाच्या कोणत्याच अक्षरावर आघात नसतो; म्हणजेच कोणतेही अक्षर जोर देऊन म्हणावयाचे नसते. प्रत्येक अक्षराचा उच्चार हळूवारपणे केल्याने, तसेच नामजपाची लय सावकाश ठेवल्याने भाव उत्पन्न होण्यास साहाय्य मिळते. ‘भाव तेथे देव’ या उक्‍तीप्रमाणे जेथे भावाची स्पंदने असतात, तेथे देवतेचे चैतन्य येते.

तारक नामजप करण्याची योग्य पद्धत कोणती, हे अनेकांना माहीत नसते. तसेच नामजप अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य उच्चारांसह होणेही आवश्यक असते; कारण अशा नामजपानेच देवतेच्या तत्त्वाचा अधिक लाभ होतो.

 

संतांच्या मार्गदर्शनानुसार सिद्ध झालेला नामजप !

येथे देण्यात आलेल्या नामजपांचे वैशिष्ट्य म्हणजे सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार हा नामजप सनातनच्या संत पू. (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी शास्त्रीय प्रयोगांद्वारे सिद्ध केला आहे.

 

प्राथमिक अवस्थेत जप करतांना मन एकाग्र होण्यासाठी हळू आवाजात जप करणे लाभदायक

जप मनात करतांना मनात इतर विचार येऊन मनाची एकाग्रता ढळते, तसेच जप करतांना काही बोलणे ऐकू आले, तर आपले लक्ष तिकडे जाते. याचाच लाभ घेऊन स्वतःलाच ऐकू येईल एवढ्या हळू आवाजात जप केला, तर मन तो जप ऐकते. त्यामुळे मन अधिक एकाग्र होते. याउलट मोठ्याने जप केला, तर जप तसा होण्यासाठी मनाचे लक्ष तिकडेच जाते. त्यामुळे मनाची जपावरची एकाग्रता ढासळते.
– (प.पू.) डॉ. आठवले (७.८.२०१४)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘नामसंकीर्तनयोग’

Leave a Comment