संत भक्तराज महाराज आणि पांडुरंग

पूर्णत्वाला पोहोचलेले संत, म्हणजे सगुणात राहूनही निर्गुणाची सतत अनुभूती घेणारे, सर्वज्ञानी अन् सर्वशक्तीमान असे संत प.पू. श्रीमत् सद्गुरु भक्तराज महाराज हे अशा कोटीतील आहेत. ते स्वतः सत्-चित्-आनंदावस्थेत असल्याने सद्गुरु पदावर विराजमान आहेत. गुरु शिष्यांना साधना करायला सांगतात, तर सद्गुरु शिष्यांकडून साधना करवून घेतात. संत भक्तराज महाराज शिष्यांकडून साधना म्हणजे नामस्मरण करवून घेतात, असा बर्‍याच जणांचा अनुभव आहे. महाराज एकदा त्यांच्या भक्तांसह श्रीक्षेत्र पंढरपूर येथे गेले असतां भक्तांनी तेथे अनुभवलेला एक प्रसंग त्यांचे एक भक्त श्री. बापू जोशी, ठाणे यांनी सांगितला. तो येथे दिला आहे.

संत भक्तराज महाराज आणि पांडुरंग

‘एकदा बाबा (प.पू. भक्तराज महाराज) पंढरपूरला गेले असता आम्ही सगळे मुक्कामाच्या ठिकाणी, म्हणजे होळकर वाड्यावर बसलो होतो. त्या वेळी पांडुरंगाचे पुजारी (बडवे) तेथे येऊन म्हणाले, ‘‘आज गुरुवार आणि एकादशी असल्याने तुमच्या हस्ते पांडुरंगाला हार आणि पेढ्याचा नैवेद्य दाखवावयाचा आहे.’’ तेव्हा बाबा म्हणाले, ‘‘बरं, तुमची इच्छा आहे, तर तसे करू !’’ बडवे म्हणाले, ‘‘पांडुरंगाला भेटायची वेळ रात्री १० वाजता आहे.’’

भक्तांची अनुभूती

मग बडवे म्हणाले, ‘‘आज फराळ करायला आमच्याकडेच या.’’ त्याप्रमाणे आम्ही बडव्यांकडे फराळाला गेलो. फराळ चालू असतांना बडवे आपल्या मुलाला म्हणाले, ‘‘हार आणि पेढ्याचा पुडा घेऊन ये.’’ तेवढ्यात बाबा म्हणाले, ‘‘कशाला घाई करतोस ?’’ बडवे म्हणाले, ‘‘महाराज, साडेआठ वाजता आमच्या येथे सर्व दुकाने बंद होतात, म्हणून मी घाई करतो आहे.’’ तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, ‘‘त्याने जर १० वाजता भेटीची वेळ दिलेली आहे, त्याला जर आपल्या हातून हार घालून घ्यायचा आहे, तर तो दुकान उघडे ठेवील. नाही मिळाली तर आपण खंत वाटून घ्यायची नाही. नुसते हात जोडायचे.’’ बडव्यांच्या घरून आम्ही पावणेदहा वाजता बाहेर पडलो. त्यांच्या घरासमोरच पांडुरंगाचे मंदिर. पावणेदहा वाजता पेढ्याचे आणि हाराचे दुकान उघडे पाहून पुजारी चकितच झाले. पेढ्याची पुडी आणि हार घेऊन आम्ही सर्व देवळात गेलो.

बाबांनी पांडुरंगाला पेढा भरविणे

प.पू. बाबा पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. त्यांच्या बाजूला आम्ही सर्व उभे राहिलो. मग बाबांनी पांडुरंगाच्या गळ्यात हार घातला आणि पेढ्याच्या पुडीतील एक पेढा उचलून पांडुरंगाच्या मुखाला लावला. (तोंडाजवळ नेला़.) तेव्हा अर्धा पेढा एकदम गायब झाला. बाबांचा चेहरा लालबुंद झाला.

बाजूचे बडवे बाबांना म्हणाले, ‘‘अहो शेटजी, असा पेढा पांडुरंगाला लावायचा नसतो.’’ बडव्यांनी सर्व हार दूर केले. तरी त्यांना पेढा कोठेही मिळाला नाही. बाबांनी पांडुरंगाच्या चरणांना स्पर्श केला, तेव्हा त्यांना उजव्या चरणाजवळ अर्धा पेढा मिळाला. तो पेढा बाबांनी आम्हा भक्तांना दिला. तेथून बाबा तडक होळकरांच्या वाड्यात केव्हा गेले, हे आम्हाला कळले नाही. वाड्यावर गेल्यावर बाबा खांबाला टेकून ठेवलेल्या खुर्चीत बसले. त्यांचा चेहरा लालबुंद दिसत होता. ते कोणाशी बोलण्याच्या स्थितीत नव्हते. तरीपण मी जाऊन बाबांना विचारले. तेव्हा त्यांनी हाताने खूण करून ‘भजन करा’, असे सांगितले. आम्ही भजन करायला सुरुवात केली. भजन चालू असतांनाच हुंदके देऊन रडण्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा पहातो, तर बाबांना गहिवरून आले होते. तेव्हा पवारसाहेब म्हणाले, ‘‘आरती करा.’’ त्याप्रमाणे आरती केली. मग बाबा जाऊन झोपले.

प्रसिद्धी परांङमुख संत

नंतर बाबांनी आम्हा भक्तांना सांगितले, ‘‘होळकरांकडे आलेले आनंदाश्रू व दुःखाश्रू होते. आनंदाश्रू अशासाठी की, माझ्या गुरुमाऊलीने प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडविले व मी पांडुरंगाला पेढा भरविला. दुसरे दुःखाश्रू अशासाठी की, पांडुरंगाने पाषाणातून सगुण रूपात येऊन मला दर्शन दिले. परमेश्वराला पाषाणातून प्रत्यक्ष यायला किती कष्ट पडले असतील, या विचाराने दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजताच बरोबरच्या सर्वांना घेऊन बाबांनी पंढरपूर सोडले; कारण त्यांना प्रसिद्धी नको होती.’’

– श्री. बापू जोशी, ठाणे

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’

Leave a Comment