साधक आणि भक्त यांच्यासाठी प्रासादिक ठेवा असलेली प.पू. भक्तराज महाराज यांची चैतन्यमय भजने अन् त्यांचे भावार्थ !

इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) हे सनातन संस्थेचे संस्थापक (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले यांचे गुरु होत. ‘प.पू. भक्तराज महाराज म्हणायचे, ‘भजन हेच माझे जीवन आहे !’ प.पू. बाबांची गुरुसेवेची आत्यंतिक तळमळ, त्यांचा गुरूंविषयीचा अपार भाव, त्यांची अध्यात्मातील शिकवण इत्यादी सारे त्यांच्या भजनांमधून व्यक्त होते. प.पू. बाबांसारख्या उच्च कोटीच्या संतांनी भजने रचली असल्याने ती पुष्कळ चैतन्यदायी आहेत. त्यामुळे या भजनांद्वारे साधक आणि भक्त यांना विविध स्तरांवरील अनुभूतीही येतात; म्हणूनच प.पू. बाबांची भजने म्हणजे, एक अलौकिक, आनंददायी आणि चिरंतन असा ठेवा आहे. साक्षात् परब्रह्मस्वरूप असलेल्या प.पू. बाबांचा सहवास त्यांच्या काही भक्तांना जवळून लाभला. अशाच भक्तांपैकी एक भक्त म्हणजे, कै. चंद्रकांत रामकृष्ण दळवी (दादा दळवी). दादांनी प.पू. बाबांना वेळोवेळी प्रश्न विचारून किंवा प.पू. बाबांनी बोलण्याच्या ओघात केलेल्या विवेचनातून भजनांचे भावार्थ नीट समजून घेतले. दादांनी भावार्थांच्या आशयामध्ये स्वतःच्या लिखाणाची भर घालून, ते सूत्रबद्ध करून, सुगम आणि ओघवत्या भाषेत लिहिले. आज प.पू. बाबांची  २ भजने आणि कै. दादा दळवी यांनी लिहिलेले त्यांचे भावार्थ यांचा प्रासादिक लाभ घेऊया !

तल्लीन होऊन भजने गातांना प.पू. भक्तराज महाराज

चला जाऊ नाथ सदनाला ।

चला जाऊ नाथ सदनाला । साई सदनाला ।
सर्व सौख्याचा लाभ होईल आपणाला ।। धृ. ।।

भावार्थ : चला ! नाथांच्या सदनी, म्हणजे माझे गुरु प.पू. अनंतानंद साईश यांच्या घरी जाऊया. त्यांचे दर्शन झाल्यावर आपल्याला सौख्याचा (आनंदाचा) लाभ निश्चितच होईल.

जिवा शांती नसे हो संसारी । पैशा-अडक्याची दैना घरोघरी ।
बायकापोरांची काळजी परोपरी । दुजा मार्ग नसे हो आपणाला ।
चला वंदूया सद्गुरुचरणाला ।। १ ।।

भावार्थ : संसारात जिवाला शांती नसते. सर्वांना पैशांची अडचण असतेच. मुले, पत्नी इत्यादींची काळजीही मनाला व्यथित करत असते. अशा अडचणींतून बाहेर पडण्याचा मार्गही सापडत नाही. अशा वेळी सद्गुरूंकडे जाऊन त्यांना वंदन करून त्यांच्या चरणांचा आसरा घ्यावा.

गुरुकृपा सागर हा भारी । पतितपावन नामाची थोरी ।
मिटवील जिवाचा घोर हरि । अभय येथे चरणी आलीयाला ।
साई देतील गती देहाला ।। २ ।।

भावार्थ : सद्गुरु कृपेचे सागर आहेत. ते पतितांना पावन करणारे आहेत. हा हरि (सद्गुरु) क्षणात् आपल्या चिंता नाहीशा करील. सद्गुरूंच्या चरणांशी लीन होणार्‍याला अभय मिळेल. सद्गुरूंना शरण आलेल्याच्या देहाला (जिवाला) सद्गती प्राप्त होईल.

आषाढ शुक्ल व्यासपौर्णिमेसी । रतलामग्रामी शिष्यसदनासी ।
मुजुमदार असे सेवेसी । मिळेल सगुण सोहळा पहाण्याला ।
नाथ वसे शिष्यसदनाला ।। ३ ।।

भावार्थ : सद्गुरूंचे दर्शन आषाढ शुक्ल पौर्णिमेला (गुरुपौर्णिमेला) रतलाम (मध्यप्रदेश) येथे त्यांच्या शिष्याच्या घरी घडेल. मुजुमदार (शिष्याचे नाव) सेवेत असतील. सद्गुरु शिष्याच्या घरी मुक्कामाला असतील. तिथेच गुरुपौर्णिमेचा सगुण सोहळा पहायला मिळेल.

ना येणे होईल तुम्हा जरी । चिंतन करा नाम आपुले घरी ।
भक्ता देतील ओळख अंतरी । ऐसा अमोल भक्तीचा झरा ।
नाथ येतील हृदयमंदिरा ।। ४ ।।

भावार्थ : तुम्हाला तिथे येणे जमले नाही, तर घरीच सद्गुरूंचे चिंतन आणि नामस्मरण केले, तरी चालेल. तिथेसुद्धा सद्गुरु भक्ताला अंतरातून ओळख देतील. अमोल भक्तीचा झरा तुम्ही जर सतत वहाता ठेवलात, तर सद्गुरु तुमच्या हृदयात नित्याचे विराजमान होतील.

 

‘जय जय जय जय जय साईनाथा ।’ या भजनाची पार्श्वभूमी

कै. चंद्रकांत दळवी

सद्गुरु ब्रह्मलीन होऊन जवळजवळ २ वर्षे झाली होती. ‘आता ते सगुण रूपात परत कधीही दिसणे शक्य नाही’, हे पूर्णपणे ठाऊक असूनही प.पू. बाबा पुनःपुन्हा सद्गुरूंना आळवत होते. गुरुमाऊली म्हणजे आईच ना ! आपली आई जवळ बसलेली असतांना आपण आपले मोठेपणच काय, पण ‘आपण वडील झालो आहोत’, हेही विसरतो. प.पू. बाबांची परिस्थिती त्याहूनही वाईट होती. ते अनुभवाने समजून चुकले होते, ‘या जगातली सगळी नाती केवळ स्वार्थावर आधारलेली आहेत आणि खरे प्रेम सद्गुरूंविना दुसरे कुणीही देऊ शकत नाही’; पण आता तेही निर्गुणात गेल्यावर सर्व जगच प.पू. बाबांच्या दृष्टीने वैराण (ओसाड) झाले होते. त्यामुळे प.पू. बाबांना प्रेमाचा ओलावा केवळ सद्गुरुमाऊलीच्या आठवणींमध्येच जाणवत होता. सद्गुरूंच्या चरणसेवेचा मेवा प.पू. बाबांच्या स्मृतीरूपी तिजोरीत बंद होता. रहाता राहिले सद्गुरुनाम; परंतु तेही माया उसंत आणि स्वस्थता देईल तेव्हाच ! डिसेंबर १९५९ च्या पूर्वी प.पू. बाबा वेळ मिळेल तेव्हा मनात सद्गुरूंचा जयजयकार करून त्यांना आर्ततेने प्रार्थना करत. तशा अवस्थेतच प.पू. बाबांना ‘जय जय जय जय जय साईनाथा ।’, हे भजन स्फुरले.

 

जय जय जय जय जय साईनाथा ।

जय जय जय जय जय साईनाथा । गुरु साईनाथा ।
दे दर्शन या वत्सा करी कृपा आता ।। धृ. ।।

भावार्थ : साईनाथा (सद्गुरुनाथा), तुमचा जयजयकार असो ! तुम्ही तुमच्या या पोरक्या लेकरावर (माझ्यावर) कृपा करा आणि एकदा तरी सगुण दर्शन द्या !

तू करुणाघन पतित मी निर्धन ।
शरणागतासी होसी तू पावन ।। १ ।।

भावार्थ : सगळे जग अनादि काळापासून जाणत आहे, ‘तुम्ही सर्वाधिक दयावान आहात.’ तुम्हाला हेसुद्धा ठाऊक आहे, ‘मी पापी आहे. पुण्याचे (पापाच्या विरुद्ध अर्थाने शब्द) धन माझ्याजवळ मुळीच नाही. मी तुम्हाला शरण आलो आहे; कारण ‘शरणागताला पावन करणे’, हे तुमचे ब्रीद आहे.’

तू करुणाकर अनाथ मी किंकर ।
करी तव चाकर शिरी ठेवी तव कर ।। २ ।।

भावार्थ : सद्गुरुनाथा, अनाथ किंकर (सेवक) असलेल्या दिनाला (प.पू. बाबांना) पहाताक्षणी तुमच्या मनात करुणा उत्पन्न होते; कारण तुम्ही करुणाकर आहात. मी तर केवळ तुमचा निराधार सेवक आहे.

तू भक्तवत्सल मन माझे चंचल ।
करी कृपा माय-बाप दे भक्ती अचल ।। ३ ।।

भावार्थ : सद्गुरुनाथा, माझे मन फार चंचल आहे. ते माझ्या नियंत्रणात मुळीच नाही; पण तुम्ही भक्तवत्सल आहात. मला तुमच्याविना दुसर्‍या कुणाचाही आधार नाही. माझे माय-बाप तुम्हीच आहात. ‘काहीही झाले, तरी जिला कधीही धक्का लागणार नाही’, अशी अचल भक्ती मला द्या’, ही तुमच्या चरणाशी नम्र प्रार्थना !

 

Leave a Comment