‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग २)’ या सनातनच्या ग्रंथातील भजन अन् त्याचा भावार्थ !

सनातनचा ‘प.पू. भक्तराज महाराजांच्या चैतन्यमय वाणीतून साकारलेली भजने आणि त्यांचे भावार्थ (भाग २)’ हा ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. या ग्रंथातील भजनांच्या भावार्थांचे लिखाण प.पू. भक्तराज महाराज यांचे मुलुंड (मुंबई) येथील भक्त कै. चंद्रकांत (दादा) दळवी आणि त्यांना साहाय्य त्यांची कन्या सौ. उल्का नितीन बगवाडकर यांनी केले आहे. या ग्रंथाचा पहिला भाग प्रकाशित झाला आहे आणि तिसरा भागही प्रकाशित होणार आहे. आज या ग्रंथाच्या भाग २ मधील एक भजन आणि त्याचा भावार्थ येथे देत आहोत.

 

त्रैलोक्याचे योगीराज हे अवतरले भूवरी ।

प.पू. भक्तराज महाराज

भजनाची पार्श्वभूमी

एकदा प.पू. बाबा इंदूर येथून उज्जैन येथे बसमधून प्रवास करत होते. तेव्हा त्यांना पुढील भजन स्फुरले.

त्रैलोक्याचे योगीराज हे अवतरले भूवरी ।
रेखिले रूप हे हृदयांतरी ।। धृ. ।।

भावार्थ

सद्गुरु प.पू. श्री अनंतानंद साईश म्हणजे परब्रह्माचे देहधारी रूप आणि तेच त्रैलोक्याचे योगीराज ! प.पू. बाबांनी जेव्हा त्यांचे दर्शन घेतले, तेव्हा प्रथमदर्शनीच त्यांची प्रतिमा प.पू. बाबांच्या हृदयावर कोरली गेली.

दया-क्षमा-शांती सेजेला ।
षड्रिपू हे दास सेवेला ।
रज-सत्त्व-तमांकित ज्याला ।
अलख हा बाणाचित्तनिरंजन ।
सगुणकांती गोजिरी ।
चरणी वाहे निर्मल गंगाझरी ।। १ ।।

भावार्थ

‘दया, क्षमा आणि शांती’, हा सद्गुरूंचा स्थायीभाव होता, तर षड्रिपू त्यांचे दास (सेवक) होते. सर्वसामान्य तुम्ही-आम्ही षड्रिपूंचे दास असतो आणि मायेच्या आज्ञेप्रमाणे षड्रिपू आपला उपयोग करतात. सत्त्व, रज आणि तम सद्गुरूंच्या अंकित (नियंत्रणात) होते. ‘अलख (ब्रह्म) हा बाणा आणि चित्त निरंजन (अगदी शुद्ध)’, असे सद्गुरु होते. त्यांची कांती, म्हणजे शरीर गोजिरे (सुंदर) होते आणि त्यांच्या चरणांतून जणू निर्मल गंगाजल वहायचे.

भक्तांचा कनवाळू हरि ।
अहर्निश राबे भक्तांघरी ।
चराचर व्यापूनी उरला हरि ।
चंद्र-सूर्य हे नयनी झळकती । (टीप १)
आत्मज्योत अंतरी ।
उभा असे एके चरणावरी ।। २ ।। (टीप २)

भावार्थ

सर्व देव हे परब्रह्माचे (सद्गुरूंचेच) अवतार आहेत; म्हणून प.पू. बाबांनी सद्गुरूंना ‘हरि’ म्हटले आहे. हरि भक्तांचा कनवाळू होता. त्यामुळे तो (विठ्ठल) अहर्निश भक्तांच्या घरी राबायचा. तो चराचर व्यापून उरल्यामुळे सर्व भक्तांच्या घरी या ना त्या रूपात असायचा. त्याच्या (सद्गुरूंच्या) डोळ्यांत चंद्र-सूर्याचे तेज असायचे. सद्गुरु भक्तांचे दोष आणि दुर्गण किंवा पाप सूर्याच्या प्रखर तेजाने जाळायचे अन् चंद्राच्या शीतल प्रकाशाने भक्तांवर प्रेमाचा शिडकावा करायचे. सद्गुरूंच्या अंतरात आत्मज्योत तेवत असायची आणि ते एका चरणावर, म्हणजे नामाच्या आधारावर उभे असायचे.

टीप १ – चंद्र-सूर्य हे नयनी झळकती । : चंद्र म्हणजे शीतलता आणि सूर्य म्हणजे तेज

टीप २ – उभा असे एके चरणावरी । : चरणावर म्हणजे नामावर

‘चंद्र’ इडा नाडीचे प्रतीक आहे. ‘सूर्य’ पिंगला नाडीचे प्रतीक आहे. ‘आत्मज्योत’ सुषुम्ना नाडीचे प्रतीक आहे. शरिरातील या तीन नाड्यांचा संयोग म्हणजे त्रिपुटी झाली. असे होणे हे मुक्ती किंवा मोक्ष स्थितीचे दर्शक आहे.

चला जाऊ पाहू याला ।
हरिकृपे नामदेवे देखिला ।
नामाने देवाला वश केला ।
अशा नामाला हृदयी ठासूनी । सद्गुरुपद हे धरी ।
सदेह दिसेल वैकुंठपुरी ।। ३ ।।

भावार्थ

चला ! आपण त्या योगीराज हरीचे दर्शन घेऊया. हरीच्या कृपेने नामदेवाला (संत नामदेव यांना) हरीचे दर्शन झाले होते. नामदेवाने केवळ नामस्मरणाने देवाला वश केले. आपणही हरीच्या नामाला आपल्या हृदयात ठासून त्याचे (सद्गुरूंचे) चरण धरू. मग आपल्यालाही सदेह वैकुंठाचे दर्शन होईल.

 

ग्रंथ खरेदीसाठी भेट द्या – SanatanShop.com

Leave a Comment