पंढरपूरचे दैवत श्री विठ्ठल

Article also available in :

विठ्ठल Vitthal
श्री विठ्ठल

 

व्युत्पत्ती आणि अर्थ

अ. व्युत्पत्ती

‘डॉ. रा.गो. भांडारकर म्हणतात की, ‘विष्णु’ या संस्कृत शब्दाचे कानडी अपभ्रंश रूप ‘बिट्टि’ असे होते आणि या अपभ्रंशापासून ‘विठ्ठल’ हा शब्द बनला.’

आ. अर्थ

१. विट ± ठल (स्थळ) · विठ्ठल

अर्थ : विटेवर उभा रहातो तो विठ्ठल.

२. विदा ज्ञानेन ठान् अज्ञजनान् लाति गृह्णाति ।

अर्थ : अज्ञ जनांना जो ज्ञानाने स्वीकारतो तो विठ्ठल.

३. ‘विठ्ठल’ याचे दुसरे नाव : पांडुरंग

‘पांडुरंग’ हे धवल शिवाचे नाव आहे. याचेच कानडीत पंडरंगे हे रूप होते; म्हणून पांडुरंग अथवा पंडरंग याचे पूर ते ‘पंढरपूर’ होय, असे डॉ. रा.गो. भांडारकर म्हणतात.

अ. श्री विठ्ठलाची मूर्ती काळ्या रंगाची असूनही त्याला पांडुरंग (पांढर्‍या रंगाचा) हे नाव पडण्यामागील कारणे

अ १. दह्या-दुधाचा अभिषेक केल्यामुळे विठ्ठल पांढर्‍या रंगाचा झाल्याने त्याला ‘पांडुरंग’ म्हणणे

‘श्री विठ्ठल हा माझा अवतार आहे. त्यामुळे दह्या-दुधाने माखल्या गेलेल्या रूपातच मी श्री विठ्ठलाचे रूप धारण केले. शास्त्रे आणि पुराणे यांत श्री विठ्ठलाचा रंग सावळा सांगितलेला असला, तरी अभिषेकामुळे तो पांढरा झाल्याने श्री विठ्ठलाला ‘पांडुरंग’ म्हणतात.’ – श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना दत्ता बुवा पूर्वाश्रमीच्या कु. मेघा नकाते़ यांच्या माध्यमातून, १५.७.२००५, सायंकाळी ७.३५)

अ २. श्री विठ्ठलाची मूर्ती काळ्या रंगाची दिसत असली, तरी खर्‍या भक्‍ताला सूक्ष्म-दर्शनेंद्रियाने ती पांढरीच दिसते. प्रत्येक मासातील (महिन्यातील) दोन एकादश्यांपैकी पहिली श्री विठ्ठलाच्या नावे आणि दुसरी पांडुरंगाच्या नावे करतात.

 

इतिहास

अ. २८ युगे उभा असणे

१. सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि अशा चार युगांचे एक चक्र, म्हणजेच एक फेरा होतो. सध्या पृथ्वीतत्त्वाचा सातवा फेरा चालू आहे. ७ x ४ = २८. सध्या २८ वे युग चालू आहे. विठ्ठल २८ युगांपासून उभाच आहे.

२. ४ वेद, १८ पुराणे आणि ६ शास्त्रे यांची बेरीज २८ असणे आणि त्यांनी पांडुरंगाचे गुणगान करणे : ४ वेद, १८ पुराणे आणि ६ शास्त्रे यांची बेरीज २८ होते; म्हणून विठ्ठल ‘युगे अठ्ठावीस’ उभा आहे; कारण हे सर्व (वेद, पुराणे आणि शास्त्रे) त्याचेच गुणगान करणारी आहेत.’

‘विठ्ठल २८ युगांपासून उभा आहे, असे म्हटले आहे. ‘उभा आहे’, याचा अर्थ विठ्ठल २८ युगांपासून निर्गुण स्वरूपात, म्हणजेच तत्त्वरूपाने कार्यरत आहे. यावरून विठ्ठलाचे अनादित्व लक्षात येते.’

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्री विठ्ठल (उपासनाशास्त्र आणि पंढरपूर माहात्म्य)’

 

पंढरीच्या श्री विठ्ठलमूर्तीनेही भोगला असा वनवास !

१. प्राचीनता

‘पंढरपूर येथील श्री विठ्ठलाची मूर्ती पुष्कळ प्राचीन आहे. ही तिसर्‍या शतकातील उदयगिरी लेण्यातील मूर्तीप्रमाणे दिसते; परंतु संतजन आणि भक्‍तगण यांच्या लाडक्या पंढरीच्या श्री विठ्ठलमूर्तीला अनेकदा वनवासी व्हावे लागले आहे.

२. विजयनगर येथे प्रतिष्ठापना

दक्षिणेतील विजयनगर साम्राज्याचा राजा रामराया याने खिस्ताब्द १६ व्या शतकाच्या मध्यास पंढरपूरची श्री विठ्ठलमूर्ती विजयनगर येथे नेली आणि तेथे श्री विठ्ठलाचे भव्य मंदिर बांधून त्यात मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

३. पंढरपूर येथे पुनर्स्थापना

संत एकनाथांचे पणजोबा भानुदास महाराज यांनी ती मूर्ती विजयनगर येथून पुन्हा पंढरपुरास आणून तिची समारंभपूर्वक मूळ ठिकाणी स्थापना केली.

४. मुसलमानांपासून रक्षण होण्याकरता मूर्ती गुप्त स्थळी हालवणे

दक्षिणेत मुसलमानांचे वर्चस्व चालू झाल्यावर श्री विठ्ठलमूर्ती आक्रमकांच्या हाती लागू नये; म्हणून खिस्ताब्द १६६९ मध्ये ती पंढरपूर येथून हलवून गुप्त स्थळी ठेवण्यात आली. नंतर खिस्ताब्द १६७२ मध्ये आषाढीवारीच्या वेळी मूर्ती ‘काडकुसुंबे’ या गावी न्यावी लागली. ती लपवून ठेवल्यामुळे आक्रमकांच्या हाती लागू शकली नाही.

५. दीर्घकाळ मूर्ती मंदिराच्या बाहेर

खिस्ताब्द १६७५ मध्ये मूर्तीची चोरी झाली. बडव्यांकडून भरपूर रक्कम घेऊन चोरणार्‍याने ती परत दिली. १६९४ ते १७१५ या कालावधीत दीर्घकाळ मूर्ती पंढरपूरच्या बाहेर अज्ञातवासात होती.

६. पंढरपुरात पुनश्च प्रतिष्ठापना

१७१५ मध्ये पंढरपूरच्या मंदिरात ती पुनश्च प्रस्थापित झाली. वर्षभरात राजर्षी शाहू महाराजांनी एका अभयपत्राद्वारे ‘पंढरपूर क्षेत्राला सैन्याकडून उपद्रव होणार नाही’, अशी ग्वाही दिली. त्यानंतर श्री विठ्ठलाच्या मूर्तीला पुनश्च वनवास भोगावा लागला नाही.’

– श्री. रमेश सहस्त्रबुद्धे (श्रीगजानन आशिष, ऑगस्ट २०१०)

 

श्री विठ्ठलाला कुंकू न लावता बुक्का का लावतात ?

कुंकू हे प्रत्यक्ष कार्यरत आदिशक्तीचे प्रतीक आहे. श्री विठ्ठल हे शिवाच्या वैराग्यभावाचे, म्हणजेच साक्षीभावाचे प्रतीक असल्याने त्याला बुक्का लावला जातो. प्रत्येक कर्म अकर्म-कर्मच्या सिद्धांताद्वारे न्याहाळून त्या त्या घटकाला कार्यकारणभावरूपी ऊर्जा प्रदान करून त्यालाही देहबुद्धीच्या पलीकडे नेणे, म्हणजेच शिवत्वाच्या पलीकडे नेणे, हा त्याचा (बुक्क्याचा) स्थायी भाव आहे. शिवत्वाच्या पलीकडे, म्हणजेच पुरुषप्रकृतीच्या पलीकडे नेणे. श्री विठ्ठल हा प्रत्यक्ष कार्यस्वरूप नसून तो कर्मस्वरूपी आहे. सगुणाच्या साहाय्याने निर्गुणाची कास धरून ध्येयाप्रती स्थिरतेत एकत्व साधून साक्षीभावाच्या विश्‍वात रमणार्‍या तत्त्वाचे नाव विठ्ठल आहे. मायेतील आसक्ती त्यागून वैराग्यभावात, म्हणजेच निर्गुणात रमणारा जीवच साक्षीभाव या पदाला पोहोचू शकतो. बुक्का लावल्याने श्री विठ्ठलाच्या मूर्तीत आज्ञाचक्राच्या ठिकाणी सुप्त असणार्‍या साक्षीभावात्मकरूपी वैराग्यलहरी कार्यरत होऊन त्या जिवासाठी स्वतःतील अनाहतचक्राशी सुप्त असणारी क्रियाशक्ती जागृत करून जिवाला मायेत ब्रह्म पहाण्याचे बळ देऊन त्याला मायेपासून विलग करतात. – एक विद्वान

 

श्री विठ्ठलाला करायच्या काही प्रार्थना

१. हे विठ्ठला, तू भक्तीचा भुकेला आहेस. तुझ्या चरणांशी येण्यासाठी तुझी भक्ती तळमळीने कशी करायची, हे तूच मला शिकव, ही तुझ्या चरणी प्रार्थना !

२. हे विठ्ठला, धर्मरक्षण करणे, ही काळानुसार आवश्यक अशी तुझी उपासनाच आहे. त्यासाठी तूच मला भक्ती आणि शक्ती दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !

 

श्री विठ्ठलाच्या उपासनेमागील अध्यात्मशास्त्र

गोपीचंदन आणि तुळस

श्री विठ्ठलाच्या मूर्तीतील श्रीविष्णुतत्त्व जागृत होण्यासाठी मूर्तीला गोपीचंदन लावतात, तर श्रीकृष्णतत्त्व जागृत होण्यासाठी तुळस वहातात. गोपीचंदनामुळे भक्तांची आध्यात्मिक उन्नती होते, तर तुळशीमुळे भावाप्रमाणे चैतन्याची अनुभूतीयेते.

टाळ-मृदुंगांचा गजर

यामुळे श्री विठ्ठलाच्या मूर्तीभोवती असणारी नवग्रहमंडले, नक्षत्रमंडले, तसेच तारकामंडले जागृत होतात अन् त्यांच्या आशीर्वादाने भक्त उद्धरतात.

 

जेव्हा नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर ।

विठ्ठल विठ्ठल गजरी । अवघी दुमदुमली पंढरी ॥

होतो नामाचा गजर । दिंड्या पताकांचा भार ॥

निवृत्ती ज्ञानदेव सोपान । अपार वैष्णव ते जाण ॥  – संत चोखामेळा

 

सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥

पतितपावन मानसमोहन । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥

ध्येय ध्यास ध्यान चित्त निरंजन । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥  – संत ज्ञानेश्वर

 

श्री विठ्ठलाचा अनादर रोखा !

१. प्रसादपुडीतील विठ्ठलाचे चित्र रस्त्यावर टाकू नका !

२. देवतेचे चित्र असलेले उदबत्तीचे पाकीट, मिठाईचा खोका आदी वस्तू वापरानंतर कचर्‍यात टाकू नका !

३. अशा वस्तू वा देवतांची चित्रे रस्त्यावर पडलेली आढळल्यास खालील पेटीत जमा करा !

४. आम्ही त्यांचे विसर्जन करू !

५. देवतांची विटंबना करणे आणि ती होऊ देणे, हे महापापच आहे !

 

श्री विठ्ठलाविषयी अधिक माहिती,

१. श्री विठ्ठलाचे मूर्तीविज्ञान

२. विठ्ठलाची भावपूर्ण गायलेली आरती

Leave a Comment