भजन, भंडारे आणि नामस्मरण यांच्या माध्यमातून अध्यात्म शिकवणारे प.पू. भक्तराज महाराज !

Article also available in :

श्री. अशोक भांड

७.७.२०१९ या दिवसापासून प.पू. भक्तराज महाराज यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे. (७.७.२०१९ हा प.पू. भक्तराज महाराजांचा १००वा जन्मदिन) त्यांच्याच कृपेने प्रेरणा घेऊन सर्व भक्तांनी एकमताने हे वर्ष ‘शताब्दी वर्षा’च्या रूपाने साजरा करण्याचे ठरवले आहे. या अंतर्गत श्री गुरुचरित्र पारायण, नामस्मरण, भजन आणि भंडारा यांचे आयोजन ठिकठिकाणी जिथे जिथे भक्त निवास करतात, त्या ठिकाणी केले जात आहे.

या अंतर्गत भक्तांनी १३ कोटीचा नामजप सद्गुरुचरणी समर्पित करण्याचा संकल्प केला आहे. समर्पित भक्तांद्वारे श्री भक्तवात्सल्याश्रम, इंदौर (मध्यप्रदेश) येथे संपूर्ण वर्षभर ‘श्री गुरुचरित्र पारायण’ करण्याचा संकल्प केला आहे. तो साकार झाला आहे. प.पू. बाबांचे सर्व समर्पित भक्त आपापल्या शहरांत किंवा गावांत सेवा करून या शुभकार्यात आपले अमूल्य योगदान देऊन स्वतःला धन्य समजत आहेत.

या महत्त्वपूर्ण पुण्यकार्यात सहभागी होऊन ‘न भूतो न भविष्यति’ अशा या महान कार्याचे भागीदार आणि साक्षीदार असणारे आम्ही सर्व भक्त अत्यंत भाग्यवान आहोत. ‘सद्गुरु सर्व भक्तांना पुष्कळ शक्ती, भरपूर भक्ती आणि चैतन्य प्रदान करोत. सर्वांची इच्छा पूर्ण होऊ दे’, अशी सद्गुरूंच्या चरणी विनंती आहे.

सर्व शुभेच्छांसहित !’

– एक सेवक,

श्री. अशोक भांड (१०.७.२०१९)

॥ हरि ॐ तत्सत् ॥

 

१. ईश्‍वराने दिलेला दुर्लभ असा मनुष्यजन्म आणि त्याचा उद्देश

१ अ. ‘सर्व योनींमध्ये श्रेष्ठ असलेल्या मनुष्ययोनीत जन्म मिळणे’, हा अनुपम आणि श्रेष्ठ योग असणे

‘या जगात विद्यमान सर्व प्राणीमात्रांत भारतीय शास्त्रानुसार ईश्‍वरप्रदत्त ‘मनुष्ययोनी’ सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे; कारण मानवाला भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचा विचार करण्याची अद्भुत क्षमता देवाने दिली आहे. मानवाच्या बुद्धीमुळे मनुष्ययोनी इतर योनींपासून वेगळी मानली जाते.

मनुष्यदेहाची प्राप्ती हा एक अनुपम आणि श्रेष्ठ योग आहे. मानवी जीवन अनमोल आहे. आपण सर्वार्ंनी या मानवी शरिराचा उपयोग सत्कर्म करण्यासाठी केला पाहिजे. या अमूल्य भेटीसाठी आपण परमेश्‍वराचे सदैव कृतज्ञ असले पाहिजे. जे जीव या अमूल्य जीवनास साधारण समजून व्यर्थ घालवतात, त्यांनी नीट समजून घ्यायला पाहिजे की, ही सामान्य घटना नसून हा अत्यंत असाधारण अद्भुत योग आहे.

१ आ. निःस्वार्थ भावनेने आपले कर्तव्यकर्म करण्यासाठी देवाने मनुष्याला या जगात पाठवलेले असणे

जीवनाचे एक निश्‍चित, निर्धारित लक्ष्य असते. ते जाणून निःस्वार्थ भावनेने आपले कर्तव्यकर्म करण्यासाठी देवाने आपल्याला या जगात पाठवले आहे. पंचमहाभूतांनी निर्मिलेला मानवदेह (शरीर) हे एक अत्यंत अद्भुत आणि कठीण गुह्य आहे. ते समजण्यासाठी अनादि काळापासून पुष्कळ प्रयत्न चालू आहेत, तरीही या प्रगत मानवाला काही प्रमाणातच यश लाभले आहे. सद्सद्विवेकबुद्धीने विचार केल्यास लक्षात येते की, ‘प्राणशक्ती’ शरिराला चेतनावस्थेत ठेवते. ती परम पिता परमेश्‍वर, जो या ब्रह्मांडाचा मालक आहे त्याच्या अस्तित्वाची ओळख पटवून देते. त्याच्या सत्तेने जगातील सर्व घडामोडी होतात. त्याच्या इच्छेविना झाडाचे पानही हलत नाही. ही प्रचंड शक्ती गुप्त रूपात कार्य करत असते.

१ इ. त्यागात खरा आनंद आहे !

जीवनात घेणार्‍यापेक्षा देणारा अधिक बुद्धीमान आणि शक्तीशाली असतो. प्रकृती हे त्यागाचे प्रतीक आहे. त्यागात खरे सुख, आनंद आहे, भोगात नाही. भोग दुःखी जीवनास कारणीभूत ठरतात. त्यागात खरा आनंद दडला आहे, म्हणजे परमेश्‍वर आनंदस्वरूप आहे.

 

२. प.पू. भक्तराज महाराज यांनी भजनपंक्तींद्वारे सांगितलेले सद्गुरूंचे सामर्थ्य !

आपल्या एका भजनात बाबा (प.पू. भक्तराज महाराज) म्हणतात,

आँखे दी जो अंधी । मन में है घोर अंधेरा ॥
वे आत्मचक्षू हमको । रूप देखे हम तिहारा ॥

सद्गुरु प्रकाशपुंज आहेत. त्यांच्याच कृपेने आपण आत्मचक्षु प्राप्त करून त्यांच्या सत्य स्वरूपाला ओळखू शकतो.

 

३. प.पू. भक्तराज महाराज यांचे जीवनचरित्र

३ अ. लहानपणापासूनच हृदयात भक्तीज्योत सदैव तेवत राहिल्याने भजन आणि श्रवण हा आवडता छंद बनणे,
शिक्षण पूर्ण होताच लहान-सहान कामे करून धंदा वाढवणे अन् अनेक दैवी गुणांमुळे लोकांमध्ये आदरभाव असणे

बाबांचा (प.पू. भक्तराज महाराज यांचा) जन्म अत्यंत धार्मिक सामान्य ब्राह्मण प्रतिष्ठित कुळात झाला. श्रीराम हे त्यांचे कुलदैवत ! लहानपणापासूनच भगवत्प्रेमाने त्यांना आकर्षित केले. त्यांच्या हृदयात भक्तीज्योत सदैव तेवत राहिली, परिणामस्वरूप ‘धार्मिक कार्यात सातत्याने भाग घेणे आणि भजन, श्रवण, गरिबांना साहाय्य करणे’, हा त्यांचा आवडता छंद आणि स्वभाव बनला. शिक्षण पूर्ण होताच परिस्थितीवश त्यांनी नोकरी शोधण्याचे काम आरंभ केले.

नोकरी मिळेपर्यंत स्वस्थ न बसता त्यांनी लहान-सहान कामे करून धंदा वाढवला; पण नियतीला हे मान्य नव्हते. ‘कुशाग्र बुद्धी, वाक्पटूता, त्वरित अचूक निर्णय घेणे’, या गुणांमुळे हे बालक असामान्य झाले. यामुळे सगळेच त्यांच्याशी आदरभाव ठेवून वागत असत.

३ आ. ‘श्री गुरुचरित्र’वाचनाचा छंद जडणे आणि प.पू.
श्रीशामसाईबाबांनी साईभक्ती वाढवण्यासाठी मार्गदर्शन करून प्रोत्साहित करणे

त्यांची लहानपणापासूनच धार्मिक आणि आध्यात्मिक साधनेची वृत्ती असल्यामुळे त्यांना ‘श्री गुरुचरित्र’वाचनाचा छंद जडला. विपत्तीकाळातही त्यांची साधना यथागत चालूच होती. त्यामुळे त्यांची गुरुप्राप्तीची ओढ दिवसेंदिवस वाढत गेली. त्याच दरम्यान प.पू. श्रीशामसाईबाबांनी (हे साईबाबांचे शिष्य होते आणि त्यांच्याच आदेशानुसार त्यांच्या मोरटक्का आश्रमात राहून जनसेवा करत होते.) बाबांना साईभक्ती वाढवण्यासाठी मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले.

३ इ. श्री भुरानंद बाबांना ‘स्वामी (श्री अनंतानंद साईश) कोणाशी तरी बोलत आहेत’, असा भास होणे,
त्यांनी झोपडीच्या दाराच्या फटीतून आत डोकावल्यावर त्यांना श्री साईनाथ आणि त्यांचे स्वामी श्री अनंतानंद
साईश बोलत असल्याचे दिसणे अन् श्री साईनाथांनी सांगितल्याप्रमाणे श्री अनंतानंद साईश यांनी इंदौरला जाणे

ज्याप्रमाणे सोनाराला हिर्‍याची अचूक पारख असते, त्याचप्रमाणे गुरूंना सद्शिष्याची पारख असते. श्री भुरानंद बाबांचा (श्री साईशांचे शिष्य यांचा) एक अनुभव असा आहे की, वर्ष १९५६ च्या सुमारास स्वामींनी (श्री अनंतानंद साईश यांनी) एक अनुष्ठान केले. तेव्हा ते नर्मदाकिनारी पू. श्री अवधूत यांच्या कुटीजवळ झोपडीत राहत होते. त्यांची पादसेवा करून श्री भुरानंदबाबा जायला निघाले, तोच ‘स्वामी (श्री अनंतानंद साईश) कोणाशी तरी बोलत आहेत’, असा त्यांना भास झाला. ते दाराच्या फटीतून आत डोकावले. तेव्हा त्यांना दिसले, ‘श्री साईनाथ आणि त्यांचे स्वामी श्री अनंतानंद साईश बोलत आहेत. श्री साईनाथ स्वामींना म्हणाले, ‘मेरी याद इंदौर हो रही है । मुझे इंदौर में ढुंड रहे है । तू और मैं क्या दो है ? इंदौर चले जा ।’

काही दिवसांनंतर इंदौरला आल्यानंतर स्वामी प्रथम हरसिद्धी मंदिराजवळ राहत असलेले मुसलमान फकीर श्री पीरबाबांना भेटले. (श्री पीरबाबा श्री शिर्डी साईनाथांचे शिष्य होते आणि त्यांच्याच आदेशावरून इंदौरला जनकल्याणासाठी वास्तव्य करून होते.) त्यांच्याशी वार्तालाप करून, ओळख पटवून स्वामी पालीवाल धर्मशाळेत (कृष्णपुरा) निघून गेले. श्री साईबाबांच्या स्वरूपात श्री अनंतानंदांना बघून श्री पीरबाबांना श्री गुरु भेटल्याचा आनंद झाला होता.

३ ई. श्री अनंतानंद साईश यांची प्रथम भेट

३ ई १. प.पू. भक्तराज महाराज श्री सत्यनारायण कथेच्या आमंत्रितांची सूची बनवत असतांना त्यांच्या मित्राच्या मुलीने ‘साईबाबांना नाही बोलावणार का ?’, असे विचारल्यावर ‘कोणत्यातरी मुसलमान फकिराला भोजन देऊनच उपवास सोडूया’, असे त्यांनी ठरवणे

प.पू. बाबा त्यांचे आवडते प्रिय मित्र श्री. हरिभाऊ लांभाते यांच्यासह श्री सत्यनारायण कथेच्या आमंत्रितांची सूची बनवून वाचत होते. जवळच खेळत असलेली त्यांची ६ – ७ वर्षांची मुलगी (माया) म्हणाली, ‘‘काका, आपण सर्वांची नावे लिहिली; परंतु एवढे मोठे साईभक्त असूनही तुम्ही साईबाबांना नाही बोलावणार ?’’ हे शब्द बाबांच्या अंतर्मनाला भिडले. ते म्हणाले, ‘‘बाळा, साईबाबांना अवश्य बोलवू हं !’’ तेव्हा दोन्ही मित्रांनी ठरवले, ‘कोणत्यातरी मुसलमान फकिराला भोजन देऊनच उपवास सोडूया.’

३ ई २. श्री सत्यनारायण पूजेच्या नैवेद्याची थाळी घेऊन पू. पीरबाबांजवळ आल्यावर त्यांनी खाण्यास नकार देऊन पालीवाल धर्मशाळेत जाण्यास सांगणे, त्याप्रमाणे तेथे गेल्यावर स्वामींना नैवेद्य ग्रहण करण्याची विनंती करणे आणि स्वामींनी नैवैद्याच्या ताटातून कढी अन् बेसनचक्की स्वीकारून प्रत्यक्ष साई असल्याचा शुभ संकेत देणे

९.२.१९५६ या दिवशी बाबा आणि त्यांचे घनिष्ठ मित्र श्री. दत्तात्रय जोशी (वैद्यराज) यांच्याद्वारा स्थापित ‘सुनंदा फार्मसी’च्या प्रथम उद्घाटनाच्या वेळी श्री सत्यनारायण पूजेच्या नैवेद्याची थाळी घेऊन ते पू. पीरबाबांच्या जवळ आले. पू. पीरबाबा त्यांना म्हणाले, ‘‘मैंने तो रोजा अख्तियार कर लिया है, अब मैं नहीं खाऊँगा ।’’ पू. पीरबाबांनी त्यांच्याकडे येण्याचे कारण जाणून घेतले आणि त्यांना पालीवाल धर्मशाळेत जाण्यास सांगितले. ते म्हणाले, ‘‘वहाँ जो संत मिलेंगे, मानो वह असली साई है ।’’ तेव्हा सर्व जण ताट घेऊन लगबगीने पालीवाल धर्मशाळेत पोचले. रात्र झाली होती. धर्मशाळेच्या हनुमान मंदिराच्या ओट्यावर स्वामी अंधारात पहुडलेे होते. बाबांनी त्यांना कळकळून करबद्ध विनंती करून त्यांच्या पुढे नैवैद्याचे ताट आणले.

आधी नकार देत स्वामी म्हणाले, ‘‘मी संन्यासी आहे. एकदाच जेवतो.’’ बाबांचे प्राण कंठाशी आले; पण एकंदरित खुलासा होताच त्यांनी नैवैद्याच्या ताटातून कढी आणि बेसनचक्की स्वीकारून (हे दोन्ही पदार्थ श्री साईबाबांनाही प्रिय होते.) स्वामींनी प्रत्यक्ष साई असल्याचा शुभ संकेत दिला.

३ ई ३. प.पू. बाबांनी अंतःकरणापासून कृतज्ञता व्यक्त करत स्वामींच्या पायांवर डोके टेकवल्यावर ‘बेटा दिनू, मैं तेरे लिए ही आया हूँ ।’, असे म्हणणे, ते ऐकताच प.पू. बाबा ढसाढसा रडू लागणे, त्या वेळी श्री साईशांनी प.पू. बाबांना कवटाळून जागृत करणे

निघण्यापूर्वी बाबांनी मौनावस्थेत अंतःकरणापासून कृतज्ञता व्यक्त करत स्वामींच्या पायांवर डोके टेकवले. स्वामींना संपूर्ण शरणागतीचा संकेत मिळाला. दिनूच्या पाठीवरून हात फिरवत ते म्हणाले, ‘‘बेटा दिनू (बाबा), मैं तेरे लिए ही आया हूँ ।’’ हे ऐकताच बाबा ढसाढसा रडत श्री चरणांवर अश्रूसिंचन करू लागले. तेव्हा श्री साईशांनी त्यांना कवटाळले आणि जागृत केले. तोपर्यंत बाबांची पूर्ण शरणागती झाली होती.

३ उ. ९.२.१९५६ या दिवशी दिनूच्या कठीण साधनेची सांगता होणे, तेव्हापासून प्रतिवर्षी हा दिवस
‘प्रकटदिन’ या रूपात साजरा केला जाणे आणि त्यानंतर प.पू. बाबांनी सर्वकाही विसरून सद्गुरूंची सेवा करणे

९.२.१९५६ या दिवशी दिनूच्या कठीण साधनेची सांगता झाली. तेव्हापासून प्रतिवर्षी हा दिवस ‘प्रकटदिन’ या रूपात मोठ्या थाटात साजरा केला जातो. त्या दिवसापासून १ वर्ष १० मास बाबा सगुण सहवासात सद्गुरूंच्या सेवेत मग्न होते. ते इतरांना काय; पण स्वतःलाही विसरले. त्यांचे नातेवाईक, मित्र, कुटुंबीय इत्यादी सर्व दुरावले. केवळ आणि केवळ ‘गुरुसेवा’ हाच त्यांच्या जीवनाचा उद्देश राहिला.

३ ऊ. श्री अनंतानंद साईश यांनी प.पू. बाबांना गुरुमंत्र देणे

१५.२.१९५६ या दिवशी श्री अनंतानंद साईश यांनी बाबांना नर्मदामैय्याच्या साक्षीने गुरुमंत्र दिला. त्यानंतर त्यांचे गुरु श्री प.पू. चंद्रशेखरानंद स्वामींच्या पादुकांचे दर्शन घडवले. तिथून स्वामी सर्वांना ओंकारेश्‍वर महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी घेऊन गेले. रात्री मुक्कामास श्री शामसाई सदनास (मोरटक्का येथे) आले.

३ ए. प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘बाप माझा हो ज्ञानवंत…’ हे भजन सद्गुरु श्री साईशांच्या चरणी
अर्पण केल्यावर स्वामींनी अतीप्रसन्न होऊन दिनूला ‘भक्तराज’ या उपाधीने अलंकृत करणे, त्यानंतर
प.पू. बाबांना अनेक मराठी आणि हिंदी भजने सुचू लागणे आणि त्यांनी ती भजने सद्गुरूंना म्हणून दाखवणे

१६.२.१९५६ या दिवशी पहाटे प्रथम प्रहरी सद्गुरूंसाठी चुलीवर पाणी तापवतांना सद्गुरुकृपेने त्यांच्या जिव्हेवर सरस्वतीमाता प्रगट झाली. त्यांच्या श्रीमुखातून ‘बाप माझा हो ज्ञानवंत…’ हे भजन सद्गुरु श्री साईशांच्या चरणी अर्पण झाले. ते ऐकून स्वामी अतीप्रसन्न झाले. त्यांनी लगेच बाबांना ‘भक्तराज’ या उपाधीने अलंकृत केले. यानंतर भजनांचा जणू झराच वाहू लागला. प्रतिदिन नवीन भजनांचा उदय होत असे. बाबा भजन लिहून चाल लावून सद्गुरूंसमोर उभे राहून टाळ्या वाजवत भजन म्हणत असत. माऊली लक्ष देत भजन ऐकत असे. शब्द अथवा चाल चुकल्यास ते सुधारून देत. श्रीमुखातून अनेक वेळा भजन झाल्यामुळे भजनांना सिद्धमंत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भजनांचा प्रवाह निरंतर चालू राहिला. दरम्यान बाबांनी अनेक मराठी आणि हिंदी भजने लिहिली.

३ ऐ. श्री साईश यांनी भक्तांच्या घरी भजन आणि भंडारा करून अन्नदानाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवणे

श्री साईश यांना जे कोणी भक्त आग्रहपूर्वक घरी बोलावत, तेथे पूजा-अर्चनानंतर बाबांचे भजन गायले जायचे. त्यानंतर भंडारा होत असे. ‘नामस्मरण आणि अन्नदान’ यांचे या कलियुगात किती महत्त्व आहे !’, हे यातून लक्षात येते. श्री साईश भगवानांच्या जीवनात भंडार्‍याचे (अन्नदानाचे) आत्यंतिक महत्त्व राहिले आहे. त्यांनी अनेक भंडार्‍यांचे आयोजन करून आपल्या क्षेत्रात अन्नदान करण्याच्या महानतेची ओळख करून दिली. त्यांच्या या देणगीला नर्मदातटावर निवास करणारे, तसेच परिक्रमा करणारे चांगल्या प्रकारे जाणतात.

३ ओ. श्री साईश यांच्या दर्शनाला परगावातूनही भक्त आणि भाविक येणे आणि प.पू.
बाबांचे भजन ऐकल्यावर मायदेशी अन् परदेशी भक्तांच्या अंतःकरणात भाव जागृत होणे

श्री साईशांची ख्याती वाढत होती. ते ‘साईबाबा’ म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांच्या दर्शनाला परगावातूनही भक्त आणि भाविक यायचे. श्री साईशांचे दर्शन घेऊन ते स्वतःला धन्य समजत. बाबांच्या भजनाचे आकर्षण आणि सामर्थ्य इतके होते की, एकदा त्यांचे भजन ऐकल्यावर भक्त शरण आलाच म्हणून समजा. भाषेचे बंधनही गळून पडते. ज्या भक्ताच्या अंतःकरणात भाव जागृत होतात, त्याला भजन समजू लागते. त्याचे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे आश्रमात दर्शनाला येणारे (मराठी आणि हिंदी दोन्ही भाषा न समजणारे) मायदेशी आणि परदेशी भक्त, ज्यांचा आश्रमाशी अथवा भक्तांशी काहीही संबंध नाही.

३ औ. श्री अनंतानंद साईश यांचे महानिर्वाण

अवतारी संत त्यांचे कार्य पूर्ण होताच पुढील कार्यासाठी विनाविलंब निघून जातात. ते मायेत कधीच गुंतत नाहीत. ते तत्त्वाशी जोडलेले असतात. त्यांना कशाचेही बंधन नसते. वर्ष १९५७ मध्ये डिसेंबर मासात श्री दत्तजयंतीच्या दिवशी भक्तांना आशीर्वाद देत रतलामहून ते आगगाडीने आमेट मायगावी (जिल्हा राजसंमुद, राजस्थान) निघून गेले. १२ डिसेंबरला ते अनंतात विलीन झाले.

३ औ १. गुरूंच्या महानिर्वाणाचे वृत्त कळताच प.पू. बाबांना जीवन अंधःकारमय, आधारशून्य आणि निरर्थक वाटू लागणे, श्री साईशांनी त्यांच्या अंतर्मनात प्रवेश करून ‘चल उठ भजन कर ।’, असे म्हटल्यावर प.पू. बाबांनी हातात खंजिरी घेऊन रात्रं-दिवस निरंतर भजन करणे आणि ३८ वर्षांहून अधिक काळ भजन, भ्रमण आणि भंडारा ही त्रिसूत्री राबवणे

श्री अनंतानंद साईश यांच्या महानिर्वाणाचे वृत्त कळताच सर्व स्तब्ध झाले. प.पू. बाबा तर देहभान विसरले. त्यांना आपले जीवन अंधःकारमय, आधारशून्य आणि निरर्थक वाटू लागले, जणू सर्वच हरपले आहे. श्री साईशांनी त्यांच्या अंतर्मनात प्रवेश करून म्हटले, ‘क्या मैने तुझे यही सिखाया, चल उठ भजन कर ।’ तेव्हा प.पू. बाबा चिरनिद्रेतून जागे झाले. त्या दिवसापासून हातात खंजिरी घेऊन प.पू. बाबा रात्रं-दिवस निरंतर भजन करत राहिले. भजन, भ्रमण आणि भंडारा हा त्रिसूत्री कार्यक्रम त्यांच्या कष्टमय जीवनाची रूपरेषा बनली. ३८ वर्षांहून अधिक काळ हे कार्य निरंतर चालू होते. भक्त जुळले आणि आज संच उभा आहे. ही जादू आजही कायम आहे आणि भविष्यातही राहील, यात शंका नाही; कारण या ईश्‍वरी शक्तीने प्रचंड रूप घेतले आहे.

३ अं. प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांतील सामर्थ्य

आलम दुनिया भजनाने वेडी झाली आहे. एका स्त्रीभक्ताने आपल्या भजनात याबद्दल स्पष्ट लिहिले आहे,

भजन की नसीहतों (शिकवण) का, ऐसा असर है ।
जिसको लगी हवा, वो कुरबान हो गए ।
बड़ी मुद्दतो (पुष्कळ प्रयत्नांनी) में बाबा भक्तराज मिले ॥

असे सद्गुरु आपणांस लाभले, हे आपले सौभाग्य ! बाबांच्या भजनात अदम्य चेतनाशक्ती भरली आहे, जी भजनप्रिय भक्तांना वेडे करून सोडते. त्यांच्या भजनाचा प्रभाव चित्तावर पडत असल्यामुळे भक्त गुरुतत्वाशी एकरूप होऊन स्वत:चे देहभान पार विसरून जातो आणि त्या अलौकिक जगात वावरतो, जिथे सर्वत्र आनंद पसरला आहे. बाबा म्हणतात, ‘‘भजन म्हणजे भज + मन. म्हणजे जो सद्भक्त चित्त (मन) एकाग्र करून परमेश्‍वराचे स्मरण करील, तोच भजनाचा आनंद घेऊ शकतो. जो भजनांचे श्रवण, मनन, चिंतन आणि मंथन करील, तो भजनात आनंद प्राप्त करील.’’ असे अनेक सद्भक्त आहेत, ज्यांना भजनात आत्मसाक्षात्कार झाला, तर काहींना साक्षात् परमेश्‍वराचे दर्शन घडले. अनेक भक्तांना त्यांच्या कृपेने भजने स्फुरली, जी अत्यंत भावपूर्ण आणि प्रेरणादायक आहेत.

बाबांच्या भजनात रामायण, महाभारत, गीता, वेद-वेदांत, उपनिषद् इत्यादी सर्व धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रंथांचे सार आहे. साधनारत साधकांना तर त्यांच्या मार्गावर येणार्‍या प्रत्येक प्रश्‍नाचे निश्‍चित उत्तर भजनातून मिळते. श्री अनंतानंद साईशांनी बाबांना म्हटले होते, ‘‘भजन ही सब कुछ है ।’’ म्हणजे भजने ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि भक्तीपूर्ण असून ती सत्-चित्-आनंद प्राप्त करून देण्यास पूर्णपणे समर्थ आहेत. याच भजनांद्वारे प.पू. बाबांनी अनेक भक्तांना भक्तीमार्गावर प्रशस्त केले आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सतत आनंद दरवळतो आहे. बाबांच्या भजनांत अध्यात्मशास्त्रातील कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग, शक्तीपातयोग इत्यादी सर्व योगांचे सार आहे; म्हणूनच भजनातून सत्-चित्-आनंदाची सतत अनुभूती होते. भक्तांसाठी तर ‘जिथे भजन तिथे भक्तराज’, म्हणजे ‘भजन = भक्तराज’, हे समीकरण बनले, तात्पर्य भजनातच सद्गुरु भक्तराज माऊली पावते.

३ क. प.पू. बाबांनी ‘भजनासह भंडारा’ ही गुरुपरंपरा अखंड राबवणे आणि भक्तांना अन्नदानाचे महत्त्व पटवून देणे

‘भजनासह भंडारा’ ही गुरुपरंपरा बाबांनी अखंड राबवली आणि आजही ती मोठ्या उत्साहाने अन् आनंदाने साजरी केली जात आहे. प.पू. सद्गुरु भक्तराज महाराज जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त भारतात सर्वत्र भंडारे, भजन आणि नामस्मरण आयोजित होत आहे. यावरून ‘भजन, अन्नदान आणि नामस्मरण यांचे किती असाधारण महत्त्व भारतीय संस्कृतीत आहे’, हे सर्व जगाला समजून येईल. बाबा सांगत असत, ‘‘अन्नदान हे श्रेष्ठ दान होय. गरीब आणि दरिद्री यांना तृप्तीभोज करवून त्यांच्या तृप्त आत्म्यापासून जो आशीर्वाद मिळतो, तो अत्यंत फलदायी असतो. अन्न हे पूर्ण ब्रह्म होय; म्हणूनच अन्नदानाची एकही संधी सोडू नका, निदान त्यात अंशदान तरी करावे.’’

३ ख. प.पू. बाबांनी उज्जैनच्या क्षिप्रा नदीच्या काठी,
रामघाटावर चालू केलेला आणि आताही होत असलेला ‘दरिद्र नारायण भंडारा’ !

‘कलियुगी धर्म हा कोसांतरी’, असे बाबांनी भजनात म्हटले आहे. खरोखरच या कलियुगात काही भारतीय आपल्या संस्कृतीपासून दूर होत आहेत. अशा लोकांची समजूत घालणे आवश्यक आहे. ते समाजकार्य समजून करावे. अशा अनेक गोष्टी मनी-ध्यानी ठेवून बाबांनी ‘दरिद्र नारायण भंडारा’ उज्जैनच्या क्षिप्रा नदीच्या काठी, रामघाटावर चालू केला. स्वतः बाबा भंडार्‍यात दरिद्री नारायणांच्या समवेत बसून प्रसाद ग्रहण करत असत. तेव्हापासून दिवाळीत हा भंडारा नियमित आयोजित केला जातो. रामघाटापासून श्री महाकालेश्‍वर मंदिरापर्यंत जितके दरिद्री नारायण सापडतील त्या सर्वांना, येतील त्या भक्तांना आणि पाचारण करणार्‍या साधू-संतांना आणि येईल त्या भक्ताला तृप्तीभोज करविले जाते. प्रसादात भोपळा आणि चवळी यांची एकत्रित भाजी, पुरी आणि गोड सांजा असतो. आधी सद्गुरूंना नैवैद्य अर्पण होतो आणि नंतर सर्वत्र प्रसादाचे वाटप होते. उत्साही आणि तरुण भक्त हातगाडीत भंडार्‍याचा प्रसाद ठेवून त्याचे जागोजागी वाटप करतात. दरम्यान बाकी जमलेले भक्त भजन करतात. वाटप करून आल्यानंतर उरलेल्या प्रसादात भक्त भोजन-प्रसाद घेतात. त्यातूनही उरलेला प्रसाद ठिकठिकाणी आश्रमात वाटला जातो. या भंडार्‍याने आता फारच व्यापक रूप घेतले आहे. बाबा तर आपल्या भक्तांना आधीपासूनच सांगत आहेत,

गांठ मे पैसा, धान की गठडी । होवेना जो भी साथ ॥
प्रेम का प्यासा है मेरा प्रभु । लाओजी अपने साथ ॥
आवोजी आवो साई के दरबार ॥

माझ्या सर्व भक्त-बांधवांना माझी कळवळीची विनंती आहे की, बाबांच्या कोणत्याही शिकवणीला सहज घेऊ नका. प्रत्येक शिकवण जीवात्म्याच्या कल्याणासाठी असून भजनांच्या माध्यमातून ती अत्यंत परीपूर्ण रितीने मांडली आहे. या मागचा हेतू केवळ जनकल्याण हा आहे. आपणही आपल्या जीवनाचे सार्थक करून घेऊया !

३ ग. भगवंतप्राप्तीचा कलियुगातील सरळ आणि साधा मार्ग म्हणजे नामस्मरण !

नामस्मरणाचे महत्त्व सर्व साधू-संत आपापल्या मतानुसार समजावतात; पण बाबांनी आपल्या भक्तांसाठी या कलियुगाच्या परिस्थितीनुसार दूरदृष्टी ठेवून अत्यंत सरळ, साधा, सुविधाजनक, उपयुक्त आणि अनुकरणीय मार्ग दाखवला आहे. त्यानुसार त्यांचा भक्त परिस्थितीनुसार कधीही आणि कुठेही परमेश्‍वराचे (इष्टदेवतेचे) अथवा गुरूने दिलेले ‘नाम’ घेऊ शकतो.

३ ग १. अनुभूती – नोकरी करतांना सतत नामस्मरण केल्याने स्वतःची आणि कामगारांची कार्यक्षमता अन् एकाग्रता वाढणे, कामाचा ताण न्यून होणे, कंपनीचे उत्पादन आणि त्याची गुणवत्ता वाढल्यामुळे वार्षिक उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक होऊन लाभही (नफाही) अधिक होणे

मी नोकरी करत असतांना बाबांच्या कृपेने माझे ‘नामस्मरण’ सतत चालू असे. त्याचा सकारात्मक परिणाम माझ्यावर आणि माझ्या हाताखाली कार्यरत कर्मचार्‍यांवर अन् त्यांच्या कामावर असा झाला की, त्यांची कार्यक्षमता आणि एकाग्रता वाढली, तसेच वातावरणातील प्रसन्नता वाढली. त्यामुळे कामाचा ताण न्यून झाला. काम व्यवस्थित आणि उत्कृष्ट रितीने वेळेवर होत असे. मला आणि कामगारांना थकवा जाणवत नसे. परिणामस्वरूप कंपनीचे उत्पादन आणि त्याची गुणवत्ता वाढल्यामुळे वार्षिक उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक होऊन लाभही (नफाही) अधिक होई. त्यामुळे कंपनीतील वातावरणही सर्वांना पोषक असे. सर्व कामे दडपण न येता सुरळीत चालत. त्यामुळे ३८ वर्षे खासगी क्षेत्रात काम करूनही मला कामाचा ताण कधी जाणवला नाही. कोणतीही अप्रिय घटना न घडता मी नोकरीचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो, हे केवळ गुरुकृपेमुळेच ! ‘नामात अगम्य शक्ती आहे’, याचे हे स्पष्ट उदाहरण होय; म्हणूनच तर बाबा आपल्या भजनात स्पष्टपणे सांगतात,

नामची दीनाचा आधार । साधूनी नेईल आपणा पार ॥

म्हणूनच अगत्याने सांगतो, ‘नामाची कास धरा आणि जीवनाचे सार्थक करून घ्या. आतातरी बाबाच स्मरण करण्यास ‘नको रे दवडू क्षण साचा । रंगू दे नाम ही वाचा ॥’, म्हणजे ‘वेळ न घालवता नामस्मरणास लागा. नामच संसाररूपी चिखल तरण्यास कामी पडणार’, अशी ग्वाही सद्गुरु देत आहेत’, हे सत्य होय.

क्षणही हा एक मोलाचा । बोल हा सत्य दीनाचा ॥

नामाचा महिमा असा की, त्यामुळे मनाचे विकार दूर होऊन अंतःकरण शुद्ध होते, जे परमेश्‍वराचे स्वरूप सद्गुरूंना हृदयात विराजमान करण्यासाठी अती आवश्यक आहे.

 

४. सद्गुरूंचा सत्संग, मार्गदर्शन आणि त्यांची सेवा
करण्याची संधी मिळाल्याविषयी त्यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

सद्गुरुकृपेमुळेच मला जीव (बाबा आणि दादा) + शिव (श्री अनंतानंद साईश) मीलनाचा अविस्मरणीय, अद्भुत संगम पाहण्याची संधी मिळाली, हे माझे सौभाग्य ! याचसमवेत त्यांच्यासह तीर्थाटन झाले. सत्संग आणि भजन यांचा मला आनंद लुटता आला. मला त्यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. त्यांची सेवा करण्याची अल्पशी संधी मिळाली, ज्यामुळे माझ्या जीवनाची दशा आणि दिशा पार पालटून गेली. अज्ञानतेचे ज्ञान करवून, आध्यात्मिक जगाची सुंदर यात्रा करवून, सत्य दर्शन घडवून त्यांनी माझ्या आयुष्यात आनंदीआनंद भरून दिला आणि मला सत्यपथावर चालण्याचे बळ दिले. आपल्या आदर्शानुसार जगल्याने मी शांत, समाधानी, निर्भय आणि आनंदमय जीवन जगत आहे. आपण मला अपेक्षेपेक्षा कितीतरी पटींनी अधिक देऊन नेहमीसाठी ऋणी बनवले, जे ऋण फिटणे अशक्य होय. आजही पावलोपावली हेच घडत आहे; म्हणूनच मीपण हेच ठरवले आहे की, मी नेहमीसाठी ‘आपला दास’ म्हणून आपली सर्वतोपरी सेवा करीन. ‘माझा हा संकल्प आपण निश्‍चितच पूर्ण कराल’, याची मला निश्‍चिती आहे.

‘अमोल चीज जो दी गुरुने । न दे सके भगवान भी ॥’

आपल्या कृपेने या अज्ञानी बालकाने जे रेखाटले, ते आपल्या चरणी अर्पण !

॥ हरि ॐ तत्सत् ॥’

– आपला सेवक,

श्री. अशोक भांड (३०.३.२०१९)

Leave a Comment