काही पंचांगांच्या मते हनुमान जन्म तिथी आश्विन वद्य चतुर्दशी आहे, तर काहींच्या मते चैत्र शुद्ध पौर्णिमा आहे. महाराष्ट्रातील हनुमान जयंती चैत्र पौर्णिमेला साजरी होते. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला प्रारंभ करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते आणि सर्वांना प्रसाद वाटला जातो.
हनुमान जयंतीला अन्य दिवसांच्या तुलनेत १ सहस्रपटीने मारुति-तत्त्व कार्यरत असते. त्याचा उपासकाला सर्वाधिक लाभ होण्यासाठी येथे मारुतीचा पूजाविधी, त्यासाठी आवश्यक साहित्य, पूजकाची सिद्धता; मारुतीच्या जन्माचा इतिहास, त्याच्या उपासनेमुळे होणारे लाभ आदींसह अध्यात्मशास्त्रीय माहिती; मारुति-तत्त्व आकृष्ट करणारी रांगोळी; तसेच मारुतीची आरती, मारुतिस्तोत्र, हनुमानाचा भावपूर्ण नामजप आदींचे ध्वनीमुद्रणही (ऑडिओ) येथे उपलब्ध आहे.


हनुमान जन्माचा इतिहास
राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी ‘पुत्रकामेष्टी यज्ञ’ केला. तेव्हा यज्ञातून अग्निदेव प्रगट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस (खीर, यज्ञातील अवशिष्ट प्रसाद) प्रदान केला होता. दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणार्या अंजनीलाही पायस मिळाले होते आणि त्यामुळेच मारुतीचा जन्म झाला होता. त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. तो दिवस ‘हनुमान जयंती’ म्हणून साजरा करतात.
हनुमान हे मारुतीचे दुसरे सर्वपरिचित नाव आहे. हनुमान हा सर्वशक्तीमान, महापराक्रमी, महाधैर्यवान, सर्वोत्कृष्ट भक्त आणि संगीतशास्त्राचा प्रर्वतक म्हणूनही प्रसिद्ध आहे. भाव, भक्ती, शक्ती आणि युक्ती आणि बुद्धी असे जीवनाला परिपूर्ण करणारे जे जे आहे, त्या त्या सर्वांचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे हनुमान.
वाल्मीकिरामायणात (किष्किंधाकांड, सर्ग ६६) पुढीलप्रमाणे हनुमानाची जन्मकथा दिली आहे – अंजनीच्या पोटी हनुमान जन्मला. जन्म झाल्यावर ‘उगवणारे सूर्यबिंब हे एखादे पक्व फळ असावे’, या समजुतीने हनुमानाने आकाशात उड्डाण करून त्याकडे झेप घेतली. त्या दिवशी पर्वतिथी असल्यामुळे सूर्याला गिळण्यासाठी राहु आला होता. सूर्याकडे झेपावणारा हनुमान हा दुसरा राहुच आहे, या समजुतीने इंद्राने त्याच्यावर वज्र फेकले. ते हनुवटीला लागून ती छाटली गेली. यावरून त्याला ‘हनुमान’ हे नाव पडले.
हनुमान जयंती पूजाविधी

पूजा करतांना ती भावपूर्ण व्हावी आणि हनुमंताची कृपा व्हावी, या हेतूने हनुमान जयंती या दिवशी करायचा पूजाविधी येथे सविस्तर दिला आहे. संपूर्ण हनुमानाचे पूजन जाणून घेण्यासाठी…
हनुमानाची उपासना कशी करावी ?
महाराष्ट्रात शनिवार, तर उर्वरित भारतात शनिवार आणि मंगळवार हे मारुतीचे वार मानले जातात. या दिवशी मारुतीला शेंदूर आणि तेल अर्पण करण्याची प्रथा आहे. मारुतीला नारळ फोडण्याची रुढीही पूर्वापार चालत आलेली आढळते. आध्यात्मिक उन्नतीसाठी उपासना म्हणून वाममुखी (डावीकडे तोंड असलेला) मारुति किंवा दासमारुति पूजेत ठेवतात.
हनुमानाचा नामजप अधिकाधिक करा !
देवतेच्या विविध उपासनांपैकी कलियुगातील सर्वांत श्रेष्ठ, सोपी, सुलभ आणि देवतेशी सतत अनुसंधान साधून देऊ शकणारी अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेचा नामजप. देवतेच्या नामजपाने देवतेचे तत्त्व जास्तीतजास्त ग्रहण होण्यासाठी, नामजपाचा उच्चार अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य करणे आवश्यक असते. हनुमान जयंती या दिवशी हनुमान-तत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. त्याचा लाभ घेण्यासाठी या दिवशी मारुतीचा ‘श्री हनुमते नम: ।’ हा जप अधिकाधिक करावा.
आता आपण साधकांनी सात्त्विक पद्धतीने म्हटलेला नामजप ऐकत त्या समवेत जप करूया.

अक्षर सात्त्विक असल्यास त्यात चैतन्य असते. सात्त्विक अक्षरे आणि त्यांच्या भोवती देवतेच्या तत्त्वाला अनुरूप अशी चौकट यांचा अभ्यास करून सनातनने भगवान हनुमानाची नामजप पट्टी बनवली आहे. ही नामजप पट्टी बघत भक्त नामजप करू शकतात.
मारुतीची आरती
आरती लयबद्ध पद्धतीने म्हणण्याने आपल्यात जलद भावजागृती होण्यास साहाय्य होते. आरतीचा अर्थ समजून ती म्हटली, तर त्याचा अधिक लाभ होतो. ‘सनातन’च्या भाव असलेल्या म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे. आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल. ही आरती ऐकण्याने अन् तशा पद्धतीने म्हणण्याने आपल्यातही जलद भावजागृती होण्यास साहाय्य होईल.
तर ऐकूया, सनातनच्या साधकांनी गायलेली मारुतीची आरती ….
मारुतिस्तोत्र
स्तोत्र’ म्हणजे देवतेचे स्तवन, म्हणजेच देवतेची स्तुती होय. स्तोत्रपठण केल्याने पठण करणार्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षक-कवच निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण होते. ज्या वेळी ठराविक लयीत अन् सुरात एखादे स्तोत्र म्हटले जाते, त्या वेळी त्या स्तोत्रातून एक विशिष्ट चैतन्यदायी शक्ती निर्माण होते. बहुतांश स्त्रोत्र संतांनी लिहिलेली असल्याने त्यात चैतन्य आहेच आणि त्या चैतन्याचा लाभ ते म्हणणार्याला होतो. असेच चैतन्यमय स्त्रोत्र असलेले मारुतीस्त्रोत्र एकूया. समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेल्या मारुतिस्तोत्रात ते विविध नावांनी मारुतीच्या रूपाचे वर्णन आणि त्याची स्तुती करतात. स्तोत्रातील आरंभीचे तेरा श्लोक मारुतीच्या स्तुतीपर अन् वर्णनपर आहेत, तर नंतरचे चार श्लोक स्तोत्रपठणाच्या फलश्रुतीचे आहेत.
मारुतीला शेंदूर, रुईची पाने-फुले वाहा !

ज्या वस्तूंमध्ये देवतेची पवित्रके, म्हणजे देवतेचे सूक्ष्मातिसूक्ष्म कण आकर्षित करण्याची क्षमता इतर वस्तूंपेक्षा जास्त असते, अशा वस्तू देवतेला वाहिल्या, तर साहजिकच देवतेचे तत्त्व मूर्तीमध्ये येते आणि देवतेच्या चैतन्याचा लाभ आपल्याला लवकर होतो. शेंदूर, रुईची पाने आणि फुले, तसेच तिळाचे तेल यांमध्ये हनुमानाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता सर्वांत जास्त असल्याने या वस्तू हनुमानाला अर्पण कराव्यात. हनुमानाच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत वाहिल्यास, फुलांकडे हनुमानाचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. यानुसार हनुमानाला फुले वहातांना पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांवर हनुमानाचे अधिपत्य असल्याचे प्रतीक म्हणून, ती पाच किंवा पाचच्या पटीत वाहावीत.
मारुतिपूजनाच्या पूर्वी उपासकाने स्वतःला अनामिकेने (करंगळी जवळील बोटाने) शेंदूर लावावा.
हनुमानाला कोणत्या गंधाच्या उदबत्तीने ओवाळावे ?

हनुमानाची पूजा करतांना हनुमानाचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करणार्या केवडा, चमेली आणि अंबर या गंधांच्या उदबत्त्या वापराव्यात. अन्य देवतांप्रमाणेच हनुमानालाही भक्तीच्या पहिल्या टप्प्यात दोन उदबत्त्यांनी ओवाळणे अधिक योग्य आहे, तर भक्तीच्या पुढच्या टप्प्यात एका उदबत्तीने ओवाळावे. देवाला ओवाळतांना उदबत्ती उजव्या हाताची तर्जनी, म्हणजे अंगठ्याजवळील बोट आणि अंगठा यात धरून घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने तीन वेळा ओवाळावी.
मारुतीला नारळ अर्पण करण्याची पद्धत !

हनुमानाच्या देवळात जाऊन हनुमानाला नारळ अर्पण करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा. हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी. या वेळी हनुमानाची सात्त्विक स्पंदने नारळात यावीत, यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी. त्यानंतर नारळ फोडून त्याचा अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि राहिलेला अर्धा भाग तेथील स्थानदेवतेला अर्पण करावा. यामुळे स्थानदेवतेच्या माध्यमातून देवळाच्या परिसरातील त्रासदायक शक्ती अन् कनिष्ठ भुते यांना उतारा मिळून तीही संतुष्ट होतात. नंतर आपल्यासाठी ठेवलेला नारळाचा अर्धा भाग प्रसाद म्हणून ग्रहण केल्याने हनुमानाच्या सात्त्विक लहरींचा लाभ होतो. काही भाविक देवाला नारळ पूर्णतः अर्पण करतात. नारळ पूर्णतः अर्पण केल्याने त्यांच्या मनात फक्त त्यागाची भावना क्वचितच उत्पन्न होते; त्यातून त्यांना आध्यात्मिक लाभ होत नाही. यासाठी शक्यतो देवाला नारळ पूर्णतः अर्पण करू नये. त्या ऐवजी नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा.
मारुतीला किती प्रदक्षिणा घालाव्यात ?

हनुमानाच्या देवळात दर्शन घेतल्यानंतर पाच प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर हनुमानाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. अधिक संख्येत प्रदक्षिणा घालायच्या असल्यास, त्या शक्यतो किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या पटीत, म्हणजे दहा, पंधरा, वीस अशा घालाव्यात. प्रदक्षिणा घातल्याने हनुमानाकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य अल्प कालावधीत संपूर्ण देहात संक्रमित होते.
हनुमान-तत्त्व आकृष्ट करणार्या रांगोळ्या
मारुतीच्या पूजेपूर्वी, तसेच हनुमान जयंतीला घरी किंवा देवळात मारुति-तत्त्व आकृष्ट करणार्या आणि प्रक्षेपित करणार्या सात्त्विक रांगोळ्या काढाव्यात. याचे एक उदाहरण येथे दिले आहे. अशा रांगोळ्या काढल्यामुळे तेथील वातावरण मारुति-तत्त्वाने भारित होऊन त्याचा लाभ सर्वांनाच होतो. या रांगोळ्यांमध्ये पिवळा, फिकट निळा, गुलाबी यांसारखे सात्त्विक रंग भरावेत.

हनुमानाची उपासना करण्यामागील गूढार्थ समजून घेऊन तसेच उपयुक्त माहिती जाणून त्याची भक्ती भावपूर्ण केल्यास आपल्याला त्याचा अधिक लाभ होतो. अशी उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी…
सनातन संस्थेच्या ऑनलाइन
विनामूल्य सत्संगात सहभागी व्हा !
मारुतीला करावयाच्या काही प्रार्थना

आञ्जनेयाय विद्महे । वायुपुत्राय धीमहि ।
तन्नो वीरः प्रचोदयात् ।। – मारुतिगायत्री
अर्थ : आम्ही अंजनीपुत्र मारुतीला जाणतो. वायूपुत्र मारुतीचे ध्यान करतो. तो वीरमारुति आमच्या बुद्धीला सत्प्रेरणा देवो.
✔ हे मारुतिराया, तू जशी श्रीरामचंद्राची दास्यभक्ती केलीस, तशी भक्ती मलाही करण्यास शिकव, ही तुझ्या चरणी प्रार्थना.
✔ हे मारुतिराया, धर्मरक्षणासाठी तू मला भक्ती आणि शक्ती दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !
✔ हे मारुतिराया, तू जसे रामनामाच्या बळावर अधर्मी असुरांना मारलेस, तसे आता चालू असलेल्या धर्म-अधर्माच्या लढ्यात आम्हाला ‘साधना’ म्हणून राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण यांचे कार्य करता येण्यासाठी आशीर्वाद अन् बळ दे !
शनीची साडेसाती आणि मारुतीची पूजा यांचा संबंध

शनीची साडेसाती न्यून (कमी) होण्यासाठी मारुतीची पूजा करतात. त्याचा विधी पुढे दिला आहे. एका वाटीत तेल घ्यायचे. त्यात चौदा काळे उडीद टाकून त्या तेलात स्वतःचा तोंडवळा पहायचा. मग ते तेल मारुतीला वाहायचे. एखादी रुग्ण व्यक्ती जरी मारुतीच्या देवळात जाऊ शकत नसली, तरीही याच पद्धतीने तिला मारुतीची पूजा करता येते. तेलात तोंडवळ्याचे प्रतिबिंब पडते, तेव्हा वाईट शक्तीचेही प्रतिबिंब पडते. ते तेल मारुतीला वाहिल्यावर त्यातील वाईट शक्तीचा नाश होतो. खरा तेली शनिवारी तेल विकत नाही; कारण ज्या शक्तीच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी एखादा माणूस मारुतीला तेल अर्पण करत असेल, ती शक्ती तेल विकणार्याला त्रास देण्याची शक्यता असते; म्हणूनच मारुतीच्या देवळाबाहेर बसलेल्याकडून तेल विकत न घेता तेल घरून नेऊन अर्पण करावे.







जय श्रीराम जय जय श्रीराम
रामभक्त श्री हनुमान कि जय
khup sundar Shri Hanumate Namah☘️☘️☘️☘️