मारुतिविषयक मूर्तीविज्ञान

भारतातच नव्हे, तर विदेशातही मारुतीची अनेक मंदिरे आहेत. त्यांमध्ये असलेल्या मारुतीच्या मूर्तींचे रंग-रूपही निरनिराळे आहे. रंग आणि रूप यांनुसार मारुतीची निरनिराळी गुणवैशिष्ट्ये आहेत. या लेखात आपण मारुतीचा रंग अन् रूप यांनुसार लक्षात येणारी विविध प्रकारांची गुणवैशिष्ट्ये पहाणार आहोत.

हनुमान मूर्ती

१. रंग

हनुमानाची मूर्ती क्वचित काळ्या आणि बव्हंशी तांबड्या रंगाची असते. त्याचा काळा वर्ण हा शनीच्या प्रभावाने निर्माण झाला असावा. तांबड्या रंगाचा हनुमान म्हणजे शेंदूर माखलेला. हनुमानाच्या शेंदूरप्रेमाच्या कथाही आहेत.

अ. एकदा सीतेने स्नानानंतर कपाळावर शेंदुराचा टिळा लावला. हनुमानाने त्याचे कारण विचारल्यावर सीता म्हणाली, ‘‘त्यामुळे तुमच्या स्वामींचे आयुष्य वाढते.’’ तीच गोष्ट हनुमानाने लक्षात ठेवली आणि त्याने स्वतःच्या सर्वांगाला शेंदूर फासला ! हे पाहून श्रीराम प्रसन्न होऊन म्हणाला, ‘‘तुझ्यासारखा माझा कोणी भक्‍त नाही.’’ आणि श्रीरामाने हनुमानाला अमरत्व दिले; म्हणून तो सप्तचिरंजिवांपैकी एक आहे.

 

आ. हनुमान द्रोणागिरी घेऊन लंकेला जात असता भरताने त्याला बाण मारला. त्यामुळे त्याच्या पायाला जखम झाली. ती जखम शेंदूर आणि तेल लावून बरी झाल्याने हनुमानाला शेंदूर आणि तेल आवडते.

२. रूप

आकार आणि मुख यांनुसार हनुमानाच्या सर्वसाधारणतः पुढील प्रकारच्या मूर्ती आढळतात.

अ. प्रताप मारुति

प्रताप मारुतीचे स्वरूप भव्य असते. एका हातात द्रोणागिरी आणि दुसर्‍या हातात गदा, असे हे रूप असते.

 

प्रताप मारुति

आ. दासमारुति

दासमारुति हा श्रीरामापुढे हात जोडून उभा असतो. त्याचे मस्तक किंचित पुढे झुकलेले आणि पाय जुळवलेले असतात. त्या वेळी त्याची शेपटी भूमीवर रुळलेली असते.

दासमारुति

इ. वीरमारुति

वीरमारुति हा युद्धाच्या पवित्र्यात असतो. वीरमारुतीची मूर्ती वीरासन घातलेली असते. या मूर्तीच्या डाव्या हातात गदा असते. डाव्या हाताला पुढे केलेल्या डाव्या पायाच्या मांडीचा आधार देऊन ती गदा डाव्या खांद्यावर टेकवलेली असते. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवलेला असून उजवा हात अभयमुद्रेत असतो. वीरमारुतीची शेपटी वर उभारलेली असते. काही वेळा त्याच्या पायाखाली राक्षसाची मूर्ती असते. वार्इट शक्तींचा त्रास दूर करण्यासाठी वीरमारुतीची उपासना करतात. वीरमारुतीमधून शक्‍ती, तर दासमारुति हा रामाशी एकरूप झालेला असल्याने त्याच्यातून भाव आणि चैतन्य प्रक्षेपित होत असते.

 

हनुमान Hanuman
वीरमारुति

 

सुक्ष्म-चित्र : सनातन-निर्मित हनुमानाचे सात्त्विक चित्र

खालील सूक्ष्म-चित्र मोठ्या आकारात पहाण्यासाठी चित्रावर ‘क्लिक’ करा !

 

ई. पंचमुखी मारुति (पंचमुखी हनुमान)

पंचमुखी मारुतीच्या मूर्ती बर्‍याच प्रमाणात आढळून येतात. गरुड, वराह, हयग्रीव, सिंह आणि कपि ही ती पाच मुखे होत. या दशभुज मूर्तीच्या हातात ध्वज, खड्ग, पाश इत्यादी आयुधे असतात. पंचमुखी देवतेचा एक अर्थ असा आहे की, पूर्व, पश्‍चिम, दक्षिण आणि उत्तर या चार दिशा अन् ऊर्ध्वदिशा अशा पाचही दिशांना त्या देवतेचे लक्ष आहे किंवा तिचे त्यांच्यावर स्वामित्व आहे.

 

पंचमुखी मारुति
पंचमुखी मारुति

उ. दक्षिणमुखी (उजवीकडे पहाणारा) मारुति

दक्षिण हा शब्द दोन अर्थांनी वापरला जातो. एक म्हणजे दक्षिण दिशा आणि दुसरा म्हणजे उजवी बाजू.

१. दक्षिण दिशावाचक अर्थ

या मूर्तीचे तोंड दक्षिणेकडे असते, यावरून त्याला ‘दक्षिणमुखी मारुति’ असे म्हटले जाते.

२. उजवी बाजूवाचक अर्थ

या मारुतीचे तोंड त्याच्या उजव्या बाजूकडे वळलेले असते. या मारुतीची सूर्यनाडी चालू असते. सूर्यनाडी ही तेजस्वी आणि शक्‍तीदायक आहे. (गणपति आणि मारुति यांची सुषुम्नानाडी नेहमी चालू असते; पण रूप पालटल्यावर थोडा पालट होऊन त्यांची सूर्य किंवा चंद्र नाडीही थोड्या प्रमाणात चालू होते.) उजवीकडे पहाणारा मारुति हे उजव्या सोंडेच्या गणपतीप्रमाणेच कडक दैवत आहे. वाईट शक्‍तींच्या निवारणासाठी याची उपासना केली जाते.

वाममुखी मारुति

वाममुखी मारुति

दक्षिणमुखी मारुति

दक्षिणमुखी मारुति

ऊ. वाममुखी (डावीकडे पहाणारा) मारुति

वाम म्हणजे डावी बाजू किंवा उत्तर दिशा.

१. उत्तर दिशावाचक अर्थ

या मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असते.

२. डावी बाजूवाचक अर्थ

या मारुतीचे तोंड त्याच्या डाव्या बाजूकडे वळलेले असते. या मारुतीची चंद्रनाडी चालू असते. चंद्रनाडी ही शीतल आणि आनंददायी आहे. तसेच उत्तर दिशा ही अध्यात्माला पूरक आहे.

ए. अकरामुखी मारुति

या मारुतीला बावीस हात आणि दोन पाय असतात. (असा मारुति सौराष्ट्रात आहे.)

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘मारुति’

2 thoughts on “मारुतिविषयक मूर्तीविज्ञान”

Leave a Comment