मारुतीची उपासना

हनुमान Hanuman
मारुति

मारुतीचे दुसरे सर्वपरिचित नाव आहे, हनुमान. हनुमान हा सर्वशक्‍तीमान, महापराक्रमी, महाधैर्यवान, सर्वोत्कृष्ट भक्‍त आणि संगीतशास्त्राचा प्रर्वतक म्हणूनही प्रसिद्ध आहे. भाव, भक्ती, शक्ती आणि युक्ती आणि बुद्धी असे जीवनाला परिपूर्ण करणारे जे जे आहे, त्या त्या सर्वांचे मूर्तीमंत प्रतीक म्हणजे हनुमान. या मारुतीविषयी वैशिष्टपूर्ण माहिती या लेखात पाहू.

 

१. महापराक्रमी मारुति

मनोजवम् मारुततुल्यवेगम्, जितेन्द्रियम् बुदि्धमताम् वरिष्ठम् ।।
वातात्मजम् वानरयूथमुख्यम्, श्रीरामदूतम् शरणम् प्रपद्ये ।।

मनोवेगाने जाणारा, वार्‍याप्रमाणे वेगवान्, जितेंद्रिय, बुद्धीमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमुदायाचा अधिपति आणि श्रीरामाचा दूत, अशा मारुतीला मी शरण आलो आहे.

 

२. मारुतीला शेंदूर, रुईची पाने-फुले वहाणे

रुईचे फुल
रुईचे फुल

ज्या वस्तूंमध्ये देवतेची पवित्रके, म्हणजे देवतेचे सूक्ष्मातिसूक्ष्म कण आकर्षित करण्याची क्षमता इतर वस्तूंपेक्षा जास्त असते, अशा वस्तू देवतेला वाहिल्या, तर साहजिकच देवतेचे तत्त्व मूर्तीमध्ये येते आणि देवतेच्या चैतन्याचा लाभ आपल्याला लवकर होतो. शेंदूर, रुईची पाने आणि फुले, तसेच तिळाचे तेल यांमध्ये हनुमानाची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता सर्वांत जास्त असल्याने या वस्तू हनुमानाला अर्पण कराव्यात.

 

 

३. मारुतीला वाहण्यात येणार्‍या रूईच्या पानाची सूक्ष्मातील वैशिष्ट्ये

खालील सूक्ष्म-चित्र मोठे करून पहाण्यासाठी चित्रावर क्लिक करा !

1428039898_hanuman_rui

 

४. मारुतीला फुले वाहाण्याची पद्धत

हनुमानाच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत वाहिल्यास, फुलांकडे हनुमानाचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. यानुसार हनुमानाला फुले वहातांना पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांवर हनुमानाचे अधिपत्य असल्याचे प्रतीक म्हणून, ती पाच किंवा पाचच्या पटीत वाहावीत.

 

५. मारुतीच्या पूजेत वापरायच्या उदबत्त्या

हनुमानाची पूजा करतांना हनुमानाचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करणार्‍या केवडा, चमेली आणि अंबर या गंधांच्या उदबत्त्या वापराव्यात.

अन्य देवतांप्रमाणेच हनुमानालाही भक्‍तीच्या पहिल्या टप्प्यात दोन उदबत्त्यांनी ओवाळणे अधिक योग्य आहे, तर भक्‍तीच्या पुढच्या टप्प्यात एका उदबत्तीने ओवाळावे. देवाला ओवाळतांना उदबत्ती उजव्या हाताची तर्जनी, म्हणजे अंगठ्याजवळील बोट आणि अंगठा यात धरून घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने तीन वेळा ओवाळावी.

 

६. मारुतीला नारळ अर्पण करण्याची पद्धत

हनुमानाच्या देवळात जाऊन हनुमानाला नारळ अर्पण करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. नारळ अर्पण करण्यापूर्वी हनुमानाच्या मूर्तीसमोर हातात धरावा. हातात धरलेल्या नारळाची शेंडी मूर्तीकडे असावी. या वेळी हनुमानाची सात्त्विक स्पंदने नारळात यावीत, यासाठी हनुमानाला प्रार्थना करावी. त्यानंतर नारळ फोडून त्याचा अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि राहिलेला अर्धा भाग तेथील स्थानदेवतेला अर्पण करावा. यामुळे स्थानदेवतेच्या माध्यमातून देवळाच्या परिसरातील त्रासदायक शक्‍ती अन् कनिष्ठ भुते यांना उतारा मिळून तीही संतुष्ट होतात. नंतर आपल्यासाठी ठेवलेला नारळाचा अर्धा भाग प्रसाद म्हणून ग्रहण केल्याने हनुमानाच्या सात्त्विक लहरींचा लाभ होतो. काही भाविक देवाला नारळ पूर्णतः अर्पण करतात. नारळ पूर्णतः अर्पण केल्याने त्यांच्या मनात फक्‍त त्यागाची भावना क्वचितच उत्पन्न होते; त्यातून त्यांना आध्यात्मिक लाभ होत नाही. यासाठी शक्यतो देवाला नारळ पूर्णतः अर्पण करू नये. त्याऐवजी नारळ फोडून नारळाचा अर्धा भाग देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा आणि देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा.

 

७. नारळ उतरवणे आणि तो मारुतीच्या देवळात फोडणे

एखाद्या व्यक्‍तीला अनिष्ट शक्‍तीचा त्रास असल्यास, तो दूर करण्यासाठी त्या व्यक्‍तीवरून नारळ उतरवावा आणि त्यानंतर तो हनुमानाच्या देवळात फोडावा. व्यक्‍तीवरून नारळ उतरवल्याने व्यक्‍तीतील अनिष्ट शक्‍ती नारळात येते.

असा नारळ हनुमानाच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी अनिष्ट शक्‍ती हनुमानाच्या सामर्थ्याने नष्ट होते.

 

८. मारुतीला प्रदक्षिणा घालणे

हनुमानाच्या देवळात दर्शन घेतल्यानंतर पाच प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर हनुमानाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. अधिक संख्येत प्रदक्षिणा घालायच्या असल्यास, त्या शक्यतो किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या पटीत, म्हणजे दहा, पंधरा, वीस अशा घालाव्यात. प्रदक्षिणा घातल्याने हनुमानाकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य अल्प कालावधीत संपूर्ण देहात संक्रमित होते.

 

९. आध्यात्मिक त्रास निर्मूलनासाठी मारुतीला तेल वाहाणे

हनुमानाच्या उपासनेने शनिग्रहपीडाही दूर करता येते. याचा विधी याप्रमाणे आहे. एका वाटीत तेल घ्यावे. त्यात चौदा काळे उडीद टाकून त्या तेलात स्वतःचा चेहरा पहावा. मग ते तेल हनुमानाला वाहावे. एखादी आजारी व्यक्‍ती जर अनिष्ट शक्‍तीच्या त्रासामुळे आजारी असल्याने हनुमानाच्या देवळात जाऊ शकत नसली, तरीही तिने पाहिलेले तेल अन्य व्यक्‍तीने हनुमानाला वाहिले, तरीही त्याचा परिणाम होतो. तेलात चेहर्‍याचे प्रतिबिंब पडते, तेव्हा अनिष्ट शक्‍तीचेही प्रतिबिंब पडते. ते तेल हनुमानाला वाहिल्यावर त्यातील अनिष्ट शक्‍तीचा नाश होतो.

 

१०. मारुतीला वाहायचे तेल घरून घेऊन जाणे

हनुमानाला वहायचे असलेले तेल हनुमानाच्या देवळाबाहेर बसलेल्या तेलविक्रेत्याकडून विकत न घेता घरून नेऊन वाहावे. याचे कारण म्हणजे एखादी व्यक्‍ती ज्या अनिष्ट शक्‍तीच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी तेलविक्रेत्याकडून तेल विकत घेऊन ते हनुमानाला वाहात असेल, ती अनिष्ट शक्‍ती त्या तेलविक्रेत्याला त्रास देण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी तेल घरून नेऊन वाहावे.

 

११. आध्यात्मिक त्रासापासून रक्षण होण्यासाठी मारुतीची उपासना करणे

हनुमान हा सर्वशक्‍तीमान असल्यानेच त्याला भूत, पिशाच, राक्षस, समंध इत्यादी कोणत्याही अनिष्ट शक्‍ती त्रास देऊ शकत नाहीत. लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते हनुमानाला काही करू शकले नाहीत. अनिष्ट शक्‍तींपासून रक्षण होण्यासाठी केलेली हनुमानाची उपासना म्हणूनच विशेष फलदायी ठरते. व्यक्‍तीला अनिष्ट शक्‍तींचा त्रास असल्यास तो दूर होण्यासाठी तिला हनुमानाच्या देवळात नेणे, तिने पाहिलेले तेल अन्य व्यक्‍तीने हनुमानाला वहाणे, त्रास असणार्‍या व्यक्‍तीवरून नारळ उतरवून मग तो नारळ मारुतीच्या देवळात फोडणे, तिला मारुतिस्तोत्र म्हणण्यास सांगणे, तिला हनुमानाचा नामजप करण्यास सांगणे, यांसारखे उपाय करता येतात.

 

१२. बलोपासना करून हनुमंताची कृपा संपादा !

धर्म-अधर्म यांच्या लढ्यातील महत्त्वाचे दैवत म्हणजे हनुमंत ! हनुमंताने त्रेतायुगात रावणाविरुद्धच्या युद्धात प्रभु श्रीरामास सहकार्य केले, तर द्वापरयुगात महाभारताच्या घनघोर युद्धात तो कृष्णार्जुनाच्या रथावर विराजमान होता. हिंदुस्थानात मोगली सत्ता अत्याचाराचे थैमान घालत होत्या, त्या वेळी महाराष्ट्रात बलोपासना रुजवण्यासाठी समर्थ रामदासस्वामींनी हनुमंताच्या मूर्तींची ११ ठिकाणी स्थापना केली आणि हिंदूंमध्ये ‘हिंदवी स्वराज्या’च्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘मारुति’

1 thought on “मारुतीची उपासना”

Leave a Comment