मारुतिस्तोत्र

हनुमान Hanuman

मारुति

स्तोत्र’ म्हणजे देवतेचे स्तवन, म्हणजेच देवतेची स्तुती होय. स्तोत्रपठण केल्याने पठण करणार्‍या व्यक्‍तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षककवच निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्‍तींपासून रक्षण होते. ज्या वेळी ठराविक लयीत अन् सुरात एखादे स्तोत्र म्हटले जाते, त्या वेळी त्या स्तोत्रातून एक विशिष्ट चैतन्यदायी शक्‍ती निर्माण होते. बहुतांश स्त्रोत्र संतांनी लिहिली असल्याने त्यात चैतन्य आहे आणि त्या चैतन्याचा लाभ ते म्हणणार्‍याला होतो. असेच चैतन्यमय स्त्रोत्र असलेले मारुतीस्त्रोत्र एकूया.

समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेले मारुतिस्तोत्र

समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेल्या मारुतिस्तोत्रात ते विविध नावांनी मारुतीच्या रूपाचे वर्णन आणि त्याची स्तुती करतात. स्तोत्रातील आरंभीचे तेरा श्‍लोक मारुतीच्या स्तुतीपर अन् वर्णनपर आहेत, तर नंतरचे चार श्‍लोक स्तोत्रपठणाच्या फलश्रुतीचे आहेत. ऐकूया तर समर्थ रामदासस्वामी रचित मारुतिस्तोत्र सनातनचे साधक पुरोहित श्री. दामोदर वझे गुरुजी यांच्या आवाजात..

मारुतिस्तोत्र

भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती । वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ।।१।। महाबळी प्राणदाता, सकळां उठवीं बळें । सौख्यकारी शोकहर्ता (टीप १), धूर्त वैष्णव गायका ।।२।। दिनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदंतरा । पाताळदेवताहंता, भव्य सिंदूरलेपना ।।३।। लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना । पुण्यवंता पुण्यशीला, पावना परतोषका ।।४।। ध्वजांगे उचली बाहू, आवेशें लोटिला पुढें । काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ।।५।। ब्रह्मांड माईला (टीप २) नेणों, आवळें दंतपंगती । नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भृकुटी त्राहिटिल्या बळें ।।६।। पुच्छ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं । सुवर्णकटीकासोटी, घंटा किंकिणी नागरा ।।७।। ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू । चपळांग पाहतां मोठें, महाविद्युल्लतेपरी ।।८।। कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे । मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ।।९।। आणिता मागुता नेला, गेला आला मनोगती । (टीप ३) मनासी टाकिलें मागें, गतीस (टीप ४) तूळणा नसे ।।१०।। अणूपासोनि ब्रह्मांडा, येवढा होत जातसे । तयासी तुळणा कोठें, मेरुमंदार धाकुटें ।।११।। ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छ घालूं (टीप ५) शके । तयासि तूळणा कैचीं, ब्रह्मांडीं पाहतां नसे ।।१२।। आरक्त देखिलें डोळां, गिळीलें (टीप ६) सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ।।१३।। धनधान्यपशुवृद्धी, पुत्रपौत्र समग्रही । पावती रूपविद्यादी, स्तोत्र पाठें करूनियां ।।१४।। भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही । नासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शनें ।।१५।। हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली बरी । दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणें ।।१६।। रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासी मंडण (टीप ७) । रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ।।१७।। ।। इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।। ।। श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ।। टीप १ – दुःखहारी (मूळ स्थानी) टीप २ – ब्रह्मांडे माईले (मूळ स्थानी) टीप ३ – आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती । (मूळ स्थानी) टीप ४ – गतीसी (मूळ स्थानी) टीप ५ – वङ्कापुच्छे करू (मूळ स्थानी) टीप ६ – ग्रासिले (मूळ स्थानी) टीप ७ – मंडणू (मूळ स्थानी) हे ऐकून स्तोत्र पठण करणार्‍यांना जास्तीतजास्त आध्यात्मिक लाभ होवो, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र (अर्थासह)’

2 thoughts on “मारुतिस्तोत्र”

 1. याची mp 3 डाउनलोड उपलब्ध होऊ शकणार नाही का ? प्रत्येक वेळेस online होणे शक्य होत nahi

  Reply
  • नमस्कार श्री. चंद्रकांत मेहेत्रेजी,

   कृपया यासाठी आमचे ‘सनातन चैतन्यवाणी’ हे Android app ‘गुगल प्लेस्टोअर’च्या पुढील लिंक वरून विनामूल्य डाऊनलोड करू शकता : https://play.google.com/store/apps/details?id=sanatan.audios.musicplayer
   या App मध्ये संकेतस्थळावरील नामजप, स्तोत्र, आरती, मंत्र इत्यादी सात्त्विक ऑडिओ उपलब्ध आहेत. हे ऑडिओ केवळ एकदाच इंटरनेट वापरून ऐकावे लागतात, नंतर ते offline ऐकू शकतो. (म्हणजे एखादा ऑडिओ दुस-यंदा ऐकण्यासाठी विना इंटरनेट ऐकू शकतो.)

   आपली,
   सनातन संस्था

   Reply

Leave a Comment