सनातनच्या ८ व्या संत पू. श्रीमती प्रेमा कुवेलकरआजी (भाग २)

अनुक्रमणिका

४. सनातनच्या आठव्या संत पू. कुवेलकरआजी यांनी त्यांच्या साधनेविषयी सांगितलेली सूत्रे आणि त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती

५. पू. प्रेमा कुवेलकरआजींच्या बोलण्यात आणि पहाण्यातसुद्धा प्रेम जाणवणे अन् त्यांची त्वचा एकदम मऊ झालेली आणि त्वचेवर चमकही जाणवणे


३ आ. सौ. रूपा नागराज कुवेलकर (सूनबाई), कवळे, फोंडा, गोवा.

‘आज भाऊबिजेच्या दिवशी ज्यांचा सत्कार झालेला आहे, त्या माझ्या सासूबाई आहेत; पण मी म्हणेन की, त्या सासूबाई नसून माझ्या आई आहेत; कारण त्यांनी आजपर्यंत कधीच सासूची सत्ता गाजवलेली नाही. त्यांनी माझ्यावर आईपेक्षा जास्त प्रेम केले आहे. त्यांची देवावर अधिक श्रद्धा असून देवाप्रती त्यांना प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी आजपर्यंत प्रत्येक संकटावर मात केली आहे.

३ आ १. देवावर अधिक श्रद्धा असणे

अ. सद्गुरु आईंना घरात बसल्या जागी देवतांची दर्शने होतात आणि देवता त्यांच्याशी बोलतात.

आ. ‘देव आणि परात्पर गुरु डॉक्टर सर्व व्यवस्थित करतील. आपण नकारात्मक विचार करू नये’, असे त्या सांगतात. त्यांची परात्पर गुरु डॉक्टरांवर पुष्कळ श्रद्धा आहे.

इ. आम्हाला काही त्रास झाल्यास आम्ही सद्गुरु आईंना ‘सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांना विचारा’, असे सांगतो. त्या सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांना विचारून आम्हाला सांगतात.’

३ आ २. प्रेमळ स्वभाव

त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे. तसेच त्यांच्या तोंडवळ्यावर नेहमीच प्रसन्नता आणि तेज असते.

३ आ ३. गावात मान असणे

गरीब परिस्थिती असल्याने कधी कधी घरात स्वयंपाकासाठी वस्तू न्यून असायच्या; पण त्यांनी लोकांकडे कधीच हात पसरला नाही. आहे त्या सामग्रीमध्ये स्वयंपाक करून वाढला. त्यामुळे त्यांना गावात मान आहे. मी गावात फिरतांना लोक मला एकच सांगतात, ‘‘तुझी सासू फार चांगली आहे. तिचे चांगले कर.’’

३ आ ४. या घरात विवाह होऊन आल्यावर सासूबाईंमुळेच देवावरची श्रद्धा वाढणे

माझ्या विवाहाआधी माझी देवावर तेवढी श्रद्धा नव्हती; पण या घरात विवाह होऊन आल्यावर सासूबाईंमुळेच माझी देवावरची श्रद्धा वाढली. त्या नेहमीच दुसर्‍यांना चांगला बोध करतात. त्यांच्याविषयी लिहावे तेवढे थोडेच आहे. मी कधी रुग्णाईत असतांना त्या माझी मुलीप्रमाणे काळजी घेतात. त्यांनी केलेल्या भक्तीमुळेच आम्ही आज आमच्या संसारात सुखी आहोत. स्वतःला कितीही त्रास असला, तरी तो त्या आपल्या तोंडवळ्यावर दाखवत नाहीत. मला एवढी चांगली सासू लाभल्यासाठी मी देवाच्या चरणी खरेच कृतज्ञ आहे.’

३ आ ५. शांत

‘घरात कुणाचे काही चुकल्यास सद्गुरु आई न रागावता त्यांना शांतपणे चूक समजावून सांगतात. सद्गुरु आईंनी सांगितलेले दुसर्‍यांना पटते. सद्गुरु आई आजपर्यंत कधीच मोठ्या आवाजात बोलल्या नाहीत.

३ आ ६. सुनेला आईचे प्रेम देणे

सद्गुरु आई माझ्यावर मातेसमान प्रेम करतात. त्यांनी आजपर्यंत मला कधीच वाईट वागणूक दिली नाही. पूर्वी मला अल्पाहाराचे काही पदार्थ येत नव्हते. सद्गुरु आईंनी मला ते पदार्थ करायला शिकवले. आम्हाला मूलबाळ नसले, तरी त्यांनी आम्हाला त्याची कधीच जाणीव करून दिली नाही.

३ आ ७. सुनेच्या आजारपणात तिची सेवा करणे

माझे हात आणि पाय यांवर गाठी यायच्या. त्या वेळी सद्गुरु आई गरम पाण्यात कापड भिजवून त्या कापडाने माझे हात आणि पाय शेकायच्या अन् नंतर त्या भागावर तेलाने मर्दन करायच्या. मी रुग्णाइत असतांना त्या माझ्यावर घरगुती उपाय करायच्या आणि देवीचा अंगारा लावायच्या.

३ इ. श्री. मनोज नारायण कुवेलकर (लहान मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३ इ १. आईमुळेच सनातन संस्थेमध्ये येऊन ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे ध्येय गाठू शकणे

‘मी सनातन संस्थेमध्ये येण्याचे सर्व श्रेय आईला जाते. १९९० या वर्षी माझे शिक्षण झाल्यावर मावशीने मला चाकरीसाठी मुंबईला बोलवले होते; पण वडील पाठवायला घाबरत होते. ‘तिथे गेल्यावर वाईट संगत आणि व्यसने लागतात’, असे ते ऐकून होते. त्यामुळे ते मला पाठवायला सिद्ध नव्हते; पण आईने त्यांना सांगितले, ‘‘आपली कुलदेवता आहे, ती त्याचे रक्षण करील. तसेच वाईट संगत आणि वाईट व्यसने यांपासून दूर ठेवील, याची मला निश्चिती आहे.’’ नंतर वडिलांनी मला जायला अनुमती दिली. आईच्या श्री शांतादुर्गेवरच्या श्रद्धेमुळे मला वाईट संगत किंवा व्यसन न लागता ईश्वराचे व्यसन लागले आणि मी सनातन संस्थेमध्ये आलो. अशा प्रकारे चांगल्या मार्गाला लागून ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे ध्येय गाठले. हे जे घडले ते आईमुळे. तिने केलेले हे ऋण मी कधीच विसरणार नाही. मी तिच्या चरणी कृतज्ञ आहे.

३ इ २. सकारात्मक विचार करण्यास शिकवून आश्रमात सर्वांशी आणि सेवेशी प्रामाणिक रहाण्याची शिकवण देणे, तसेच दोषनिर्मूलनही करायला सांगणे

आईला कधी राग येतच नव्हता. लहानपणापासून आतापर्यंत आम्ही कुणाविषयी राग येण्यासारखे बोललो, तर आम्हाला ती थोड्या वेळाने समजवायची, ‘‘सतत सकारात्मक विचार ठेवा. तो शत्रू असला, तरी त्याच्याविषयी नकारात्मक विचार करून आपल्याला काही मिळणार नाही. उलट आपण देवापासून दूर जातो. आपल्याला देवाच्या जवळ जायचे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करा.’’ आई मला सांगत असे, ‘‘आश्रमात सर्वांशी, तसेच सेवेशी प्रामाणिक रहा. तुझ्यात ‘प्रेमभावाचा अभाव’ हा दोष आहे. तो घालवण्याचा प्रयत्न कर. तसेच आणखी काही दोष असेल, तर तो घालव, म्हणजे तू लवकर ईश्वराच्या जवळ जाशील. प.पू. डॉक्टर बसलेले आहेत आम्हाला पुढे नेण्यासाठी. त्यांना जसे आवडते, तसे वाग. साधकांना दुखवू नकोस. सर्व साधकांमध्ये ईश्वराला बघ, म्हणजे नकारात्मक विचार येणार नाहीत.’’ अशा आईच्या पोटी जन्माला आल्याविषयी प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

३ इ ३. आईला चांगले-वाईट घडण्याविषयी पूर्वसूचना मिळणे

आईला चांगले-वाईट काही घडणार असले, तर पूर्वसूचना मिळायच्या. त्याचे एक उदाहरण सांगतो. मी ‘आय.टी.आय’. ला इलेक्ट्रॉनिक शिकत असतांनाची गोष्ट आहे. एकदा रात्री आईला स्वप्नामध्ये दिसले, ती शांतादुर्गेच्या मंदिरात गेली आहे. तेथे एक सुवासिनी आली आणि आईला म्हणाली, ‘तुझी ओटी मोठी कर. सर्व देवांची राखण म्हणून मी तुझी ओटी भरते.’ नंतर आईला जाग आली. दुसर्‍या दिवशी मी ‘आय.टी.आय’. मधून घरी येतांना धावत्या गाडीतून खाली पडलो; पण मला काही लागले नाही.

३ इ ४. मनातून साईबाबांना विचारून झाडपाल्याचे औषध लावणे, त्यामुळे रोग पूर्ण बरा होणे

माझे १ ली ते ३ री पर्यंतचे शिक्षण अंकोल्याला झाले. त्या काळी एकदा सायकलला आपटून माझ्या गुडघ्याला मार बसला होता. त्या वेळी आधुनिक वैद्यांकडे नेऊन जास्त लाभ झाला नाही. तेव्हा आईने मनातून साईबाबांना विचारून झाडपाल्याचे औषध लावले. त्या औषधामुळे माझा व्रण लवकर भरून आला.

३ इ ५. बहिणीच्या विवाहाच्या दोन दिवस आधी कुटुंबातील एक व्यक्ती मरण पावल्यामुळे सुतक येणे, तेव्हा विवाह मोडेल; म्हणून भावाला रडू येणे, आईने ‘शांतादुर्गा आणि प.पू. डॉक्टर आहेत, ते काही वाईट होऊ देणार नाहीत’, असे सांगणे आणि तसेच घडणे

१९९५ मध्ये माझ्या बहिणीचा विवाह ठरला होता. सगळी सिद्धता झाली होती. पत्रिका वाटून झाल्या होत्या. विवाहाच्या दोन दिवस आधी आमच्या कुटुंबातील कोणीतरी व्यक्ती मरण पावली. त्यामुळे आम्हाला सुतक आले. माझ्या भावाने विवाहाची सर्व धावपळ केली होती. अपशकून झाला; म्हणून त्याला जास्त वाईट वाटले आणि तो रडायला लागला. त्याला वाटले, ‘आता विवाह मोडेल’; पण त्या वेळी आईने त्याचे सांत्वन करत सांगितले, ‘‘तू काही काळजी करू नकोस; कारण शांतादुर्गा आणि प.पू. डॉक्टर आहेत. ते काही वाईट होऊ देणार नाहीत. तेव्हा तू बहिणीच्या सासर्‍यांना जाऊन सांग.’’ भावाने बहिणीच्या सासर्‍यांना तसे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘काही काळजी करू नकोस. अपशकून इत्यादी काही झालेले नाही. आपण त्या दिवशी विवाह न करता नुसता स्वागत-समारंभ (रिसेप्शन) करू आणि सुतक संपल्यावर लहान प्रमाणात विवाह करू.’’ त्या वेळी मला आणि भावाला अधिक बरे वाटले. आईने सांगितले तसेच झाले.

आईची एवढ्या वर्षांची साधना तसेच तप यांचे फळ आज भाऊबिजेच्या दिवशी प.पू. डॉक्टरांनी तिला दिल्यामुळे मला अधिकच आनंद झाला. प.पू. डॉक्टरांच्या चरणी मी कृतज्ञ आहे. माझीही साधना आईसारखी तुम्हीच करून घ्या, ही तुमच्या चरणी प्रार्थना. अशा आईच्या पोटी मला जन्माला घातल्यामुळे मी ईश्वराचा पूर्णतः ऋणी आहे.’

३ इ ६. अनुभूती
३ इ ६ अ. कडक ऊन असतांना ‘पाऊस येणार आहे’, असे आईने सांगणे आणि तसेच घडणे

मी प्रतिदिन आश्रमात येण्याआधी देवघरातील देवांची पूजा करून येतो. ऑगस्ट २०११ मध्ये एकदा सकाळी कडक ऊन पडले होते. देवघर घराच्या बाहेर अंगणात आहे. त्या दिवशी पूजेला जातांना आई म्हणाली, ‘‘छत्री घेऊन जा, पाऊस येईल आणि तू भिजशील.’’ मी म्हटले, ‘‘एवढे ऊन आहे !’’ आणि छत्री न घेता गेलो. नंतर पूजा संपतांना काळोख होऊन मोठा पाऊस आला. आईचे न ऐकल्यामुळे मला भिजत यावे लागले.

३ इ ६ आ. कटीदुखीवर आईने सांगितलेला उपाय केल्यावर ती लगेच बरी होणे

आश्विन पौर्णिमा, कलियुग वर्ष ५११३ (१२.१०.२०११) या दिवसापासून माझी कटी (कंबर) पुष्कळ दुखत होती. त्यामुळे मला अधिक वेळ बसता येत नव्हते. तसेच झोपायलाही त्रास होत होता. झोप लागत नव्हती. मी आधुनिक वैद्यांकडून औषध घेतल्यावर मला तेवढ्यापुरते बरे वाटायचे. त्या गोळ्यांचा परिणाम संपला की, पुन्हा दुखणे चालू व्हायचे. नंतर मी आईला म्हटले, ‘‘कटी जास्तच दुखते.’’ ती म्हणाली, ‘‘देवघरात दिवा लावलेला आहे. त्याच्याखालच्या ताटलीमध्ये दिव्याचे तेल सांडलेले आहे. ते कटीला लाव, म्हणजे चांगले वाटेल.’’ मी लगेच तसे केले. थोड्या वेळाने कटी दुखायची थांबली.’

– श्री. मनोज कुवेलकर (पू. प्रेमा कुवेलकर यांचा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

४. सनातनच्या आठव्या संत पू. कुवेलकरआजी यांनी त्यांच्या
साधनेविषयी सांगितलेली सूत्रे आणि त्यांच्याविषयी आलेल्या अनुभूती

सनातनच्या संतरत्न पू. प्रेमा कुवेलकर !

सनातनच्या संतरत्न पू. प्रेमा कुवेलकर !

४ अ. नामजपातील गुणवत्तेत वाढ होणे

४ अ १. नामजपात अखंडत्व येणे

नामजपात अखंडता असते. झोपेतून जागे झाल्यावरही नामजप सुरूच असतो; कारण पू. आजी ‘झोपेतही नामजप अखंड सुरू राहू दे’, अशी श्रीकृष्णाला प्रार्थना करतात.

शास्त्र : भावनांचे प्रमाण कमी झाले की, मायेच्या विचारांपासून अलीप्तता येते आणि नामात अखंडत्व येते; कारण मनात ‘नाम हाच एक विचार’ रहातो.

४ अ २. नामजप अधिक गुणवत्तेने झाल्याने वाईट शक्तींनी कधी कधी पू. आजींना त्रास देण्याचा प्रयत्न करणे आणि त्रासाचे स्वरूप
४ अ २ अ. थकवा येणे

नामजप करतांना कधी कधी खूप थकवा येतो, डोके दुखते.

४ अ २ आ. श्रीकृष्णाने सूक्ष्मातून उपाय सांगितल्याप्रमाणे उपाय केल्याने एक महिनाभर सुरू असणारी कंबरदुखी दोन-तीन दिवसांतच बरी होणे

एकदा तर कंबरदुखीचे प्रमाण खूप वाढले होते. एक महिनाभर कुठल्याच औषधाने ती बरी होत नव्हती. तेव्हा श्रीकृष्णाने लामणदिव्यातील थेंब थेंब खाली गळणारे तेल लावायला सांगितल्यावर दोन दिवसांत कंबरदुखी पूर्णपणे गेली.

४ आ. प्रार्थनेत सातत्य येणे

सर्व प्रसंगांत, तसेच साधकांना होणारे वाईट शक्तींचे त्रास दूर होण्यासाठी दिवसभरात अधिकाधिक प्रार्थना होतात. पूर्वी एवढ्या प्रार्थना होत नव्हत्या.

शास्त्र : सेवाभावात वाढ झाली की, आपोआप देवाशी बोलण्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे प्रार्थनेत सातत्य येऊ लागते.

४ इ. अनुभूती येणे अल्प होणे

पूर्वी कुलदेवी ‘श्री शांतादुर्गादेवी’ विषयीच्या अनुभूती खूप यायच्या. आता अनुभूतीकमी होत चालल्या आहेत. आतून शांत वाटते.

४ ई. चराचरात ईश्वर दिसण्याएवढे व्यापकत्व येणे

४ ई १. प्रत्येकात श्रीकृष्ण दिसणे

घरात कुणाबद्दलही कसल्याच प्रतिक्रिया येत नाहीत. प्रत्येकात श्रीकृष्णच दिसत असल्याने त्याच्याशीच संधान साधले जाते.

४ ई २. श्रीकृष्ण स्वतःच्या हृदयात दिसणे

‘श्रीकृष्ण स्वतःच्या हृदयात ‘पंढरपूरच्या विठोबासारखा’ कमरेवर हात ठेवून साक्षीभावात उभा आहे’, असे दिसते.

४ उ. पू. कुवेलकरआजींविषयी आलेल्या अनुभूती

४ उ १. देहात नामाचा नाद सुरू होणे

पू. कुवेलकरआजींचा हात हातात घेतल्यावर माझ्या देहात नामाचा नाद आपोआप सुरू झाला.

४ उ २. पू. आजींच्या देहातील जडत्व चैतन्यामुळे नाहीसे होणे

पू. आजींच्या हाताचा स्पर्श अत्यंत मुलायम आहे. त्यांच्या देहात काहीच नाही, असे वाटते. त्यांच्या देहाचे जडत्व त्यांच्यातील चैतन्यामुळे नाहीसे झाले आहे.

४ उ ३. डोळ्यांतील भावस्पर्शीपणा !

पू. आजींचे डोळे भावस्पर्शी, तसेच पारदर्शक वाटतात.

४ उ ४. वाणीतील गोडवा वाढणे

त्यांच्या वाणीत गोडवा आहे. ‘त्यांचे शब्द थेट आपल्या अंतःकरणात जाऊन प्रवेश करत आहेत’, असे जाणवते आणि या शब्दांच्या स्पर्शाने मनाला आनंद होतो.

४ ऊ. पू. आजींच्या सहवासाने दैवीगुणसंपन्नतेची अनुभूती येणे

‘जेथे दैवीगुणसंपन्नता येते, तेथे संतपद प्राप्त होते’, याचीच अनुभूती पू. आजींच्या सहवासाने आली.

‘हे ईश्वरा, पू. आजींसारखी गुणसंपन्नता आमच्यातही येऊ दे आणि आम्हाला तुझ्या चरणांजवळ स्थान मिळू दे’, हीच तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना !

– सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (कार्तिक शु. ४, कलियुग वर्ष ५११३ (३०.१०.२०११))

५. पू. प्रेमा कुवेलकरआजींच्या बोलण्यात आणि पहाण्यातसुद्धा प्रेम जाणवणे
अन् त्यांची त्वचा एकदम मऊ झालेली आणि त्वचेवर चमकही जाणवणे

पू. आजींच्या त्वचेवर चमक जाणवणे !

पू. आजींच्या त्वचेवर चमक जाणवणे !

‘पू. आजींच्या डोळ्यांकडे पाहिल्यावर त्यांच्याकडे पहातच रहावेसे वाटते. पू. आजी नावाप्रमाणेच प्रेमळ आहेत. त्यांच्या बोलण्यात आणि पहाण्यातसुद्धा प्रेम जाणवते. त्यांची त्वचा एकदम मऊ झालेली जाणवली. त्यांच्या त्वचेवर चमकही जाणवली. आजींचे वय आणि त्यांचे आजारपण या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे पाहून जाणवत नाहीत.’- सौ. श्रद्धा पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment